05 August 2020

News Flash

जगाच्या पाटीवर : औषधमात्रे तन प्रतिकारशक्ती

मी डेन्मार्क, नेदरलँड आणि स्वित्झर्लंडमधल्या विद्यापीठांत चार अर्ज केले होते. डेन्मार्कमध्ये दोन आणि नेदरलँडमध्ये एक अर्ज स्वीकारला गेला

(संग्रहित छायाचित्र)

श्रेया जोशी

नमस्कार. मी ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी’मधून ‘बॅचलर्स इन फार्मसी’ केलं. तिसऱ्या वर्षांला असतानाच परदेशात जाऊन मास्टर्स करायचं ठरवल्याने त्या दृष्टीने अभ्यासक्रम-विद्यापीठांचा शोध घ्यायला सुरुवात झाली. मी कोणत्याही संस्थेचं मार्गदर्शन घेतलं नव्हतं. इंटरनेटवरच्या टिप्सचा उपयोग करून घेणं, बॅचलर्सच्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन घेणं किंवा थेट त्या विद्यापीठाचंच मार्गदर्शन घेणं हे केव्हाही चांगलं. माझे बरेच सीनिअर्स परदेशात शिकायला गेले आहेत. त्यांचे अनुभव, त्यांच्या करिअर संधींविषयी ऐकलं होतं. माझी मावशी आणि तिचं कुटुंब अमेरिके त स्थायिक आहे. त्यांचं करिअर आणि जीवनानुभव पाहून मलाही परदेशात जाऊन शिकावंसं वाटू लागलं. शिवाय नवीन गोष्टी शिकणं आणि नवीन वातावरण अनुभवायचं होतं. फार्माला भारतात संधी असली तरी त्याहूनही अधिक संधी परदेशात आहे. बहुतांशी वेळा अनेक विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. मात्र मी युरोपचा पर्याय निवडला. त्यामुळे आधी आईबाबांनी काही नातलग अमेरिकेत असल्याने तिथे जाण्याविषयी समजावून पाहिलं, पण नंतर मी घेतलेल्या निर्णयाला त्यांनी कायम पाठिंबा दिला. विद्यापीठाचा शोध घेताना किंवा पुढे माझा अर्ज स्वीकारला गेल्यावर बाबांनी तिथल्या विद्यार्थ्यांशी ईमेलद्वारे संपर्क साधून सविस्तर माहिती विचारली होती.

मी डेन्मार्क, नेदरलँड आणि स्वित्झर्लंडमधल्या विद्यापीठांत चार अर्ज केले होते. डेन्मार्कमध्ये दोन आणि नेदरलँडमध्ये एक अर्ज स्वीकारला गेला. नेदरलँडमध्ये माहिती काढण्यासारखं कुणी ओळखीचं नव्हतं. डेन्मार्कमधल्या विद्यापीठांची व्यवस्थित माहिती सीनिअर्सकडून कळली. इथे इंग्रजीत संवाद साधला जात असल्याने भाषिक अडथळा अजिबात नाही. तिथली दोन विद्यापीठे होती, ‘टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगन’. त्यातही हेच विद्यापीठ निवडलं; कारण इथे इंडस्ट्रिअल एक्सपोजर खूप आहे. विषय त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ येऊन शिकवतात. विद्यापीठ आणि इंडस्ट्रीचे संलग्न अनेक उपक्रम होतात. अर्ज करणं, अर्जाचा स्वीकार होणं हे बऱ्याच आधी होत असल्याने आपण सगळ्या गोष्टी सोडून जाणार आहोत, हे तेवढं जाणवत नाही. जायची वेळ येऊन ठेपल्यावर आठवडाभर आधी ते जाणवतं. मी घरच्यांशी, नातलग-मित्रमंडळींशी खूपच अटॅच आहे. त्यामुळे भावनिकदृष्टय़ा तो काळ सगळ्यांच्या परीक्षेचा होता. आता माझ्या मलाच गोष्टी निभावून न्यायच्या होत्या. निर्णय आणि जबाबदारी घ्यायची होती. त्यामुळे किंचितशी भीती वाटली होती. पण हे सगळं वाटणं आणि त्याला सामोरं जाणं, तितकंच गरजेचं असतं. हा अनुभव प्रत्येकाने घेतला पाहिजे. माझ्यातला हा बदल मला स्वत:ला, घरच्यांना जाणवण्याजोगा आहे. आता मी स्वयंपाकापासून घरकामापर्यंत सगळ्या कामांमध्ये स्वावलंबी झाले आहे.

अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधी आठवडाभर इथे आले. या विद्यापीठातल्या भारतीय विद्यार्थ्यांशी समाजमाध्यमाद्वारे संपर्क साधला होता. त्यातून एक ग्रुप तयार होऊन तिकीट बुकिंग, विद्यापीठात राहण्याची व्यवस्था वगैरे गोष्टी आधीच केल्या होत्या. कॉलेजमध्ये इंट्रोडक्शन वीकमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज होत्या. अभ्यासक्रमाची माहिती दिली गेली. कॉलेज आणि सिटी टूर झाली. नवीन ओळखी झाल्या. इथे स्थानिक, युरोपभरातून आणि अन्य देशांतले विद्यार्थी शिकायला येतात. सोशल इव्हेंटमुळे आम्हाला रुळायला वेळ मिळाला. मी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्क’मध्ये ‘मास्टर्स इन फार्मास्युटिकल डिझाइन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग’ (फार्मा टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. औषधं शोधण्यापासून ते औषध मार्केटमध्ये येण्यापर्यंतच्या सगळ्या टप्प्यांचा अभ्यास यात केला जातो. त्यातही फार्माच्या कोणत्याही विषयात स्पेशलायझेशन करता येऊ  शकतं. ड्रग डेव्हलपमेंट, क्लिनिकल ट्रायल वगैरे विषयांचं ज्ञान दिलं जातं. काही अपवाद वगळता विषयनिवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना आहे.

इथे ग्रुपवर्कवर (सांघिक कामगिरी) खूपच भर दिला जातो. सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि प्रोजेक्ट ग्रुपने केली जातात. त्यामुळे खूप शिकायला मिळतं. आधी हे सगळ्यांना अ‍ॅडजस्ट करणं कठीण गेलं होतं. आता त्याची सवय झाली आहे. असं काम करताना विविध दृष्टिकोनांतून मुद्यांचा विचार केला जातो. टीमवर्कचं महत्त्व अधोरेखित होतं. पहिल्या सेमिस्टरमध्ये मी ‘मायक्रो अ‍ॅण्ड नॅनोटेक इन डायग्नॉस्टिक्स अ‍ॅण्ड फार्मा’ हा विषय घेतला होता. त्यासाठी ग्रुपवर्क होतं आणि एक रिपोर्ट लिहायचा होता. तेव्हा डेंग्यूवर काम करत होते. त्यावेळी व्याख्यान देण्यासाठी एका कंपनीचे सीईओ आले होते. त्यांचं याच संदर्भात काम होतं. त्यांना भेटून त्यांच्याशी बोलले. त्यांच्या कंपनीत जाऊन काम पाहिलं. पुढे काही महिन्यांनी स्टुडण्ट असिस्टंट म्हणून कंपनीकडून बोलावणं आलं. इथे अभ्यासाखेरीज उरलेल्या वेळात अनेकजण नोकरी करतात. अनेक कंपन्या स्टुडण्ट असिस्टंटची नोकरी देऊ  करतात. ‘ब्लूसेन्स डायग्नॉस्टिक्स’ ही माझ्या अभ्यासक्षेत्रातली कंपनी आहे. तिथे मुख्यत्वे इम्युनॉलॉजीसंदर्भात (रोगांपासून संरक्षण कसं मिळतं याचा अभ्यास) काम केलं जातं. हे काम बघून मला इम्युनॉलॉजीच्या अभ्यासात अधिक रस वाटायला लागल्याने ते विषय मी अभ्यासते आहे. माझा इंडस्ट्रिअल थिसिस फेब्रुवारीमध्ये याच कंपनीत सुरू होणार आहे. या कंपनीत आधी सहा महिने काम करायचं आणि त्या अनुभवावर आधारित प्रोजेक्ट लिहायचा असतो.

मी रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट टीममध्ये आहे. मी दोनच दिवस लॅबवर्क करते. प्रयोगातल्या चाचण्यांसाठी लागणारी बायो-केमिस्ट्रीची सोल्यूशन्स तयार करणं, संशोधनासाठी आलेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करणं, त्याची नोंद करणं आदी गोष्टी करते. इथे वीकएण्डला सुट्टी असते. आठवडय़ाभरात कामाच्या तासांची फ्लेक्झिबिलिटी खूप असते. रोज साडेसात तास काम करणं अपेक्षित असतं. त्याला घडय़ाळाच्या काटय़ाचे नियम लागू होत नाहीत. वर्क-लाईफ बॅलन्स इथल्या वर्ककल्चरमध्ये (कार्यसंस्कृती) चांगल्या रीतीने साधला जातो. आमची कंपनी छोटी असल्याने सहकाऱ्यांशी चांगली ओळख, मैत्री झाली आहे. पदांचा महिमा आणि माहात्म्य अजिबात नाही. सगळ्यांशी सहज संवाद साधू शकता. जगणं ताणविरहित आहे. डेन्मार्क हा जगातल्या आनंदी देशांमधला अव्वल स्थानी असणारा देश आहे. त्याचं प्रतिबिंब इथल्या जगण्यात निश्चितच दिसतं. अलीकडेच आम्ही सगळे सहकारी मिलानला गेलो होतो. तिथे टीमबिल्डिंगसाठी इव्हेंट होता. बऱ्याच अ‍ॅक्टिव्हिटीज आयोजित करण्यात आल्या होत्या. व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यशाळा घेण्यात आली. हा एक छान अनुभव होता.

इथे लॅपटॉपवर प्रेझेंटेशन आणि एकू ण अभ्यास ऑनलाइन असतो. सुरुवातीच्या काळात त्याची सवय नसल्याने नवीन वाटलं. प्राध्यापकांना कितीही प्रश्न-शंका बिनधास्त विचारता येतात. त्यांची व्यवस्थित उत्तरं मिळतात. असाईनमेंट, रिपोर्ट्स, प्रोजेक्ट खूप असतात. तोंडी आणि ओपन बुक परीक्षा असतात. फक्त नेट सुरू करता येत नाही परीक्षेच्या वेळी. पाठांतर हा मुद्दा बाद झाला आहे. आपल्याला समजलेल्या संकल्पना परीक्षकांना विशद करणं ही गोष्ट महत्त्वाची ठरते. निकाल लगेच कळतो. सेमिस्टरच्या सुरुवातीलाच अभ्यासक्रमाचा आराखडा मिळतो आणि तो प्रत्यक्षात तसाच अमलात आणला जातो. एकू ण चार तासांचं लेक्चर असलं तरी सलग चार तास शिकवलं जात नाही. तर दोन तास प्रेझेंटेशनसह शिकवलं जातं आणि त्यातही ब्रेक असतात. नंतर कधी टय़ुटोरिअल, कधी प्रश्नोत्तरं कधी ग्रुपवर्क दिलं जातं. प्राध्यापक पीटर हीगार्ड माझे स्टडीहेड आहेत. माझ्या अकॅडमिक, थिसिस, अन्य काही शंका त्यांना विचारते. त्यांचं मार्गदर्शन मिळतं. माझ्या थिसिसचे ते इंटर्नल सुपरव्हायझर असतील. नेदरलँडमधल्या ‘सेन्सअस २०१९’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑगस्टमध्ये गेले होते. आमच्या विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या पंधरा जणांच्या टीमचं नाव  ‘डिक्टेट्स’ होतं. त्यासाठी सहा महिने काम सुरू होतं. या स्पर्धेत आजार आणि त्यावरचं औषध शोधणं अपेक्षित होतं. यावेळी अथ्र्रायटिससाठी आम्ही औषध शोधत होतो. त्यासाठीचा बायोसेन्सर विकसित करण्यासाठी मॅनेजमेंट, फार्मा, बायॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्सचे विद्यार्थीही होते. विभिन्न शैक्षणिक पाश्र्वभूमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र काम करणं ही मोठी कठीण गोष्ट होती. कारण प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं होतं. या काळात बरेच चढउतार अनुभवाला मिळाले. प्रत्येकाच्या कामाची पद्धत, वेळेचं व्यवस्थापन, ताणतणाव आदी गोष्टी घडल्या. अभ्यास आणि हे काम न जमल्यानं काहींनी मध्येच माघार घेतली. कुणी ठरल्यापेक्षा थोडं कमी काम केलं. स्पर्धेच्या आधी सुट्टी असल्याने थोडाफार सुट्टीचा मूडही होता. सगळ्या अडचणींतून वाट काढणं, हीच एक मोठी परीक्षा होती. हा अनुभव बरंच काही शिकवून गेला. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशांतील १५ विद्यापीठांचा सहभाग होता. आम्ही क्रिएटिव्हिटी विभागात तिसरे आलो. इतर विद्यापीठांतल्या विद्यार्थी-प्राध्यापक आणि जाणकारांना भेटायची संधी मिळाली. व्यावसायिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बोलायला मिळालं. कार्यवर्तुळ वाढवायची संधी मिळाली. मी कॉलेजमध्ये डॅनिश भाषा शिकते आहे. अभ्यास आणि काम सांभाळून त्यासाठी तितका वेळ देता येत नाही. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काही मुख्य सण साजरे होतात. त्यासाठी वेळ काढते. एरवी सतत होणाऱ्या इव्हेंटसाठी वेळ मिळतोच असं नाही.

वर्गातली मित्रमंडळी मिळून अभ्यासाखेरीज गप्पा मारतो. एकत्र स्वयंपाक करतो. पॉटलक करतो. काहीजणांनी बॉलिवूडचे चित्रपट पाहिले आहेत, हे ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. अमिताभ बच्चन, शाहरुख खान त्यांना माहिती आहेत. भारतीय सणवार, वेशभूषेबद्दल त्यांना कुतूहल वाटतं. मुंबई, गर्दी, लोकलगर्दी असे विषयही गप्पांमध्ये असतात. त्यांची खाद्यसंस्कृती, फिरस्तीची ठिकाणं यावरही गप्पा रंगतात. इथल्या संस्थांतर्फे साजऱ्या होणाऱ्या सणवारांना आम्ही जातो. तरीही आमच्या गावातला- पेणचा गणेशोत्सव मी मिस करते. दिवाळीत घरच्यांची आणि नातलगांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकटी किंवा ग्रुपसोबत फिरायला जाते. या वर्षभरात सहा देशांत फिरणं झालं आहे. दोन महिन्यांपूर्वी स्वित्र्झलण्ड ट्रिप झाली. तेव्हा एक दिवस टिटलिस आल्प्सवर गेले होते. सर्वदूर पसरलेल्या बर्फामुळे भोवताल स्वर्गासारखा सुंदर वाटत होता. तिथे भरपूर स्नो अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या. गंमत म्हणजे आल्प्सवर शाहरुख आणि काजोलच्या डीडीएलजेचं एक मोठं पोस्टर आहे. कारण तिथं डीडीएलजेचं बरंचसं शूटिंग झालं होतं. ते बघून मज्जाच वाटली. वेळोवेळच्या या फिरस्तीची आखणी आणि व्यवस्थापन स्वत: किंवा आमचं आम्हीच करतो. हा अभ्यासक्रम संपल्यावर नोकरीचा अनुभव घेऊन काही काळाने पीएचडी करायचा विचार आहे.

कानमंत्र

* आपल्याच चांगल्या भवितव्यासाठी हिंमत करून, स्वत:वर विश्वास ठेवून आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. त्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळतात.

* इथे यायच्या आधीच अभ्यासक्रम आणि शिक्षणपद्धतीची माहिती मिळवून त्यानुसार पुढच्या गोष्टींची व्यवस्थित आखणी करा. त्यामुळे सगळी तयारी झालेली असेल आणि शेवटच्या क्षणाला ताण येणार नाही.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 4:34 am

Web Title: jagachya pativar article shreya joshi abn 97
Next Stories
1 अराऊंड द फॅशन : ‘फॅशन’ अ‍ॅवॉर्ड गोज टू ..
2 शेफखाना : यूटय़ूबची फुडी दुनिया
3 छोटे टेक्नोवीर
Just Now!
X