डोंगरदऱ्यातील भटकंती हा काहीसा पुरुषी वर्चस्व असणारा छंदात्मक साहसी खेळाचा प्रकार. गेल्या काही वर्षांत मात्र समाजाची मानसिकता बदलत गेली तसे डोंगराकडे वळणाऱ्या मुलींची संख्यादेखील वाढली. डोंगरभटकंतीचा आनंद ही आज अनेकींची जीवनशैली झाली आहे. तीन पिढय़ांच्या ट्रेकर्सशी बोलून रेखाटलेली ही लाईफस्टाईल !
मुळातच काहीसं पुरुषी वर्चस्व असणाऱ्या गिर्यारोहणामध्ये एक साहसी क्रीडा प्रकार म्हणून महिलांचं पाऊल काहीसं उशिराच पडलं. सुरुवातीच्या काळात गडकिल्ल्यांच्या निमित्ताने डोंगरभटकंती होऊ लागली. पन्नासच्या दशकापासून मुंबई विद्यापीठाच्या आणि काही संस्थांच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयीन मुलींनी गिरिभ्रमणाच्या, काही प्रमाणात प्रस्तरारोहणाच्या प्रांतांत आपलं अस्तित्व दाखविलं. ८०च्या दशकात तर केवळ महिलांच्या हिमालयीन मोहिमादेखील आखल्या गेल्या. त्या काळात एक छंद म्हणून याकडे पाहणाऱ्या अनेक होत्या पण गिर्यारोहणाला जीवनशैलीची भाग बनविणाऱ्यादेखील अनेक होत्या. अशाच प्रकारे गिर्यारोहण आयुष्याचा भाग बनल्यामुळे आजही डोंगरात भटकणाऱ्या ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे याबद्दल सांगतात, ‘साहस आणि निसर्गाची आवड आणि घरून पूर्ण पाठिंबा यामुळे ३०-३५ वर्षांपूर्वी आम्ही डोंगरात भटकू लागलो. त्या वेळी एक प्रकारे झोकून देण्याची आमची वृत्ती तयार झाली होती. मैत्रिणींच्या घरी जाऊन पालकांना समजावूनदेखील सांगत असू. अगदी पाच-सहा मुली एकत्र येऊन आम्ही ट्रेकला जात असू. वाट चुकल्यावर रात्री डोंगरातच मुक्कामदेखील केला आहे. आजही सर्वच वयांच्या महिला आमच्याकडे मोठय़ा प्रमाणात येत आहेत. लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. गिर्यारोहणातील स्त्री-पुरुष दरी कमी झाली आहे. पण आज एकूणच चंगळवादाचा जो परिणाम समाजावर झाला आहे, तो या क्षेत्रावरदेखील दिसून येतो. पूर्वी जी झोकून देण्याची वृत्ती होती ती मात्र कमी झाली आहे. त्यातल्या त्यात ग्लॅमरस माऊंटेनिअरिंगकडे वळताना दिसतात.’’

पन्नास वर्षांत पालकांच्या आणि मुलींच्या मानसिकतेत बदल झाला आहे. आज महिलांच्या फार मोठय़ा गिर्यारोहण मोहिमा होत नसल्या तरी ट्रेकिंगमध्ये मोठय़ा प्रमाणात मुलींची संख्या वाढली आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगात भटकंती करताना मुलांबरोबरच मुलींची संख्यादेखील समान असते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी डोंगर भटकंतीला सुरुवात केलेल्या आदिती गाडगीळ याच अनुषंगाने सांगतात, ‘‘मुलींच्या ट्रेकिंगकडे आजही बऱ्याच प्रमाणात विवाहपूर्व आणि विवाहोत्तर असे पाहिले जाते. माझ्याबाबत सांगायचे तर माहेरपेक्षा सासरी खूप पाठिंबा मिळाल्यामुळे दोन मुली झाल्यानंतरदेखील माझं ट्रेकिंग आजही सुरू आहे, किंबहुना वाढलंच आहे. मनातून आवड असणं आणि त्याला घरून योग्य तो पाठिंबा मिळणं हे या ठिकाणी मला महत्त्वाचं वाटते. पण बऱ्याच वेळा लग्नानंतर कोणी तरी एकानं तडजोड करायची तर बहुतांश वेळा ती जबाबदारी मुलींवरच येते. त्याचा परिणाम मुलींच्या ट्रेकिंगवर होतो. अर्थात माझ्याबाबत तसं झालं नाही हे महत्त्वाचं.’’ खरं तर आज या क्षेत्रात मुलींना खूप काही करता येण्यासारखं आहे, याकडे त्या लक्ष वेधतात.
आजच्या पिढीची तर गिर्यारोहणाकडे पाहण्याची मानसिकता वेगळीच आहे. स्वत:च्या स्वच्छंदी मोकळ्या जगण्यासाठी अनेक मुली वैयक्तिक नियोजन करतात आणि त्यातून नेहमीच्या जबाबदाऱ्यांबरोबर आपली आवडदेखील जोपासतात. योग्य नियोजन करून डोंगरभटकंतीची आवड टिकवणं आता बऱ्याच प्रमाणात सुकर होत चाललं आहे. पण त्यासाठी ती आवड तुमच्या जीवनाचा भाग बनविण्याची आवश्यकता असल्याचं आजच्या पिढीतील मुलींचं सांगणं आहे. आज काही प्रमाणात तरी नव्या पिढीतील मुली ट्रेकिंग, माउंटेनिअरिंगला जीवनाचा भाग बनविताना दिसत आहेत. सोनाली भाटिया ही त्यापैकीच एक. ती आवर्जून सांगते, पुरुष-महिला असा भेद करायची गरज नाही, कारण अनेक मुलांचं ट्रेकिंगदेखील लग्नानंतर बंद होतं. तिच्या मते आज हिमालयातदेखील अनेक ठिकाणी केवळ महिलांच्या आयोजनाखाली गिर्यारोहणाचे उपक्रम केले जातात. पहाडी भागातली महिला करिअर म्हणून त्याकडे पाहताना दिसतात. स्वतबाबत बोलताना ती सांगते, ‘‘डोंगरभटकंती ही माझा जीवनाचा भाग बनली आहे. नवीन ठिकाणी जाणे, नव्या लोकांना भेटणे, नवीन माहिती मिळवणे आणि हे सर्व करण्यासाठी स्वत:चा फिटनेस टिकवणे, प्रशिक्षण घेणे हे मी जाणीवपूर्वक करते. डोंगरात गेले नाही तर मला वेड लागेल, कारण मला डोंगरांचे वेड लागले आहे. योग्य नियोजन करून मला दरवर्षी हिमालयातदेखील भरपूर फिरता येते. निसर्गाच्या जवळ तर जाता येते पण स्वत:ला शोधता येते.’’

मुलींच्या ट्रेकिंगबाबत आजही बऱ्याच प्रमाणात लग्न हा महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. विवाहपूर्व आणि विवाहोत्तर असेच त्याकडे पाहिले जाते. 
– आदिती गाडगीळ

सहय़ाद्रीत मनसोक्त भटकंती करणारी आणि अनेकांना ट्रेकिंगला घेऊन जाणारी प्रीती पटेल सांगते, ‘‘डोंगरभटकंती ही माझी जीवनशैली बनली आहे. तुम्हाला जर स्वत:ची वेगळी आवड जोपासायची असेल तशी प्राथमिकता देऊन त्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे लागतात. आपल्या आयुष्यात आपण इतर ठिकाणीदेखील हे करतोच. हेच मी माझ्या डोंगरभटकंतीसाठी करते. स्वत:च्या पायावर उभे राहून इतर जबाबदाऱ्या पेलतानाचं स्वत:च्या आवडीनुसार प्राथमिकता सांभाळणे हेदेखील महत्त्वाचं आहे. त्या आवडीनिवडीत जर तुमची जीवनशैली दडली असेल तर मग त्यानुसार वागणं आपसूकच होतं.’’ आपली आवड जोपासण्यासाठी अशा प्रकारे डोंगर भटकणाऱ्या मुलींची संख्या तशी तुलनेने कमी आहे, मात्र आजच्या मुली त्या दृष्टीने विचार करत आहेत हेदेखील तेवढेच खरे. अर्थात लग्नानंतरदेखील आत्यंतिक गरजेपुरत्या तडजोडी करूनदेखील काही मुलींची भटकंती सुरू ठेवण्याची त्यांची तयारी आहे. कारण भटकंती, साहसी खेळ हा त्यांच्या मते जीवनाचा भाग बनलेला आहे. गेली दहा र्वष गडकिल्ल्यांवर भटकणारी आणि सायकलिंगची मनापासून आवड असणारी मीनल जोशी सांगते, ‘‘आताच भटकून घ्या, लग्नानंतर हे छंद जोपासता येतील की नाही हे सांगता येणार नाही असे जे सांगितले जाते ते पटत नाही. डोंगरभटंकती, सायकलिंगमधील जो आनंद मी आता घेते तो आनंद मला लग्नानंतरच्या आयुष्यातदेखील घेता आला पाहिजे. अर्थात काही आवश्यक तडजोडी कराव्यात पण त्यासाठी डोंगरभटकंतीचा आनंद नाकारता येणार नाही, कारण तो माझ्या आयुष्याचा भाग आहे.’’
नव्या पिढीची प्रिसिला मदन ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी सांगते, ‘‘माझ्या घरीच भटकंतीचा वारसा असल्यामुळे मी डोंगरात फिरायला लागले. पण केवळ भटकंती न करता निसर्गाची आवड संरक्षण हादेखील मुद्दा त्यात येतोच. दुसरे असे की इतर काही करून जे आनंदाचे क्षण मिळणार नाहीत ते मला डोंगरात मिळतात, त्यामुळेच तो आवडीबरोबरच जीवनाचादेखील भाग बनतो. माझ्या पिढीतील काही मुलींचा काही प्रमाणात केवळ काही विरंगुळा असा हेतू असला तरी अगदी केवळ दहा- बारा मुलींचा ट्रेक जरी न्यायचा असेल तरीदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे तिचे मत आहे. मात्र अजून करिअर म्हणून फारसं कोणी याकडे पाहत नाही.’’
स्वत:च्या आवडीच्या छंदासाठी एका मर्यादेपर्यंत तर कधी मर्यादा ओलांडून जाणारी ही काही प्रातिनिधिक उदाहरणं असली तरी त्यापलीकडेदेखील काही वास्तव उरतेच. आज प्रत्येक ट्रेकमध्ये मुलांइतकीच मुलींची गर्दी असली तरी त्या गर्दीची मानसिकता काय आहे त्याबद्दल बोलताना प्रीती पटेल सांगते, ‘‘आजकाल ट्रेकिंगसाठी मुली खूप येतात. पण बहुतांश मुलींचं ट्रेकिंग हे केवळ काही काळापुरतच मर्यादित आहे. काही काळापुरतं मिळणारं थ्रिलिंग, फ्रीक आऊट, टाइमपास हा भाग जास्त प्रमाणात दिसून येतो. नवीन मित्र भेटतात, त्यातून वेगळा ग्रुप तयार होतो. ट्रेकिंगशिवाय हा ग्रुप वाढतो. त्यामुळे डोंगरातील सातत्य राहत नाही. थोडक्यात पॅशनेटली पुढे जाऊन ट्रेकिंगला जीवनशैलीला बनविणाऱ्या मुली थोडय़ाच उरतात.’’ हाच मुद्दा इतरांच्या बोलण्यातसुद्धा येतो. याचेच प्रतिबिंब पल्लवी वर्तक हिला केवळ महिलांची प्रस्तरारोहण मोहीम करण्यासाठी महिला प्रस्तरारोहक मिळवायला वर्षभर आटापिटा करावा लागला. यामध्ये दिसून येते अर्थात शहरातील पालकांची, मुलींची मानसिकता बदलली असली तरी अजूनही मुलींचा ट्रेक म्हणून डोंगरवस्त्यातील लोकांचा दृष्टिकोन फारसा बदलला नसल्याचं हे कटुसत्य मात्र सर्वच मुली सांगतात. त्यामुळेच केवळ दहा-बारा मुलींनी मिळून एखाद्या ट्रेक करावा, अशी आपली सामाजिक मानसिकता बनलेली नाही. ही जेव्हा बदलेल तेव्हाच या मुलींच्या लाइफस्टाइलमधील डोंगराचे स्थान अबाधित राहील.