12 December 2017

News Flash

व्हायरलची साथ : नि:शब्द प्रेम

किशोरवयात ज्या मुलीवर जयप्रकाशचं प्रेम जडलं होतं आज तिच्यासोबत जयप्रकाश सुखाचा संसार करतोय.

प्रशांत ननावरे | Updated: October 6, 2017 10:52 AM

जयप्रकाशची प्रेमकहाणी जाणून घ्यायची असेल तर थेट तेरा र्वष मागे जावं लागेल. २००४ साली जेव्हा जयप्रकाश सतरा वर्षांचा होता त्या कोवळ्या वयात तो एका मुलीच्या प्रेमात पडला. शाळेच्या वर्गाबाहेरून चालत जाणाऱ्या एका मुलीला त्याने पाहिलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. तिचं नाव सुनीता. आजवर त्याच्या मनात अशा भावना कधीच जागृत झाल्या नव्हत्या. पुढे त्या आकर्षणाचं रूपांतर मैत्रीत झालं. पण जेव्हा जयप्रकाश सुनीताला इतर कोणत्याही मुलासोबत पाहत असे तेव्हा त्याला असह्य़ वेदना होत असत. लवकरच त्याने तिच्याशी बोलणं टाकलं. तिला त्याचं कारण कळलं नाही. परीक्षेनंतर जेव्हा तिने त्याची स्लॅम बुक भरली तेव्हा मला तुझ्याशी बोलायचंय असं तिने लिहिलंदेखील.. पण बोलणं कधी झालंच नाही. जयप्रकाशचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं. साधारणपणे शाळेतून महाविद्यालयात आल्यावर ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी.’ या उक्तीनुसार प्रत्येकजण नव्याच्या शोधात असतो. पण जयप्रकाशला सुनीतासारखं कोणी सापडलंच नाही. एव्हाना सुनीताही कोइम्बतूर सोडून बंगळूरुला निघून गेली होती.

त्यानंतर २००७ साली जयप्रकाशला वाढदिवसाच्या दिवशी एक अनोळखी फोन आला. समोरच्या व्यक्तीने तिची ओळख सुनीता अशी करून दिली आणि पुन्हा एकदा जयप्रकाशचा जीव भांडय़ात पडला. फक्त दोनच मिनिटं संभाषण चाललं. त्यानंतर ते अधूनमधून बोलत होते, पण मग पुन्हा आपापल्या कामात व्यस्त झाले. २०११ साली अचानक जयप्रकाश आणि सुनीताच्या सामायिक मित्राचा जयप्रकाशला फोन आला. सुनीता कोइम्बतूर येथे होती आणि तिचा अपघात झाल्याचं त्याने सांगितलं. तिला खरंच भेटायचं का? या संभ्रमात जयप्रकाश होता. लहानमोठा अपघात झाला असेल या विचाराने त्याने दोन दिवसांनी सुनीताला फोन केला. संभाषणादरम्यान त्याला सुनीताचा आवाज अनोळखी वाटला. त्यानंतर जेव्हा तो तिला भेटायला गेला तेव्हा त्याने जे पाहिलं ते अविश्वसनीय होतं. डोक्यावर केस नाहीत, विघटित झालेला चेहरा, तोंड, नाक, दात यांचा पत्ता नाही, चालणंही ९० वर्षांच्या म्हातारीसारखं. जयप्रकाश हे सर्व पाहून तीळ तीळ तुटला. आपल्याला सुनीताच्या परिस्थितीचं इतकं वाईट का वाटतंय, याचा शोध घेताना तिच्यावर आजही आपलं खरं प्रेम असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याच रात्री त्याने सुनीताला मेसेज केला. या जगात फक्त मीच तुझी काळजी घेऊ  शकतो. आपण लग्न करू या. मेसेज वाचून तिने फोन केल्यावरही त्याने तेच सांगितलं. ती हसली, पण नाही म्हणाली नाही. जयप्रकाशच्या निर्णयाने त्याच्या आईला धक्का बसला, पण त्याचे वडील पाठीशी उभे राहिले. कालांतराने आईनेसुद्धा पाठिंबा दिला.

जानेवारी २०१२ नंतर तिच्या प्रत्येक शस्त्रक्रि येच्या वेळी जयप्रकाश हजर होता. शुद्धीवर आल्यानंतर तिला खळखळून हसताना पाहत होता. दोघांनी एकमेकांच्या साथीने आयुष्य जगायला सुरुवात केली. अनेक चढउतार आले, पण दोघांनी मिळून त्यावर मात केली. जयप्रकाशने स्वत:ला बदललं. या सगळ्यातून त्याला खूप आत्मविश्वास मिळाला आणि तो खंबीर बनला.

कामानिमित्त बाहेरगावी गेलेला जयप्रकाश २६ जानेवारी २०१४ साली रात्री एक वाजता जेव्हा बंगळूरुला पोहोचला तेव्हा त्याला प्रवासाचा प्रचंड क्षीण जाणवत होता. पण त्याने सुनीताला घराच्या गच्चीवर पाहिलं तेव्हा तिच्या हातात गुलाबाची तीन फुलं होती. सुनीताने जयप्रकाशला लग्नाची मागणी घातली आणि तो एका क्षणाचाही विचार न करता हो म्हणाला. त्याच दिवशी त्यांचा साखरपुडाही झाला. पण लग्न करायचे ठरल्यानंतर अनेक आव्हानं समोर उभी ठाकली. जयप्रकाशची आर्थिक स्थिती बेताचीच होती. लग्नाच्या दिवशीही सकाळी जयप्रकाश हाफ पॅन्ट घालून लग्नस्थळ स्वच्छ करत होता. एकत्र राहण्याचा निर्णय झालाय मग लग्नाची आवश्यकता काय, असा सवाल अनेकांनी केला. एवढंच नव्हे, तर अनेकांनी सुनीताला मुलं न होऊ  देण्याचाही सल्ला दिला. कारण तीसुद्धा तिचाच चेहरा घेऊ न जन्माला येतील. आजही अनेकजण सुनीताकडे दयेच्या नजरेनं पाहतात आणि जयप्रकाशने तिच्याशी लग्न करून तिच्यावर उपकार केल्याचा विचार करतात. पण जयप्रकाशच्या मते, त्याने त्याला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न केलं आहे आणि तिने त्याचं आयुष्य पुरतं बदलून टाकलंय. आज त्यांना आत्मिया आणि आत्मिक ही दोन मुलं आहेत. किशोरवयात ज्या मुलीवर जयप्रकाशचं प्रेम जडलं होतं आज तिच्यासोबत जयप्रकाश सुखाचा संसार करतोय. चेहरा पाहून, अटी ठेवून किंवा बाह्य सौंदर्यावर प्रेम केलं जात नाही. ते दोन आत्म्यांचं मीलन असतं. जयप्रकाशचं सुनीतावर इथून चंद्रापर्यंत जाऊ न-येऊन जितकं अंतर आहे तितकं अमर्याद किंवा कदाचित त्याहूनही अधिक प्रेम आहे, असं तो म्हणतो. हे सर्व त्याने शब्दात मांडलं असं तरी ते त्याच्या कृतीतून आधीच सिद्ध झालंय.

दिखाऊ पणाची स्पर्धा लागलेल्या काळात, हे असं काहीतरी समोर आल्यावर मन गहिवरून येतं. फेसबुकवर ‘बीइंग यू’ या पेजवर जेव्हा ही कहाणी प्रसिद्ध झाली तेव्हा अनेकजण नि:शब्द झाले. पोस्टचा लाइक, शेअर आणि प्रतिक्रियांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. पण त्या आकडय़ांचा संदर्भ लोकप्रियतेशी नव्हे तर संवेदनशीलतेशी अधिक जोडलेला आहे. पोस्टवरील प्रतिक्रियांमधून ते पाहायला मिळतंय. कारण खरं प्रेम म्हणजे काय याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कुठलीही त्यागाची किंवा उपकाराची भावना मनात न ठेवता केलेलं निस्सीम प्रेम आणि ते आयुष्यभर निभावण्याची शपथ जयप्रकाश आणि सुनीताने घेतली आहे. म्हणूनच जयप्रकाश आणि सुनीताचं प्रेम उत्तरोत्तर बहरत जावो हीच सदिच्छा!

viva@expressindia.com

First Published on September 29, 2017 12:33 am

Web Title: jayprakash sunitha love story bengaluru man love story