News Flash

जगाच्या पाटीवर : मन में हैं विश्वास

परदेशी शिक्षणाचा निर्णय आणि त्यासाठीचे प्रयत्न ही थोडी तारेवरची कसरत होती. कारण मी नोकरी करत होते.

जगाच्या पाटीवर : मन में हैं विश्वास
(संग्रहित छायाचित्र)

ऐश्वर्या म्हाडगुत

परवा प्लेलिस्टवर गाणं ऐकलं, मन में हैं विश्वास. ते ऐकता एकता माझ्या करिअरचा प्रवास एखाद्या कादंबरीतले प्रसंग आठवावेत, तसा स्मरू लागला. परदेशी जाऊन शिकायचा निर्णय घेण्यामागे एकचएक कारण नव्हतं. माझ्या मामांनी परदेशात जाऊन मास्टर्स केलं आणि त्यांना जॉब मिळाला होता, हे उदाहरण डोळ्यांसमोर होतं. घरच्यांचंही मी परदेशात जाऊन शिकायला हवं, असं मत होतं. मलाही पदवीनंतर शिकायचं होतंच. थोडय़ाशा आत्मपरीक्षणान्ती कळलं की, मला आयुष्यात यशस्वी लवकरात लवकर व्हायचं आहे. परदेशी शिकल्याने यशाचं माप लवकर पदरात पडू शकतं, असं मला वाटलं. नेहमीपेक्षा भिन्न अवकाशात यश मिळवणं हेदेखील प्रगतीचं द्योतक असतं.

परदेशी शिक्षणाचा निर्णय आणि त्यासाठीचे प्रयत्न ही थोडी तारेवरची कसरत होती. कारण मी नोकरी करत होते. व्हिसाची मुलाखत झाल्यानंतर मी राजीनामा दिला. दत्ता मेघे महाविद्यालयातून मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. तिथले प्राध्यापक आणि माझे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली परदेशातील शिक्षणाविषयीची माहिती मी स्वत:च शोधली. मी चार विद्यापीठांमध्ये अर्ज केले होते. त्यांचा सकारात्मक रिप्लायही आला. त्यापैकी युनिव्हर्सिटी ऑफ ुस्टनतर्फे शिष्यवृत्तीही मिळणार होती. मात्र न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचं चांगलं रँकिंग आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर  नोकरी मिळण्याचं प्रमाण अधिक असल्याने तीच निवडली.

मी भारतात दोन ठिकाणी नोकरी केली. त्यापैकी एका ठिकाणी वरिष्ठांनी एका कामगारासमोर माझा अपमान केला होता. माझ्या पदवीचा नाममात्रही आदर राखला नव्हता. त्याच दिवशी आपण या वातावरणात राहायचं नाही, असं ठरवलं. या निर्णयाला आई-बाबांनी खंबीर पाठिंबा दिला. बाबांची माझ्या शिक्षणाचा खर्च करायची तयारी होती, मात्र त्यांच्यावर भार नको आणि स्वत:च्या पायावर उभं राहायचं असल्याने मी शिक्षणकर्ज घेतलं. आईला मी एकटी कशी राहीन, याची जरा चिंता वाटली; पण बाबांना मी सगळं निभावेन, याची खात्री होती. आता मी ठव विद्यापीठाच्या ‘टॅण्डन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग’मध्ये ‘मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग’ करते आहे.

इथे यायच्या आधी मी कधीच विमानप्रवास केला नव्हता. मैत्रिणीसोबत तिकीटही मिळालं नव्हतं. त्यामुळे थोडीशी भीती आणि थोडीशी उत्सुकताही होती. मला न्यायला येणाऱ्या काकूंची अर्थात बाबांच्या मित्रांच्या मिसेसची भेट होईपर्यंत, मोबाइल नेटवर्क बंद असल्याने तेवढय़ापुरता ताण आला होता. पहिला दिवस जेटलॅगमध्ये गेला. विद्यापीठातील ओरिएंटेशनच्या दिवशी आणि वर्गात गेल्यावर किंचितशी भीती वाटली होती. या वातावरणात आपण अ‍ॅडजस्ट होऊ  का, इथल्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करता येईल का, असे विचार मनात येत होते. तेव्हा मनाशी खूणगाठ बांधली की इथवर आलो आहोत, तर प्रयत्नांत सातत्य ठेवायचं आणि आपलं स्थान निर्माण करायचं. ट्रेन चुकीची पकडल्याने दुसऱ्याच स्टेशनवर उतरले होते. तेव्हा विरुद्ध दिशेला आल्याचं कळलं. पण योग्य रस्ता माहीत नव्हता. त्यामुळे एकीला तसं विचारलं आणि तिने स्वत: माझ्यासोबत येऊन योग्य मार्गाच्या सबवेपर्यंत पोहोचवलं. परदेशात कॉलेजच्या पहिल्या दिवशी अशा चुकण्याच्या वेळी काय वाटतं, ते या प्रसंगातून गेलेल्या व्यक्तीला कळू शकतं.

प्राध्यापकांनी पहिल्याच लेक्चरच्या वेळी सौहार्द आणि स्नेहाचं वातावरण निर्माण केलं. इथला अभ्यासक्रम नेहमीच अप टू डेट असतो. उदाहरणार्थ- आम्ही एनर्जी पॉलिसीबद्दल शिकलो. हा विषय माझ्या भारतातील कॉलेजमध्येही होता. मात्र त्यात थिअरीवर भर होता. इथे त्या लेक्चरच्या दिवसापर्यंतचे या विषयातले अपडेट त्यांच्या साइटवर केले होते. असे अपडेट वेळोवेळी होतच असतात. इथल्या शिक्षणपद्धतीत एक गोष्ट जाणवली की आपला निकाल आपल्या अपेक्षांहून थोडा कमी लागल्यावर आपण त्या संदर्भात योग्य ते कारण सांगितल्यास आपला निकाल उंचावण्याची संधी मिळते. प्रत्येक प्राध्यापक त्यांच्या त्यांच्या हिशेबानुसार परीक्षा घेतात. एका परीक्षेत मी चांगलं लिहू शकले नाही. कारण तिथं बर्फवृष्टी झाली होती आणि माझी तब्येत थोडी बिघडली होती. प्राध्यापकांना तसं सांगितल्यावर त्यांनी मला एक्स्ट्रा असाइन्मेंट दिली आणि माझ्या ग्रेडमध्ये वाढ झाली.

इथला कॅम्पस खूप सुंदर आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांना अनेक सोयी-सुविधा पुरवतं. उदाहरणार्थ- जिम. इथे फिटनेसला खूप महत्त्व दिलं जातं. मलाही ते प्रकर्षांने जाणवल्याने व्यवस्थित डाएट आणि जिमला जाणं या गोष्टी आता कटाक्षाने करते. परिणामी सुरुवातीचं आजारी पडणं सोडलं तर सुदैवाने मी आजारी पडलेले नाही. कॉलेजच्या कॅफेमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी डायनिंग डॉलर ही व्यवस्था केली आहे. त्यात त्या विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रात काही ठरावीक रक्कम जमा केली जाते आणि त्यामुळे त्यांना चार सुखाचे घास खाता येतात. अकॅडमिक आणि इतरही अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. थँक्स गिव्हिंग डिनर, ख्रिसमस इव्हेंट वगैरे आयोजित केले जातात. ‘इंडियन स्टुडण्ट बॅचलर्स असोसिएशन’तर्फे सगळे भारतीय सणवार साजरे केले जातात. आम्ही गरबा, दिवाळी साजरे केल्यामुळे सणवार मिस केले नाहीत. या सेलिब्रेशनमध्ये स्थानिक विद्यार्थीही मोठय़ा उत्साहात सामील झाले होते. गरब्यासाठी परिधान केलेला रंगीत पेहराव आणि संगीत त्यांना खूप आवडलं. माझे तैवान, बल्गेरियामधले आणि काही स्थानिक विद्यार्थीही मित्र-मैत्रिणी झाले आहेत. ईमेलद्वारे आम्ही ग्रूपस्टडी करायचं ठरवतो. त्या वेळी अर्थातच पूर्ण वेळ अभ्यास होत नाही. मग आपापली संस्कृती, जीवनमान, खाद्यजीवन, पेहराव आदी विषयांवर गप्पा होतात.

मी कॅम्पसबाहेर राहाते. थोडासा प्रवास असला तरी अंतर फार नाही. आम्ही पाचजणी फ्लॅट शेअर करतो आहोत. परीक्षेच्या वेळी ग्रंथालयातील रूम बुक करणं, रात्रभर जागून अभ्यास करणं वगैरे गोष्टी आम्ही करतो. आमचे विषय वेगळे असले तरी एकमेकींना सपोर्ट करतो. अभ्यास आणि कामाने कितीही थकलो तरी जेवणखाणसह बाकी काम स्वत:चं स्वत:लाच करावं लागतं. त्यामुळे आम्ही कामं वाटून घेतली आहेत. बाहेरच्या खाण्यात ब्रेड प्रामुख्याने असतो. त्याची एवढी सवय नसली तरी त्याच्याशिवाय काही वेळा पर्यायही नसतो. एकटेपणावर मात करता आली पाहिजे. त्यासाठी छंद नक्कीच मदतीचा हात देतात. वाचन, स्वयंपाक करणं हे माझे छंद आहेत.

आमचं विद्यापीठ जागतिक स्तरावरील पहिल्या दहा विद्यपीठांच्या गणनेत येत नसलं तरीही ते खूप नावाजलेलं आणि जुनं विद्यापीठ (स्थापना १८३१) आहे. त्याचा एम्प्लॉयमेंट रेंट चांगला आहे. या विद्यापीठाबद्दल एक विशेष बाब आवर्जून सांगितली जाते की, आपण एखाद्या कंपनीला आपला रेझ्युमे पाठवतो, त्यावर या विद्यापीठाचा स्टॅम्प असेल किंवा नाव असेल तर नक्कीच तो रेझ्युमे एकदा तरी उघडून पाहिला जाईल. विद्यापीठाचं मुख्य कॅम्पस मॅनहॅटनमध्ये आहे. तिथल्या बोस्ट- इु२३ ग्रंथालयाची इमारत भलीमोठी आणि जुनी आहे. आमचं टॅण्डन स्कूल ब्रुकलीनमध्ये आहे. एम्प्लॉयमेंटशी संबंधित काही इव्हेंट मुख्य कॅम्पसमध्ये होतात.

मी ऑनकॅम्पस अर्धवेळ नोकरी करते. माझ्या विभागात मला काम मिळालं नाही, पण मी इलेक्ट्रिकल विभागाच्या एक प्राध्यापकांची पदवीधर साहाय्यक म्हणून काम करते. परीक्षांचे पेपर तपासणं, ईमेलना रिप्लाय करणं वगैरे. हे काम प्रसंगी इथल्या घरूनही करता येऊ  शकतं. या नोकरीमुळे राहणीमानावरच्या खर्चातला थोडा खर्च भरून निघतो. आमच्या विभागाचे सल्लागार (अ‍ॅडव्हायजर) डॉ. इस्केंडर सहिन आहेत. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काही काळ काम केलं आहे. आमच्या करिअरच्या दृष्टीने हितावह गोष्टी, विद्यार्थ्यांची मनोधारणा काय आहे, विषय निवड कशी करावी वगैरे बाबींमध्ये ते मदत करतात. आमच्या मेसेज किंवा ईमेल्सना तातडीने रिप्लाय करतात. कॉलेज सुरू व्हायच्या सुमारास मी त्यांना काही शंका विचारली होती, तेव्हाही त्यांनी विमानप्रवास संपल्यावर लगेच रिप्लाय केला होता. आम्हाला लेटेस्ट सॉफ्टवेअर शिकवलं जातं. फक्त थिअरीवर भर दिला जात नाही. असाइन्मेंट, प्रोजेक्टच्या सबमिशनसह नोट्स वगैरेही ऑनलाइन उपलब्ध असतात.

पदवी घेतल्यानंतर दोन वर्षांनी मी पुन्हा शिक्षणाकडे वळले. त्यामुळे माझ्या अभ्यासाची गाडी किती काळात रुळावर येईल, अशी थोडीशी धास्ती मला वाटत होती. पण आमच्या पहिल्या दोन लेक्चरमध्ये प्राध्यापकांनी सगळ्या संकल्पनांना पुन्हा उजाळा दिला. त्यामुळे साहजिक पुढच्या अभ्यासात मला काही त्रास झाला नाही. परीक्षेबद्दल मनात उगीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. प्राध्यापक कसे प्रश्न विचारतील, परीक्षा नीट पार पडेल ना वगैरे. इथे रट्टा मारणं किंवा पाठांतराची गरज नाही. अभ्यास केल्यावर विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान काय आणि किती मिळालं, यावर त्यांचा भर असतो. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर संशोधनाची संधी मिळाली तर पीएचडीचा विचार करेन. शिवाय मला माझं शैक्षणिक कर्ज फेडायचं आहे. त्यासाठी नोकरीही करणार आहे. आठवणींच्या राज्यातून बाहेर आले तर प्लेलिस्टवरचं गाणं केव्हाच संपलं होतं. मग मनातलं गाणं ओठांवर आलं की, इथवरचा सगळा प्रवास घरचे आणि दोन्ही कॉलेजमधल्या प्राध्यापकांच्या भक्कम पाठिंबा, सहकार्यामुळे झाला आहे, तसा तो पुढे होईल. कारण मेरे मन में हैं विश्वास.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2019 1:20 am

Web Title: jagachya pativar article by aishwarya mhadgutt
Next Stories
1 सारासार : माकडाच्या हाती इंटरनेट
2 शेफखाना : चॉकलेटच्या तऱ्हा
3 वस्त्रोद्योग परंपरेची झलक!
Just Now!
X