प्रथमेश दातार

लहानपणापासूनच मला विज्ञानाची विलक्षण ओढ होती. टीव्हीवर ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’इतक्याच आवडीने ‘डिस्कव्हरी’वरचे ‘एक्स्ट्रीम मशीन्स’सारखे विज्ञान-तंत्रज्ञानविषयक कार्यक्रमही बघायचो. ‘मोठं झाल्यावर कोण होणार?’, या प्रश्नाचं उत्तर ठासून ‘वैज्ञानिक’ असं दिलं जायचं. तेव्हा मला ‘संशोधन म्हणजे काय’, याची तसूभरही कल्पना नव्हती. फक्त ‘डिस्कव्हरी’वरच्या ‘एक्स्पर्टसारखं व्हायचं होतं’ इतकंच. संशोधन आणि प्रयोगाविषयी कळलं ते सहावीतल्या ‘होमी भाभा परीक्षे’च्या निमित्ताने. तेव्हा प्रात्यक्षिक करण्यासाठी प्रथमच प्रयोगशाळेत जायला मिळालं आणि वैज्ञानिक होण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. नववी-दहावीत न्यूटनच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीत रस असल्याचं जाणवलं. म्हणून दहावीनंतर आयआयटी, जेईई आणि इतर अभियांत्रिकी परीक्षांसाठी क्लासला जाऊ  लागलो. मात्र सहा महिन्यांतच लक्षात आलं की, मला अभियांत्रिकीसारख्या अप्लाईड विषयात नाही तर रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रासारख्या मूलभूत विषयांमध्ये रस वाटतो आहे. तरीही जेईई परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याच गुणांवर पुण्याच्या ‘भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान’ संस्थेत (आयसर) ‘बॅचलर्स आणि मास्टर्स ऑफ सायन्स’ डय़ुएल डिग्री या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. ‘आयसर’ ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील संस्था असून तिथे वैज्ञानिक विषयातील संशोधनाला प्रोत्साहन दिलं जातं. हे संशोधन अभियांत्रिकीसारखं त्वरित समाजोपयोगी पडत नसलं तरी अभियांत्रिकीच्या संशोधनाचा पाया या मूलभूत विषयांमधूनच येतो. त्यामुळे तेही तितकंच महत्त्वाचं आहे.

‘आयसर’मध्ये अभ्यासाबरोबर अनेक संशोधनाच्या प्रयोगशाळांमध्ये काम करायची संधी मिळाली. तेव्हा ठरवलं की, आपलीही स्वत:ची प्रयोगशाळा हवी. त्यासाठी मास्टर्सनंतर ‘पीएचडी’ पदवी मिळवणं गरजेचं असतं. म्हणून मीदेखील ही पदवी मिळवायचं ठरवलं. भारतात आयआयएससी, टीआयएफआर, आयआयटी, आयसरसारख्या आघाडीच्या संस्थांमध्ये पीएचडीसाठी प्रवेश मिळवता येतो. युरोप आणि अमेरिकेतील विद्यापीठेही सरस असल्याचं ऐकलं होतं. चौथ्या वर्षांच्या अखेरीस ‘आयसर’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’ यांनी पहिल्यांदा ‘स्टुडण्ट एक्स्चेंज प्रोग्राम’ सुरू केला होता. त्यामुळे ‘आयसर’मधल्या उन्हाळी सुट्टीत अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’च्या रसायनशास्त्र विभागामध्ये नील मार्श या प्राध्यापकांच्या प्रयोगशाळेत दोन महिने विद्यार्थी म्हणून संशोधन करायचा योग आला. तेव्हा जाणवलं की, भारतातील आघाडीच्या संस्था आणि अमेरिकेतील विद्यापीठे यांचा मूळ संशोधनाचा दर्जा समान असला तरी संशोधनाला मिळणारा निधी आणि पुढच्या संधी अमेरिकेत अधिक आहेत. भारतातील संस्थाही प्राध्यापकांच्या पदवीसाठी परदेशातील अनुभव असलेल्या उमेदवाराला अधिक पसंती देतात. म्हणूनच मी परदेशी पीएचडीसाठी जायचं ठरवलं. घरच्यांनी या गोष्टीला भक्कम पाठिंबा दिला.

पीएचडीसाठी जीवरसायनशास्त्र हा आवडीचा विषय निवडला. त्यातही प्रथिनांवर (एन्झाईम) काम करणाऱ्या प्रयोगशाळेच्या शोधात होतो. या विषयात काम करणारे सगळ्यात जास्त प्राध्यापक मिशिगन विद्यापीठात होते. शिवाय याआधी प्राध्यापक नील यांच्या प्रयोगशाळेत काम केलं होतं आणि त्यांची प्रयोगशाळा मला आवडली होती; त्यामुळे मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’सह अन्य पाच विद्यापीठांमध्येही पीएचडीसाठी अर्ज केला होता. अखेर केवळ ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’च्या रसायनशास्त्र विभागाने माझा अर्ज मंजूर केला. माझीही पसंती मिशिगनलाच असल्यामुळे तिथे मी प्रवेश घेतला. घरापासून इतक्या लांब जाणार याचं दु:ख घरच्यांना आणि मला वाटलंच. मात्र आयुष्यात काही प्राप्त करण्यासाठी थोडा त्याग करावाच लागतो, हेही तितकंच खरं आहे.

मिशिगनला येऊन आता एक वर्ष झालं आहे. याआधी इथं राहिलो असल्याने फारसा फरक पडेल, असं सुरुवातीला वाटलं नाही. पण दोन महिने आणि पाच वर्ष यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आधी आलो होतो तेव्हा विद्यापीठानेच जागा दिली होती. आता स्वत:च्या हिमतीवर सगळं निभावून न्यायचं होतं. इथं यायच्या आधी चार महिने घराचा शोध सुरू केला होता. ‘नटसम्राट’ नाटकातल्या ‘घर देता का घर?’ या ओळींचं ‘कुणी रूममेट देता का रूममेट?’ या ओळींत कधी रूपांतर झालं ते कळलंच नाही. सुदैवानं दोन रूमची अपार्टमेंट आणि रूममेट, हे वेळेत आणि चांगले मिळाले. दुसरा अडथळा होता फर्निचरचा! स्वस्तात मस्त वापरलेलं फर्निचर विकणारे भरपूर आहेत इथं. पण ते घरापर्यंत येणार कसं? दोन मार्गानी- स्वत:ची गाडी किंवा ‘पॅकर्स अ‍ॅण्ड मूव्हर्स’ना भरमसाट दिडक्या मोजा. ना स्वत:ची, ना मित्राची गाडी होती. भाडय़ाने गाडी घ्यायला लायसन्सही नव्हतं. मग माझ्या रूममेटचा भाऊ  आमच्यासाठी तीन राज्यांतून गाडी चालवत देवासारखा मदतीला धावून आला. पुढचा यक्षप्रश्न म्हणजे पेटपूजा! पुण्यात ‘आयसर’मध्ये आम्ही मित्र आठवडय़ातून एकदा स्वयंपाक करायचो. आईकडूनही प्राथमिक स्वयंपाक शिकलो होतो. या बाबतीत माझं पारडं जड करणाऱ्या गोष्टी म्हणजे स्वयंपाकाची मुळात असलेली आवड आणि संशोधनाशी त्याचं साम्य. या दोन्ही गोष्टींसाठी कसब आणि विज्ञान यांची जरुरी असते. स्वयंपाकघरातलं विज्ञान शालेय शिक्षणात समाविष्ट असतं आणि त्यात कालांतराने कसब येतंच. वरणभाताने सुरुवात होऊन आता स्वयंपाकाची गाडी छोले-पुरी आणि गुलाबजामपर्यंत येऊन पोहोचली आहे.

पीएचडीचं पहिलं दीड वर्ष धावपळीतच जातं. दर सेमिस्टरला दोन विषय शिकावे लागतात आणि बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांना टीचिंग अस्टिस्टंट होऊ न शिकवावं लागतं. मला मुळात शिकवायला आवडतं. टीचिंग असिस्टंट म्हणून काम केल्याने शिकवण्याचा चांगला अनुभव मिळतो. प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी विद्यार्थी शिक्षकांना अभिप्राय देतात. पहिल्या सेमिस्टरमध्ये काही विद्यार्थ्यांनी माझ्या शिकवण्यातील एक-दोन कमतरता निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार शिकवण्याच्या पद्धतीत बदल केले. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना माझं शिकवणं फार आवडलं. पहिल्या वर्षी क्लासमध्ये शिकणं, शिकवणं आणि संशोधन यांचा समतोल राखणं सुरुवातीला थोडं कठीण गेलं; परंतु वेळेचं योग्य व्यवस्थापन करायला शिकल्यावर काम थोडं सोपं झालं. पहिल्या वर्षांतील सर्व विषयांमध्ये मला ‘ए’ ग्रेड मिळाली. आमच्या विभागाच्या वार्षिक संमेलनात लोकांना माझ्या संशोधनाची माहिती पोस्टरद्वारे द्यायची संधी मिळाली. तेव्हा माझ्या कामाचं कौतुक झालं.

प्रयोगशाळेत वेळेचं बंधन नसतं. कधी १२-१३ तास काम करावं लागतं तर कधी ५ तासही पुरतात. माझे प्राध्यापक नील मार्श विद्यार्थी किती तास नि कसं काम करत आहेत, याची शहानिशा करत नाहीत. दर आठवडय़ाच्या शेवटी कामातली प्रगती आणि पुढच्या आखणीबद्दल मी त्यांना सांगतो. ते अतिशय चाणाक्ष आहेत. माझ्या कामातली बारीकशी चूकसुद्धा लगेच ओळखून योग्य ते मार्गदर्शन करतात. ‘एन्झाईमोलॉजी’ आणि त्यातही ‘व्हिटॅमिन बी१२’ वापरणाऱ्या प्रथिनांच्या विषयात प्राध्यापक नील मार्श हे मोठं नाव आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत मला शरीरातील रासायनिक प्रक्रिया घडवून आणणाऱ्या प्रथिनांचा अभ्यास करायला मिळतो. मी अभ्यासतो आहे ती प्रथिनं माणसाच्या शरीरातील नसून जिवाणूंच्या शरीरातील असतात. कारण जिवाणूंमधील अनेक प्रथिनं अतिशय अवघड वाटणाऱ्या रासायनिक प्रक्रियांना सहजतेनं उत्प्रेरणा देतात. रसायनशास्त्रज्ञालाही अशक्य वाटणाऱ्या प्रक्रिया ही प्रथिनं कशा रीतीने घडवून आणतात, याचा अभ्यास आम्ही करतो. या ज्ञानाचा उपयोग पुढे औद्योगिक किंवा पर्यावरणविषयक क्षेत्रातील रासायनिक प्रक्रियांना घडवून आणण्यासाठी केला जाऊ  शकतो. कामाच्या निमित्ताने प्रयोगशाळेतील सहकाऱ्यांची मदत लागते. ओळख होऊन त्यांच्याशी मैत्रीही होते. लंचब्रेकमध्ये इतिहासापासून ते राजकारणापर्यंत अनेक विषयांवर वादविवाद रंगतात. नवीन गोष्टींची माहिती होते. प्रयोगशाळेत काही अमेरिकनांशी मैत्री झाली आहे. भारताबद्दल आणि मुख्यत्वे आपल्या जेवणाबद्दल त्यांना फार कुतूहल असतं. त्यांनी अनेकदा मला भारतीय जेवण शिकवायची विनंती केली. त्यामुळे नुकताच मी भारतीय पाककृतींचा पहिला वर्ग घेतलादेखील. सुरुवात अर्थातच वरणभाताने झाली. प्रयोगशाळेत भारतीय विद्यार्थीही खूप आहेत. त्यांच्याशी देशातल्या घडामोडींसह इतर गोष्टींवर चर्चा होते. एक मराठी मुलगीही आहे. त्यामुळे हिंदी-मराठी दोन्ही भाषांमध्ये बोलायला मिळतं. सारखं इंग्लिश बोलून कंटाळा येतो. शेवटी आपल्या भाषेत बोलण्यासारखं दुसरं काही सुख नाही.

टीचिंग असिस्टंटशिप आणि प्राध्यापक नील यांच्या संशोधन निधीतून एकत्रपणे मला दर महिन्याला शिष्यवृत्ती मिळते. घरभाडे आणि इतर खर्चासह शिक्षणाचा खर्चही त्यातूनच निघतो. घरकाम आणि अभ्यास या आघाडय़ा सांभाळतानाच छंद जोपासणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भारतात मला सायकलिंगचं वेड होतं. अजूनही आहे. मात्र इथं र्अध वर्ष बर्फाचं साम्राज्य असल्याने सायकलिंग करता येत नाही. त्यावर मी पोहोण्याचा पर्याय शोधला आहे. विद्यापीठाच्या स्विमिंगपूलमध्ये रोज संध्याकाळी पोहायला जातो. शिवाय नदीत कायाक चालवतो. आईसस्केटिंग करतो. गेले काही आठवडे आम्ही वीकएण्डला क्रिकेटही खेळलो. दर वर्षी जीवरसायनशास्त्र शाखेतर्फे  विद्यार्थी आणि प्राध्यापकांची सहल आयोजित केली जाते. नील रसायनशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र या दोन्ही शाखांमध्ये प्राध्यापक असल्यामुळे या वर्षी मीही सहलीला जाऊ  शकलो. मिशिगन राज्यातील तलावाजवळ एक दिवस-रात्रीची ही सहल होती. आम्ही फार मजा केली.

नातलग आणि मित्रांशी बोलताना हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, पुढे काय ठरवलं आहे? या प्रश्नाचं उत्तर सोप्पं नाही. या प्रश्नाचे काम आणि जीवनशैली हे दोन पैलू आहेत. कामाच्या दर्जाबाबत भारतातील आघाडीच्या संस्था आणि अमेरिकेत फारसा फरक नाही. भारतात संशोधनाला जास्त निधी मिळाल्यास इथं थांबायची गरज नाही. जीवनशैलीचा प्रश्न वैयक्तिक आहे. इकडचं राहणीमान, सोयीसुविधा, शिस्तबद्धपणा अनेकांना भावतो. पण हल्ली आपल्याकडेही अनेक सोयीसुविधा उपलब्ध होऊ  लागल्या आहेत. इथं सगळंच छान आहे असंही नाही. आयुष्य फार स्वकें द्रित आहे. शेजारच्यांशी गप्पा मारणं सोडा, शेजारी कोण राहतं हेही माहिती नसतं. वरवर घट्ट वाटणारे नातेसंबंध अनेकदा आतून पोकळ असतात. घरचे, नातलग, मुंबईचा पाऊ स, नाक्यावरचा वडापाव, ट्रेनमधली गर्दी या सगळ्याची अनेकदा आठवण येते. घरच्यांना एकटं सोडावंसं वाटत नाही. भारतात शैक्षणिक किंवा औद्योगिक संस्थेत संशोधक व्हायची संधी मिळाल्यास आनंदच होईल. आपल्या कामाचा आपल्या देशाला लाभ झाल्याचं समाधान मिळेल. तसं झालं नाही तरी माझं संशोधन थांबणार नाही. कुठंही असलो तरी आपल्या संशोधनामुळे लोकांचं भलं कसं करता येईल, हा विचार नेहमी मनात असेलच. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे,’ या उक्तीवर लक्ष केंद्रित करत मी चांगला संशोधक होणार आहे.

कानमंत्र

* अमेरिकेतल्या सगळ्याच विद्यापीठांना संशोधनासाठी किंवा शिक्षणासाठी भरपूर निधी मिळत नाही. आघाडीच्या १००-२०० चांगल्या संस्थांनाच मिळतो. अनेक छोटय़ा विद्यापीठांतील शैक्षणिक दर्जा सामान्यच असतो. त्यामुळे भरमसाट पैसे खर्च करून तिथं शिकायला येण्यात फायदा नाही. व्यवस्थित अभ्यास करूनच विद्यापीठाची निवड करावी.

* अनेक विद्यापीठांमध्ये सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये पुढील वर्षांतील प्रवेशाचे अर्ज स्वीकारले जातात. मूळ प्रवेशप्रक्रियाही तेव्हाच चालू होते. त्यामुळे लवकर अर्ज भरल्यास प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असते. हे सगळीकडे लागू होत नाही; परंतु अनेक विद्यापीठं असं करतात.

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com