आपली मातृभाषा आणि तिची जननी असलेली संस्कृत भाषा जगवावी आणि ती खूप लोकांपर्यंत पोहोचावी असं बऱ्याच जणांना वाटत असतं. अशाच काही संस्कृतवेडय़ांच्या  शोधादरम्यान अशा एका अवलियाची ओळख झाली, जो त्याच्या संगीताच्या आवडीचा आणि संस्कृतच्या प्रेमाचा मिलाफ घडवून संस्कृत जपतो आणि जगतो! हा मुलगा संस्कृतमधल्या श्लोकांना चाली देतो आणि त्या देताना चक्क वेस्टर्न म्युझिकही वापरतो.
जयदीप वैद्य.. संस्कृतच्या आवडीपायी पुण्यातल्या फग्र्युसन कॉलेजमध्ये संस्कृत बी.ए.ला अ‍ॅडमिशन घेतली. कॉलेजमध्ये संस्कृत दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात जयदीपने रस घेतला. परंतु आपल्या संस्कृत श्लोकांत-स्तोत्रांत इतकं पोटेन्शिअल असताना कार्यक्रमात मराठी-हिंदीतून संस्कृतमध्ये भाषांतरित केलेली गाणी सादर करायची हे जयदीपला व्यक्तिश: पटत नव्हतं. म्हणूनच अंगभूत संगीत कौशल्याचा वापर करून जयदीपने संस्कृत दिनासाठी काही संस्कृत श्लोक आणि स्तोत्र संगीतबद्ध करायला सुरुवात केली आणि इथूनच सुरू झाला संस्कृत श्लोकांचा संगीतमय प्रवास.!!
‘लहानपणापासूनच घरातील सांगीतिक वातावरण व संस्कृतची ओढ यामुळे स्तोत्र वाचतानाच निरनिराळ्या चाली व लयी मनात रुंजी घालू लागायच्या,’ असं जयदीप सांगतो. भारतीय शास्त्रीय संगीत व संगीतातील राग हा पाया ठेवून जयदीपने वेस्टर्न ऱ्हिदम तसेच निरनिराळ्या पाश्चात्त्य व भारतीय वाद्यांचे टोन संगीतरचनेत मोठय़ा खुबीने वापरले. मित्रमत्रिणी-कॉलेज-पालक, सगळ्यांकडूनच या अभिनव प्रयोगाला दाद मिळाली. त्यानंतर प्रतिष्ठेची समजली जाणारी फिरोदिया करंडक स्पर्धादेखील जयदीपने  संस्कृत रचनेनं गाजवली.
‘मी गालिब’ नाटकासाठी संगीत दिग्दर्शित केलेली गझल-कव्वाली, ‘रहिमा’ नावाच्या बँडसाठी बनवलेले सुफी तसेच संस्कृत श्लोकांचे कम्पोझिशन्स, ‘१९०९’ या मराठी सिनेमात गायलेलं देशभक्तीपर ‘वंदे मातरम्’ गीत, तसंच काही शॉर्ट फिल्म्ससाठी केलेलं संगीत दिग्दर्शन.. इतकं वैविध्य आणि नावीन्य जयदीपच्या कामात आहे. जयदीपच्या संगीतावर संस्कृत भाषेचा प्रचंड प्रभाव आहे.
मटेरिअलिस्टिक जगात महत्त्वाच्या असणाऱ्या पब्लिसिटी-फेम या गोष्टींकडे जयदीप फारसं लक्ष देत नाही, त्याच्या दृष्टीने मनापासून आणि कष्टाने तुमचं काम एकदा पूर्णत्वाला गेलं की ते लोकांना आपलंसं वाटू लागतं. संस्कृत स्तोत्रांच्या फ्यूजनबद्दलही त्याचं हेच मत आहे व त्यामुळेच सध्या संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे त्याचा जास्त कल आहे. संस्कृत भाषा ही सर्वसामान्यांना समजत नाही किंवा मग तत्सम अनेक माइंड ब्लॉक आपल्याकडे आहेत, परंतु जयदीपच्या मते, धर्म-भाषा या गोष्टी आपल्या सोयीसाठी आहेत व त्या खूप व्यक्तिगत असायला हव्यात. भविष्यात संस्कृत आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचा अभिजात मिलाफ घडवून जागतिक दर्जाची ‘भव्य सांगीतिक प्रस्तुती’ करण्याचा जयदीपचा विचार त्यानं बोलून दाखवला.
भारतीय संगीत व संस्कृत भाषा नव्याने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळी वाट निवडलेल्या या अवलियाला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.!!