नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
एकदा अमिताभ बच्चन कुठल्याशा भाषणात म्हणाले होते, की दोन गोष्टींमुळे भारत जगभर ओळखला जातो – एक म्हणजे ताजमहाल आणि दुसरी म्हणजे लता मंगेशकर! लता.. बस नाम ही काफी है..मेरी आवाज ही पहचान है. प्रस्तावानेत अजून काही लिहायची गरजच नाही.
दीदींची ब्लॅक अँड व्हाइट काळापासून आत्तापर्यंतची सर्वच हिंदी सिनेगीते अथवा मराठी भाव/भक्तिगीते तमाम रसिकांना तोंडपाठच असणार ह्य़ात काहीच शंका नाही. आणि त्यातली खूपशी गाणी वर्षभरातल्या अनेक प्लेलिस्ट्समध्ये येत असतातच. मी आजच्या प्लेलिस्ट मध्ये दीदींच्या फक्त तीन अल्बम्सचा विचार करत आहे.
एक – श्रद्धांजली. कुठलेही गाणे ऐकत असताना एक गायक म्हणून माझ्या मनात हा विचार चालू होतोच होतो, की हे गाणे मी कसे गायले असते? ही जागा अशी घेतली असती, हा शब्द असा उच्चारला असता वगैरे वगैरे. श्रद्धांजली हा अल्बम करण्यामागे अनेक उद्देशांबरोबर दीदींचा हाही एक उद्देश असावा असे मला वाटते. समकालीन आणि आधीच्या गायकांना श्रद्धांजली म्हणून दीदींनी हा अल्बम गायला. रफी साहेबांची ‘दिन ढल जाए हाए’, ‘मन रे तू काहे ना धीर धरे’, ‘कभी खुद पे कभी हालात पे’; किशोरदांची ‘कोई हमदम’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘ये जीवन है’, ‘वो शाम’; ‘हेमंत कुमारची ‘ये नयन डरे डरे’, ‘तुम पुकार लो’; ‘सहगल साहेबांचे ‘मै क्या जानू क्या जादू है’ ही आणि अशी गाणी ऐकताना दीदींच्या मनातला या गायकांविषयीचा आदर तर दिसतोच, पण या गाण्यांचा त्यांनी लावलेला एक वेगळा अर्थही आपल्याला सापडतो. विशेषत: त्यांनी गायलेल्या मुकेशजींच्या गाण्यांमध्ये. कारण मुकेशजींनी प्रत्येक गाणे हे सरळसोट अत्यंत साध्या पद्धतीने गायले आहे, त्यात दीदींनी जाणीवपूर्वक आपल्या आवाजातले अलंकार कोरले आहेत आणि असे करताना गाण्याचा अनर्थ न होता त्यांचा अर्थ अजूनच चांगल्या पद्धतीने बाहेर येईल, याचे भान ठेवले आहे. उदाहरणार्थ ‘आंसू भरी है’, ‘कही दूर जब’, ‘जाऊं कहा बता ए दिल’.
दोन – मोठय़ा, महान कलाकारांचं आणि त्यांच्या कलकृतींचं हे एक वैशिष्टय़ असतं की, त्या कलाकृतींचा प्रत्येक काळात नवनवीन अर्थ समजत जातो आणि वेगवेगळ्या अभ्यासकाला वेगवेगळा अर्थ लागत जातो. गालिबसुद्धा प्रत्येकाला वेगळा वेगळा दिसला. बाळासाहेबांना तो जसा दिसला तो त्यांनी दीदींच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोचवला. या चालींना अर्थातच बाळासाहेबांच्या (हृदयनाथ मंगेशकर) खास ‘दुर्गम’ स्वररचनांचा टच आहे. या अवघड गजला केवळ दीदीच गाऊ जाणोत. ‘कोई उम्मीद बर नहीं आती’ हे असेच अनवट चढम् उतार आणि अवघड जागांनी सजलेले गाणे. पण लतादीदींनी ते केवढय़ा सहजतेने गायले आहे! या अल्बममधले हे माझे सर्वात आवडते गाणे आहे. त्याचबरोबर बाज़्‍ाीचा-ए-अत्फमल है, नक्श फरियादी है किसकी, कभी नेकी भी उसके जी में गर, दहर में नकम््श-ए-वफम या गजलासुद्धा मी सतत ऐकत असतो.
तीन – मीरा. असाच अजून एक कलाकार ज्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन प्रत्येक वेळी नवीन असतो. बाळासाहेबांनी मीरेला आपल्या सुरांमध्ये गुंफताना पुन्हा एकदा दीदींना माध्यम बनवले आणि दीदींनी त्या मीरेला आपल्या सर्वाच्या अगदी जवळ, हृदयात आणून सोडले. प्रेम म्हणजेच भक्ती आणि प्रेम म्हणजेच ईश्वर हे मला या अल्बममुळे उमगले. प्रेमाची परिसीमा गाठणे म्हणजे काय हे मला या अल्बममुळे कळले. ‘चाला वाही देस’, ‘नंदनंदन दीठ पडम्ी या माई’, ‘म्हारा रे गिरिधर गोपाल’, ‘पपीहा रे’, ‘करम की गति न्यारी’, आणि सर्वात जास्त म्हणजे ‘माई माई कैसे जियु री’ (त्यातही दुसऱ्या माईची जागा) या भजनांच्या मी सदैव प्रेमात पडत असतो. बाळासाहेबांनी स्वरबद्ध केलेल्या मीरेला लतादीदींच्या आवाजात ऐकून आपणच काय, खुद्द तो कृष्णसुद्धा प्रेमात पडला असणार ह्य़ात मुळीच शंका नाही. दीदी, या मानवजातीच्या अंतापर्यंत आम्ही तुमच्यावर प्रेम करत राहू. आपणास ८६ व्या वाढदिवसाच्या (२८ सप्टेंबर) मनापासून शुभेच्छा!

हे ऐकाच.. : ये प्यार का नगमा है
जसे दीदींनी गायकांना श्रद्धांजली वाहिली आहे, तसेच अनेक जणांनी दीदींना त्यांची गाणी गाऊन सलाम केला आहे. श्रेयाला (घोषाल) तर प्रतिलता असे म्हटलेही जाते. पण मला यामधली सर्वात आवडलेली दोन सादरीकरणे- एक म्हणजे ॅकटअ अवॉर्ड्समध्ये दीदींना लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर होताना उत्तम सिंग, सलीम सुलेमान, लेस्ली लुइस आणि सुंदर अशा नव्या पद्धतीच्या कोरसबरोबर शंकर महादेव यांनी गायलेले ‘ये प्यार का नगमा है’; जे लता दीदी स्वत: समोर बसून ऐकत आहेत. हे ऐकताना, पाहताना डोळ्यात पाणी तरळते. दुसरे म्हणजे ‘बाहो मे चले आ’ हे गाणे पाकिस्तानच्या उस्ताद इम्तियाज़ अली अणि उस्ताद रियाज़्‍ा अली यांनी गजलच्या अंगाने सादर केले होते. हे अफलातूनच आहे. गजल गायकीच्या बोल ताना, मुरक्या, अलंकार या गाण्यात ऐकताना एक वेगळीच मजा येते. हे दोन्ही व्हिडीयोज यू टय़ूबवर उपलब्ध आहेत. न चुकता पाहा.
जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट