नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

नवरात्री. देवीचा उत्सव आणि त्या निमित्ताने स्त्री-शक्तीच्या सन्मानाचा उत्सव आणि म्हणूनच या आठवडय़ात सादर करत आहे काही गान-देवतांच्या, म्हणजे मला आवडणाऱ्या गायिकांच्या गाण्यांची प्लेलिस्ट. भारतातील गायिकांचा उल्लेख वरचेवर अनेक प्लेलिस्टमध्ये होतच असतो. आज काही पाश्चात्त्य संगीतातल्या देवतांचे स्मरण. या सर्वच देवता प्रतिभावान असण्याबरोबरच रूपवान जरी असल्या, तरी प्लेलिस्ट बनवताना त्यांच्या फक्त गान-प्रतिभेचेच दर्शन घेण्याचा (अटोकाट) प्रयत्न करण्यात आला आहे.

सुरुवात एला फिट्सगेराल्ड या क्लासिक जॅझ गायिकेच्या Misty या गाण्याने. साधी सोपी शब्दप्रधान गायकी. जुन्या काळात घेऊन जाणारी. मग व्हिटनी ह्य़ूस्टनचे ‘I will always love you’ हे अजरामर क्लासिक प्रेमगीत. पुढे सिलीयन डीऑन आणि मारिया कॅरी या दोन परफेक्शनिस्ट गायिका. सिलीयन डीऑनचे ‘टायटॅनिक’ चित्रपटातले ‘माय हार्ट विल गो ऑन’ हे जगप्रसिद्ध गाणे. तसेच Oh holy night हे सुंदर गाणे आणि मारिया कॅरी ची Hero आणि My all ं’’ ही दोन गाणी. तांत्रिक दृष्टय़ा शुद्ध स्वच्छ गायकी, लयीबरोबर जाणारी आवाजाची कंपने ((vibrato) आणि भावना पोहोचवण्याची उत्तम क्षमता यामुळे तुलनेने नवीन असल्या तरी या गायिका ‘क्लासिक’ या श्रेणीतच येतात.

आवाजाची कंपने म्हटल्यावर पाहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे शकीरा. मला वाटते स्पॅनिश लोकांच्या आवाजात जात्याच एक वेगळ्या प्रकारचा व्हायब्राटो असतो. त्याचा शकीरा फारच मस्त वापर करते. तसेच ओळीच्या अथवा शब्दाच्या शेवटी आवाज मुद्दाम थोडासा चिरकवण्याची तिची खास स्पॅनिश पद्धतसुद्धा वेगळी अशी आहे. तिच्या te aviso te anuncio आणि Gitana (या गाण्यात तबला वाजलेला ऐकून सुखद धक्का बसतो) या गाण्यांमधून ही शैली ठळकपणे समोर येते. आवाज मुद्दाम चिरकवण्याची अशीच लकब, थोडय़ा वेगळ्या पद्धतीने Dolores O’Riordan या आयरिश गायिकेने क्रॅनबेरीज बॅण्डच्या ‘झॉम्बी’ या गाण्यात वापरली आहे. माणसाच्या सतत युद्धस्थितीत असण्याच्या स्वभावावर टीका करणारे हे रॉक गाणे भन्नाट आहे. त्यात zombie हा शब्द उच्चारताना लावलेला वेगळा आवाज आणि त्या शब्दाची फोड करून शेवटचेच अक्षर पुन्हा पुन्हा गाण्याची पद्धत अद्भुत आहे. अशीच स्टाइल पुढे रिहाना या गायिकेनेसुद्धा आपल्या Umbrella गाण्यात केला आहे. ‘इन माय अम्ब रेला एला एला ए ए ए.. ’ अशी शब्दाची फोड करत रिहानाच्या खास हेल काढून गाण्याच्या पद्धतीमुळे हे गाणे ‘अलग’ झाले आहे. रिहानाचेच Stay हे गाणेसुद्धा मस्त, अलग आहे.

अशीच अजून एक अलग गायिका म्हणजे दियाना क्राल.. जॅझ संगीतच, पण नव्या पद्धतीची मांडणारी, नव्या दमाची गायकी. हिची Look of love आणि Quiet nights ही गाणी भारी आहेत. जॅझ संगीतात थोडेसे ‘कंट्री म्यूझिक’आणि सोल म्यूझिक वापरून आपल्या तलम, गोड आवाजात गाणी सादर करणाऱ्या नोराह् जोन्स या अमेरिकन गायिकेची Moon song आणि Don’t know why ही गाणी माझ्या फारच आवडीची आहेत. जॅझमधल्याच स्कॅटिंग या पद्धतीचा (म्हणजे आपल्याकडच्या नोम तोम किंवा आलापीमध्ये अर्थ नसलेल्या शब्दांचा गाताना वापर करतात तसे) वापर पॉप म्युझिकमध्ये करणारी भन्नाट गायिका म्हणजे अमेरिकेचीच बेयॉन्से नोवेल्स. स्कॅटिंग बरोबरच थोडेसे रॅप, रॉक, पॉप सर्वच काही एकत्र करून गाणारी मॉडर्न गायिका. हिची Deja vu आणि Heart of a broken girl ही गाणी मी सतत ऐकतो. अशीच एक मॉडर्न आणि तयारीची गायिका म्हणजे क्रिस्टिना अ‍ॅग्विलेरा. हिची The Voice within आणि Beutiful ही गाणी ऐकण्याजोगी आहेत.
अमेरिकेच्याच कॅटी पेरीचासुद्धा मी फॅन आहे. तिचे Wide awake हे सॉफ्ट गाणे आणि Rore हे धम्माल गाणे आहे. हिचा आवाज गोड आहे आणि दमदारही! Roar गाण्यात आवाजाच्या या दोन्ही बाजू दिसतात. या गाण्याचा व्हिडीयोसुद्धा धमाल आहे. दमदार आवाजाची, पण साध्या सोप्या गायकीची एक ब्रिटिश गायिका म्हणजे आजच्या काळात खूप प्रसिद्ध अशी अ‍ॅडल. हिची Rolling in the deep आणि जेम्स बाँडच्या चित्रपटासाठी गायलेले Skyfall ही गाणी छान आहेत. खऱ्या अर्थाने आजच्या काळातले गाणे कुठले असेल, तर Bang bang हे गाणे! अमेरिकेच्या अ‍ॅरिआना ग्रॅण्डे, इंग्लंडच्या जेसी जे आणि त्रिनिदादच्या निकी मिनाज या तिघींनी एकत्र येऊन केलेले हे फंक, पॉप, रॅप गाणे आधुनिक गायकी आणि उत्तम संगीत संयोजन याचा नमुना आहे. अ‍ॅरिआना आणि जेसी यांची जलद चढ-उतारांची, भुरळ पाडाणारी अशी गायकी आणि निकी मिनाजचे अति जलद, जगावेगळे रॅपिंग यामुळे हे गाणे आधुनिक काळातल्या सर्वोच्च गाण्यांपैकी एक ठरते. या देवतांच्या दर्शनाने तुम्हासही सुख मिळेल अशी आशा करतो.

हे ऐकाच.. ‘लाईव्ह’चा थरार
बेयोंसे ही गायिका स्टेजवर अजूनच भन्नाट गाते. तिने दे जावू हे गाणे लाइव्ह गाताना आधी भारी असे स्केटिंग केले आहे. यू टय़ूबवर उपलब्ध असलेला हा व्हिडीयो चुकवू नये असाच आहे. तसेच आपल्या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी खास करून प्रसिद्ध अशा अजून काही देवता म्हणजे- अजीजा मुस्तफा जादेह ही अझरबैजान देशातली विदुषी तिच्या पियानोवादन आणि पियानो वाजवत गायनासाठी प्रसिद्ध आहे. ही गायकीसुद्धा वेगळी, काहीशी अरेबियन, काहीशी युरोपियन अशी आहे, जी स्केटिंगच्या जवळही जाते. हिचे Gadma gozal आणि Always हे परफॉर्मन्सेस चुकवू नयेत. Salute salon: सादरीकरणात व्यंग आणि विनोदाचा आगळावेगळा असा चार जणींचा ग्रुप (Chamber music qartet) ज्यात दोन व्हॉयलिन, एक चेलो आणि एक पियानोवादिका आहे. यांची Competetive foresome’ आणि पारंपरिक Levan pokkaही सादरीकरणे यू टय़ूबवर शोधून नक्की पाहावीत. The Corrs: एक व्हॉयलिन, एक बासरी आणि एक ड्रम वाजवणारी अशा तीन मुख्य स्त्रियांबरोबर काही पुरुष असलेला हा बँड त्यांच्या कंट्री स्टाइल म्युझिकसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची ‘जॉय ऑफ लाइफ’ आणि ‘टायटॅनिक’मध्ये वापरले गेलले (ज्याची रिंगटोन तुम्ही कोणा ना कोणाच्या फोनवर नक्की ऐकली असेल) Toss the feathers हे सादरीकरण अज्जिबातच चुकवू नका.
जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com