06 August 2020

News Flash

जगाच्या पाटीवर : ‘विदा’कारण

मी ‘विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून ‘बॅचलर्स ऑफ इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग’ (बी.ई) केलं आहे

(संग्रहित छायाचित्र)

|| हितेश वैद्य

सध्या मी प्रचंड व्यग्र आहे. जाम धावपळ सुरू आहे सगळी.. सेमिस्टर संपत आलं असलं तरी अभ्यासाची व्याप्ती अधिकाधिक वाढतेच आहे. आताही या लेखाचं वाचन कॉलेजला जाताजाता सुरू आहे. यावेळी आठवडय़ातून दोनच दिवस कॉलेज असतं. याचं कारण, आम्ही निवडलेल्या विषयांनुसार वेळापत्रक ठरतं. मी ‘रॉचेस्टर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचं एक मुख्य कारण म्हणजे आम्हाला वर्षभराचे कोऑप्स करण्याची मोकळीक असते. विद्यार्थ्यांंची तीन महिन्यांची इंटर्नशिप सहा महिन्यांची किंवा वर्षभराची झाल्यास त्याला ‘कोऑप’ म्हणतात. या कोऑपचा पर्याय काही निवडक विद्यापीठांमध्येच उपलब्ध आहे. बऱ्याचदा या कोऑपमध्ये चांगलं काम केल्यास कंपनी पूर्णवेळ नोकरी देऊ  करते. या काळात आणि मोठय़ा सुट्टीच्या कालावधीतही काही ठरावीक तास काम करता येतं. त्यानुसार मीही ‘ऑन कॅम्पस’ म्हणजे कॉलेजमध्येच पार्टटाईम काम करतो. कोऑप दुसऱ्या सेमिस्टरनंतर करता येतं. सध्या माझी तिसरी सेमिस्टर सुरू असून मी कोऑप्स शोधतो आहे.

मी ‘विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून ‘बॅचलर्स ऑफ इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग’ (बी.ई) केलं आहे. त्या वर्षांत मशीन लर्निंगच्या काही अ‍ॅक्टिव्हिटीज सुरू केल्या होत्या. काही सेमिनार्स वगैरे घेतले होते. त्यानंतर मला मुंबईच्या आयआयटीमध्ये इंटर्नशिप मिळाली. तिथे मी मुख्यत्वे ‘लॅंग्वेज ट्रान्सलेशन’च्या संदर्भात काम केलं. मशीन लर्निंग वापरून इंग्लिश ते हिंदी भाषांतर करायचं हा प्रकल्प होता. देवनागरीत तितकासा डेटा (विदा) उपलब्ध नसल्याने १.७ दशलक्ष इतकी नवीन विदा तयार केली. त्यानंतर त्यावर प्रयोग केले. काही काळ देवनागरी भाषांच्या ओसीआरवर (ऑप्टिकल कॅ रेक्टर रेग्ननिशन) काम केलं. आपण जेव्हा एखाद्या दस्तावेजाचा फोटो किंवा स्कॅन कॉपी काढतो तेव्हा ते छायाचित्र (फोटो) स्वरूपातच उपलब्ध राहतं, परंतु या छायाचित्रामधल्या दस्तावेजातील मजकूर आपल्याला टेक्स्ट किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड स्वरूपात हवा असेल तर ते ओसीआर तंत्र वापरून मिळवता येतं. यामध्ये आम्हाला काही आव्हानंदेखील आली. उदाहरणार्थ- संस्कृतमधले मोठाले शब्द, जोडाक्षरं डिटेक्ट करणं हे अवघड असतं; त्यावर मी काम केलं होतं. यासाठी आम्ही जुन्या ग्रंथांचा आणि हस्तलिखितांचा वापर केला; जेणेकरून आम्हाला विविध अक्षरांतील आणि स्पष्टतेतील विदा मिळेल. पुढे मशीन लर्निंग वापरून छायाचित्रातील प्रत्येक वाक्यातील एकेक अक्षर ओळखून त्याचं टेक्स्टमध्ये रूपांतरण करण्यात येतं.

मी अकरावी-बारावीच्या वेळी आयआयटीची परीक्षा दिली होती, पण तेव्हा ती संधी थोडक्यात हुकली. तेव्हा एम.टेक करायचा विचार होता. पुढे इंजिनीअरिंगनंतर मास्टर्स आयआयटीमधून करेन, असा विचार होता. ते माझं स्वप्न होतं. उत्साहाने गेटची परीक्षा दिलीही, पण कॉलेज आणि गेटचा अभ्यास हे तितकंसं शक्य नसतं. पास झालो, पण मला तिथले सगळेच विषय अभ्यासायचे नव्हते. विषयनिवडीचं स्वातंत्र्य हवं होतं. तिथल्या इंटर्नशिपमुळे तेथील शैक्षणिक चौकटीची झलक पाहायला-ऐकायला मिळाली. त्याव्यतिरिक्त, मला डॉ. राजीव गांधी या अमेरिकेमधील ‘रटगर्स युनिव्हर्सिटी’मधल्या प्राध्यापकांनीही प्रोत्साहन दिलं. ते त्यांच्या सुट्टय़ांच्या कालावधीत मुंबईत येऊन विद्यालंकारमध्ये शिकवायचे. त्यांच्याशी बोलताना परदेशातल्या करिअरसंधीबद्दल कळलं होतं. या सगळ्या मुद्यांचा विचार करून परदेशात एम.एस. करायचं ठरवलं. पदवी मिळाल्यानंतर जीआरई आणि टोफेलची परीक्षा दिली.

विद्यापीठाची किंवा इन्स्टिटय़ूटची निवड करणं, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. कधी ते फार अवघड वळण ठरतं तर कधी फार गोंधळून जायला होतं. एका मित्राकडून ‘रॉचेस्टर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’विषयी (आरआयटी) कळलं. इंडस्ट्रीमधल्या चांगल्या संधीसाठी हे विद्यापीठ अधिक प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी माझी डेडलाईन मिस झाली, तर कुठे प्रतीक्षायादीत नाव होतं. यू.एस.ए. सरकारच्या मुंबईतील ‘यूएसआयईएफ’ सेंटरमध्ये चांगलं मार्गदर्शन मिळतं. तिथल्या कार्यशाळांमध्ये अर्ज कसा लिहावा, इथपासून अनेक बाबींचा सल्ला दिला जातो. आरआयटीमध्ये माझा अर्ज स्वीकारला गेला. मी ‘मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर सायन्स’च्या अडीच वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. कोऑपनुसार त्याचा कालावधी वाढू शकतो. प्रवेश घेतल्यावर मात्र शैक्षणिक कर्ज मिळण्यात थोडीशी अडचण आली आणि त्यात वेळ गेला. पुढे इथे आल्यावर फ्लॅटमेटनी प्रॉडिजीमधून कर्ज घेतल्याचं कळलं. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन दुसऱ्या सेमिस्टरमध्ये मी प्रॉडिजीमधून कर्ज घेतलं. इथल्या शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त रोजच्या खर्चाला लागणारे पैसेही त्यातून मिळत आहेत.

इथे आल्यावर सुरुवातीचे चार दिवस न्यूजर्सीला माझ्या आतेभावाकडे राहिलो होतो. तो मला एअरपोर्टवर न्यायला आला होता. सगळं सामान पटापट त्याच्या गाडीच्या डिक्कीत टाकलं. माझ्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा फोल्डर ट्रॉलीमध्येच होता. तो नंतर ठेवणार होतो, पण गडबडीत तो ट्रॉलीतच राहिला. न्यूयॉर्कला पोहोचल्यावर ते लक्षात आलं. शोधाशोध केल्यावर फोल्डर एअरपोर्टवरच राहिल्याचं आठवलं. माझ्या मित्राच्या विमानाचं उड्डाण रद्द झाल्याने तो त्याच एअरपोर्टवर अडकला होता. त्याला फोन करून फोल्डरबद्दल सांगितलं. ‘हरवले-गवसले’च्या काऊंटरवर तर फोल्डर सापडला नाही. तितक्यात त्याने कुणाला तरी कचरापेटीत तो फोल्डर टाकताना पाहिलं. त्याने तो ओळख पटवून परत मिळवला. त्यानंतर त्याला भेटल्यावर फोल्डर मला मिळाला. आल्याआल्याच झालेल्या या प्रकारामुळे थोडा धसका बसला होता. घरी स्थिरावायला भावाने मदत केली. मी भारतीय रूममेट्ससोबत राहतो. त्यातले अधिकांश मराठी आहेत. इतकंच काय तर कॅम्पसमध्येही मुंबई-पुण्यातले विद्यार्थी सर्वाधिक आहेत. थोडं सामान वगैरे लावल्यावर थोडा टाईमपास करायला लागलो. तेव्हा पहिल्यांदा जाणवली तिथली नितांत शांतता. माझ्यासारख्या मुंबईकर मुलाला इतकी शांतता पाहून क्षणभर भीतीच वाटली. सगळे रूममेट जमल्यावर जरा माणसांत आल्यासारखं वाटलं. दोन दिवसांनी त्या शांततेची सवय होत गेली. आम्ही सातजण मिळून घरकाम, स्वयंपाक करतो. काही मोजके पदार्थ आईकडून शिकून घेतले होते. इथे आल्यावर यूटय़ूबचीही साथ होती. आता स्वयंपाक इतका जमतो की, पुरणपोळीपासून अनेक पदार्थ करता येतात.

अभ्यासक्रमात स्वविचार आणि स्वअभ्यास करणं अपेक्षित आहे. कॉपी अजिबात चालत नाही. अभ्यासक्रमाचा चहूबाजूने विचार करून तो शिकवला जातो. इथे असाईनमेंट कठीण असतात. त्यामुळे त्या विषयांचं पूर्ण आकलन व्हायला मदत होते. वास्तव जीवनाशी निगडित असणाऱ्या समस्या मांडून त्या सोडवायला सांगितलं जातं. एखाद्या विषयाचा स्वतंत्ररीत्या अभ्यास करता येतो. प्राध्यापकांशी चर्चा करून तसा अभ्यासक्रम आखता येतो. त्यानुसार काम करून ते प्राध्यापकांना वेळोवेळी दाखवावं लागतं. आम्हाला दोन स्वतंत्र अभ्यास (इंडिपेन्डन्ट स्टडी) करता येतात. माझा विषय आहे ‘लाईफलॉंग लर्निंग’. उन्हाळी सुट्टीत मी रिसर्च असिस्टंट असताना याच विषयावर काम करत होतो. पुढे त्यातच इंडिपेन्डन्ट स्टडी करायचं ठरवलं. यात दर आठवडय़ाला शिक्षक काही टास्क देतात आणि आम्ही ते पूर्ण करायचे असतात. लहानपणापासून आपण सतत नवनवीन गोष्टी शिकत असतो. मोठे झालो तरी आपण लहानपणी शिकलेल्या जुन्या गोष्टी विसरत नाही. उलट आपलं ज्ञान अपडेट होत राहतं. यालाच ‘लाईफलॉंग लर्निंग’ म्हणतात. मशीन लर्निंगचं मॉडेल नवीन गोष्टी शिकत जातं, पण त्याला आधी शिकलेल्या गोष्टी विसरू द्यायच्या नसतात. याचा उपयोग सतत विदेची भर पडत राहते, अशा गोष्टींमध्ये होतो, उदा. समाजमाध्यमं, गुगल असिस्टंट इत्यादी. उन्हाळी सुट्टीत केलेल्या कामाचा रिसर्च पेपर ‘आयसीआरए २०२०’ या कॉन्फरन्समध्ये सादर केला आहे. मला या विषयाची आधी माहिती नव्हती. मशीन लर्निंग विषयासंदर्भात काम केलं असल्याने त्याची थोडी माहिती होती; पण लाईफलॉंग लर्निंगबद्दल माहिती नव्हती. मग नवीन विदा- विशेषत: व्हिडीओ जमा करणं, त्यावर प्रयोग करणं आणि त्यांची नोंद करणं या गोष्टी केल्या. त्यासाठी नवीन लॅंग्वेज (तंत्रभाषा) शिकलो. ती होती पायटॉर्च (PyTorch). हाच पेपर मी प्राध्यापक ख्रिस्तोफर कनान यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला आहे. हा पेपर कॉन्फरन्समध्ये स्वीकारण्यात आला आहे की नाही याचा निर्णय मला जानेवारी २०२० मध्ये कळेल.

इथे मुख्य सणवार साजरे केले जात असले तरी अभ्यास-कामामुळे तिथे जायला वेळ मिळत नाही. इथले काही शिष्टाचार आता अंगवळणी पडले आहेत. आधी काय बोलू, हे सुचत नसल्याने मी काढता पाय घ्यायचो. आता कोणत्याही विषयावर समोरच्यांशी संवाद साधू शकतो, नवीन ओळखी करू शकतो. आमच्या वर्गात ९० टक्के भारतीय विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्याखेरीज इतर विद्यार्थ्यांंशी बोलताना थोडी भीती वाटायची. आता त्यांच्याशीही संवाद साधायला जमतं. आत्मविश्वास वाढला आहे. धीटपणा आला आहे. माणसं ओळखायला शिकतो आहे. मला ड्रायव्हिंग करायला आवडतं. त्यामुळे वेळ मिळाला की रूममेट्ससोबत फिरायला जातो. अलीकडेच आम्ही सॅनफ्रान्सिको ते रॉचेस्टर, न्यूयॉर्क अशी क्रॉसकंट्री रोडट्रिप केली. रोडट्रिपचा हा खूपच भारी अनुभव होता. माझ्या आजवरच्या निर्णयांना पालकांनी नेहमीच प्रचंड पाठिंबा दिला आणि देत आहेत. ‘आम्ही आहोत, तू अभ्यास कर शांतपणे’ असं दोघंही सतत आश्वस्त करतात. कधीकधी होमसिक झालो तर समाजमाध्यमाचा सहारा असतोच. त्यामुळे घरच्यांचा एक भावनिक आधार मिळतो. हा अभ्यासक्रम संपल्यानंतर दोन-तीन वर्षं नोकरी करून मग पीएचडी करण्याचा विचार आहे. बघा, कॉलेजला पोहचलोदेखील. आता लेक्चर सुरू होईल. बाय!!

कानमंत्र

* अभ्यास होईलच, पण लोकांमध्ये मिळून-मिसळून राहायला हवं. त्यामुळे संपर्क वाढतो. बऱ्याच गोष्टी कळतात, शिकता येतात आणि नवीन दृष्टिकोन मिळतो.

* अभ्यास आणि जीवनशैली जगताना पठडीबाहेरचा विचार करा आणि तो विचार प्रत्यक्षात आणायला घाबरू नका.

 शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:53 am

Web Title: jagachya pativar article hitesh vaidya abn 97
Next Stories
1 डिझायनर मंत्रा : फॅशनचा नवा चेहरा
2 शेफखाना : इन्स्टाग्रामची फुडी दुनिया
3 फूड.मौला : सैर इंदूरची..
Just Now!
X