|| गायत्री हसबनीस

येत्या २९ एप्रिलला ‘वर्ल्ड डान्स डे’ साजरा करण्यात येणार आहे. नृत्यातून ‘फिटनेस’ अजमावू पाहण्याचा फंडा सध्या सगळीकडे चांगलाच रुजला आहे. किंबहुना फिट राहण्यासाठी डान्सशिवाय ‘सुदृढ’ पर्याय नाही सांगतायेत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक..

फिटनेससाठी सगळं काही करून पाहिलेली तरुणाई सध्या मोठय़ा प्रमाणावर नृत्याचा आधार घेताना दिसते आहे. यातूनच फिटनेस डान्स ही संकल्पना रुजू पाहतेय. स्पोर्ट्स, जिम, स्विमिंग अशा विविध फिटनेस पर्यायांमध्ये आता फिटनेस डान्सही सामील झाला असून याचे नक्की किती प्रकार आहेत? त्यांचे महत्त्व आणि फायदे यांवर नृत्य क्षेत्रातील दिग्गज मंडळींना बोलते केले. ‘नृत्यामुळे मानसिक आणि शारीरिक समतोल साधता येतो. माझ्या मते नृत्याशिवाय दुसरा कोणताच असा व्यायाम प्रकार नाही जो तुम्हाला जास्तीत जास्त तंदुरुस्त ठेवू शकतो. नृत्य करताना तुमचे शरीर सतत वेगळ्या पद्धतीने मूव्ह करत असते. त्याने आतूनच एक वेगळा जोष निर्माण होतो आणि एकदा मन त्याने प्रफुल्लित झाले की आपोआपच एक वेगळी ऊर्जा निर्माण होते, जी दिवसभर कार्यरत राहते’, असं मत सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावर यांनी व्यक्त केले.

‘फिटनेस डान्स’चे असे बरेच प्रकार आहेत, जे सर्व वयोगटांतील मंडळी आपल्या आरोग्यासाठी दररोज तासभर तरी करू शकतात. आठवडय़ातून निदान दोनदा-तीनदा तरी जितके प्रकार तुम्हाला करता येतील ते करा. त्यातून एक स्वत:ची वेगळी शैली विकसित होते, मनावरचा ताण कमी होतो, आपोआपच चेहऱ्यावर हास्य येते, बोलणं आणि चालणंही सुधारतं तसंच आळस जाऊन एक उत्साह निर्माण होतो. मी स्वत: फिटनेसबाबतीत खूप सजग असल्यानेच ‘आयडीएम’ म्हणजे ‘इनर डान्स मूव्हमेंट’ हा डान्स फॉर्म मी विकसित केला आहे. यात संगीताबरोबरच आम्ही योगा पोझेस शिकवतो. योगाच्या बेसिसवर आम्ही पोझेस, पोश्चर आणि ऱ्हिदम एकत्रितपणे विद्यार्थ्यांना शिकवतो. यामध्ये प्रामुख्याने मन आणि एकाग्रतेचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो, असे त्यांनी सांगितले. सध्या झूम्बा डान्सचे प्रमाण कमी होते आहे, त्याऐवजी पिलाटे डान्स जास्त प्रमाणात फॉलो केला जातो. लोकांचा कल हा मंद संगीतावर केल्या जाणाऱ्या फिटनेस डान्सकडे वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले.

क्लासिकल इंडियन, वेस्टर्न, फोक डान्स आणि अस्सल भारतीय ठेक्यातील नृत्यप्रकार फिटनेसच्या दृष्टीने सर्वात जास्त शक्तिशाली नृत्य प्रकार आहेत. या नृत्य प्रकारात विचार आहे, भावना आहे, शिस्त आहे. प्रत्येक नृत्य प्रकारात तुमचे हात-पाय, संपूर्ण शरीर हे कार्यरत असते. त्यामुळे शरीर फ्लेक्झिबल राहण्यास मदत होते. याशिवाय तुमची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालू राहते, स्टॅमिना बिल्ड होण्यास मदत होते, चपळता वाढते, शरीर स्ट्रेच राहते आणि बॉडी लँग्वेजही सुधारते, असे त्यांनी सांगितले. काही तरुणांना बॉडी शेमिंग, जाड शरीराबद्दल न्यूनगंड किंवा आपल्या दिसण्याविषयी आत्मविश्वासाचा अभाव असतो. त्यांनी ‘फिटनेस डान्स’पैंकी कुठलाही प्रकार नियमितपणे सुरू केला तर त्याने आत्मविश्वास वाढतोच, पण त्यांचे वजनही कमी होण्यास मदत होते. डिप्रेशन, सॅडनेस आणि अल्कोहोल अ‍ॅडिक्शन यासाठीही फिटनेस डान्स मदत करतो. फिटनेस डान्स हा सर्व तऱ्हेने तुम्हाला फिट ठेवण्यास मदत करतो, असं अनुभवी मत शामक यांनी मांडलं. शामक दावर गेली २५ वर्षे मुलांना नृत्य शिकवत आहेत.

सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या मते, आज नृत्याला फिटनेसच्या दृष्टीने पाहिले जात आहे ही फार चांगली गोष्ट आहे. ज्यांना नृत्याची आवड आहे त्यांच्यासाठी डान्स, अ‍ॅरोबिक्स, झुम्बा या फिटनेसच्या दृष्टीने खूप चांगल्या डान्स अ‍ॅक्टिव्हिटीज् आहेत. अशा प्रकारच्या नृत्यामुळे कार्डिओ वर्कआऊट होण्यास मदत होते. डान्स आणि फिटनेस या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे ज्यांना फिटसुद्धा राहायचे आहे, पण डान्स कधी करता आला नाही त्यांना फिटनेस आणि डान्स दोन्हीचा आनंद घेता येतो. डान्स क्लासेसमध्येच अ‍ॅब्ज, हाताचे व्यायामसुद्धा घेतले जातात. ज्यालाच ‘फिटनेस थ्रु डान्स’ असे म्हटले जाते. फक्त नृत्य करून पुरेसं नाही. मसल टोनिंग व स्ट्रेन्थ गेन हवं असेल तर नृत्यासोबत व्यायामाला पर्याय नाही. त्यामुळे शास्त्रीय नृत्य शिकताना व्यायाम करणे आवश्यक असल्याचे फुलवा यांनी सांगितले. जर तुम्ही क्लासिकल डान्स शिकताय तर तुम्हाला तुमचा फिटनेस मेन्टेन करण्यासाठी वेगळे योग्य एक्सरसाईजही करावे लागतता. मात्र डान्स अ‍ॅरोबिक्स किंवा अन्य प्रकारात त्याची गरज उरत नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘ऊ र्जा आर्ट स्टुडिओ’ या नावाने बेली डान्स शिकवणारी आणि स्वत: बेली डान्समध्ये पारंगत असलेल्या ऊर्जा देशपांडे-नरवणकर यांच्या मते ‘बेली डान्स’ हा एक डान्स आर्ट आहे. मी बेली डान्स फिटनेसच्या अंगाने शिकवत नाही, पण कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी केली की नक्कीच आपल्या फिटनेससाठी ती योग्य ठरते. बेली डान्स करताना बेली पोर्शनवर जास्त फोकस असतो, पण बेली डान्स शिकण्याआधी कुठलेच व्यायामप्रकार करावे लागत नाहीत. अगदी प्रत्येक शरीरयष्टीतील आणि साईजमधील मुली बेली डान्स शिकू शकतात. सुरुवातीला बेली डान्सच्या स्टेप्स शिकवण्याआधी विद्यार्थ्यांची एक बॉडी तयार केली जाते. पुढील कठीण स्टेप्स येण्यासाठी बेसिक पोश्चर शिकवले जाते. सुरुवातीला बेली हा प्रत्येकालाच योग्य पद्धतीने जमेलच असं नाही. तुम्ही जेव्हा नियमितपणे दोन-तीन महिने क्लासला येता तेव्हा तुमचा पाया मजबूत होण्यास सुरुवात होते, असे त्या म्हणतात. बेली डान्समुळे पोटाला अजिबात त्रास होत नाही. हा खूप मोठा गैरसमज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बेली डान्समध्ये संपूर्ण शरीराचा वापर होतो, त्यामुळे शरीर फिट राहते. मात्र डान्सप्रकार निवडताना काही काळजीही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. उदाहरणार्थ, ज्यांना आथ्र्रायटिस असतो त्यांना झुम्बा डान्स करायला सांगत नाहीत, असं त्या म्हणतात. बेली डान्समध्ये आपण संपूर्ण शरीर कंट्रोलमध्ये ठेवून एक बॉडी पार्ट मुव्ह करत असतो. हात-पाय, बेली किंवा चेस्ट पोर्शन यांपैकी कुठलाही बॉडी पार्ट असेल तरी तुम्हाला अप्पर बॉडी शेपिंगसाठी हातांची हालचाल करावी लागते तर लोअर बॉडी शेपिंगसाठी पायांची हालचाल करावी लागते. यासाठी सराव आणि एकाग्रता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे ऊर्जा यांनी सांगितले.

फिटनेस डान्स जितका महत्त्वाचा तितकाच त्यासोबत योग्य आहार, मेहनत घ्यायची तयारी, चिकाटी आणि जिद्द असायला हवी. सतत आनंदी राहण्यासाठी डान्सशिवाय पर्याय नाही. मात्र त्यासाठी आपली आवड आणि त्याला साजेसा डान्स प्रकारही निवडायला हवा. तसेच फिटनेससाठी डान्सचा पर्याय आवडणाऱ्यांनी फिटनेस डान्सचे प्रकार लक्षात घेऊन त्याविषयी जागरूकता निर्माण करायला हवी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘फिटनेस डान्स’मधील काही महत्त्वाचे प्रकार आणि फायदे

बॅले डान्स बॅले डान्समुळे बॉडी लँग्वेज, अ‍ॅटिटय़ूड आणि पोश्चर सुधारण्यास मदत होते. मसल्स स्ट्रेच होण्यास सुरुवात होते त्यामुळे थाईज, पाय आणि कंबरेसारखी तत्सम दुखणी होत नाहीत. बॅले डान्समध्ये प्रचंड प्रमाणात शिस्त आवश्यक असते. या डान्समधून तुम्ही फिटनेस, शरीराची फ्लेक्झिबिलिटी आणि मूड नक्कीच बुस्ट करू शकता.

योगा डान्स  योगा डान्स हा एकमेव असा फिटनेस डान्स आहे जो आपल्या मनातील आंतरिक जागृतीसाठी अत्यंत लाभदायी आहे. ज्यातून योगा, डान्स, फिटनेस, मेडिटेशन, अध्यात्म आणि सर्जनशीलता या सगळ्या गोष्टी आत्मसात करता येतात.

बेली डान्स हा नृत्य प्रकार खूप सहज, मजेशीर आणि कुठल्याही वयोगटातील मंडळींसाठी आहे. बेली डान्स तुम्हाला ‘अ‍ॅब’ वर्क आऊ ट करण्यास मदत करते. तुमच्या ‘कोर’सकट प्रत्येक ठिकाणी मसल टोनिंग होण्यास मदत होते. त्याशिवाय शरीराचा आकार मेन्टेन करण्यासाठी हा नृत्य प्रकार सर्वात उपयुक्त आहे. बेली डान्समध्ये अ‍ॅरोबिक एलिमेंटही शिकवला जातो. त्यामुळे शरीरातील एन्डोर्फीन बाहेर पडते, मूड स्विंग्स होत नाहीत आणि मन ताजेतवाने वाटते. बेली डान्स हा सर्वात जास्त फायदेशीर आहे. कॉर्निक बॅक, शोल्डर पेन आणि आथ्र्रायटिस याकरता हा डान्स महत्त्वाचा आहे.

टॅप डान्स टॅप डान्सकरता पायात बूट घालणे आवश्यक असते. ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घालू शकता. बरेच जण लेगिंग्ज, शॉट्स त्यावर टी-शर्ट किंवा वेस्टर्न कपडे परिधान करतात. या नृत्यात बॅलन्स कसा राखावा हेही शिकवलं जातं. या डान्सची रचना अशी की तुम्हाला तुमचे पोश्चरल मसल्स ‘कोर’भोवती आणावे लागतात, जेणेकरून तुमचे बॉडीवेट तुमच्या पायांवर राहते. ज्यामुळे तुमचे पोश्चर सुधारते. तुमचे पोट आत जाते तसेच लोअर बॅक सरळ होण्यास मदत होते. शफिंग, पिक-अप्स, जम्पिंग, विरुद्ध तळपायावर लॅन्डिंग करणे, तळपायाने बोल फिरवताना मागे-पुढे होणाऱ्या मूव्हमेंट्सनी २५० कॅलरीज् अध्र्या तासाच्या सेशनने बर्न होतात. आर्म स्ट्रेचिंगही यामुळे होते.

स्ट्रीट डान्स/ हिप हॉप हे डान्सप्रकार तसे कमर्शियल डान्स ट्रेण्ड्स आहेत. जे जास्तकरून म्युझिक व्हिडिओजमध्ये दिसतात. स्ट्रीट डान्स तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जर तुम्हाला बॅलेट डान्स अथवा टॅप डान्स जमत नसेल तर तुम्ही स्ट्रीट डान्स नक्कीच करू शकता. या दोन्ही डान्सप्रकारांमुळे डान्सर आणि प्रेक्षकांमधील संवाद वाढतो. हे दोन्ही नृत्यप्रकार स्ट्रीटवर, नाईट क्लब्स, स्कूल यार्ड अशा ठिकाणी केले जातात.

सालसा डान्स सालसा डान्समधून बेसिक फूट पॅट्र्न्‍स, स्टेप्स, टर्न्‍स, पोझिशन्स, अ‍ॅडव्हान्स स्पाईन्स, फूट वर्क या सर्व गोष्टी शिकता येतात.? एका तास सालसा केल्यावर साधारणपणे ६०० कॅलरीज् तुम्ही बर्न करू शकता. मसल्स आणि हाडं सुदृढ ठेवण्यासाठी या नृत्यप्रकार योग्यच आहे. सालसा शिकल्याने सेल्फ एस्टीम, आत्मविश्वास आणि फ्लेक्झिबिलिटी वाढते.