ईशा वडनेरकर

स्टेजवर सगळ्यांसमोर लेडी मॅकबॅथचा प्रवेश मी सादर केला होता. आमचं सादरीकरण पाहायला समीक्षक आले होते. काहीजणांना ते पात्र लक्षवेधीपणे साकारल्याबद्दल स्टार्स मिळाले. त्यांपैकी मला एकटीलाच तीन स्टार्स मिळाले. त्या स्टार्सना न्याहाळत असताना डोळ्यांसमोर आला आजवरचा प्रवास.. कधी सरळ रेषेतला तर कधी थोडय़ाशा वळणांचा..

मी रुईया महाविद्यालयातून बी.ए. (पॉलिटिकल सायन्स) केलं. तिथल्या ‘नाटय़वलय’मध्ये मिळालेलं शिक्षण हे जणू एखाद्या नाटय़शाळेतल्या प्रशिक्षणासारखंच होतं. अभिनयापासून ते बॅकस्टेजपर्यंत रंगभूमीच्या सगळ्या पैलूंची झलक दिसली. त्यातूनच पुढे नाटय़कलेची गोडी लागली. लहानपणापासून कथ्थक शिकत होते. त्यात नृत्याला अभिनयाची जोड होती. पदवी मिळाल्यावर लगेच नाटकांतून कामं मिळत गेली. त्या दोन वर्षांत कथ्थकचा हात सुटतोय की काय असं वाटल्याने पुण्याच्या भारती विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ आर्ट्स इन डान्स’ केलं.  माझ्या नृत्यकलेला भरभरून आशीर्वाद लाभले ते गुरू ज्योती शिधये आणि मनीषा साठे यांचे. दरम्यान ‘गमभन’, ‘पुन्हा सही रे सही’, ‘मोरूची मावशी’, ‘राजू राजा राम और मै’आदी व्यावसायिक नाटकांत काम केलं. काम करताना एका टप्प्यावर वाटलं की, व्यावसायिक स्तरावर काम करत असले तरी भूमिकांमध्ये वैविध्य दाखवणं, त्यातले बारकावे पकडणं कठीण जातं आहे. एकदा हे लक्षात आल्यावर काम करताना मनाला समाधान वाटेनासं झालं. मग कामं मिळत असूनही अगदी ठरवून कामं करणं थांबवलं. अभिनयाचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे असं वाटलं. केवळ अभिनय शिकण्यापुरतंच मर्यादित न राहता स्वत:भोवती आखून घेतलेली चौकट मोडायची होती. ठरावीक भोवतालाच्या पलीकडे जाऊन स्वत:ला पारखायचं होतं. कलेच्या क्षमता तपासायच्या होत्या. नव्या शक्यतांची चाचपणी करायची होती. इथे आल्यावर एक कलावंत आणि एक माणूस म्हणून अनेक कलानुभवांना सामोरी गेले.

परदेशी प्रशिक्षण घ्यायचं ठरवल्यावर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये जायचा विचार केला. मात्र न्यू यॉर्कमधल्या विद्यापीठातला थेट प्रवेशाचा पर्याय नाकारला. माझी आवडती अभिनेत्री कल्कीची ‘गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी’, ‘ऑक्सफर्ड स्कूल ऑफ ड्रामा’, ‘ड्रामा स्टुडिओ लंडन’ या ठिकाणी ऑडिशन्स दिल्या. शिवाय आणखीन काही ठिकाणी अर्ज केले होते. त्या त्या संस्थेच्या अटींनुसार सादरीकरणाचं चित्रीकरण करून पाठवलं होतं. जवळपास सहा महिने ऑनलाइन ऑडिशन्स देत होते. ‘नाटय़वलय’मधल्या मित्रमंडळींची या कामात फार मदत झाली. मला मनापासून प्रवेश घ्यायचा होता तो ‘ड्रामा स्टुडिओ लंडन’मध्ये. तिथे जुनी-नवी नाटकं, टेलिव्हिजन, रेडिओ आदी पैलूंचा अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ – आवाज हा घटक विचारात घेतला तर नाटक, टीव्ही, रेडिओ, कार्टून आदी विविध माध्यमांतल्या आवाजांचा अभ्यास करायला मिळतो. इथली आणि अन्य दोन विद्यापीठांचीही पहिली ऑनलाइन फेरी पार झाली. २०१६ मध्ये सगळ्या ऑडिशन्ससाठी १० दिवसांची लंडन ट्रिप आखली. तेव्हा पहिल्यांदा एकटीच भारताबाहेर गेले होते. तेव्हा एक बुजरेपणा होता; उगाच भीती वाटायची. या ऑडिशन्समध्ये उच्चारांवर फार गोष्टी अवलंबून असतात. आपण बघतो त्या अमेरिकन शोमधले उच्चार तुलनेने समजायला सोपे असतात. पण इथलं इंग्रजी कळणं कठीण जात होतं. अभिनय करताना समोरच्याचं ऐकून इम्प्रोव्हाइज करायचं असल्याने बोलणं कळणं, ही गोष्ट खूपच महत्त्वाची होती.

पुढे ‘ड्रामा स्टुडिओ लंडन’मध्ये ‘प्रोफेशनल अ‍ॅक्टिंग’ या दोन वर्र्षांच्या पदविकेसाठी प्रवेश मिळाला. मात्र आर्थिक तरतुदी करता करता इथल्या प्रवेशाची मुदत संपली. प्रतीक्षायादीत नाव आलं. एका क्षणी कळलं की प्रवेश मिळू शकेल, पण तितक्या अल्पावधीत जाणं अशक्यच होतं. कारण व्हिसा वगैरे व्यावहारिक गोष्टींची पूर्तता व्हायची होती. मग वर्षभर थांबावं लागलं. दरम्यान, झी मराठीच्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेत मी बंडीची भूमिका केली. २०१७ मध्ये प्रत्यक्ष येऊन ऑडिशन्स देण्यापेक्षा नवीन व्हिडीओ पाठवण्याची सूट देण्यात आली. त्यानंतर प्रवेश मिळाला. तेव्हा बाकी गोष्टी सुरळीत झाल्या. पण स्टुडण्ट व्हिसा नाकारला गेला. मग पुन्हा अर्ज केला. अखेरीस ऑक्टोबर २०१७ मध्ये इथे आले.

माझा भाऊ  युवकने फ्रान्समध्ये साउंड इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्स केलं आहे. त्यानेच मला सर्वाधिक प्रोत्साहन दिलं. शिवाय, आईबाबांचा भक्कम पाठिंबा आहेच. सायली परब आणि रामचंद्र गांवकर हेही माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आपण शिकून परतायचं, असं तेव्हा माझ्या मनाशी ठरवलं होतं. आता इथली इंडस्ट्री, कामाची पद्धत पाहिल्यावर जागतिक स्तरावर काम करायला आवडेल. भारतातही ऑडिशन्स देणं सुरू आहे. अजून कोणताही ठाम निर्णय घेतलेला नाही. मी वीकएण्डला काम करून थोडंफार कमावण्याचा प्रयत्न करते. कारण आमच्या अभ्यासक्रमात सातत्याने अभ्यास खूप करावा लागतो. इथे काम हे काम म्हणूनच पाहिलं जातं. त्याला दर्जा दिला जात नाही. मी एका ईस्ट आफ्रिकन इंडियन कुटुंबात बेबीसीटिंग करते. शिवाय जमेल तसं काही इव्हेंटसाठी काम करते. कामानिमित्ताने लोकांशी संवाद साधताना अनेक गोष्टींची माहिती होते. कामानिमित्ताने वावरताना जाणवलं की माझं आडनाव उच्चारणं इथल्या लोकांना कठीण जातं आहे. उच्चारायला म्हणून सोपं आणि भारतीयत्वाचं प्रतिनिधित्व करणारं ‘डे’ हे आडनाव मी रंगभूमीवर काम करताना लावते.

सध्या आमची शेवटची टर्म सुरू आहे. आता आमच्या नाटकाचे पब्लिक शोज व्हायला लागले आहेत. इथल्या रंगभूमीवर काम एजंटच्या माध्यमातून मिळतं. हा एजंट मिळणं खूप कठीण गोष्ट असते. गेल्या महिन्यातल्या आमच्या शोनंतर मी एका एजंटसोबत करार केला आहे. सुरुवातीला खूप कोषात होते. एकेक गोष्टी समजत गेल्यावर, शिकत गेल्यावर त्या कोषाबाहेर आले. आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा खूपच फायदा झाला. आमच्या अभ्यासक्रमात एक विषय असतो – स्टोरीटेलिंग. इथले विद्यार्थी त्यांच्या गोष्टी सादर करतात. विचार केल्यावर जाणवलं की, आपल्याकडे किती समृद्ध साहित्य आहे. कितीतरी महान व्यक्तिमत्त्वं होऊन गेली आहेत. मी द्रौपदी, सावित्रीबाई फुले अशा व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. आपली एकापेक्षा एक सरस माणसं इथे माहितीच नाहीत. सुरुवातीला इथला अ‍ॅक्सेंट शिकू की नको, अशा दुविधेत पडले होते. ‘अ‍ॅक्सेंट शिकलीस तर प्लस पॉइंट होईल. पण मी कुठल्याही देशात काम केलं तरी भारतीयपण कायम राहणार आहे आणि त्यासह ते पात्र म्हणून माझी निवड होणार आहे, त्यामुळं माझा अ‍ॅक्सेंट

जपून ठेवायला हवा,’ असं मला आमच्या व्हॉइस टीचरनी समजावून सांगितलं. आताही आमच्या प्रयोगांत आमची निवड या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून केली जाते. भारतीय आहे म्हणून कमी दर्जाचं पात्र साकारा, असं न होता ते ते पात्र उठून कसं दिसेल, याचा विचार केला जातो.

इंडस्ट्रीतली तज्ज्ञ मंडळी आम्हाला शिकवतात. आम्ही फक्त १३ विद्यार्थी असल्यामुळे सगळ्यांशी चांगली मैत्री झाली. त्यात थायलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील आणि ब्रिटिश विद्यार्थी आहेत. प्रत्येकाची संस्कृती, भाषा विभिन्न असली तरी संवाद साधायला मजा येते. सादरीकरण करायला सांगितल्यावर काहींनी काल्पनिक पात्रं सादर केली. त्यांना माझ्या सादरीकरणानंतर त्या पात्राविषयी आणि एकूणच भारताविषयी खूप उत्सुकता वाटलेली दिसली. बरेच प्रश्न विचारतात. आता आमची प्रभावी वक्त्यांच्या सादरीकरणाची तयारी सुरू आहे. मुकाभिनयाच्या वेळी कथ्थकचा खूप फायदा होतो. आम्ही नॅशनल थिएटर, शेक्सपिअर्स ग्लोब आणि वेस्टएण्डला भरपूर नाटकं बघतो. इथला दिग्दर्शक नटांना ओरडू वगैरे शकत नाही. क्वचित असं झालंच तर इथले नट दुखावतात. मी ते मनाला लावून न घेता कामावरच लक्ष केंद्रित करते. आम्हाला लेखी परीक्षा नाही. केवळ प्रॅक्टिकल्स असतात. उदाहरणार्थ- कधी आधुनिक नाटकांतले प्रसंग सादर करायचे. त्या सादरीकरणाबाबत विद्यार्थ्यांसह प्रत्येक विभागप्रमुखासोबत चर्चा होतात. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षांकडेही लक्ष दिलं जातं. सादरीकरणांत साचेबद्धता न येण्याची दक्षता घेतली जाते. हरतऱ्हेच्या भूमिका सक्षमतेने करण्यासाठी तयार केलं जातं.

टीमवर्कचा विचार करता मला ‘नाटय़वलय’चं टीमवर्क अधिक चांगलं वाटतं. तिथलं झोकून देऊन काम करणं, वेळेचं पालन, शिस्तपालन आदी अनेक गोष्टींमुळे फरक पडत होता. इथे बऱ्यापैकी केवळ वैयक्तिक पातळीवर विचार केला जातो. काहीजण इतरांना पाठिंबा देतातही, नाहीच असं नाही. वेळोवेळी नाटय़ कार्यशाळांचं आयोजन केलं जातं. घरकाम, अभ्यास आणि वीकएण्डचं काम करताना खूप तारेवरची कसरत होते, पण त्यातही मजा येते. त्यामुळे स्वावलंबी होता आलं. माझ्या प्रोफेशनची गरज असल्याने फिटनेसचा जास्त विचार करायला लागले आहे. आम्ही एका प्रोफेशनल क्लाउनिंग आर्टिस्टच्या पाच दिवसीय कार्यशाळेला गेलो होतो. कॉमेडी खूप आवडत असल्याने मी ते खूप एन्जॉय केलं. त्यानंतर सहा महिन्यांनी ती आमचं एक सादरीकरण पाहायला आली होती. तेव्हा तिनं सांगितलं की, ‘एका शोसाठी ती क्लाउनच्या शोधात होती, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तिला माझाच चेहरा आठवला’, ही गोष्ट मला खूप मोठी वाटली. पण अभ्यासामुळे ते तीन महिने चालणारं काम मला करता आलं नाही. अर्थात, अशा संधी आणखीही मिळू शकतील, असंच जणू मला मिळालेले स्टार्स सुचवत आहेत नाही का..

‘जगाच्या पाटीवर’ आवाहन

आपल्याकडे शिक्षणाची सुरुवात पाटीवर अक्षरं गिरवून केली जाते. आजच्या डिजिटल युगातही पाटीची संकल्पना तग धरून राहिली आहे हे विशेष. या पाटीच्याच संदर्भात पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर देशात पदवीपर्यंतच्या शिक्षणाची मुळाक्षरं गिरवली जातात आणि जगाच्या पाठीवर अर्थातच जगभरातल्या विद्यापीठांच्या पाटीवर (आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं) पुढचं शिक्षण घेतलं जातं आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यामागचा विचार, त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा, दरम्यान आलेल्या अडीअडचणी, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर आलेला अनुभव आदी मुद्दय़ांचा शोध घ्यायचा प्रयत्न म्हणजे हे ‘जगाच्या पाटीवर’ सदर.

या सदरासाठीची अट : १८ ते ३० वर्षे या वयोगटातील मुलगा/मुलगी. परदेशातील विद्यापीठात किमान ४ ते ६ महिने शिक्षण झालेलं असावं. स्वत:चे आणि विद्यापीठ परिसरातील फोटो द्यावे लागतील. तुम्ही स्वत: किंवा तुमच्या ओळखीतील कुणी असल्यास तुमचा संदर्भ देऊन त्याकरता त्या त्या विद्यार्थी किंवा विद्यर्थिनीची किमान शैक्षणिक माहिती (भारतातील शिक्षण, परदेशातील शिक्षण, त्याचा कालवधी वगैरे. परदेशी शिक्षणाविषयीची- विद्यापीठासह अभ्यासक्रमाची माहिती) viva@expressindia.com यावर ईमेल करावी.

(विद्यार्थी-विद्यार्थिनी निवडीचा अधिकार टीम व्हिवाकडे राखीव)

कानमंत्र

  • अभिनय शिकणं या गोष्टीला कमी लेखलं जातं. मात्र इतर कला शिकून आत्मसात केल्या जातात; तशी अभिनयकलाही आत्मसात करा. या कलेच्या अभ्यासात सातत्य ठेवा.
  • भोवतालचे लोक कितीही काही बोलले तरी आपल्या ध्येयावरचं लक्ष ढळू देऊ  नका.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com