डॉ. अपूर्वा जोशी

बऱ्याचदा तुम्हाला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते. तुम्हाला तुमचा दिनक्रम आणि उत्पन्न यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत:चा व्यवसाय असण्याची आवश्यकता वाटते, तरीही तुम्ही तुमच्या स्टार्टअपच्याच कल्पनेवर अडकले आहात किंवा तुम्ही अद्याप कोणता व्यवसाय करणार याची खात्री नाही; अशीच परिस्थिती बहुधा खूप लोकांची असते. त्यामुळे या गोंधळापलीकडे जात नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी तुम्हाला नक्की कुठे आणि कशी प्रेरणा मिळेल, याचा विचार करायला हवा. ही लेखमाला समाप्त करताना स्टार्टअपसाठीचा हा प्रेरणाशोध कसा असावा याबद्दल जाणून घेऊयात..

‘प्रवासा’तून प्रेरणाशोध

जितक्या उद्योजकांबद्दल वाचलं, ऐकलं आणि भेटले त्या सगळ्यातून हेच जाणवलं की, सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी शेकडो जणांना त्यांच्या स्टार्टअपची प्रेरणा मिळवण्यासाठी सापडलेली सर्वात स्थिर पद्धत म्हणजे ‘प्रवास’.  एक्स्प्लोर करा. तुम्हाला शक्य तितके भिन्न भिन्न दृष्टिकोन, संस्कृती, नवीन ठिकाणे, पदार्थ, अभिरुची आणि दृश्यांचा अनुभव घ्या.

जमेल तितक्या लोकांशी बोला

तुमच्या कोषातून बाहेर पडा आणि तुम्ही जमेल तितक्या वेगवेगळ्या लोकांशी बोला. त्यांच्या सामाईक वेदना, आशा आणि आकांक्षा या सगळ्यांची मनात नोंद घेणं सुरू करा. यातूनच तुम्हाला काही समान धागे सापडायला सुरुवात होईल. तुमचे भावी स्टार्टअप किती विस्तृत क्षेत्रांत आणि किती लोकांना सेवा देऊ शकते, याविषयी मोर्चेबांधणी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची भेट घ्या.

जर तुमचा व्यवसाय फक्त एक छोटय़ा स्तरावरचा स्थानिक व्यवसाय असेल तर शहरातील प्रत्येकाशी चर्चा करा; तसं नसेल तर तुम्ही राज्यव्यापी किंवा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन काम करण्यासाठी तयारी करू शकता. लोकांशी बोला आणि कल्पना शोधा, जेणेकरून व्यापक स्तरावर कामाचा आराखडा बांधता येईल.

उपद्रवी वाटणाऱ्या गोष्टींची सूची बनवा

सर्वात उत्तम स्टार्टअप व्यवसाय हे वैयक्तिक वेदना आणि निराशेच्या प्रसंगातून प्रेरित झालेले आहेत. खरोखर तुम्हाला कोणत्या गोष्टींचा उपद्रव झाला? कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला ग्राहक म्हणून, कामावर किंवा जगाकडे पाहात असताना खरोखर चुकीच्या दिसतात? असे कुठले विचार आहेत जे तुम्हाला रात्री जागे ठेवतात? सकाळी उठल्यावर कुठली कामं दिवसभरात करावीत याची प्रेरणा मिळते? सध्याच्या अशा पेचात टाकणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याचे निराकरण करणे आवश्यक आहे? या सगळ्याचा विचार करा. त्यातून जी उत्तरे मिळतील, त्या यादीचा तुलनात्मक विचार करत तुम्ही कोणत्या गोष्टीत बदल करू शकता, तुमची कोणती कौशल्ये त्यासाठी वापरू शकता, हे ठरवा. व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा कशी मिळवायची याचा शोध घेताना हा प्रारंभिक मुद्दा लक्षात घ्यावा.

पूर्णपणे नवीन गोष्टींचा प्रयत्न करा

तुम्ही जेव्हा एकाच ‘बबल’मध्ये असता तेव्हा पूर्णपणे ताज्या, नवीन आणि प्रेरणादायक कल्पना मिळवणे कठीण होऊन जाते. तंत्रज्ञानाने ही ‘लूप’ आणखी बंद केली आहे. नेटफ्लिक्स त्यांच्या शिफारशी सर्च इंजिनच्या माध्यमातून तुमच्यावर लादते;  गूगल आणि सोशल मीडिया तुमचे जग आणखी संकुचित करतात. तुमचे म्युझिक अ‍ॅप्स  तुम्हाला नवीन संगीत आणि ध्वनी शोधण्यापासून प्रतिबंधित करतात. तुम्हाला नवीन कल्पना आणि नवीन प्रेरणा हव्या असतील तर या ‘बबल’पासून सुटका करून घ्या. महिन्याभरासाठी पूर्णपणे भिन्न लोक आणि ग्रुप्ससह हँगआऊट करण्याचा प्रयत्न करा. कामासाठी नवीन मार्ग शोधा. असं काही ऐकण्याचा प्रयत्न करा जे तुम्ही आधी सहसा कधी ऐकलेलं नाही. इतकंच नाही तर दर महिन्यात तुमचा जो डाएट पॅटर्न आहे तो चेंज करून पहा . पूर्णपणे रँडम गोष्टींचा प्रयत्न करा किंवा तुमच्या बकेट लिस्टमधील सर्व गोष्टी टिकमार्क होतील अशी सुरुवात करा. आपल्या मनात येणाऱ्या सर्व अनपेक्षित नवीन कल्पनांमुळे तुम्हालाच आश्चर्य वाटेल आणि त्या कल्पनांच्या मागे जाण्याचं कुतूहल कायम राहील.

नवीन छोटय़ा प्रकल्पांची बांधणी करा

एखादा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळवायची हे शोधून काढताना नवीन प्रकल्पांचा प्रयत्न करा. एखादा  समान इंटरेस्ट  पाहून एक सोशल ग्रुप तयार करा. एखाद्या विषयानुरूप ब्लॉगिंग सुरू करा. नवीन छंद सुरू करा. अद्याप मोठा व्यवसाय बनवण्याची चिंता करू नका. वेगवेगळ्या गोष्टींची चाचणी सुरू करा. कदाचित तो महिनाभर चालेल किंवा एक वर्ष. कदाचित तुम्हाला त्यात खूप इंटरेस्ट निर्माण होईल किंवा हा एक चांगला आणि मोठा व्यवसाय होऊ शकेल. त्यावर ओव्हरथिंक करू नका, फक्त तो कसा विकसित होतो ते पाहा.

शक्य तितक्या लोकांना मदत करा

व्यवसायाचं मूळ शोधायला गेलात तर ‘लोकसेवा’ हा एक महत्त्वाचा पाया असल्याचे दिसून येईल. बहुतेक जण जनमनाच्या भावना जपत अधिक मदत करण्याचे भरीव काम करतात असे दिसते. कदाचित व्यवसायासाठी त्यांनी तयार केलेले हे तत्त्व आहे. चॅरिटी चांगली आहे, परंतु जास्तीत जास्त हुशार उद्योजक जागृत होत आहेत की फक्त दानधर्म/लोकसेवा हे तत्त्व टिकाऊ, स्केलेबल किंवा पुढे नेणारं असू शकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना त्यांचे लक्ष्य शोधण्यात किंवा अर्थपूर्ण पुढे नेण्यात मदत कशी सुरू करू शकता? तुमच्याकडे जे आहे त्यापासून प्रारंभ करा, तुमचं स्टँडिंग काय आहे  आणि हा अख्खा प्रवास तुम्हाला कुठे घेऊन जातो हे पाहणं जास्त अर्थपूर्ण आहे.

बिझनेस कॉम्पिटिशन आयोजित करा

कल्पना सुचण्यात अद्याप समस्या येत आहेत? बिझनेस कॉम्पिटिशन/ स्पर्धा हा एक उपाय आहे.  उत्कृष्ट कल्पना किंवा व्यवसाय योजना स्पर्धा यांचं आयोजन करा. व्यवसाय सुरू करण्याची आपली प्रेरणा फक्त आपली स्वत:ची कल्पना असू शकत नाही. तुमच्या सामायिक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही इतरांसह टीम-अप करू शकाल.

मोठे स्वप्न पाहा

तुम्ही पुढे जे करू इच्छिता असा सर्वात मोठा आणि धाडसी उपक्रम कोणता आहे, याचा विचार होऊ दे!

viva@expressindia.com