शब्दांकन: वेदवती चिपळूणकर

संकलन : तेजश्री गायकवाड

चित्रपटाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारी आणि सरधोपट मार्गाचे चित्रपट न स्वीकारता आपल्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी परिपूर्ण अभिनेत्री इरावती हर्षे! हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांत तितक्याच समर्थपणे वावरणाऱ्या इरावतीशी गप्पा मारण्याची संधी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत  ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना मिळाली. ‘शांती’सारखी मालिका ते अगदी आताच्या ‘आपला मानूस’ आणि पुलंच्या चरित्रपटापर्यंतचा तिचा प्रवास या गप्पांमधून उलगडला. नव्याने या क्षेत्रात येऊ  पाहणाऱ्या तरुणाईला तिने काही मोलाचे सल्लेही दिले. या वेळी तिला बोलतं केलं रेश्मा राईकवार आणि स्वाती पंडित यांनी..

आपण ‘एस्टॅब्लिश’ कधीच होत नाही!

एकदा आपण ‘एस्टॅब्लिश’ झालो असं आपल्याला वाटायला लागलं की तिथे आपली प्रगती थांबते. आपण आपल्याभोवती एक ‘सेफ्टी नेट’ तयार करतो आणि कोणतीही नवीन गोष्ट करून बघण्याची रिस्क घेत नाही. नवीन गोष्टी करून बघितल्या नाहीत तर आपण एका साच्यात फिट होऊन जातो. ज्याला सतत प्रगती करत राहायची असते त्याला स्वत:ला ‘एस्टॅब्लिश’ ठरवून मोकळं होता येत नाही. नवीन अ‍ॅडव्हेंचर करताना हे एस्टॅब्लिश असणं आडवं येतं. वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी हा टॅग नसणं कधीही चांगलं!

डबिंगचा अनुभव

डबिंग या प्रकाराची मला कायमच धास्ती वाटायची. लिपसिंक मॅच करत त्याच भावनांनी संवाद म्हणायचे या गोष्टीत मी फारशी कम्फर्टेबल नव्हते. एकदा सहज स्टुडिओमध्ये टाइमपास करत असताना मी ‘बेवॉच’चं हिंदी स्क्रिप्ट पाहिलं. तेव्हा मला कळलं की ‘बेवॉच’चं हिंदी डबिंग होणार आहे. गंमत म्हणून कोणी आजूबाजूला नसताना मी ते वाचून पाहिलं. त्यानंतर मी ‘बेवॉच’, ‘स्मॉल वंडर्स’, ‘गोल्डन कंपास’ अशा अनेक हॉलीवूड सिनेमांसाठी डबिंग केलं. ‘दिल तो पागल है’च्या फ्रेंच आवृत्तीसाठी मी माधुरी दीक्षितच्या भूमिकेसाठी डबिंग केलं. ते डबिंग जास्त कठीण होतं, कारण फ्रेंच भाषा शिकून ते संवाद डब करायचे होते. जे मी करू शकणार नाही असं वाटलं होतं ते मी अगदी मनापासून एन्जॉय केलं.

शिक्षण हवं

मी स्वत: अभिनय क्षेत्रात येताना त्याचं काहीही शिक्षण नसताना आले आणि अनुभवातून शिकत गेले. मात्र तंत्रशुद्ध शिक्षण घेणं हे तितकंच आवश्यक आहे. सरावाने गाडी चालवता येते, पण मुळातच अ‍ॅक्सलरेटर, ब्रेक आणि क्लच या तिघांमध्ये गोंधळ असला तर त्या सरावाने जमलेल्या स्किलचा पाया कच्चाच राहतो. त्यामुळे तांत्रिक शिक्षण असणं, त्याची माहिती असणं महत्त्वाचं आहे. समोरच्याचं ऐकून घेता आलं पाहिजे. इन्स्ट्रक्शन्स ऐकून त्याबरहुकूम काम करणं हेही जमलं पाहिजे. त्यासाठी या क्षेत्रातल्या शिक्षणाचा फायदाच होतो.

टेलिव्हिजनमधला फरक

नव्वदच्या दशकातील टेलिव्हिजनमध्ये साधेपणा होता. ‘शांती’ ही मालिका पहिला भारतीय डेली सोप म्हणून ओळखली जाते. ऑगस्ट १९९३ मध्ये टीव्हीवर आलेली ही मालिका. त्या वेळी मालिकांचे भाग मर्यादित असायचे आणि अनेकदा ती संख्या आधीच ठरलेली असायची. त्या वेळी टीव्ही इंडस्ट्री ही नुकतीच जोर धरू लागली होती आणि बहरायच्या प्रयत्नात होती. त्याला कित्येक र्वष झाली. आताच्या टीव्ही मालिका आणि त्या वेळच्या टीव्ही मालिका यांच्यात प्रचंड फरक आहे. आताच्या टीव्ही मालिकांपासून मी लांब आहे आणि लांब असण्याबद्दल आनंदीसुद्धा आहे.

फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि मी

मी कधीकाळी ‘छोटा मूँह, बडी बात’ नावाचा एक टीव्ही शो केला होता. एक दिवस सहज बोलता बोलता असं लक्षात आलं की त्याच्या कोणत्याच जुन्या टेप्स आपल्याकडे सांभाळून ठेवलेल्या नाहीत. अशा वेळी काहीतरी रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असल्याचं लक्षात आलं. आपल्याकडे आधीपासून मौखिक परंपराच आहे. लिखित स्वरूपात दस्तऐवज जपून ठेवणं याची आपल्याला सवयच नाहीये. तसा विचारच आपण कधी करत नाही. वेस्टर्न कल्चरमध्ये या गोष्टी त्यांनी खूप जपल्या आहेत. ती एक गोष्ट आपल्याला गुण म्हणून त्यांच्याकडून घ्यायला हवी. आपल्याच गौरवशाली, यशस्वी गोष्टी जपण्यात आपण कमी पडतोय हे लक्षात आलं आणि त्याबाबतीत काहीतरी करायला हवं हे जाणवलं. त्यानंतर मी, दिग्दर्शक शिवेन्द्र सिंग डुंगरपूर आणि त्याची पत्नी तीशा आम्ही एकत्र चर्चा केली. या चर्चेतून मग ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’ सुरू क रण्याचा निर्णय आम्ही घेतला. आपल्या चित्रपटांचं जतन करणं आणि त्याबद्दलचं शास्त्र पुढे शिकवणं हा आमचा या फाउंडेशनमागचा मुख्य उद्देश आहे.

माझ्या भूमिका

माझ्या सगळ्याच भूमिका आवडल्या वगैरे मी म्हणणार नाही. पण प्रत्येक भूमिकेचं आपलं एक स्वतंत्र आव्हान असतं, वैशिष्टय़ असतं हे मात्र नक्की! प्रत्येक भूमिकेचं वेगळं स्थान असतं. ‘झी’वर मी ‘तोहफा’ नावाच्या मालिकेत काम केलं होतं ज्यात मी खुनी होते. असं काहीतरी एक्सायटिंग करायला मला आवडतं. मी खूप थंड डोक्याने माझ्या नवऱ्याची हत्या करते, अशी ती गोष्ट होती. मला माझ्या नेहमीच्या चौकटीपेक्षा ही भूमिका जास्त आवडली. मात्र माझी सगळ्यात आवडती भूमिका म्हणजे ‘कासव’ चित्रपटातील भूमिका म्हणता येईल. सुमित्रा भावेंचं लेखन आणि त्यांची शैली या गोष्टी न आवडण्यासारख्या असूच शकत नाहीत. ‘कासव’ हा माझ्या आयुष्यातला एक मोठा टप्पा म्हणता येईल. यात डिप्रेशनमधून बाहेर पडलेली नायिका मी साकारली होती. आणि खरंतर ती डिप्रेशनची प्रक्रिया मी तेव्हा अनुभवली होती. त्यातून बाहेर पडले आणि हा विषय या चित्रपटरूपाने माझ्याकडे आला. त्यामुळे तो मला जास्त जवळचा वाटला. मला भविष्यात कॉमेडी भूमिका साकारण्यासाठी प्रयत्न करायला आवडेल.

 ‘शांती’ने काय दिलं?

‘शांती’ ही मालिका २६० भागांची होती. सुमुखी पेंडसे, सुकन्या कुलकर्णी यांच्यासारख्या अभिनेत्रींबरोबर मला काम करायला मिळालं. त्या वेळी एका सीनमध्ये एका वेळी तीन कॅमेरे लागायचे. शूटिंगचं लाइव्ह एडिटिंग व्हायचं. त्यामुळे कॅ मेऱ्याचा सेन्स अगदी व्यवस्थित यायला लागला. मी काही या क्षेत्राशी निगडित कोणतंच शिक्षण घेऊन आले नव्हते. त्यामुळे सगळ्या तांत्रिक गोष्टीही मला ‘शांती’च्या वेळी पहिल्यांदाच शिकायला मिळाल्या.

अ‍ॅक्टर होणं म्हणजे..

अनेकदा असं विचारलं जातं की फिटनेसवर एवढं लक्ष कसं देता वगैरे.. मात्र मला असं वाटतं की स्क्रीनवर तुम्ही दिसणार तर तुम्हाला फिटनेसची काळजी घेणं गरजेचंच आहे, त्याला कोणताही पर्याय नसतो. अभिनय करण्यासाठी आधी तुमची भूमिका पूर्ण समजून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी भूमिकेची संपूर्ण माहिती घेणं आणि अभ्यास करणं आवश्यक आहे. मला एक किस्सा वाचलेला आठवतो. डस्टिन हॉफमन यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा आहे. ते एकदा दमल्याचा सीन देण्यासाठी खूप धावून आले आणि त्यांच्या को-अ‍ॅक्टरने त्यांना विचारलं, ‘डू यू नो देअर इज समथिंग कॉल्ड अ‍ॅक्टिंग?’ अभिनयातून जास्तीतजास्त गोष्टी, घटना, भावना दाखवता आल्या पाहिजेत हा यातला साधा बोध!

आनंदात अध्यात्म का नाही?

आपल्या आजूबाजूची माणसं, कुटुंब आणि इतर सामाजिक घटक हे आपल्याला नेहमी सपोर्ट करतात. मात्र आपण आपल्यासाठी ‘कोपिंग मेकॅनिजम’ तयार करणं गरजेचं आहे. दु:खात, नैराश्यात आपल्याला अध्यात्म आठवतं मात्र आनंदाच्या वेळी आपण त्या आनंदात वाहवत जातो. त्या वेळीही आपल्याला मार्गावर आणण्यासाठी अध्यात्म आणि मेडिटेशन उपयोगी पडतं. या सगळ्याचा फायदा असा होतो की कोणत्याही गोष्टीला आपण तात्काळ ‘रिअ‍ॅक्शन’ न देता विचार करून ‘रिस्पॉन्स’ द्यायला शिकतो.

अ‍ॅडव्हेंचर करत राहायचं!

मी काही ठरवून या क्षेत्रात आलेली मुलगी नाही. नवीन गोष्टी दिसल्या, करून पाहाव्याशा वाटल्या आणि कोणी कधी त्यापासून रोखलं नाही, अशा वाटेने मी या क्षेत्रात आले. मी कॉलेजमध्ये रुपारेलला होते तेव्हा मी आणि माझी मैत्रीण, आमच्या असं लक्षात आलं की रुपारेलमध्ये बऱ्याच वर्षांत इंग्लिश नाटक झालेलं नाही. तेव्हा आम्ही दोघींनी ‘द लास्ट ललबाय’ नावाचं नाटक लिहिलं आणि ते बसवण्याच्या मागे लागलो. त्या वेळी कॉलेजचे उपमुख्याध्यापक हिर्लेकर सर आणि माझे आई-बाबा यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. नंतर कधीकाळी मी ‘जंगली तूफान टायर पंक्चर’ अशा नावाचा एक मपेट शो केला  होता. ज्यात माझ्या कॅ रेक्टरचं नाव होतं ‘इंकी पिंकी ३’. असे वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचे आणि शिकण्याचे वेगवेगळे अनुभव मी सतत घेत राहिले. त्यातून मला असं जाणवलं की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करता आलं पाहिजे. परिचयाच्या नसलेल्या गोष्टी करून पाहण्याचं धाडस करता आलं पाहिजे. काहीतरी अ‍ॅडव्हेंचर सतत करत राहिलं पाहिजे.

तांत्रिक हौस

मी एक टीव्ही कमर्शियल अर्थात जाहिरात शूट करत होते. त्या वेळी आमचे कॅमेरामन होते गोपाळ शहा. त्यांना मी विचारलं की मी तुम्हाला असिस्ट करू का? मला फक्त तांत्रिक बाजू समजून घ्यायची होती. हेही करून पाहू या उत्सुकतेने मी त्यांना विचारलं. मात्र त्यांना ते सुरुवातीला अजिबातच पटलं नाही. आम्ही अ‍ॅक्टर लोक, पडद्याच्या पुढेच राहिलं पाहिजे, ही पडद्यामागची कामं वेगळी असतात, वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. मात्र मला काम करायचंच होतं. शेवटी त्यांनी कंटाळून मला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सेटवर यायला सांगितलं. पहिल्या दिवशी मी लायटिंगच्या सेटअपमध्ये मदत केली. लाइट्सना फिल्टर लावण्यापासून मला त्यांनी कामं सांगितली आणि चुकलं तिथे शिकवलंही! असे चार ते पाच महिने मी त्यांची असिस्टंट म्हणून काम करत होते. व्हिडीओकॉनची महिमा चौधरीने केलेली एक जाहिरात होती ज्यात महिमा चौधरीचा शॉट मर्लिन मन्रोचा फ्रॉक उडतो असा जो शॉट आहे त्या पद्धतीने घ्यायचा होता. तो ट्रॉलीवरचा शॉट मी शूट केला होता. माझ्यासाठी हीपण एक अचीव्हमेंटच होती.

अनेक इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या  – हर्षदा परब

मला इरावती यांचा ‘कासव’ हा सिनेमा बघितल्यापासून त्यांच्याविषयी कुतूहल होतं. त्यांनी आधी कसं काम केलं आहे, शिक्षण काय घेतलं, त्यांनी कला क्षेत्रात कशी कामाला सुरुवात केली? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला आज मिळाली. या क्षेत्रात काम करताना त्यांना किती अडचणी आल्या, त्यांनी डिप्रेशनशी लढा दिला, फिटनेस कशा मेंटेन करतात? या सगळ्याच गोष्टी आमच्यासारख्या तरुणाईसाठी शिकण्यासारख्या आहेत.

प्रवास महत्त्वाचा – मैत्रेयी देशमुख

मी नेहमीच व्हिवा लाऊंज कार्यक्रम आवर्जून बघण्यासाठी येते. आणि नेहमीच नवनवीन उत्तम व्यक्तिमत्त्वाची भेट मला होते. इरावती यांच्याबद्दल सिनेमा आणि काही मुलाखती सोडता जास्त माहिती नव्हती, पण आज खूप माहिती त्यांच्याविषयी आणि त्यांच्याकडूनही मिळाली. बाहेरच्या जगात वावरून पाहा, नवीन गोष्टी शिका, ट्राय करा हा त्यांनी दिलेला कानमंत्र मी कधीही विसरू शकणार नाही. ध्येयापेक्षा तिथवर पोहोचेपर्यंतचा प्रवास महत्त्वाचा असतो हे मला शिकायला मिळालं.

चित्रपटसृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला – गणेश कन्हेरकर

मी ‘लोकसत्ता’चे खूप मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे मला आज आवडत्या अभिनेत्रीला भेटायची संधी मिळाली. मी इथे रिकाम्या डोक्याने आलो होतो, पण इथून खूप काही घेऊन जातो आहे. इरावती यांच्यामुळे माझा या चित्रपटसृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्या प्रवासातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. असे कार्यक्रम तरुणाईने कधीही मिस करू नयेत.

गप्पांमधून इरावती समजल्या – प्रथमेश जाधव

या गप्पा असल्यामुळे या गप्पांचाच आपण भाग आहोत असं वाटलं. या गप्पागोष्टींमधूनच अनेक महत्त्वाच्या बाबी समजल्या. तरुणाईच्या अनेक गोष्टी यातून नीट लक्षात आल्या. ज्यांना या कला क्षेत्रात जायचं आहे त्यांच्यासाठी हा संवाद खूप महत्त्वपूर्ण होता, असं मला वाटतं.

अभिनय क्षेत्रात येऊ  पाहणाऱ्यांसाठी मोलाचा सल्ला – जुई सावे

निव्वळ अभिनयाबद्दल न बोलता इरावती यांनी डबिंग, कॅमेरा शॉट्स, त्यामागची मेहनत अशा अनेक गोष्टींवर मतं मांडली. अभिनय क्षेत्रात काय प्रगती व्हायला हवी याबद्दलचं त्यांचं मत समजलं. इरावती यांनी अनेक र्वष इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, त्यामुळे अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आजपर्यंतचा कला क्षेत्राचा प्रवासही समजला.

कॅमेऱ्यामागची अभिनेत्री आणि तिची मेहनत समजली – ओमकार गुप्ते

इरावती यांचं नाव मी ऐकून होतो, सिनेमातलं कामही बघितलेलं होतं. पण ही नायिका स्क्रीन सोडता जवळून पाहता आली. तिला ऐकता आलं, तिचा प्रवास तिच्या बोलण्यासोबत आम्हालाही अनुभवता आला. पडद्यावर थोडय़ाशा वेळापुरत्या दिसणाऱ्या त्यांच्या कामामागे किती मेहनत असते तेही आजच्या गप्पांमधून समजलं.