करण बिच्छू

आत्ता मी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसून ईबुक वाचतो आहे. या ग्रंथालयाचा वापर खूप केला जातो. इथे लॅपटॉप ४ तासांसाठी भाडय़ाने दिले जातात. महाविद्यालयाच्या वेळेत ऑनलाइन पुस्तकं वाचता येतात. विद्यार्थी या सुविधांचा वापर सातत्याने करत असल्याने इथे कायम गर्दी असते. वाचता वाचता नकळत माझी तंद्री लागली आणि आठवला आजवरचा प्रवास. मी रुईया महाविद्यालयातून बीएमएमचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मी अभिनेता असून लघुपट, यूटय़ब व्हिडीओही तयार करायचो. कम्युनिकेशन, अ‍ॅडव्हर्टायझिंग आणि मार्के टिंग हे माझे मुख्य विषय होते. मार्के टिंग विषय तेव्हाही आवडायचा आणि ब्रॅण्डिंगमध्येही रस वाटत होता. परदेशात जाऊन या विषयांचा सखोल अभ्यास करायचा होता. म्हणून मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयासाठी टोरांटो सेंटिनेंटल कॉलेजमध्ये पदविका अभ्यासक्रम निवडला. माझा मोठा भाऊ  सिद गेली पाच वर्ष इथे आहे. त्यामुळे मीही परदेशी जायचं म्हटल्यावर आईबाबांच्या मनाला थोडीशी रुखरुख वाटली; मात्र त्यांनी मला अडवलं नाही.

टोरांटोच्या सेंटिनेंटल कॉलेजमध्ये अनेक देशांमधले विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या उद्योगसंस्कृतीविषयी जाणून घ्यायची संधी होती. इथल्या पहिल्या पाच महाविद्यालयांत आमचं महाविद्यालय गणलं जातं. कॅनडामध्ये दोन वर्ष शिक्षण घेतल्यावर वर्क परमिट मिळतं. त्यानंतर कायमच्या वास्तव्यासाठीही अर्ज करता येतो. सुदैवाने सेंटिनेंटल कॉलेजमध्ये माझा अर्ज लगेच मंजूर झाला. पुढे व्हिसासाठी अर्ज करणं आणि कर्ज मंजूर होणं या गोष्टींमध्ये थोडा वेळ लागला. माझं ऑफर लेटर यायला खूप वेळ लागला होता. मात्र ‘ऑल अब्रॉड एज्युकेशन’ या संस्थेच्या साहाय्याने सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या. याआधी मी भारताबाहेर कधीच गेलो नव्हतो. माझे दादा-वहिनी आणि मित्र आदित्य मला न्यायला आले होते. एअरपोर्टबाहेरच्या पार्किंग लॉटमध्ये आल्यावर जाणवलं की, तिथे एसी असल्यासारखं गारेगार वाटतं आहे. तसं दादाला सांगितल्यावर त्यानं मला वेडय़ात काढत हे तर इथलं नेहमीचं तापमान आहे, असं सांगितलं होतं. पहिले दोन आठवडे मी दादाकडे लंडनमध्ये राहिलो होतो. तेव्हा सगळ्या गोष्टींची जुजबी माहिती करून घेतली. इथले लोक खूप छान, मदतीस तत्पर आहेत. अनोळखी असले तरी चेहऱ्यावर स्मितहास्य असतं. या सगळ्या सकारात्मक गोष्टी बघून थोडा आश्वस्त झालो.

महाविद्यालयात पहिल्यांदा गेल्यावर सगळी कागदपत्रं पडताळून घेतली गेली. पुन्हा एक छोटीशी मुलाखत झाली. ओरिएंटेशनच्या दिवशी अभ्यासक्रमाविषयी कल्पना देण्यात आली. इंटरअ‍ॅक्टिव्ह सेशन्स ठेवले होते. एरवीसारखं केवळ आराखडा ऐकला आणि विषय संपला असं झालं नाही. प्राध्यापकांशी बोलता येत होतं. विद्यार्थ्यांचे विचार-कल्पनाही ऐकून घेतल्या जात होत्या. आमच्या रोजच्या लेक्चरमध्ये क्लास अ‍ॅक्टिव्हिटी ठेवली जाते. त्यासाठी गुण दिले जातात. ‘कहूट डॉट कॉम’ या अ‍ॅपवर प्राध्यापक गेम डाऊ नलोड करतात. त्यात प्रश्नोत्तरे दिलेली असतात. ठरावीक प्रश्नांची उत्तरं ज्या टीमकडून कमीतकमी वेळात दिली जातील, त्यांना बक्षीस दिलं जातं. यामुळे अभ्यास खूप छान होतोच आणि आपण शिकलेल्या गोष्टींची लगेच परीक्षा घेतली गेल्याने बुद्धीचा कसही लागतो. लेक्चरमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांबद्दल छोटे छोटे व्हिडीओ दाखवले जातात. एखाद्या ब्रॅण्डचं मार्केटिंग, त्यांची स्ट्रॅटेजी, एखादी चूक आणि त्यात केलेली सुधारणा आदींचा त्यात समावेश असतो. या इंटरअ‍ॅक्टिव्ह सेशनमध्ये विद्यार्थी त्याचं मत मोकळेपणाने सांगू शकतात. प्राध्यापकही विद्यार्थ्यांचं मत लक्षपूर्वक ऐकून घेतात. त्यावर त्यांची काही सूचना असेल तर तीही सुचवतात. लेक्चर्स, प्रॅक्टिकल आणि परीक्षा ऑनलाइन असतात. त्याची सिस्टिम एवढी सक्षम आहे की, परीक्षा द्यायला लॉगइन केल्यावर पेपर पूर्ण देऊ नच बाहेर पडता येतं. या अपडेटेड तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अभ्यास केल्याने आपण व्यावहारिक जगात वावरायला चांगल्या पद्धतीने तयार होतो.

आमच्या अभ्यासक्रमात प्रॅक्टिकलवर अधिकांशी भर दिला जातो. रिअल लाइफ केसेस येतात आणि त्यावरून आम्हाला शिकवलेल्या विषयांच्या आधारे निष्कर्ष काढावे लागतात. दर आठवडय़ाला आमची प्रेझेंटेशन असतात. वास्तव जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी सांगितल्या-शिकवल्या जातात. नोकरीसाठी मुलाखत कशी द्यायची, स्वत:ला कसं प्रेझेंट करायचं हे शिकवलं गेलं. त्यात आमचा मॉक इंटरवूही झाला. जवळपास २० वर्षे या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक रोझमेरी फर्नाडिस यांनी आम्हाला या संदर्भात मार्गदर्शन केलं. या मॉक इंटरवूसाठी आम्हाला अप टू डेट प्रेझेंटेशन करायचं होतं. फॉर्मल ड्रेस परिधान करायचा होता. त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं द्यायची होती. माझ्या मुलाखतीनंतर प्राध्यापक रोझमेरी इम्प्रेस झाल्या होत्या. मुलाखत पूर्ण झाल्यावर त्यांनी उठून मला मिठी मारली. ‘तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा विश्वास मला वाटतो आहे,’ असं म्हणून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. ‘काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साध’, असं म्हणून स्वत:चा क्रमांक दिला होता. माझ्या रेझ्युमेवर हा खूप छान इंटरव्ह्य़ू होता, असा शेरा त्यांनी दिला. त्या परीक्षेत मला ए+ श्रेणी मिळाली. वर्गात आपण लेक्चर ऐकतो आहोत, असं न वाटता आपण एखाद्या कार्यक्रमात चांगली माहिती घेत आहोत, असं वाटतं. विद्यार्थ्यांना फोन वापरायला परवानगी असते. पण प्राध्यापकांच्या चांगल्या अध्यापनामुळे शिकण्यात लक्ष गुंतलं जातं आणि फोन हातात असूनही तो वापरावासा वाटत नाही. छान बॉण्डिंग होतं प्राध्यापकांसोबत.

इथे येऊ न पाच महिने झाले आहेत. सुरुवातीला अभ्यास ऑनलाइन असल्याने थोडं हडबडायला झालं. गोंधळलो होतो. नक्की गोष्टी कशा हाताळायच्या हे कळत नव्हतं. त्यातून सावरायला कुणी मित्रही फारसे झालेले नव्हते तेव्हा. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची निकोप स्पर्धा  असते. नंतर हळूहळू शिकत गेलो. सेमिस्टरच्या शेवटच्या टप्प्यात इथल्या अभ्यासाचा आराखडा कळला. प्राध्यापकांच्या विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत, शिक्षणपद्धतीची आखणी कशी आहे आणि शिकायला मिळतं आहे, ते कसं आणि किती वेगळं आहे, हेदेखील कळलं. सिद्धांत आणि संकल्पना शिकल्यानंतर आता वास्तवात त्याचा वापर कसा करावा, याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. विषयांनुसार वर्गातले विद्यार्थी बदलतात; पण काहीजणांचे विषय समान असतात. कोलंबिया, स्पेन या देशातले विद्यार्थी आणि भारतीय विद्यार्थिनी असा आमचा ग्रुप आहे. आम्ही एकत्र असाइन्मेंट्स करतो. अभ्यास करतो. सगळे कायम आपापलं काम आणि अभ्यासात व्यग्र असतात. त्यामुळे कॅम्पसमध्ये अनेक इव्हेंट सुरू असले तरी त्या सगळ्या इव्हेंटमध्ये सहभागी होता येत नाही. कधीतरी क्रिकेट खेळतो. बास्केटबॉलची गोडी मलाही लागली आहे. काही कॅनेडियन मित्रांच्या घरी जाऊ न आम्ही मॅच खेळलो. पुन्हा कधीतरी एखाद्या वीकएण्डला त्यांच्यासोबत खेळायचा बेत आहे. लघुपट तयार करणं फार मिस करतो आहे, कारण फारसा वेळच मिळत नाही अभ्यासातून. सध्या दिल्ली, पंजाबी, मुंबईतल्या मित्रांसोबत फ्लॅट शेअर करतो आहे. सगळेजण स्वभावाने चांगले आहेत. त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जातो. रेस्तराँमध्ये आणि फेस्टिव्हल्सना जातो.

मी वॉलमार्टमध्ये फुलफिलमेंट असोसिएट म्हणून पार्टटाइम काम करतो आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमधले सामान आम्ही रात्री भरून ठेवतो. इथे आल्यावर नोकरीसाठी प्रयत्न केले आणि महिनाभराने ही नोकरी मिळाली. इथले मॅनेजर आणि सहकारी चांगले आहेत. समजून घेतात. त्यांच्यात मी वयाने लहान आहे. कधी कधी मी उदास होतो, तेव्हा माझी मानलेली कॅनेडियन आई आणि फिलिपाइन्समधले मित्र माझी समजूत काढतात. माणुसकी आणि मित्रत्वाच्या नात्यांचे हे रेशीमबंध अलगदपणे विणले जात आहेत. इथे आल्यावर मी घरकाम, स्वयंपाक शिकलो. स्वावलंबी झालो. सुरुवातीला आई पाककृती पाठवायची. दादानेही शिकवलं. आता मला चांगला स्वयंपाक जमतो. वेगळे पदार्थ करून पाहायची आवड आहे. आईला फारच मिस केलं सुरुवातीला.. याच दरम्यान एक दिवस असा उजाडला की, नोकरीला जाताना काहीच खाल्लं नव्हतं. उशीर झाल्याने काही करता येणार नव्हतं. डबाही रिकामाच असणार होता. तेव्हा आईच्या आठवणीने डोळ्यांत पाणी आलं होतं. ती असती तर ही परिस्थितीच आली नसती. मनातल्या त्या भावनांनी शब्दरूप धारण केलं. आईविषयीची ती कविता लगेच आईला पाठवली. आता गोष्टी सुरळीत झाल्या आहेत. कधीतरी दादाकडे जातो तीन तासांचा प्रवास करून. वहिनीमुळे घरचं सुग्रास जेवण मिळतं. मध्यंतरी आमच्या ऑफिसमध्ये पार्टी होती तेव्हा शक्य असेल तर एखादा पदार्थ आणायचा होता. अनेकांनी आपापल्या प्रांतातल्या खास पाककृती केल्या होत्या. मी केलेल्या मालवणी चिकनची चव सगळ्यांना आवडली. सध्याचा अभ्यासक्रम संपल्यावर इव्हेंट मॅनेजमेंटचा ८ महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम जानेवारीमध्ये सुरू होईल. मला आधीपासून इव्हेंट आयोजनाची आवड आणि सवय होती. भारतात असताना इव्हेंट मॅनेजमेंटसाठी काम केलं होतं. सध्या काही इव्हेंटसाठी काम करत असल्याने तो अनुभव मिळतो आहे. पुढे इव्हेंटमध्ये पार्टटाइम जॉब मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन पदविका मिळाल्यावर नोकरी मिळणं तुलनेनं सोपं जाईल. बघा, तंद्रीत ग्रंथालयाची वेळ संपल्याचं कळलंदेखील नाही. लॅपटॉप बंद करून घरी पळतो आता. घरी काम आणि अभ्यास वाट बघतो आहेच!

कानमंत्र

* कॅनेडियन ब्रॅण्ड, मार्केटिंग, कंपन्यांचा शक्य तेवढा चांगला अभ्यास आधीच करून गेलात तर ती अभ्यासाच्या दृष्टीने चांगली गोष्ट ठरेल.

* स्वावलंबन आणि स्वयंपाक शिकूनच इथे या.

viva@expressindia.com

शब्दांकन – राधिका कुंटे