|| तेजश्री गायकवाड

तरुण, भरपूर एनर्जी असणारे, नेहमीच नवनवीन प्रयोग करणारे आणि भारतीय देहयष्टीनुसार उत्तम स्विमवेअर डिझाइन करणारे अशी ओळख असलेली जोडगोळी म्हणजे प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स शिवन भाटिया आणि नरेश कुकरेजा. २०१४ मध्ये फोर्ब्सच्या तिशीच्या आतील श्रीमंत तीस लोकांमध्ये निवड झालेल्या डिझायनर जोडगोळीच्या कारकीर्दीचा प्रवास परदेशातून सुरू झाला आणि आज मायदेशातही त्यांनी आपलं मुळं घट्ट रोवली आहेत. त्यांचा हा प्रवास किती विचारपूर्वक केलेला होता हे शिवन आणि नरेशशी मारलेल्या गप्पांमधून जाणवतं..

टिपिकल फॅशनची चौकट मोडून काही तरी नवीन देणं हे आजच्या ग्लॅम फॅशन वर्ल्डमध्ये म्हटलं तर अवघड आहे आणि म्हटलं तर सोपंही आहे. त्यामुळे रोजच्या फॅ शनमध्ये महत्त्वाचं काय याचा विचार करून आपण त्यातल्या कुठल्या प्रकारात वेगळं काही करू शकू हा विचार इतरांप्रमाणेच शिवन आणि नरेश या जोडगोळीसाठीही तितकाच महत्त्वाचा होता. त्यांनी हा विचार यशस्वी पद्धतीने कृतीत उतरवला आहे, हे ठामपणे म्हणू शकतो. याचं कारणम्हणजे या जोडगोळीचं कलेक्शन सादर झालं की त्याबद्दल चर्चा होतेच. त्यांच्या कलेक्शनमध्ये नेहमीच काही ना काही नवीन प्रयोग असतात आणि ते तसे पाहायला मिळणार याची खात्रीही त्यांच्या चाहत्यांना असते. फॅ शन विश्वातील त्यांच्या याहटके विचारांची आणि कलेक्शनच्या प्रवासाची एकत्रित सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना आपली मुळं नेमकी कुठली हे शिवन स्पष्ट करतो. ‘मी कानपूरसारख्या छोटय़ाशा शहरातून आलो आहे. माझं बालपण मध्य प्रदेशमधील सुंदर भौगोलिक भागात गेलं आहे. माझ्या सर्जनशील संवेदनांचा एक मोठा भाग उत्तर आणि मध्य भारताच्या समृद्ध निसर्गाने व्यापलेला आहे. मी ज्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेत लहानाचा मोठा झालो त्याचे प्रतिबिंब माझ्या कलेक्शनमध्येही दिसून येते,’ असं तो म्हणतो.

निसर्गाचं सान्निध्य, झाडंझुडपं आणि प्राण्यांबरोबर राहण्याचं वेड या गोष्टी मनात इतक्या भिनल्या होत्या की हे सौंदर्य जिथे जिथे व्यक्त करता येईल अशा एका क्षेत्राचा भाग मला व्हायचं होतं. या इच्छेनेच मला फॅशनविश्वाशी जोडलो गेलो, असं शिवन सांगतो. दिल्लीतील निफ्टमध्ये वयाच्या १७ व्या वर्षी माझा फॅ शनविश्वातील प्रवास सुरू झाला. फॅ शनची बाराखडी शिकत असतानाच तिथे माझी नरेशशी ओळख झाली, असं तो म्हणतो. याचदरम्यान आम्ही बालीमध्ये मिट्टेलमोडा इंटरनॅशनल बीचवेअरसाठी एकत्रित कलेक्शन तयार केलं आणि नंतर आम्हाला त्यासाठी २००६मध्ये अ‍ॅवॉर्डही मिळालं. त्या क्षणी आमच्या एकत्रित करिअरचं बीज रोवलं गेलं, असं सांगणाऱ्या शिवनने लेबलच्या दिशेने सुरू झालेला प्रवासही सांगितला.

आम्ही या अ‍ॅवॉर्डनंतर एकत्रित लेबल सुरू करण्याचा विचार केला. आणि शिवन-नरेश लेबलचा शुभारंभ झाला. या लेबलचं पहिलं कलेक्शनही कानमध्ये लाँच झालं. परदेशातून सुरुवात केल्यानंतर भारतीय तरुणींसाठी स्विमसूट बनवण्याचा विचार त्यांच्या मनात कसा आला, याबद्दल बोलताना जगभरात सगळीकडेच स्विमसूटची चलती आहे. मात्र भारतीयांच्या शरीरयष्टीप्रमाणे बिकिनी बनवण्याचं धाडस शक्यतो फॅशन डिझायनर्स करत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर काम करायला सुरुवात केल्याचं नरेश सांगतो. एकदा स्विमसूटवर काम सुरू केल्यानंतर तेच त्यांची ओळख ठरलं. त्याबद्दल नरेश म्हणतो, ‘आम्ही डिझाइनर म्हणून नेहमीच भारतीय शरीरयष्टीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहून चकित झालो होतो. तुलनेने लहान टॉरसो, व्यवस्थित शेपमधील बस्ट आणि हिप्स असलेल्या विशिष्ट रचनेतील स्विमसूट भारतीय तरुणींवर खुलून दिसतात. २०१० मध्ये आमच्या ब्रॅण्डने स्विमवेअरची सुरुवात केली तेव्हा भारतामध्ये स्विमवेअरसाठी मर्यादित बाजारपेठ होती. स्विमसूटची फॅ शन इथे भारतात अशी होती ज्याविषयी फारसं बोललं जात नव्हतं, ती एका ठरावीक वर्गापुरती मर्यादित होती. त्यामुळे त्यात खूप काही नवीन करायची संधी होती. एक तर स्विमसूटचं तंत्रज्ञानही इथे फारसं माहिती नव्हतं. आणि स्विमसूटबद्दलची भारतीयांची मानसिकता हेही मोठं आव्हान होतं. या एकात एक गुंतलेल्या कारणांमुळे इथे स्विमसूटचं उत्पादनही कमी होतं, असं नरेश सांगतो.

या सगळ्या वातावरणात एका लक्झरी सुट्टीवर फिरायला जाणाऱ्या जोडप्याला डोळ्यासमोर ठेवून ब्रॅण्ड डिझाइन करण्याचा उद्देश आम्ही ठेवला. यात त्या स्त्रीचा संपूर्ण पोशाख कसा असेल? डेस्टिनेशन वेडिंगसाठी आलेले किंवा विवाहानंतर परदेशात हनिमूनला येणाऱ्या किंवा नुसतीच भटकंती करणाऱ्या अशा सगळ्यांना डोळ्यांसमोर ठेवून आम्ही स्विमसूट डिझाइन केले. सुरुवातीला ते फक्त घालायचे म्हणून घातले जात होते, आता मात्र बिकिनी किंवा स्विमसूट हे लाइफस्टाइल आणि स्टेट्सचा महत्त्वाचा भाग झाला आहे. स्विमवेअर आता लक्झरी वेअर झालं आहे. लोक आपल्या स्टेट्सनुसार स्विमवेअर निवडतात, असं नरेश म्हणतो.

स्विमसूट किंवा बिकिनी म्हटलं तरी आपल्यासमोर एक ठरावीक प्रकारची रचनाच येते, मात्र साधारण पाच वर्षांपूर्वी शिवन आणि नरेशने ‘बिकिनी साडी’ हा आगळावेगळा प्रयोग केला. बिकिनी साडीचा हा प्रकार फॅ शनविश्वात वेगळीच ओळख मिळवून गेला. ‘आमच्या ब्रॅण्डचा दृष्टिकोन हा आपल्याकडेही स्त्री-पुरुषांनी त्यांच्या शरीराविषयी अभिमान बाळगावा हा होता. आपल्याकडे विनाकारण आपल्या शरीररचनेवरून न्यूनगंड बाळगला जातो आणि फॅ शनला दूर ठेवले जाते. हा नकारी विचार जाऊन प्रत्येकाने आपल्या शरीरावर प्रेम करावं आणि आपल्याला हवी ती फॅ शन करावी, या हेतूने आम्ही बिकिनी सीरिज आणि रिसॉर्ट सीरिज सुरू केली. ऑयकॉनिक बिकिनी साडी ही आमच्या ब्रॅण्डची एक युनिक निर्मिती आहे. भारतीय सामाजिक भावनांचा विचार करत आधुनिक स्विमवेअरमध्ये आम्ही अजूनही नवनवीन प्रयोग करत आहोत. आम्हाला आमच्या परंपरा न विसरता, भारतीय मनोवृत्तीला साजेसं वाटेल असं काही ना काही सादर करायचं असतं. आमची ही बिकिनी साडी अगदी ४५-५० वर्षांच्या स्त्रियाही परिधान करून आत्मविश्सावासाने वावरतात, असं शिवन सांगतो.

खरं तर भारतीय मार्केट हे बिकिनी किंवा स्विमसूटसाठी नाही असंच मानलं जातं. परंतु शिवन आणि नरेश भारतातील डिझायनर म्हणून इथेही बिकिनीजच्या अ‍ॅक्सेपटन्समध्ये मोठी वाढ दिसून येत असल्याचं ठामपणे सांगतात. ‘लोकांनी स्वत:च्या शरीरावर विश्वास ठेवायला हवा. त्यांचा विश्वास उत्तम डिझाइनने सार्थ करायची जबाबदारी आमची. योग्य रंग, कट्स यामुळे भारतीय बिकिनीही उत्तम दिसू शकते. आमच्यासाठी धाडसी, आत्मविश्वासाने वावरणारी आणि म्हणूनच मोहक दिसणारी स्त्री ही आदर्श स्त्री आहे, अशी सुंदर स्त्री कायम स्वत:बद्दल अभिमान बाळगून असते,’ असं ते म्हणतात. एक डिझायनर म्हणून आम्हाला नेहमीच आमच्या डिझाइनने लोकांच्या संवेदनशीलतेसह त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही नेहमीच ग्राहकांच्या व्हिज्युअल आणि फंक्शनल गरजा पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे,’ असा मंत्र त्यांनी दिला.

viva@expressindia.com