News Flash

जगाच्या पाटीवर : जाणिवांच्या सकारात्मकतेचा प्रवास

सध्याच्या जागतिकीकरणाच्या लाटेत आंतरराष्ट्रीय स्तरावरची माहिती असणं किती महत्त्वाचं आहे याची प्रचीती आली होती.

‘द सिटी युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस’, ब्रेमेन, जर्मनी

केदार उपासनी

नमस्कार. आज या सदराच्या निमित्ताने नाशिक ते ब्रेमेन या करिअर प्रवासातले काही क्षण तुमच्याशी शेअर करतो आहे. नाशिकमधल्या ‘के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालया’त मी प्रॉडक्शन इंजिनीअर झालो. विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडेल तेव्हा त्याला कामाची तांत्रिक आणि प्रशासकीय बाजू उत्तमरीत्या समजेल आणि त्याच्या निर्णयप्रक्रिया सर्व बाजूंनी परिपूर्ण असेल, असा विचार करून हा अभ्यासक्रम आखण्यात आला होता. प्रा. नांदुरकर यांचं मोलाचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं. शिक्षण घेताना प्रत्यक्ष अनुभव घेणं हे शिकलेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा सुवर्णमध्य गाठण्यासाठी नक्कीच मदत करतं. म्हणून मी पदवीच्या तिसऱ्या वर्षांला असताना ‘आनंद आय पॉवर’ आणि ‘अ‍ॅटलास कॉप्को’ या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप केली. त्यामुळे मला बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये गोडी निर्माण झाली. पदवी शिक्षण संपल्यानंतर नोकरी करताना प्रशासकीय ज्ञानाचं महत्त्व आणि तांत्रिक ज्ञानाची सांगड घालण्यासाठी सखोल ज्ञान मिळवण्याची गरज वाटू लागली. म्हणून ‘मास्टर्स इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए) करायचं ठरवलं. ते कुठे करायचं, विषय कोणता, खर्चाचं काय हे प्रश्न दत्त म्हणून उभे ठाकले. इंटर्नशिप आणि नोकरी करताना आंतरराष्ट्रीय ग्राहकांची मानसिकता आणि त्यांची कामाची पद्धत जवळून न्याहाळायची संधी मिळाली. त्यामुळे सध्याच्या जागतिकीकरणाच्या लाटेत आंतरराष्ट्रीय स्तरावरची माहिती असणं किती महत्त्वाचं आहे याची प्रचीती आली होती. म्हणून परदेशी जाऊन एमबीए करायचं ठरवलं.

माझा विषय, शैक्षणिक अभ्यासक्रम, आर्थिक-व्यावहारिक बाबी आणि भविष्यकालीन संधी चाचपडल्यानंतर मी जर्मनीत जाण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने विद्यापीठ आणि अभ्यासक्रमांचा शोध घेतला. चिक्कार शोधमोहिमेनंतर चार विद्यापीठांमध्ये अर्ज केला. जर्मनीतल्या बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये अर्ज प्रक्रिया मोफत असते, मात्र निर्णय प्रक्रिया खूप वेळखाऊ असते आणि आपल्या संयमाची परीक्षा इथपासूनच सुरू होते. प्रवेशासाठीच्या सगळ्या प्रक्रिया मी स्वत:च पूर्ण केल्या. त्यासाठी मला घरून भक्कम पाठिंबा मिळाला. सर्व प्रक्रिया पार पडून ब्रेमेनच्या ‘द युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस’मध्ये ‘युरोपियन / एशियन मॅनेजमेंट एमबीए’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. जर्मन भाषेच्या अभिमान आणि वापराची पूर्वकल्पना असल्याने भारतातच जर्मनची एक लेव्हल ‘व्हर्सटाइल अ‍ॅकॅडमी’त शिकलो. सप्टेंबर २०१८ च्या शेवटच्या आठवडय़ात जर्मनीला जायला निघालो. पहिलाच विमान प्रवास असल्याने थोडी भीती आणि उत्सुकता होतीच. आईबाबांना सोडून जायचं दु:ख होतं, पण कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठूनतरी निघावं लागतं; हा विचार डोक्यात होता. काहीही झालं तरी आईबाबांच्या कष्टांचं चीज करायचं, हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून हा करिअर प्रवास सुरू झाला. फ्रँकफर्ट ते ब्रेमेन ट्रेनने प्रवास केला. ब्रेमेन शहरातल्या घरासाठीची बोलणी ईमेलद्वारे आधीच झाली होती. घरमालक मला न्यायला आले होते.

सुरुवातीचे काही दिवस नक्कीच कठीण होते. अजूनही पहिला दिवस आठवतो आहे. कॉलेजला जायला निघालो होतो. बसस्टॉपवरच्या मुलाने माझी भांबावलेली अवस्था बघून माझी विचारपूस केली. त्याला इंग्रजी येत नव्हतं आणि माझं जर्मन अगदीच तोडकंमोडकं होतं. आम्ही गूगल ट्रान्सलेटच्या मदतीने संभाषण केलं. त्याने मला तिकीट घ्यायला मदत केली. कालांतरानं तो माझा चांगला मित्र झाला आणि आम्ही अजूनही संपर्कात आहोत. कॉलेजमधला सगळा स्टाफ आणि प्राध्यापकांचीही खूपच मदत झाली. ‘इंटरनॅशनल स्टुडण्ट असोसिएशन’ने (आयएसए) सगळ्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक गोष्टींसाठी सर्वतोपरी मदत केली. आम्हाला ब्रेमेन शहराच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. घरगुती वापरासाठीच्या विविध उपयुक्त गोष्टी कुठे, कशा घ्यायच्या तेही सांगितलं गेलं.

आमचं पहिलं लेक्चर क्रॉस कल्चर मॅनेजमेंटचं होतं. आंतरराष्ट्रीय वातावरणात कामकाज करताना सर्वाना सोबत घेऊन काम करण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी तेव्हा शिकायला मिळाल्या. आम्हाला एक विषय चार दिवस शिकवला जातो आणि पाचव्या दिवशी त्या विषयाची परीक्षा असते. ती प्रेझेन्टेशन, प्रोजेक्ट, पेपर, निबंध अशा विविध माध्यमांतून घेतली जाते. ते माध्यम निवडण्याचं स्वातंत्र्य प्राध्यापकांचं असतं. उदाहरणार्थ- एका लेक्चरमध्ये क्रॉस कल्चर मॅनेजमेंट या विषयासाठी एक चित्रपट दाखवण्यात आला आणि त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. इथल्या लेक्चरमध्ये प्राध्यापक सतत बोलत नाहीत. तर प्रत्येक विधानावर विद्यार्थ्यांचं मत ऐकून आणि त्यावर चर्चा करून उत्तरं शोधली जातात. त्यामुळे साहाजिकच विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढतो आणि विद्यार्थी सर्वागानं विचार करू लागतो. आशियायी आणि युरोपीय विद्यार्थ्यांना एकमेकांच्या देशांतील अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विषयांची ओळख करून दिली जाते. साहजिकच मी युरोपातील अर्थव्यवस्था, संस्था, बँका यांचा अभ्यास केला. लक्झेंबर्गमधल्या विविध प्रमुख संस्था पाहण्यासाठी आमची अभ्याससहल नेण्यात आली होती. ‘सप्लाय चेन अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स’ हा माझ्या स्पेशलायझेशनचा विषय आहे. म्हणजे कं पनी एखादं उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपपुरवठादाराकडून विकत घेते. हा व्यवहार चांगल्या प्रकारे कसा होऊ  शकेल, ग्राहकांपर्यंत आपल्या उत्पादनाची माहिती कशी पोहोचवता येईल यासाठीचा दुवा तयार करणं आणि हे कसं केलं जातं, त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टिम्सचा केसस्टडीच्या साहाय्याने मी अभ्यास केला.

डॉ. मिहाएला युकान या आमच्या अभ्यासक्रमाच्या समन्वयक आहेत. त्यांनी कम्युनिकेशन प्रेझेन्टेशनमध्ये डॉक्टरेट केलं असून तोच विषय त्यांनी आम्हाला शिकवला. त्यांनी विपुल प्रमाणात सैद्धांतिक लेखनही केलं आहे. दरम्यानच्या काळात डॉ. युकान यांनी ऊअअऊ आणि माझ्या विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून माझ्या नामांकनासाठी शिफारस केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये मी इंटर्नशिपसाठी अर्ज करायला सुरुवात केली. जर्मनीमध्ये या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. त्यामुळे संयम हा गुण फार महत्त्वाचा ठरतो. ‘अ‍ॅटलास कॉप्को’ या कंपनीमध्ये माझी मुलाखत झाली. पुढे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी डॉ. युकान यांची खूप मदत झाली. पाच महिन्यांच्या या इंटर्नशिपचा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीममध्ये होतो. भारत, चीन आणि अमेरिकेतील लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या तीन ठिकाणी समन्वय साधणं, माहिती पुरवणं आदी काम आमची टीम करत होती. त्यात टीमला साहाय्य करणं आणि कंपनीने दिलेलं सॉफ्टवेअर शिकू न माहिती अपडेट करणं आदी गोष्टी मी करत होतो. प्रोजेक्ट कंट्रोलरसोबत फोरकास्टिंगचं कामही पाहिलं. इथे पदांची उतरंड आणि त्याचा बाऊ  नसल्याने वरिष्ठांना माझ्या कल्पना मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवत कंपनीच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मला सामील करून घेतलं. वरिष्ठांमुळे केवळ व्यावसायिक ज्ञानच नव्हे तर जर्मन संस्कृती, रितीभाती, कुटुंबसंस्था आदींची तोंडओळख होत गेली.

सगळ्या व्यवधानांतून वेळ मिळेल तशा आवडीनिवडी जपत गेलो. वीकएण्डला जवळपासची ऐतिहासिक शहरं मित्रांसोबत बघितली. इथे येऊन स्विमिंग शिकलो. सुरुवातीला कॉलेजतर्फे जर्मन शिकायला प्रोत्साहन दिलं गेलं. त्यानंतरही मी जर्मन शिकण्यावर दिला. आता बी१ लेव्हलपर्यंत जर्मन शिकलो आहे. राहाणीमानाचा खर्च वाचवण्यासाठी काही ठिकाणी पार्टटाइम जॉब केले. इथे कामाच्या वेळी काम करण्याला महत्त्व दिलं जातं. इथल्या लोकांना बॉलीवूडबद्दल प्रचंड आकर्षण आहे. कामाच्या निमित्ताने विविध देशांतले लोक भेटले आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. मी सामाजिक कार्यातही सहभागी झालो होतो. आमच्या टीमने प्राणी आश्रयगृहासाठी निधी गोळा केला. एकदा मी पार्कमध्ये लोकांशी बोलून पैसे गोळा करत होतो. इथल्या अनेकांना प्राण्यांविषयी आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. काही लोक त्या कल्पनेचं स्वागत करत होते आणि काही नाहीदेखील. एका बाईने आमच्या उपक्रमाचं कौतुक करून पुढे या पैशांचा विनियोग कसा करणार हे विचारलं. मी त्याचं उत्तर इंग्रजीत सांगू शकत होतो, पण जर्मनीत सांगणं मला जमत नव्हतं. मी गडबडलो. त्या बाईंनी मला समजून घेतलं. कोणत्याही गोष्टीसाठी आधी पूर्वतयारी करणं किती महत्त्वाचं आहे, हे यामुळे शिकायला मिळालं. इथल्या शालेय शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना निसर्गाशी आणि भोवतालाशी छोटय़ा प्रकल्पांच्या साहाय्याने नकळत जोडण्याचा, त्यांना विचारक्षम करण्याचा दृष्टिकोन भावला. आमच्या कॉमन ईमेलवर आसपासच्या इव्हेंटची माहिती मिळते. त्यानुसार एका स्थानिक वृत्तवाहिनीला मी मुलाखत दिली होती. विषय होता जर्मनीमधील ‘वेस्ट डिस्ट्रीब्युशन सिस्टिम’. जर्मनीमध्ये कचऱ्याचे चार भाग केले जातात. प्लास्टिक, कागद, नाशवंत आणि बायोवेस्ट. त्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा वापर केला जातो. एक परदेशी विद्यार्थी म्हणून या उपक्रमाविषयी काय वाटतं, ते मी सांगितलं. माझ्या विद्यापीठातर्फे माझे गुण, सामाजिक सहभाग आणि प्रोफेशनल करिअर बघून पर्टिक्युलरली ‘इन्व्हॉल्व्ह इंटरनॅशनल स्टुडण्ट’ हा पुरस्कार मला देण्यात आला.

आता शेवटच्या सेमिस्टरमध्ये ‘अ‍ॅटलास कॉप्को’ या कंपनीमध्ये ‘डेव्हलपमेन्ट ऑफ ऑर्डर प्रोसेस मॅनेजमेन्ट विथ द गाइडलाइन्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट इन्स्टिटय़ूट’ (पीएमआय) या विषयावर मास्टर्स थिसिस लिहायला सुरुवात होते आहे. शैक्षणिक कर्ज फे डण्यासाठी आणि थोडा अनुभव गाठीशी बांधण्यासाठी काही वर्षं नोकरी करायचा विचार आहे. त्यानंतर पीएचडी करण्याचा विचार सुरू आहे. इथे आलो तेव्हा पुढच्या भविष्याचं चित्र धूसर होतं. कसं होईल अशी काहीशी धास्ती होती. भाषिक अडथळा पार करायचा होता. पार्टटाइम जॉब आणि इंटर्नशिपच्या अर्जासाठी काही नकार पचवावे लागले, पण प्रवाहात पडलं की पोहावं लागतंच. त्यासाठी मानसिक खंबीरपणा आवश्यक ठरतो. त्या काळात नकळत इतरांशी तुलना केली जायची. तेव्हा स्वत:चा दृष्टिकोन बदलायचाच ठरवलं. पुन्हा कंबर कसली. काहींचं मार्गदर्शन घेतलं. त्याचा परिणाम सकारात्मक झाला. या सगळ्या काळात माझ्या विचारांचा दृष्टिकोन बदलला आणि क्षितिज रुंदावलं. मनापासून संवाद साधला की समोरून प्रतिसाद मिळतो, हे कळलं. पर्यावरण आणि समाजाप्रतीच्या जबाबदारीची पुन्हा नव्याने जाणीव झाली. या साऱ्या प्रवासात पुढल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बळ लाभलं असून तो प्रवासही सुंदर असणार ही खात्री आहेच.

कानमंत्र

* आपल्याला आयुष्याकडून नक्की काय हवं आहे हे शोधण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहा.

* आपली स्पर्धा ही सगळ्यात आधी आपल्याशीच असते. त्यामुळे स्वत:ला शंभर टक्के सिद्ध करण्यासाठी जिवापाड मेहनत घ्या.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 4:04 am

Web Title: jagachya pativar kedar upasani article abn 97
Next Stories
1 डिझायनर मंत्रा : ट्रेण्डसेटर व्हा -सुबर्णा देवेंद्रन
2 अभिजात संगीत चिरंतनच!
3 आजा नचले!
Just Now!
X