News Flash

जगाच्या पाटीवर : बांधणी स्वप्नांच्यामनोऱ्याची

अजूनही आठवतो आहे तो दिवस ९ ऑगस्ट २०१८. पुणे मराठा मोर्चामुळं बंद होतं. सगळीकडे सामसूम होती

(संग्रहित छायाचित्र)

आदित्य जोशी

अजूनही आठवतो आहे तो दिवस ९ ऑगस्ट २०१८. पुणे मराठा मोर्चामुळं बंद होतं. सगळीकडे सामसूम होती. घरात धावपळ सुरू होती आणि मनात धाकधूक. २५ वर्ष आईवडिलांपाशी राहिल्यावर आता परदेशी जाताना भीती वाटत होती. पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला जाणारे आपण काही पहिलेच नाही, हा विचारही धीर देत होता. पहिलाच विमान प्रवास असल्यानं उत्सुकताही वाटत होती. या संमिश्र भावनांचं गाठोडं घेऊन घराच्या बाहेर पडलो. पुणे इंजिनीअरिंग कॉलेजमधून मी स्थापत्यशास्त्र विषयामध्ये पदवी घेतली. मला स्ट्रक्चरल डिझाइन या विषयामध्ये गोडी वाटल्याने यातच पुढे काम करायचं आहे हे पक्कं केलं. आयआयटीमध्ये शिकण्याची खूप इच्छा असल्याने गेटची परीक्षा दिली, पण त्यात यश मिळालं नाही. म्हणून मग नोकरी करून थोडा अनुभव घ्यायचा ठरवला. पुण्यात मगरपट्टा सिटीमध्ये ‘दार अल हंडाशहा’ या कंपनीत तीन वर्ष नोकरी केली. नोकरी करताना उच्चशिक्षण घेण्याची गरज जाणवत होती. त्यासाठी प्रयत्नही करत होतो, पण यश येत नव्हतं. दोनदा गेट आणि जीआरईची परीक्षा दिली, तेव्हा कुठे आयआयटी रुरकीमध्ये नंबर लागला, पण त्याच वेळी जीआरईमध्येही चांगले गुण मिळाले होते. शेवटी खूप विचार करून परदेशी जाण्याचा निर्णय घेतला.

इथे येण्याच्या आधीचं शेवटचं वर्ष खूपच धावपळीचं गेलं. जीआरई, टोफेल या परीक्षा आणि विद्यापीठांची माहिती गोळा करणं, प्रवेशअर्ज भरणं आणि शेवटी इथे येण्याची तयारी. अमेरिकेमध्ये स्थापत्यशास्त्रातले अद्ययावत संशोधन चालू आहे आणि जगातले बरेच देश अमेरिकेचीच मानके वापरून बांधकाम करतात आणि इतर बऱ्याच देशांची स्थापत्यरचनेसाठी लागणारी मानकं ही अमेरिकन मानकांवरच आधारलेली आहेत. म्हणून अमेरिके त जाण्याचा निर्णय घेतला. त्या वर्षी मी आठवडय़ातून एकदा माझ्या महाविद्यालयात जात असे. तिथे एका पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला मदत म्हणून काम केलं आणि माझंही नाव एका संशोधन पेपरवर आलं. एका विशिष्ट प्रकारच्या मूलद्रव्यांच्या मिश्रणाच्या रचनात्मक अभ्यासावर ते संशोधन होतं. याच्या एका बाजूला धातू असतो आणि एका बाजूला तापमान सहन करू शकणारं मूलद्रव्य असतं. या पेपरचा मला पाहिजे ते विद्यापीठ मिळण्यासाठी फायदा झाला. मी १० विद्यापीठांचे प्रवेशअर्ज भरले होते आणि त्यांच्या उत्तराची वाट बघत होतो. ई-मेल उघडायलाही भीती वाटायची. ४ विद्यापीठांचा होकार आला होता, पण मला अपेक्षित असणाऱ्या पडर्य़ू विद्यापीठाकडून काहीच उत्तर येत नव्हतं. म्हणून शेवटी मे महिन्यामध्ये त्यांना फोन करून विचारलं. मग त्यांचा होकार आला आणि जीव भांडय़ात पडला. मी पडर्य़ू युनिव्हर्सिटीमध्ये ‘एमएस – सिव्हिल इंजिनीअरिंग (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग) या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.  तयारीला खूपच कमी वेळ राहिला होता. व्हिसापासून सगळीच कामं व्हायची होती. पण मित्र आणि घरच्यांच्या मदतीने सगळं सुरळीत पार पडलं. पडर्य़ूच्या विद्यार्थ्यांना ‘बॉइलरमेकर’ असं म्हणतात. मला व्हिसाच्या मुलाखतीत त्याविषयी विचारलं गेलं. यामागची गोष्ट फारच अनोखी आहे. पूर्वी पडर्य़ूमध्ये लोहारकाम करण्याचं प्रशिक्षण देण्यात येत असे. १८९० मध्ये पडर्य़ूच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकन फुटबॉल या खेळात एका स्थानिक संघाचा दारुण पराभव केला, ही बातमी देताना एका पत्रकारानं पडर्य़ूच्या विद्यार्थ्यांना ‘बॉयलरमेकर’ म्हणून संबोधलं आणि हे नाव प्रचलित झालं. मी हे आधीच वाचलं असल्यानं मला उत्तर देता आलं.

पुण्यातील माझ्या महाविद्यालयातला मेकॅनिकलचा विद्यार्थीही पडर्य़ू विद्यापीठात येणार होता. मग आम्ही घर आणि विमानाचं तिकिट वगैरे बुक केलं. तो सोबत असल्यानं एवढय़ा मोठय़ा प्रवासात कंटाळा आला नाही आणि शिवाय मदतही झाली. पुणे ते दिल्ली आणि मग शिकागो असा विमान प्रवास झाला. दिल्ली ते शिकागो असे १६ तास विमानामध्ये बसून थकवा आला होता. पण पहिल्यांदाच नवीन देश पाहायची उत्सुकताही होतीच. माझं विद्यापीठ शिकागोपासून ३ तासांच्या अंतरावर आहे. पण दोन्ही वेगळ्या राज्यात असल्यामुळे दोघांच्या वेळेत १ तासाचं अंतर आहे. हा प्रकार जरा नवीन होता. त्यामुळे एकूण ३ तासांच्या प्रवासाला ४ तास लागले, हे समजल्यावर जरा मजाच वाटली. पडर्य़ू विद्यापीठ हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यात वॉबॅश नदीकाठी छोटय़ा शहरात वसलेलं आहे. इथे सगळीकडे विद्यार्थीच दिसतात. पडर्य़ू नावाच्या एका माणसानं हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत केली, म्हणून विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं. इंडियाना राज्यात मक्याची शेती केली जाते, म्हणून विद्यापीठ स्थापण्यामागचा उद्देश कृषी आणि अभियांत्रिकी शिक्षण हाच होता. या दोन्ही विषयांमध्ये पडर्य़ूनं खूप नाव कमावलं आहे. आत्तापर्यंत पडर्य़ूचे २३ विद्यार्थी अंतराळवीर झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नील आर्मस्ट्राँग. मानवाचं पहिलं पाऊ ल चंद्रावर पडलं ते नील यांचं. पडर्य़ू स्थापत्यशास्त्र विभागाची मोठी प्रयोगशाळा आहे. तिथे भूकंप आणि पूलबांधणी विषयातील अद्ययावत संशोधन केलं जातं. हे विद्यापीठ निवडण्यामागं ही प्रयोगशाळा हेही एक कारण होतं. पण माझी आवड इमारतींचे रचनात्मक विशलेषण या विषयात असल्यामुळे मला तिथं काम करायला मिळालं नाही. आमच्या विभागातले प्राध्यापक खूप हुशार आणि नम्र स्वभावाचे आहेत. मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्याने मी कायमच स्वत:ला नशीबवान समजतो. एक प्राध्यापक पुजोल हे कोलंबियाचे असून त्यांचं संशोधन भूकंपाचा इमारतींवर होणाऱ्या परिणामांवर आहे. ते हसतखेळत शिकवतात. शिकवतानासुद्धा नवनवीन पद्धती वापरतात. त्यामुळे त्यांनी शिकवलेलं लगेच समजतं. माझे गाइड डॉ. प्रकाश हे भारतीय आहेत. त्यांनी आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर इथे येऊन पीएचडी केली आहे. त्यांच्या हाताखाली स्ट्रक्चरल मेकॅनिक्स या विषयामध्ये संशोधन करण्याचा विचार आहे.

इथे आल्यानंतर पहिला मोठा सण होता गणेशोत्सव. आणि पुण्यातला गणेशोत्सव पहिल्यांदाच मिस केल्याचं वाईट वाटत होतं. पण पुण्यातील सिद्धार्थ आणि स्वप्निल या मित्रांनी घरी गणपती आणायचं ठरवलं आणि खूपच उत्साह आला. सिद्धार्थच्या वडिलांनी पुण्यातून गणपतीची मूर्ती पाठवली आणि स्वप्निलच्या वडिलांनी मोबाइलवरून पूजा सांगितली. असा हायटेक गणेशोत्सव साजरा केला. गणपतीची सगळी तयारी आणि रोज आरती करताना घराची आठवण येत होती आणि आपल्यालाही गणेशोत्सव साजरा करता आला, याचा आनंदही वाटला. तसंच नवरात्रीमध्ये गरबा खेळायला शिकलो आणि खूप मजा केली. विद्यापीठात खेळ आणि व्यायामाला खूपच महत्त्व असल्याने त्यासाठी उच्च दर्जाच्या सोयी उपलब्ध आहेत. त्याचाही माझा बॅडमिंटनचा छंद जोपासायला उपयोग करून घेतला. काम करत शिकण्याची आधीपासून खूप इच्छा होती. म्हणून एका वसतिगृहाच्या मेसमध्ये नोकरी सुरू केली. मेसमध्ये जेवणाचे वेगवेगळे काऊं टर होते. तिथे उभं राहून मुलांना काय पाहिजे ते द्यायचं, सगळे पदार्थ कायम गरम ठेवायचे असं काम असायचं. थोडं दमायला व्हायचं, पण मजा यायची. पहिल्या सहामाहीनंतर शिकागोला जाण्याचा योग आला, एका कंपनीमध्ये मुलाखत होती. तिथल्या एका रस्त्याला स्वामी विवेकानंद यांचं नाव दिलेलं आहे. ते पाहिल्यावर मन भरून आलं. योगायोग म्हणजे २०१८ मध्ये त्यांच्या त्या जगप्रसिद्ध भाषणाला १२५ वर्ष पूर्ण झाली होती.

माझा अभ्यासक्रम हा इमारतींच्या स्ट्रक्चरल डिझाइनबद्दलचा आहे. अमेरिकेत इमारतींचे प्लॅन साइन करायचे असतील तर ‘प्रोफेशनल इंजिनीअर’ ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं. दुसऱ्या सहामाहीमध्ये त्याच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करून मी ती उत्तीर्ण झालो. आता मला इंजिनीअर इन ट्रेनिंग असं म्हटलं जाईल आणि पुढची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘प्रोफेशनल इंजिनीअर’ असं म्हटलं जाईल. पुढची परीक्षा एप्रिलमध्ये देण्याचा विचार आहे. सुरुवातीला आमच्या विभागामध्ये मला एकटय़ालाच कोणतीच शिष्यवृत्ती नव्हती. पहिल्या सहामाहीला चांगले गुण मिळाल्यास शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करता येतील, असं प्राध्यापक म्हणाले होते. पहिल्या सहामाहीला खूप अभ्यास करून चांगले टक्के  मिळवले. मग दुसऱ्या सहामाहीपासून शिष्यवृत्ती मिळाली. प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना विषय शिकवायला मदत करायचं कामही केलं. विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास तपासायचा आणि त्यांना काही अडलं तर मदत करायची. त्यामुळे प्राध्यापकांना त्यांच्या संशोधनासाठी थोडा अधिक वेळ मिळतो. हा अनुभव खूपच नवीन होता. मला जो विषय शिकवायला मदत करायची होती तो पदवीच्या शेवटच्या वर्षांचा होता आणि थोडा अवघडही. मलाच कधी कधी अभ्यास करावा लागायचा. इथल्या विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेत समजवावं लागायचं. आपल्याकडे सुटसुटीत शब्द (शॉर्टफॉर्म) वापरण्याचा प्रघात आहे उदा. कॅल्सी, एलएचएस आणि आरएचएस वगैरे. त्यांना ते कळायचं नाही. त्यांना या शब्दांची मजा वाटायची. एक गमतीशीर आठवण म्हणजे, शेवटची परीक्षा चालू होती आणि परीक्षा देण्यासाठी एक मुलगा सुपरमॅनच्या वेशात आला होता. यावरून कल्पना येईल की, इथलं वातावरण, शिक्षणाकडं बघण्याचा दृष्टिकोन किती निराळा आहे ते..

जगाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या मुलांशी ओळख आणि नंतर मैत्री झाली. त्यांच्याबरोबर सांस्कृतिक, आर्थिक आणि विविध विषयांवर गप्पा मारताना खूप काही शिकायला मिळालं. तसंच अमेरिकन मुलांबद्दल असलेले काही गैरसमजही दूर झाले. उदाहरणार्थ- इथली मुलं रात्री पार्टी करतात आणि अभ्यास करत नाहीत वगैरे. इथे सगळ्यांना लवकर उठायची सवय आहे, आमची लेक्चर्सही सकाळी ८ वाजता असतात. एक विशेष म्हणजे इथल्या मुलांना इंजिनीअरिंगमध्ये खरोखर रस आहे. केवळ आईवडील सांगतात म्हणून ते इंजिनीअरिंग करत नव्हते. कदाचित विकसित देश असल्याने फक्त इंजिनीअरिंग केल्यानंच सुखी होता येतं, असा भ्रम इथे नाही. दुसऱ्या सहामाहीनंतर मला शिकागोमधल्या थॉर्नटन टोमासेट्टी या कंपनीमध्ये ३ महिने नोकरी करायची संधी मिळाली. या कंपनीने सौदी अरेबियामधल्या जेद्दाह टॉवरचं डिझाइन केलं आहे. या टॉवरचं वैशिष्टय़ म्हणजे हा टॉवर १ किमी उंच असून सध्या त्याचं बांधकाम सुरू आहे. अनेक चांगल्या अनुभवांबरोबर एक वाईट अनुभवही आला. एका शनिवारी रात्री मी शिकागोच्या घरी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बघत बसलो होतो आणि अचानक आमच्या घरात काही गुंड घुसले. आमच्यावर बंदूक रोखून म्हणाले की, सगळं सामान बाहेर काढा. सगळं सामान गोळा करून आम्हाला भिंतीकडे तोंड करून हात वर करून बसवलं होतं. ती १५ मिनिटं खूपच भयानक होती. मी एकच प्रार्थना करत होतो की, त्यांनी मला काहीही इजा करू नये. शेवटी चोर आमचं सगळं सामान घेऊ न गेले. या प्रकारातून सुखरूप बचावलो, हीच एक चांगली गोष्ट. असो. आम्ही चारजण शेअरिंगमध्ये राहत आहोत. चारही मराठी आहोत आणि त्यापैकी ३ पुण्याचे असून एक अबूधाबीचा आहे. अनेकदा घराची आठवण येते. पहिल्यांदा स्वयंपाक करणं, मित्रांची आठवण येणं, क्वचित निराश वाटणं असे अनेक अनुभव वाटय़ास आले. पण मित्रांशी बोलल्यावर बरं वाटायचं. त्यातही माझा एक मित्र जर्मनीमध्ये आणि एक भारतात. त्यांच्या काळ-वेळा गाठताना आणखी किस्से घडायचे.. उंच इमारतीच्या डिझाइनमध्ये मला विशेष रस आहे. त्यात प्रावीण्य मिळवण्याचं ध्येय आहे. आगामी काळात भारताला पायाभूत सुविधांची गरज आहे, म्हणून भारतात बांधकामाच्या नवीन संधी तयार होतील, अशी आशा आहे. आता तिसरी सहामाही चालू झाली आहे. अजून खूप स्वप्न पाहतो आहे. खूप काही शिकायचं आहे. खूप अनुभव घ्यायचे आहेत. बघू या, आता पुढं आणखीन काय काय सरप्राइजेस आहेत ते..

संकलन : राधिका कुंटे

कानमंत्र

* नोकरीचा अनुभव असल्यास पदव्युत्तर अभ्यास सोपा होऊ  शके ल.

* बऱ्यावाईट अशा सगळ्याच अनुभवांसाठी मानसिक तयारी करा.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 12:06 am

Web Title: jagachya pativar article aditya joshi abn 97
Next Stories
1 अराऊंड द फॅशन : स्ट्रीट फॅशन
2 शेफखाना : हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नवीन संधी
3 फॅशन लिंगभेदापलीकडे
Just Now!
X