तेजश्री गायकवाड, गायत्री हसबनीस
आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना दुसरीकडे अफगाणिस्तान देश तालिबान्यांच्या हाती गेला. बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली.. रोज नवीन घटना घडू लागल्या. या सगळ्या घटनांवर साहजिकच सगळ्या सोशल मीडिया, बातम्यांमधून तिकडे नक्की काय सुरू आहे याची कल्पना आपल्याला येऊ लागली. ही घटना एवढी गंभीर आहे की उद्या आपल्यावर अशी वेळ आली तर काय, असाही प्रश्न उभा राहतो. या भयावह परिस्थितीकडे आपल्याकडील तरुणाई कशा पद्धतीने बघते, त्यांची या घटनेवर नक्की काय मते आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न व्हिवाने केला आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे, ‘ज्याची त्याला नाही आगत आणि शेजारी बसला जागत’ अशी काहीशी अफगाणिस्तानच्या बाबतीत इतर राष्ट्रांची भूमिका ठरते आहे. अफगाणिस्तानच्या परिस्थितीनंतर अमेरिकेने सैन्य मागे का घेतले हा प्रश्न पडतो, अशा शब्दांत आनंद लेले याने आपली भावना व्यक्त के ली. ‘अमेरिकेने सैन्य ठेवून अफगाणिस्तानाची विचारसरणी बदलायचा प्रयत्न केला, पण ते झाले नाही. अफगाणिस्तान सैन्याची थोडी चूक आहे, कारण सरतेशेवटी रणधुमाळी उडाली त्यांच्यात आणि तालिबानमध्ये, तरीही लोक  आपलेच मारले जाणार आहेत याचा विचार अफगाणिस्तानी सैन्याने केला जो घातक ठरला. पूर्वी जी नैतिक सुबत्ता होती ती तालिबानी राजवटीमुळे संपुष्टात आली आहे. स्त्रियांना बराच त्रास सहन करावा लागला आहे,’ असे तो म्हणतो. जागतिक संस्थांनी आता दहशतवाद नष्ट करण्याशिवाय काही पर्याय नाही या ध्यासाने प्रयत्न करायला हवेत. जागतिक पातळीवर चर्चेपेक्षा कृती झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त के ली.

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी मिळवलेला ताबा ही जागतिक स्तरावर दुर्लक्ष करता येण्याजोगी गोष्ट नाही हे स्पष्टपणे सांगणारी तरुणाई या प्रकरणात अमेरिके सारखे विकसित देश आणि जागतिक संस्थांच्या भूमिकांवरही प्रश्न उपस्थित करताना दिसते आहे. ‘मोठय़ा देशांनी, जागतिक संस्थांनी यात काय केलं?’ हा प्रश्न कौस्तुभ हिलेने उपस्थित के ला. अफगाणिस्तानमधील परिस्थिती ही ना लोकशाही, ना हुकूमशाही, तर तो निव्वळ दहशतवाद आहे. आता यूएनसारख्या संस्थांचा उपयोग काय आहे? मला असे वाटते, त्यांनी काही बोलण्यापेक्षा काही तरी ठोस कृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जगातले सर्व देश एकत्र येऊन दहशतवाद नष्ट करू शकतात हे वास्तव असतानाही कोणाकडून काहीच प्रयत्न के ले का जात नाहीत, याकडे त्याने लक्ष वेधले. शक्य असूनही ते काहीच करत नाही आहेत?. खरे तर अख्खे जग आंधळी कोशिंबीर खेळत आहे आणि राज्य कुणावर आहे हेच कोणाला माहिती नाही, अशी कडवट प्रतिक्रिया कौस्तुभने व्यक्त के ली.

शस्त्रास्त्रांच्या जोरावर तालिबानींनी अफगाणिस्तानात मांडलेले अराजक जगाला कित्येक दशके  पाठी घेऊन जाणार आहे, याबद्दलही तरुणाई ठाम मते मांडताना दिसते. ‘अफगाणिस्तानात ही हुकू मशाही सुरू आहे. तालिबानी सत्तेमुळे अफगाणिस्तानी नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जाते आहे. आपल्याला आपली मते मांडण्याची संधी तरी असते, पण तिथे तर सरळ गोळी घातली जाते. त्यामुळे सरळसोट त्यांचे अस्तित्वच संपवले जाते आहे, असे मत आशीष देसाई मांडतो. तर अफगाणिस्तानी नागरिकांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला पाहिजे. कारण या हस्तक्षेपामुळे तो देशच खचला आहे, असा मुद्दा केदार सुपारकर याने उपस्थित के ला. तिथे अक्षरश: युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना यूएनसारख्या संस्थांनी त्यात लक्ष घालायला हवे होते. जगाने तेथील नागरिकांच्या संरक्षणासाठी, मूलभूत सोयीसुविधा, अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी काही तरी व्यवस्था करणे गरजेचे आहे आणि त्या देशात इतर देशातील लोक  आहेत त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक असल्याचे मत के दारने व्यक्त के ले.

एका देशात माजलेल्या अराजकाशी आपला काहीएक संबंध नसल्यासारखे इतर देशांचे वागणे हे आजच्या सुज्ञ तरुणाईलाही पटलेले दिसत नाही हे जाणवते. ‘अमेरिकेचे सैन्य इतकी वर्षे तिथे होते तेव्हा त्यांनी, अफगाणिस्तानी स्थानिक सरकारने, तेथील नागरिकांनी आपल्याला जास्तीत जास्त मानवी अधिकार मिळू शकतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, परंतु तसे काहीच झाले नाही,’ असे प्रामाणिक मत एका सुज्ञ तरुणाने मांडले. स्थानिक जनतेच्या संरक्षणाची, त्यांच्या अधिकारांची योग्य ती काळजी घेऊन बाहेरून कोणी आक्रमणकारी आले तर त्यांना समूळ नष्ट करणे हाच पर्याय असतो. या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार व्हायला हवा. अफगाणिस्तानच्या परिस्थितीनंतर प्रत्येक तरुणाने हा विचार करायला हवा की हे माझ्याबाबतीत घडू नये, माझ्या राष्ट्रात घडू नये. माझे मानवी अधिकार जपण्यासाठी आणि माझ्याबरोबरच अधिकाधिक इतर तरुणांचेही अधिकार कसे जपले जातील यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी सतर्क करणारी भूमिका या तरुणाने मांडली. भवताली घडणाऱ्या घटनांचा माग घेत आपल्या अधिकारांसाठी सतर्क राहणे आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. आणि जगभरातून ही गरज ओळखून त्या दिशेने प्रत्येकाने ठोस प्रयत्न करायला हवेत हा मुद्दा तरुणाई अधोरेखित करताना दिसते.

viva@expressindia.com