17 January 2021

News Flash

ड्रायव्हिंग स्पेशल

नुसरत साहेबांनी जगभरातील केवळ श्रोत्यांनाच नव्हे तर संगीतकारांनाही प्रभावित केले.

स्वर्गीय नुसरत फतेह अली ख़ान

नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

पुणे-मुंबई-पुणे हा प्रवास माझा आठवडय़ातून किमान दोनदा तरी होत असतो. या प्रवासामुळे ऐकणेसुद्धा भरपूर होत असते. जो गाडी चालवतो, तो त्याच्या आवडीचे संगीत लावतो आणि गाडीतले सगळे ते ऐकतात. मी जेव्हा गाडी चालवतो, तेव्हा मला स्वत:ला ऐकायला सर्वात आवडणारा कलाकार म्हणजे स्वर्गीय नुसरत फतेह अली खाँसाब.
येत्या १३ तारखेला नुसरत साहेबांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने सादर आहे माझी ही पुणे- मुंबई-पुणे ड्रायव्हिंग स्पेशल प्लेलिस्ट.. खाँसाहेबांच्या कव्वाल्या ऐकत ऐकत हे तीन-चार तास कसे जातात कळतच नाही, ड्रायव्हिंगचा शीणच राहात नाही काही; उलट असे वाटते, की जरा अजून मोठा रस्ता असता तर बरे झाले असते. कारण चालत राहणे हाच त्यांच्या गायकीचा गाभा आहे असे मला वाटते. सुरुवातीला कधी हार्मोनियम सोलो (एकल वादन) तर कधी संथ आलाप आणि शेर घेऊन मंद लयीत, तबल्यावर ढोलक-वजा ठेका चालू होतो. हळूहळू नुसरत साब विषयात हात घालत जातात, साथीदारही मग रंगात येत जातात. हार्मोनियमवर स्वरविस्तार, तारसप्तक, अति-तार सप्तकातले आलाप, रागाला धरून, सोडून आसमान छूनेवाली नुसरत साहेबांची आणि त्यांच्या साथीदारांची उत्तरोत्तर खुलत जाणारी गायकी; मूळ कव्वालीतला एक एक शेर आळवणे, त्या शेरांशी संबंधित असलेले बाहेरचे शेर मधूनमधून घालत जाणे, टाळ्यांच्या आणि तबल्याच्या लयीत हळूहळू होत जाणारी वाढ, याचबरोबर नुसरत साहेबांच्या कव्वालीचा सर्वात सुंदर अलंकार म्हणजे त्यांची सरगम. नुसरत साहेबांची सरगम ही अशी नुसती येऊन जाणारी नसते. त्या सरगममध्ये कलाकुसर असते, लक्षात राहतील असे खंड असतात, सरगम न कळणाऱ्यांनासुद्धा ऐकावीशी वाटेल, त्यातल्या चढ-उतारांमध्ये, पलटय़ांमध्ये, पॉजेस, तबल्याबरोबर, हार्मोनियमबरोबर चालणाऱ्या जुगलबंदीमध्ये ऐकणारे गुंतून जातील, असे त्या सरगमचे डिजाइनिंग असते. रागदारीवर आधारित अशा त्या सरगमच्या खेळांची श्रोते वाटच पाहत असतात.
..तर असा हा मामला किमान पंधरा मिनिटे ते कमाल अर्धा-पाऊण तास (क्वचित प्रसंगी तासभरही!) चालूच असतो.. चालूच असतो, पण संपताना असे वाटते की, अरेच्चा! संपलीसुद्धा कव्वाली! एवढे आपले वेळेचे भान हरपलेले असते. कव्वाली संपवताना शेवटचे आवर्तन हे ज्या लयीत कव्वाली चालू झाली होती, त्या लयीत गायले जाते, तेव्हा आपल्याला लक्षात येते, की आपण कुठून कुठे आलोत!
या कव्वालीला विषयाचे बंधन नसते. अल्लाह, राम, शृंगार, दारू, आनंद, दु:ख, मिस्कीलपणा, संशय अशा कुठल्याही विषयावर ही कव्वाली बेतलेली असते. विषय कुठलाही असो, भाव मात्र एकच असतो. नशेचा, धुंदीचा, तल्लीनतेचा. ही नशा नसानसांत भिनल्याशिवाय तासन्तास मैफल रंगवत ठेवण्याचा स्टॅमिना येणे शक्य नाही. फक्त नुसरत साहेबच नव्हे, तर त्यांचे सगळे साथीदारच त्या नशेत झुलत राहतात. त्यामुळे ती एकटय़ा नुसरत साहेबांची नाही, तर अख्या ग्रुपची, टीमची कामगिरी असते. नुसरत साहेबांनी कव्वाली हा प्रकार जगभरात नेऊन पोचवला. त्यात हार्मोनियम आणि गाण्याची साथ करणारे त्यांचे भाऊ फरुख फम्तेह अली खान, फर्रुख साहेबांचा मुलगा म्हणजेच राहत फतेह अली खान, तबलजी दिलदार हुसैन आणि कोरस आणि टाळ्यांचा गजर करणारे बाकी साथीदार यांचाही मोठा हात आहे.
माझ्या काही आवडत्या कव्वाल्या म्हणजे- मस्त कलंदर मस्त (ज्याच्यावरून सरगम सकट ‘तू चीज़्‍ा बडी है मस्त मस्त’ घेतले आहे), आज कोई बात हो गयी, तुम एक गोरख धंदा हो, अखियाँ उडीक दियां, अल्लाहु, सानू एक पल चैन न आवे, पिया रे पिया रे, वो हटा रहे है पर्दा इत्यादी. नुसरत साहेबांचे भारतीय चित्रपट संगीतातले योगदानही उल्लेखनीय असेच आहे. भन्नाट चालीचे वेड लावणारे ‘सांवरे तेरे बिन जिया जाए ना’ आणि ‘और प्यार हो गया’मधली सगळी गाणी माझ्या सदैव श्रवणात असतात.
योगायोगाचा भाग असा, की पुणे-मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील फूड मॉलच्या बाहेर दोन्ही बाजूंना सीडीज विकायच्या स्टॉल्सवर नुसरत साहेबांच्या मैफिलींच्या आणि सिनेगीतांच्या सीडीज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत! सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा..!
हे ऐकाच.. : गुरूज ऑफ पीस
नुसरत साहेबांनी जगभरातील केवळ श्रोत्यांनाच नव्हे तर संगीतकारांनाही प्रभावित केले. त्यातल्या काही जणांनी खाँसाहेबांबरोबर कामही केले. उदाहरणार्थ, Eddie Vedder या संगीतकाराने ‘डेड मॅन वॉकिंग’ या चित्रपटासाठी खाँसाहेबांना घेऊन द लाँग रोड आणि द फेस ऑफ लव्ह ही गाणी तयार केली. त्यातले फेस ऑफ लव्ह तर फारच मस्त आहे. तसेच ‘नॅचरल बोर्न किलर्स’साठी पीटर गाब्रीएल या संगीतकाराने खाँसाहेबांच्या आलापी आणि सरगमचा ‘टॅबू’ या ट्रॅकसाठी फार भन्नाट वापर केला आहे. हे सगळे ट्रॅक्स न चुकता ऐकावे असेच आहेत.
ए.आर. रेहमान यांनी नुसरत साहेबांना आपला सूफी गुरू मानले आहे. ‘गुरु’मधले ‘तेरे बिना’ हे सूफी स्टाइल गाणे त्यांनी खाँसाहेबांना समर्पित केले आहे. तसेच ‘गुरूज ऑफ पीस’ हे गाणे खाँसाब आणि रेहमान यांनी एकत्र येऊन तयार केले आणि गायले आहे. एकत्र येऊन म्हणजे प्रत्यक्षात नाही, तर ऑनलाइन! म्हणजे रेहमान सर चेन्नईमध्ये आणि नुसरत साब तिकडे पलीकडे पाकिस्तानात. असे हे गाणे तयार झाले. सीमा, धर्म, जात, सर्व वैर विसरून जवळ येण्याचा, प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणारे हे भारी गाणे तर अज्जिबातच चुकवू नका.
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2015 1:55 am

Web Title: jasraj joshi weekly playlist 14
Next Stories
1 क्यूकम्बर
2 व्हिवा दिवा : गौरी देशमुख
3 स्वदेशी कलेक्शन
Just Now!
X