डिझायनर मंत्रा : तेजश्री गायकवाड

इंटरनेटवर भारतीय फॅशन डिझायनर्सची यादी पहायची म्हटली तरी त्यात तरुण ताहिलियानी हे नाव ठळकपणे दिसेल. या अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवणाऱ्या या डिझायनरचा फॅशन इंडस्ट्रीतीलप्रवासही प्रेरणा देणारा आहे.

आधुनिक विचार, आधुनिक डिझाइन्स आणि त्याला पारंपरिक कलेची जोड देत वर्षांनुवर्षे फॅशनइंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभा असलेला डिझाइनर म्हणजे तरुण ताहिलियानी. फॅशनविश्वातील अग्रणी म्हणून तरुणचे नाव घेतले जाते.मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबादसारख्या मोठय़ा भारतीय शहरांमध्ये त्याची बुटीक तर आहेतच. परंतु त्याचबरोबरीने अमेरिका, जपान तसेच ऑस्ट्रेलिया अशा देशांतही त्याने डिझाइन केलेले कपडे प्रसिद्ध आहेत. इंटरनेटवर भारतीय फॅशन डिझाइनर्सची यादी पाहायची म्हटली तरी त्यात तरुण ताहिलियानी हे नाव ठळकपणे दिसेल. या अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवणाऱ्या या डिझाइनरचा फॅशन इंडस्ट्रीतीलप्रवासही प्रेरणा देणारा आहे.

तरुणचा जन्म मुंबईतलाच आहे. मात्र वडिलांच्या नोकरीमुळे लहानपणापासूनच भारतातील अनेक भागांत फिरावे लागल्यामुळे तो वेगवेगळ्या प्रांतात लहानाचा मोठा झाला. वयाच्या सहाव्या, सातव्या वर्षांपासूनच स्केचिंगची आवड असणाऱ्या तरुणने फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी अभ्यास तर केलाच. परंतु सोबतच आपल्याला कलेला वाव मिळवून देण्यासाठी त्याने मल्टी ब्रँड स्टोअर सुरू करण्याचा विचार केला होता. त्याने या व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असं पदवी शिक्षणही पूर्ण केलं. या प्रवासाविषयी तरुण  सांगतो, जेव्हा मी सहा-सात वर्षांचा होतो तेव्हापासूनच मला फॅशनचे रेखाटन करायला आवडायचं. मी जेव्हा  सर्वोत्कृष्ट कलाकाराचं पारितोषिक जिंकलं तेव्हा माझे प्रोफेसर माझ्याकडे आले आणि म्हणाले की हे छान आहे. परंतु हे नुसतंच रेखाटणं तुला आयुष्यात पुढे कुठे घेऊन जाईल? की केवळ तुला हे आवडतंय म्हणून तू केलं आहेस? त्यांच्या याच प्रश्नांनंतर तरुणने आपल्याला काय करायचं आहे हे निश्चित केलं. त्याने व्हार्टन येथे व्यवसायाचा अभ्यास केला आणि १९९१ मध्ये तरुणला ‘फॅशन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, न्यूयॉर्क’मधून सहयोगी पदवी मिळाली. नंतर तो भारतात परतला. ‘दोन दशकांपूर्वी जेव्हा मी भारतात परत आलो तेव्हा माझे पहिले आव्हान होते ते म्हणजे भारतीय लोकांची फॅशनच्या बाबतीतील मानसिकता बदलणे. उदाहरणार्थ, मला साध्या रंगांची आवड आहे, परंतु भारतीय दृष्टिकोनातून मी खूप बेज, खाकी आणि गुलाबी, केशरी आणि हिरवा रंग अशा रंगांचा वापर कपडय़ांमध्ये पाहिला. हे रंग आणि कपडय़ांचे पॅटर्न्‍स माझ्या दृष्टीने खूप भडक होते. म्हणून मग मी पूर्वेकडील काही चांगल्या गोष्टी आणि पश्चिमेकडील काही सर्वोत्कृष्ट गोष्टी घेतल्या. त्या एकत्र आणून काहीतरी वेगळं डिझाइन करण्याचा प्रयत्न मी केला’, असं त्याने सांगितलं.

‘पॅटर्न आणि फिट यांचं लग्न लावून मी ‘रेडी टू वेअर’ या संकल्पनेला सुरुवात केली’, असं तो म्हणतो. सुरुवातीच्या काळात जेव्हा पॅटर्न किंवा स्लीव्ह कशी कट करायची हेही मला माहिती नव्हतं तेव्हा मी ‘एन्सेम्बल’ हे मल्टी ब्रँड शॉप उघडलं. सर्वोत्कृष्ट भारतीय डिझाइन्स कशी आहेत त्याचा प्रचार करण्यासाठी मी माझ्या पत्नीबरोबर हे स्टोअर सुरू केलं होतं. या स्टोअरमुळे भारतात फॅशनजगतात क्रांती झाली, असं तो म्हणतो. कारण त्या वेळी डिझाइनर कपडे ही संकल्पनाच मुळी देशभर पोहोचवणं गरजेचं होतं जे काम या स्टोअरमुळे घडल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर १९९५ मध्ये ‘तरुण ताहिलियानी डिझाइन स्टुडिओ’ची स्थापना त्याने केली. एक फॅशन डिझाइनर म्हणून या क्षेत्रातला तरुणचा आवडता भाग म्हणजे डिझाइन्स स्केच करणं. स्केचिंगच्या या आर्टमुळे त्याला सतत नवनवीन कल्पनांवर काम करता येतं आणि हे त्याच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, असं तो ठामपणे सांगतो.

अशीच एक भन्नाट कल्पना कागदावर काढत त्याने नुकतंच ‘व्होग वेडिंग शो’मध्ये ‘ब्लूम’ नावाचं कलेक्शन सादर केलं आहे. ‘ब्लूम’ म्हणजे आपण एका नव्या युगात, दशकात जातो आहोत. बदल ही आपली नित्याची गरज आहे आणि हाच बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वत:त बदल करत पुढे जात असतो, एका अर्थाने आपण कळीतून फुलासारखे उमलत असतो. अर्थात आपण तेव्हाही भूतकाळ न विसरता भविष्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. हीच कल्पना लग्नसंस्थेच्या विचारामागेही आहे. लग्नाची वेळ ही आपल्यात असाच प्रकारचा बदल घडवणारी असते, आपल्यातले व्यक्तित्व उमलवणारी असते, असं तरुण म्हणतो. प्रत्येक वेळी आपल्या कलेक्शनमधून काही निश्चित विचार लोकांसमोर ठेवण्याचा फॅशन डिझाइनर्सचा हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्यासारखा असतो. हे कौशल्य या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांकडे असायलाच हवं, असं तो म्हणतो. फॅशन विश्वात भरीव कार्य करू पाहणाऱ्यांना तो मनापासून सांगतो की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅशन डिझाइनर म्हणूनसक्षम होण्यासाठी आपल्याला आपल्या कलेवर, सौंदर्यदृष्टीवर आणि कपडय़ांवर उमटणाऱ्या बारीक कलाकुसरीवर प्रेम केलं पाहिजे. आपल्याकडे नुसती कला असून भागत नाही. तर फॅशन इंडस्ट्री हे एक अतिशय कठीण क्षेत्र आहे आणि खूप स्पर्धात्मक आहे.  आपल्याला दिवसाचे चोवीस तास केवळ आपल्या कामाचा, नवनवीन संकल्पनांचाच विचार करावा लागतो, असं तरुण सांगतो. बऱ्याचदा बाहेरून हे क्षेत्र ग्लॅमरस आणि चकचकीत, प्रतिष्ठित वाटत असल्याने त्याला भुलून लोक फॅशन इंडस्ट्रीत येण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी खूप धडपडतात.मात्र ती चमक, ते ग्लॅमर हे काही मिनिटांचं असतं. त्यांना ३ मिनिटांची रॅम्पवरची चमक दिसते, पण प्रत्यक्षात तसं नसतं, असं तो म्हणतो. आपलं कलेक्शन रॅम्पवर येण्यासाठी खूप काम करायला लागतं. रॅम्पवर आलं की ते लोकांना दिसतं एवढंच खरं आहे. मात्र त्यानंतर त्याची विक्री, उत्पादन, वितरण आणि विपणनाचे संपूर्ण चक्रही सांभाळता आले पाहिजे, हे लक्षात घ्या. केवळ आपले कलेक्शन निर्मिती करण्यापुरते मर्यादित न राहता ते बाजारपेठेत उतरवण्याइतपत तुम्ही जोवर तयार होत नाही, तोवर या क्षेत्रात येण्याची घाई करू नका. कारण हा सोप्पा व्यवसाय नाही, याकडेही तो लक्ष वेधतो. अनुभव, अभ्यास आणि कलेची त्रिसूत्री सांभाळत यशस्वी फॅशन डिझाइनर म्हणून लौकिक मिळवणाऱ्या तरुण ताहिलियानीसारख्या फॅशन डिझाइनर्सनी आपल्या फॅशन इंडस्ट्रीची पताका जगभरात फडकवत ठेवली आहे. -viva@expressindia.com

‘दोन दशकांपूर्वी जेव्हा मी भारतात परत आलो तेव्हा माझे पहिले आव्हान होते ते म्हणजे भारतीय लोकांची फॅशनच्या बाबतीतील मानसिकता बदलणे. उदाहरणार्थ, मला साध्या रंगांची आवड आहे, परंतु भारतीय दृष्टिकोनातून मी खूप बेज, खाकी आणि गुलाबी, केशरी आणि हिरवा रंग अशा रंगांचा वापर कपडय़ांमध्ये पाहिला. हे रंग आणि कपडय़ांचे पॅटर्न्‍स माझ्यादृष्टीने खूप भडक होते. म्हणून मग मी पूर्वेकडील काही चांगल्या गोष्टी आणि पश्चिमेकडील काही सर्वोत्कृष्ट गोष्टी घेतल्या. त्या एकत्र आणून काहीतरी वेगळं डिझाईन करण्याचा प्रयत्न मी केला’.