सिद्धेश सप्रे

रोजच्या धावपळीतून आज थोडासा फावला वेळ मिळाला बऱ्याच दिवसांनी. जवळपास चार महिने होऊन गेले इथे येऊन आणि आता मी स्थिरावलो आहे. पहिले दोन महिने आम्ही जर्मन भाषा शिकलो. त्यानंतर पीएचडीच्या अभ्यासाला-संशोधनाला सुरुवात झाली. रोजच्या व्यावहारिक गोष्टी करणं सुकर व्हावं यासाठी प्रात्यक्षिकासह भाषा शिकवली जाते. शिवाय संस्कृतीसह अन्य बाबींची तोंडओळख करून दिली जाते. मला ऊअअऊ ची शिष्यवृत्ती मिळाली असून त्यांच्यातर्फे हा दिवसभर चालणारा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यानंतर विद्यापीठात सादर करायच्या कागदपत्रांची पूर्तता होते. मारबर्ग हे युनिव्हर्सिटी टाऊन असून विविध शैक्षणिक सोयीसुविधा आणि आमच्या विभागांच्या इमारती शहरभर विखुरलेल्या आहेत. शिवाय सिटी रजिस्ट्रेशनसारख्या व्यावहारिक बाबींची पूर्तता करण्यात काही दिवस जातात. नंतर ईमेल आयडी वगैरे मिळाल्यानंतर आपापल्या विभागीय प्राध्यापकांकडे फॉर्म भरला जातो. या सगळ्या व्यावहारिक बाबींच्या पूर्ततेनंतर मी विद्यापीठासह ‘इन्स्टिटय़ूट फॉर व्हायरॉलॉजी’चा भाग झालो. या सगळ्यात विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी अटेंटिव्ह पार्टनर असतो. त्यात भाषिक साहाय्यापासून ते घर मिळवण्यापर्यंत अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. इंटरनॅशनल ऑफिसचंही यासाठी चांगलं साहाय्य मिळतं. शिवाय ‘मारा’ अर्थात ‘माव्‍‌र्हल रिसर्च अकॅडमी’तर्फे संशोधनाशी संबंधित आणि अन्य आनुषंगिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी लागणारी मदत आणि प्रशिक्षण मिळतं.

बायोसेफ्टी लेव्हल्सच्या चार प्रकारांपैकी मी लेव्हल ३ मध्ये काम करतो आहे. लेव्हल ३ म्हणजे काही विषाणू हवेतून पसरू शकतात आणि त्यांना नियंत्रित करणं कठीण असतं ती होय. या लेव्हलमध्ये साधारणत: रोगकारक जंतूवर (पॅथोजेन्स) काम करतात. या जंतूंची बाधा होऊ  नये म्हणून त्यावर लस टोचून घेता येते, पण हे रोगकारक जंतू खूप अपायकारक असतात. उदाहरणार्थ- वेस्ट बंगाल नील फिव्हर, यलो फिव्हर व्हायरस, क्यासूंर फॉरेस्ट डिसीज व्हायरस, हाय पॅथोजेन्स इन्फ्लुएन्झा व्हायरस, रिकट्टसिया बॅक्टेरिया वगैरे. त्यामुळे लॅबमध्ये लॅबसूट घालून आम्हाला काम करावं लागतं. हे लॅबसूट घालून, सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन प्रत्यक्षात लॅबमध्ये ३-४ तासांहून अधिक काळ काम करता येत नाही. त्यामुळे लॅबमध्ये काम करायच्या तंत्राचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर महिन्याभरात सुपरवाइजर अर्थात मार्गदर्शक पुढचा आराखडा स्पष्ट करतात. त्या ठरलेल्या वेळी कामाविषयी चर्चा केली जाते. आठवडय़ातल्या काही वारी सेमिनार्स, व्याख्यानं, प्रबंध सादरीकरण आदी अ‍ॅक्टिव्हिटीज होतात. त्यातही एक व्याख्यान जर्मन भाषेत आणि बाकी इंग्रजीत दिली जातात. आमचे मार्गदर्शक आमच्या संशोधनासाठी त्यांचा बहुमूल्य वेळ देतात. एक विद्यार्थी म्हणून नव्हे तर भावी शास्त्रज्ञ म्हणून आम्हाला वागणूक दिली जाते. सुरुवातीच्या काळात माझे मार्गदर्शक डॉ. ख्रिश्चन केलर यांना मी ‘डॉ. केलर’ असं संबोधायचो. मात्र त्यांनी मला नावानंच हाक मार, असं सांगितलं. नावानं संबोधलं तरी एक आदरभाव कायम असतोच. विद्यार्थ्यांचं मत ऐकून घेऊन त्यावर मोकळी चर्चा केली जाते. विद्यार्थी-प्राध्यापकांमधलं चार हाताचं अंतर, अढी कुठेही राहात नाही. आपल्या वेळेचं आणि कामाचं योग्य व्यवस्थापन करणं हेच अपेक्षित असतं. कामाच्या वेळी काम करून त्यानंतरचा वेळ स्वत:साठी राखून ठेवला जातो. आरोग्याविषयी इथले लोक खूप जागरूक आहेत. स्पष्टवक्ते आणि शिस्तीचे भोक्ते आहेत. परफेक्शन आणि डॉक्युमेंटेशनवर त्यांचा अधिक भर असतो.

थोडंसं मागच्या काळात डोकावायचं तर मी ‘रुईया महाविद्यालया’तून ‘बायोकेमिस्ट्री’मध्ये बी.एस्सी. केलं. त्यानंतर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’शी संलग्न असणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’मधून ‘मास्टर ऑफ सायन्स’ केलं. त्यानंतर भारतातच पीएचडी करण्यासाठी दोन संस्थांमध्ये माझी निवड झाली होती. मात्र त्यात निधी, दोन संस्थांसह एकत्र काम करणं आणि मला हव्या त्या विषयाचा अभ्यास – संशोधन करायला मिळणं, या गोष्टी प्रत्यक्षात यायला अनेक अडथळे होते. इथे या गोष्टींचे अडथळे अजिबात नाहीत. उलट विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी आवश्यक असणारी मदत सर्वतोपरी केली जाते. प्रशिक्षण दिलं जातं. इथल्या प्राध्यापकांशी स्काइपवर बोलणं झाल्यावर त्यांची मार्गदर्शन करण्याची तयारी आणि समोरच्यावर विश्वास दाखवण्याची वृत्ती लगेचच जाणवली. ती वेळोवेळी प्रत्यक्षातही उतरली.

या सगळ्या कारणांमुळे परदेशात जाऊ न पीएचडी करायचा निर्णय घेतला. त्यासाठीच्या आवश्यक परीक्षा दिल्या. त्याच वेळी कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि अमेरिकेत अर्ज पाठवले होते. कॅनडा, अमेरिकेतल्या विद्यापीठांत माझी निवड झाली होती. ऑस्ट्रेलियातील संस्थेत निवड झाली तरी शिष्यवृत्ती मिळाली नाही. तिथल्या मार्गदर्शकांचा प्रतिसाद चांगला होता. विद्यापीठाचे मानांकन नव्हे तर माझ्या अभ्यासविषयानुसार मी मार्गदर्शकांच्या शोधात होतो. मी लिहिलेल्या अनेक ईमेल्सपैकी साधारण ६० ते ७० टक्के ईमेल्सना नकार मिळाला. मात्र माझा सीव्ही चांगला असल्याचं अनेकांनी नमूद केलं होतं. निधी किंवा जागा नसणं,  प्राध्यापकांची निवृत्ती, तगडी स्पर्धा अशी काही कारणं या ईमेल्समध्ये होती. शिवाय पुढे तू अमुक गोष्ट करू शकतोस, अशा आशयाचे सल्ले, मार्गदर्शनही होतं. या सगळ्या काळात माझे आईबाबा आणि भाऊ  कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. मला वेळोवेळी प्रोत्साहन देत निर्णयस्वातंत्र्य दिलं.

डॉ. केलर यांनी पहिल्या प्रतिसादात ‘मी थेट तुझ्या अभ्यासविषयावर काम करत नाही. त्यामुळे तू या चार जणांशी संपर्क साध’, असं लिहिलं होतं. त्यानंतर काही मिनिटांत पुन्हा आलेल्या ईमेलमध्ये ‘तुला माझ्या अभ्यासविषयात रस वाटलाच तर नक्की संपर्क साध. तुझ्या संशोधनविषय आणि कौशल्याला वाव द्यायला मला आवडेल’, अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. माझं पदव्युत्तर शिक्षण विषाणूविज्ञानात झालं असल्याने या दिशेने एक प्रयत्न करायला हरकत नाही, असा निर्णय मी घेतला. मग आम्ही बॅक्टेरिया आणि व्हायरस (जिवाणू आणि विषाणू) यांचं सुपरइन्फेक्शन असणारं प्रोजेक्ट तयार केलं. ते ज्या संस्थेशी निगडित आहेत, ती ‘फिलिप्स युनिव्हर्सिटी मारबर्ग’शी संलग्न असल्याने इथे प्रवेश घेतला. केलर हे ‘हेड ऑफ डायग्नॉस्टिक्स’ आहेत. ते मुळात मेडिकल डॉक्टर असून त्यांना संशोधनात रस आहे. त्यांनी स्वत:ची लॅब सुरू केली आहे, ती अद्याप प्रस्थापित व्हायची आहे. इथे खूप काही शिकायला मिळतं आहे. विचारांना सतत चालना मिळते. आम्ही आठवडय़ातून साधारण तीनदा भेटतो. त्यात लॅब मीटिंग, कॉमन मीटिंग चालते. प्रयोगांची आखणी, चर्चा, इतरांच्या कामाची माहिती मिळणं, एकमेकांना सल्ले-सूचना देणं हेही सुरू असते.

सुरुवातीच्या काळात भाषेच्या संदर्भात काही कडूगोड अनुभवही आले. विशेषत: वयस्कर लोकांचा जर्मन भाषेतील संभाषणावर भर असतो. मात्र आपण त्या दिशेने प्रयत्न करतो आहोत, असं दिसल्यास ते नक्कीच मदतीचा हात देतात. इंग्रजी भाषा जगात प्रभावी असू शकते, परंतु जर्मन लोकांनी त्यांची भाषा जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांच्याकडून शिकण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृती आणि भाषेचा अभिमान बाळगणं. इथे सुरुवातीच्या काळात जुळवून घेणं थोडं कठीण गेलं. विशेषत: मी शाकाहारी असल्याने त्यासाठी आवश्यक पदार्थाचा शोध घ्यायला लागला. भारतातल्या शिक्षणानिमित्ताने मी काही काळ घराबाहेर असल्याचा थोडा अनुभव गाठीशी होता. आता पूर्णपणे स्वावलंबी झालो आहे. इथल्या हवामान बदलामुळे रुळायला वेळ लागतो. सुरुवातीला नैराश्य, एकटेपणा जाणवतो. संस्कृती, व्यक्तिस्वातंत्र्य आदी गोष्टीतले फरक जाणून घ्यायला लागले. काम आणि वैयक्तिक जीवनात अंतर ठेवता येऊ  शकतं. आम्ही मित्रमंडळी वीकएण्डला एकत्र भेटतो. स्वयंपाक करतो. वेळ मिळाला तर फिरायला जातो. लॅबमधल्या सहकाऱ्यांना आपले पदार्थ खूप आवडतात. ते मी त्यांना खिलवतो.

इथे आल्यावर प्रामुख्याने जाणवलं की, आपल्या छंदांना वेळ देणं आवश्यक आहे. वेळ मिळाल्यावरच छंद जोपासण्याऐवजी त्यासाठी खास वेळ राखून ठेवणं, ही इथली खासियत आहे. मला छायाचित्रण करणं आणि गायनाचा छंद आहे. इथे मी स्वकमाईचा पहिलावहिला डीएसएलआर विकत घेतला. छायाचित्रणाची आवड असणाऱ्या एका ग्रुपमध्ये आम्ही एकत्र जमतो. वेगवेगळे प्रयोग करतो. चर्चा करतो. जर्मन लोकांना संगीताची आवड खूप आहे. मीही गाण्याचा छंद जोपासतो आहे. लॅबमधले आणि अन्य काही भारतीय मित्र मिळून आम्ही बँड तयार केला असून कार्यक्रमही करतो. काहीजण गातो, काही वादन करतात. कधी कधी वीकएण्डला ओव्हरनाइट ट्रेकिंगही करतो.

एकदा मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताला जखम झाल्याने तो त्याच्या प्रयोगातल्या काही गोष्टी करू शकत नव्हता. तशा गोष्टी मलाही माझ्या प्रयोगासाठी कराव्या लागणार होत्या. तो अनुभव नसल्याने थोडी भीती वाटत होती. दुसऱ्याच्या प्रयोगाची सॅम्पल हाताळण्यासाठी तितकासा आत्मविश्वास वाटला नाही. तितक्यात सुपरवाइजर स्वत: लॅबमध्ये येऊ न काम करायला लागले. मी त्यांचं निरीक्षण करू लागलो. पाच मिनिटांनी पुढचं तुला करायला आवडेल का, असा प्रश्न त्यांनी विचारला. तो विश्वास त्यांनी दाखवून मला प्रोत्साहन दिलं आणि मी ते करू शकलो. आत्मविश्वास वाढला. मध्यंतरी लॅबमधले बरेचसे सहकारी थायलंडला परिषदेसाठी गेले होते. तरीही एक प्रयोग होणं आवश्यक होतं. त्यासाठीचं प्रशिक्षण द्यायला कुणी नव्हतं. पण केवळ फोनवर मिळालेल्या सूचनांनुसार मी तो प्रयोग केला. त्यात यश मिळालं. त्यांचा विश्वास मला सार्थ ठरवता आला होता. नंतर त्यांनी माझं कौतुकही केलं.

Modulation of Influenza infection and immunity by Orientia tsutsugamushi superinfectional’ यावर मी संशोधन करतो आहे. मानवी शरीरात रोगप्रतिकाकरशक्ती कार्यरत असते. काही जिवाणू शरीरात प्रवेश करतात आणि त्या विषाणूंपासून संरक्षण देऊ  शकतात किंवा रोग अधिकच तीव्र करू शकतात. यापैकी ओरिएंटिया या जिवाणूचा (बॅक्टेरिया) इन्फ्लुएन्झा विषाणूच्या रोगाची लागण होण्यावर कसा काय परिणाम घडतो आणि त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारकशक्तीवर काय परिणाम होतो हे पाहण्याचा प्रयत्न आमच्या या संशोधनात करत आहोत. माझी पीएचडी अंदाजे साडेतीन ते चार वर्षांत पूर्ण होईल. पुढे पोस्टडॉक करण्याचा विचार आहे. शिवाय केवळ या संशोधनातलं तंत्रज्ञानच नव्हे तर एकूणच त्यासंबंधीचा शास्त्रीय आणि विचारस्वातंत्र्य देणारा दृष्टिकोन भारतात रुजवायचा विचार आहे.

कानमंत्र

* प्रयत्नांत सातत्य ठेवा. नकार पचवायला शिका आणि नि:संकोचपणे अनुभवी लोकांची मदत घ्या.

* ज्ञानभाषा ठरणाऱ्या इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा. मेहनतीला पर्याय नाही.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com