|| शेफ अनघा गोडबोले

आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या इटली या देशाची उन्हाळ्यातील खाद्यभ्रमंतीची अनोखी सैर खास व्हिवा वाचकांसाठी..

इटली म्हटलं की आपल्याला पिझ्झा, कॅनलोनी, पास्ता या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण इटली म्हणजे एवढेच नाही, तर त्या पलीकडेही या देशात बघण्यासारखे बरेच आहे. भरपूर वायनरीज, ऑलिव्ह गार्डन्स, विशाल, संपन्न समुद्रकिनारा, राजवाडे त्याचबरोबरीने त्यांची खाद्यसंस्कृतीसुद्धा अनुभवण्यासारखी आहे. हा देश लांबुळका असल्यामुळे प्रत्येक शहरातील हवामान वेगळे आहे. स्वित्र्झलडजवळील भाग जरा गार तर ग्रीसजवळील भाग गरम आहे. जसजसे तुम्ही वेगळ्या भागात जाता तसे तेथे मिळणारे स्थानिक पदार्थ त्यांची रूप, चव बदलतात.

नेपोलीचा पिझ्झा तर बॉलोग्नामधील टोरंटोल्लिनी पास्ता तर मिलानमधील रीसोत्तो, प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यामध्ये सगळे इटालियन लोक आपापल्या कुटुंबीयांबरोबर सुट्टी एन्जॉय करताना दिसतात. इटालियन पदार्थामध्ये टोमॅटोचा वापर खूप केला जातो. इटलीमध्ये उन्हाळ्यात टोमॅटो खूप छान आणि रसरशीत मिळत असल्यामुळे टोमॅटो वापरून केलेले पदार्थ येथे उन्हाळ्यात खूप चाखायला मिळतात. मार्केटमध्ये गेलात तर सगळं मार्केट लालबुंद टोमॅटो, रसरशीत मेलोन्स, हिरव्यागार हर्ब्सनी ओथंबून वाहत असतात. इटालियन लोक वर्षभर वापरण्यासाठी उन्हाळ्यातील टोमॅटोचे कॅनिंग करून ठेवतात तर उन्हाळ्यातील फ्रुट्स वाळवून ठेवतात.

इटलीमध्ये उन्हाळ्यात रेस्टॉरंट आपले खुर्च्या-टेबलं रस्त्यावर मांडतात. कलाकार आपली कला दाखवतात आणि सगळे खवय्ये खाबूगिरी करीत याचा आनंद घेताना दिसतात. ‘बृस्केत्ता’ हा इटलीतील एक प्रसिद्ध पदार्थ आहे. कुरकुरीत ब्रेडच्या तुकडय़ावर सुंदर लाल टोमॅटो, बेसिलचे मिश्रण, फ्रुटी, ऑलिव्ह ऑइल घालून केलेला हा पदार्थ फारच छान लागतो. इटलीतील बांधव उन्हाळ्यातील गरम हवेत फ्रेश सॅलड्स खाताना दिसतात. टोमॅटोच्या चकत्या, फ्रेश मोझरेला चीज आणि ताजी बेसिलची पाने वापरून केलेले कॅ प्रिसें सलाड इटालियन लोकांना खूप आवडते. उन्हाळ्यात मिळणाऱ्या खरबुजाबरोबर केलेला ‘हॅम आणि मेलॉन’ सलाड, शिळ्या ब्रेडचे तुकडे आणि फळे घालून केलेले पॅनझानेला सलाड असे बरेच प्रकार तिथे आवडीने खाल्ले जातात.

सॅलड्सबरोबर उन्हाळ्यात इथे वेगवेगळे मासेही खूप खाल्ले जातात. पालेर्मोच्या नाइट मार्के टमध्ये आपल्याला नवल वाटेल पण ऑक्टोपस खूप दिसतो. उकळत्या पाण्यात शिजवून, त्यावर लिंबू आणि मीठ घालून केलेले ऑक्टोपसचे सलाड इथे सर्वाना मनापासून आवडते. उन्हाळ्यात इटलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आइसक्रीमवर ताव मारला जातो. आइसक्रीमला इटलीत ‘जलातो’ म्हटले जाते. जलातेरिया म्हणजे आइसक्रीम पार्लर होय. इटलीतल्या आइसक्रीमचं वैशिष्टय़ म्हणजे आपल्यासमोर इथे आइसक्रीम बनवले जातात व ते सव्‍‌र्ह केले जातात. प्रामुख्याने फळांच्या रसापासून केलेली ‘ग्रॅनिता’ ही भारतीय ‘बर्फाच्या गोळ्याची’ बहीण आहे. कलिंगड, आंबा, डाळिंब, संत्रे अशा फळांच्या गारेगार चवी उन्हाळ्यात चाखायला मजा येते. क्वचित यात बदाम आणि चॉकलेटसारखे फ्लेवर्स मिळतात. उन्हाळ्यात खाल्ला जाणारा अजून एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे ‘जिलाटो’. आइसक्रीमसारखा असणारा हा पदार्थ उन्हाळ्यात प्रत्येकाच्या हातात दिसतो. हा पदार्थ प्रथम कुठे केला गेला याविषयी दुमत आहे. कोणी म्हणतं फ्लोरेन्समध्ये तर कोणी म्हणतं सिसिलीमध्ये. पिस्ता आणि कॉफी या चवी जिलाटोमध्ये चविष्ट लागतात. इटालियन लोकांना कॉफी खूपच आवडते. कडक उन्हाळ्यात देखील ते त्यांची कॉफीची आवड जोपासतात. इस्प्परेससो कॉफीमध्ये वॅनिला आइसक्रीम घालून केलेली ‘अफोगातो’ ही कॉफी उन्हाळ्यात अधिक प्यायली जाते.

सिसिली हे इटलीचा भाग असणारे एक बेट आहे. या बेटावर उन्हाळ्यात अतिशय वेगळे पदार्थ बघायला मिळतात. ग्रीक आणि अरबांची या बेटावर सत्ता होती आणि त्या सत्तेचा परिणाम इथल्या खाद्यसंस्कृतीवर  झाला आहे. इथला एक पदार्थ ‘पान ई पानेले’ हा अगदी मुंबईच्या वडा किंवा भजी पावसारखा असतो. कागदाच्या कोनमध्ये घालून लोक रस्त्यावर चालत चालत हा पदार्थ खातात.

इटलीत एकंदरीतच तळलेल्या गोष्टी खूप खाल्ल्या जातात. झुकिनी किंवा घोसाळ्याच्या फुलाची भजीदेखील सर्रास खाल्ली जातात. त्याच्या पोटात गोट चीज घालून छान कुरकुरीत तळलं जातं. अरांचिन्नी जे शिळ्या रिझोटोपासून बनवले जाते, हा इथला फेमस समर स्ट्रीट फूड आहे. ‘कॅनोली’ हा पदार्थसुद्धा इथे लोकप्रिय आहे. कुरकुरीत आवरण आणि त्यात पनीरसारखे लागणारे रिकॉटा चीज घालून केलेली ही डिश इटालियन लोक चवीने खाताना दिसतात.

खाण्याबरोबरच उन्हाळ्यात इटालियन पेयसुद्धा प्रसिद्ध आहेत. लिंबू घातलेला वोडका, ज्याला लेमोनचेलो म्हणतात. टी इटालियन सोडा त्याचबरोबर व्हाइट स्पार्किंग वाइन वापरून केलेले स्प्रिट्झ अशी बरीच लोकप्रिय पेये इटलीमध्ये बघायला मिळतात.

गारेगार अफोगातो

साहित्य : १ स्कूप व्हॅनिला आइसक्रीम, १ शॉट एस्प्रेसो कॉफी

कृती: एका काचेच्या कपात एक स्कूप व्हॅनिला आइसक्रीम घालावे. त्यावर गरम एस्प्रेसो ओतावी आणि लगेच सव्‍‌र्ह करावे.

 

पॅनझानेला सलाड

साहित्य : तीन कप शिळ्या ब्रेडचे तुकडे, पाच टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, १/२ टी स्पून मीठ, ९०० ग्रॅम टोमॅटो, ४ कप मोझरेलला चीज (तुकडे), १/२ कप कांद्याचे पातळ काप, २ टेबलस्पून रेड वाइन व्हिनेगर, १ टेबलस्पून ओरिगॅनो, १ काकडी चिरलेली, १/३ कप चिरलेली तुळशीची पाने, १/२ टी स्पून मस्टर्ड.

कृती : ब्रेडच्या तुकडय़ांना थोडे तेल लावून बेकिंग शीटवर घालून १८० सेंवर १०-१२ मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत बेक करून घ्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करून घ्या. त्यात चीजचे तुकडे, १ टीस्पून व्हिनेगर, कांद्याचे काप, ओरिगॅनो घालून मिक्स करून घ्या. दुसऱ्या भांडय़ात उरलेले व्हिनेगर, मस्टर्ड, मीठ आणि मिरपूड घालून एकजीव करा. त्यात ऑलिव्ह ऑइलची बारीक धार घालत घालत मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करावे आणि ड्रेसिंग बनवून घ्यावे. यात काकडीचे तुकडे घालून मिक्स करावे. काकडीचे मिश्रण, टोमॅटोचे मिश्रण आणि ब्रेडचे तुकडे एका मोठय़ा भांडय़ात मिक्स करावेत. वरून तुळशीची पाने घालून सर्व एकत्र करावे.

संयोजन साहाय्य : मितेश जोशी

viva@expressindia.com