09 July 2020

News Flash

क्षितिजावरचे वारे : प्रगती आणि जन्मठेप

१९९० च्या दशकात जनरल मोटर्सने ‘ईव्ही १’ या नावाची एक दिमाखदार, अनेकांना परवडेल अशी गाडी बाजारात आणली

सौरभ करंदीकर

सर्वच प्रगत तंत्रज्ञान स्वागतार्ह असतंच असं नाही. किंबहुना अशा अनेक सुविधा, अनेक तंत्राविष्कार जगासमोर येऊ न देण्यात, किंवा आले तरी त्यांना बाजारपेठेत अपयशी बनवण्यात अनेकांचा स्वार्थ असू शकतो.

‘बोला. काय काम काढलं आज?’, एडिसन इलेक्ट्रिक कंपनीच्या चेअरमनने समोर उभ्या ठाकलेल्या त्या तरुण—तडफदार इंजिनीअरला अत्यंत नीरस स्वरात विचारलं.  ‘सर, मी अनंत काळ चालणाऱ्या लाइट बल्बचा शोध लावलाय’. चेअरमन चेहऱ्यावरची माशी देखील हलू न देता म्हणाले, ‘अस्सं!’ ‘सर खरंच सांगतोय. माझा बल्ब कधीच काम करायचा थांबणार नाही, जुना होणार नाही, अगदी फुटला तरी प्रकाशमान होत राहील. हा घ्या पुरावा’. असं म्हणून त्या इंजिनीअरने हातातल्या ब्लूप्रिंट्स चेअरमनसमोर उलगडल्या. दर काही दिवसांनी अशाच एखाद्या भंपक इंजिनीअरला तोंड देणं हा चेअरमनचा नित्यक्रमच झाला होता. आपण काहीतरी दिव्य केलंय असं भासवणाऱ्यांचा कंपनीमध्ये तोटा नव्हता! ‘प्रत्येकाला एडिसन बनायचं असतं’ असं मनात म्हणत अत्यंत तुच्छतेने चेअरमन ब्लूप्रिंट न्याहाळू लागले. मात्र या खेपेस काहीतरी वेगळं घडत होतं. चेअरमनचा चेहरा अचानक बदलला. डोळे विस्फारले. त्यांनी थरथरत्या हाताने फोन उचलला. ‘तुम्ही जरा बाहेर बसता का?’, त्यांनी त्या तरुण इंजिनीअरला विचारलं. इंजिनीअर रिसेप्शनमध्ये बसून राहिला. तासाभराने चेअरमनचा बुलावा आला. इंजिनीअर केबिनमध्ये शिरताच तिथे जमलेल्या सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. अत्यंत प्रेमाने हस्तांदोलन करत चेअरमन म्हणाले. ‘अभिनंदन! तुमचा शोध खरंच क्रांतिकारक आहे. त्याबद्दल कंपनीने यंदाचा एडिसन पुरस्कार आपल्याला द्यायचं ठरवलंय!’ इंजिनीअरचा आनंद गगनात मावेना. ‘आणि पुरस्काराचा एक भाग म्हणून तुम्हाला सहकुटुंब ताहिती बेटावर कंपनीच्या रिसॉर्टमध्ये सुट्टीवर पाठवण्यात येतंय!’ चेअरमनने इंजिनीअरच्या हातात विमानाची तिकिटं ठेवली!

ताहिती बेटावरच्या रिसॉर्टमध्ये इंजिनीअर सहकुटुंब सहपरिवार पोहोचला, तेव्हा तिथल्या नोकराने त्याच्या हातात एक चिट्ठी ठेवली. स्वत: चेअरमनने त्याला लिहिलं होतं, ‘मित्रा, हा रिसॉर्ट आणि हे बेट तुला भेट देण्यात येतंय. आनंदाने राहा. तुझ्या आणि तुझ्या पुढच्या पिढय़ांच्या आयुष्यभराचा खर्च कंपनी करेल! फक्त दोनच अटी — बेट सोडून पुन्हा कधीच परतायचं नाही! आणि तुझ्या अनंत काळ चालणाऱ्या बल्बबद्दल वाच्यतासुद्धा करायची नाही’.

ही आख्यायिका आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा देते — सर्वच प्रगत तंत्रज्ञान स्वागतार्ह असतंच असं नाही. किंबहुना अशा अनेक सुविधा, अनेक तंत्राविष्कार जगासमोर येऊ न देण्यात, किंवा आले तरी त्यांना बाजारपेठेत अपयशी बनवण्यात अनेकांचा स्वार्थ असू शकतो. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे आले तेव्हा खरं दु:ख झालं ते विद्युतक्षेत्राला! वर्षांनुवर्ष चालत आलेले उद्योगधंदे, अनेकांची प्रगती आणि त्यायोगे येणारी सुबत्ता एखाद्या तांत्रिक आविष्काराने संपणार असेल तर त्या आविष्काराला अनेक शत्रू निर्माण होणार हे उघड आहे.

विद्युतशक्तीवर चालणाऱ्या गाडीची रचना (इलेक्ट्रिक कार) सर्वप्रथम १८२७ साली हंगेरीमध्ये अन्योस जेडलिक नावाच्या धर्मप्रसारकाने केली होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या इलेक्ट्रिक कार्सच्या रचनेत प्रगती झाली, परंतु ज्यांचं भांडवल वाफेवर चालणाऱ्या गाडय़ांमध्ये गुंतलं होतं, त्यांनी या गाडय़ांना विरोधच केला. १९०२ साली स्टुडबेकर कार कंपनीने इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकाळी फोर्ड मोटर कंपनीने असेम्ब्ली लाईन निर्मिती—तंत्र वापरून अत्यंत स्वस्त गाडय़ा बाजारात आणल्या आणि तुलनेने काहीशी महाग इलेक्ट्रिक कार मागे पडली. विद्युतशक्तीवर चालणाऱ्या रेल्वेगाडय़ा मात्र कमालीच्या लोकप्रिय झाल्या. आजही आपल्या सर्वांच्या परिचयाचं ‘इलेक्ट्रिक’ वाहन हेच होय. आपल्या रस्त्यावर मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक पेट्रोल—डिझेलच्या गाडय़ाच धावत आहेत. यात अनेक औद्योगिक आणि राजकीय हितसंबंध आहेत हे वेगळं सांगायला नको.

एकेकाळच्या ट्राम आणि आताच्या लोकल रेल्वेगाडय़ा, छतावरच्या पॅंटोग्राफ द्वारा विद्युत शक्ती खेचून घेतात. रस्त्यावरच्या गाडय़ांना मात्र स्वत:ची रिचार्जेबल बॅटरी वागवावी लागते. त्यामुळे अशा वाहनांच्या प्रगतीची सारी मदार बॅटरी तंत्रज्ञानावर असते. १९८० साली नावारूपाला आलेल्या लिथियम—आयन बॅटरीने इलेक्ट्रिक गाडय़ांच्या प्रगतीचा आलेख उंचावला. १९९० च्या दशकात जनरल मोटर्सने ‘ईव्ही १’ या नावाची एक दिमाखदार, अनेकांना परवडेल अशी गाडी बाजारात आणली. ‘हू किल्ड द इलेक्ट्रिक कार?’ नावाच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या माहितीपटात या गाडीची अमेरिकन सरकार, खनिज तेल लॉबी, इतर कार निर्माते आणि ग्राहक संघटना यांनी कशी मुस्कटदाबी केली त्याची करुण कहाणी सांगितली आहे. खरं सांगायचं तर लिथियम—आयन बॅटरीच्या साहाय्याने ही गाडी एका चार्जिगवर सुमारे ३०० मैल धावू शकली असती, परंतु बॅटरी पुरवणाऱ्या कंपनीवर ही क्षमता १०० मैलांहून कमी ठेवण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला. पेट्रोल पंपांप्रमाणे नाक्यानाक्यावर चार्जिग स्टेशन्स असतील अशी अनेकांची भोळी कल्पना होती. प्रत्यक्षात झालं ते वेगळंच. हमरस्त्यावर चार्जिग स्टेशन्स कमी, कारण मुळात अशा गाडय़ाच कमी, असे ‘कोंबडी आधी की अंडं?’ स्वरूपाचे युक्तिवाद केले गेले. आणि या गाडीचं उत्पादन थांबवण्यात आलं.

२००८ साली रस्त्यावर आलेल्या ‘टेस्ला रोडस्टर’ या गाडीसमोर ‘ईव्ही १’ हाच आदर्श होता, असं खुद्द टेस्लाचे अध्यक्ष इलॉन  मस्क म्हणतात. पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामांविरुद्ध तयार होणारं जनमत पाहून अनेक कंपन्यांनी आपापल्या इलेक्ट्रिक गाडय़ा बाजारात आणल्या, परंतु अनेकांची किंमत सामान्य माणसाला परवडणारी नव्हती.  आज इलेक्ट्रिक कार म्हटलं की टेस्ला हेच नाव प्रामुख्याने घेतलं जातं. आणि याच कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ‘प्रोजेक्ट रोडरनर‘ची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत टेस्ला आणि चिनी बॅटरी उत्पादक सीएटीएल यांनी १६ वर्षे आणि गाडीला सुमारे बारा लाख किलोमीटर चालवणाऱ्या बॅटरीची घोषणा केली आहे. ही बॅटरी बाजारात आली तर पहिल्याने पोटशूळ उठेल तो खनिज तेलाच्या व्यापाऱ्यांचा. आज जगाची अर्थव्यवस्था ज्या उद्योगांवर अवलंबून आहे त्यात तेल व्यवसाय अग्रगण्य आहे. टेस्लाच्या बॅटरी तंत्रज्ञानानं जग बदलेल. पेट्रोल पंप ओस पडतील, पर्यावरणाचा समतोल राखण्यात थोडीफार मदत होईल, परंतु मानवी हितसंबंधांचं काय करणार? की आता इलॉन मस्कला त्या एडिसन—कथेतील इंजिनीअरप्रमाणे ताहिती बेटावर जन्मठेप द्यायचा घाट घातला जाईल?

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 1:41 am

Web Title: information about electric car zws 70
Next Stories
1 योगिक वाट
2 ‘सोशल’वादात अडकलेली तरुणाई
3 सदा सर्वदा स्टार्टअप : वाटाघाटींचे महत्त्व!
Just Now!
X