15 August 2020

News Flash

टेकजागर : जिओची पेरणी

आजघडीला ३४ कोटींच्या आसपास मोबाइल ग्राहक असलेल्या जिओने भारतीय मोबाइल सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले.

(संग्रहित छायाचित्र)

आसिफ बागवान

तीन वर्षांपूर्वी जिओच्या मोबाइल सेवेच्या रूपात भारतीय दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडली. क्रांती म्हणण्याचं कारण एवढंच की, जिओच्या स्वस्त मोबाइल सेवा शुल्कामुळे देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ग्राहकांना शून्य दरात कॉल दर आणि अतिशय माफक दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करून द्यावा लागला. त्यामुळे देशातील ४जी स्मार्टफोनधारकांची आणि मोबाइल इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. आता रिलायन्सने ‘जिओ फायबर’च्या रूपाने केवळ ब्रॉडबॅण्ड इंटरनेट उद्योगातच पाय टाकलेला नाही तर जनतेला खुणावणारे ऑनलाइन मनोरंजनाचे माध्यम सर्वसामान्यांच्या आणखी जवळ आणून ठेवले आहे. पण इतकं सगळं स्वस्त देणं रिलायन्सला कसं परवडतं?

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी १ सप्टेंबर २०१६ रोजीच्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पहिल्यांदा ‘जिओ’ मोबाइल सेवेची घोषणा केली, तेव्हा अवघ्या भारताचे डोळे विस्फारले गेले होते. मोफत मोबाइल कॉलिंग, वेगवान ४जी इंटरनेट, अनलिमिटेड आणि स्वस्त डेटा प्लॅनची घोषणा करत अंबानी यांनी ‘जिओ’च्या रूपात भारतीय दूरसंचार क्षेत्रात एक नवीन बॉम्ब फेकला होता. हा बॉम्ब फुटताच भारतीय मोबाइल ग्राहकांच्या जिओवर उडय़ा पडल्या. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत जिओ ही देशातील अव्वल क्रमांकाची दूरसंचार कंपनी बनली आहे.

आजघडीला ३४ कोटींच्या आसपास मोबाइल ग्राहक असलेल्या जिओने भारतीय मोबाइल सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले. ‘जिओ’च्या आगमनापूर्वी मोबाइल डेटा ही मौल्यवान गोष्ट मानली जात होती. मोबाइल डेटाचे, विशेषत: ४ जीसारख्या वेगवान मोबाइल डेटाचे दर जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहक अगदी काटेकोरपणे मोबाइल डेटाचा आवश्यक तितकाच वापर करत होता. जिओने हे चित्रच बदलून टाकले आणि म्हणता म्हणता बाजारातल्या सर्व मोबाइल दूरसंचार कंपन्यांचे दर खाली आले. साहजिकच मोबाइल वापरकर्ते, ४जी मोबाइलधारक यांची संख्या प्रचंड वेगाने वरच्या दिशेने झेपावली. त्यापाठोपाठ मोबाइल इंटरनेट वापरातही कमालीची वाढ झाली. पूर्वी महिन्याला दोन जीबी कसेबसे संपवणाऱ्या भारतीयांना दिवसाला दोन जीबी डेटाही पुरेनासा झाला. यातला बहुतांश डेटा ‘यूटय़ुब’सारख्या ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग संकेतस्थळांवरील कन्टेन्टसाठी खर्च होऊ लागला. त्याच काळात भारतात ऑनलाइन कन्टेन्ट पुरवणाऱ्या अ‍ॅपचे प्रस्थ वाढू लागले. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, झी५, हॉटस्टार यांसारख्या अ‍ॅपवरच्या कार्यक्रमांना टीव्हीवरच्या कार्यक्रमांपेक्षाही जास्त प्रसिद्धी आणि चर्चेचं वलय मिळू लागलं. आधीच स्वस्त आणि वेगवान डेटा मिळत असल्याने व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या प्रेमात पडलेल्या भारतीय मोबाइल ग्राहकासाठी हे कार्यक्रम म्हणजे पर्वणीच होती. म्हणता म्हणता हे ऑनलाइन एन्टरटेन्मेंट मोबाइलपुरतं मर्यादित न राहता दिवाणखान्यातल्या टीव्हीचा भाग बनलं. आज ‘सेक्रेड गेम्स’, ‘होस्टेजेस’, ‘काफिर’ अशा वेबसीरिजना टीव्हीवरच्या मालिकांपेक्षाही कैक जास्त लोकप्रियता लाभली आहे. अशा एकूण वातावरणात ‘जिओ’ची ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा जिओ फायबर सुरू होते आहे.

रिलायन्स उद्योग समूहाच्या १२ ऑगस्ट २०१९ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी जिओ फायबरची घोषणा केली. १०० एमबीपीएस ते एक जीबीपीएस इतका झंझावाती वेग असलेली ही इंटरनेट सेवा जिओ येत्या काही महिन्यांत सुरू करत आहे. ही सेवा प्रामुख्याने कोणासाठी याचं उत्तरही अंबानी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतल्या अन्य घोषणांतून मिळतं. ऑनलाइन मालिका किंवा मनोरंजनात रस असलेल्या कुटुंबांसाठी जिओ फायबर हा पर्याय आहे. त्यामुळेच जिओ फायबरचा वार्षिक प्लॅन खरेदी करणाऱ्यांना जिओतर्फे एक ४के क्षमतेचा एलईडी टीव्ही आणि जिओ सेटटॉप बॉक्स मोफत दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर जिओ फायबरच्या ग्राहकांसाठी अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्स किंवा तत्सम ‘ओटीटी’ वाहिन्यांसाठीचे एकत्रित पॅकेज उपलब्ध करण्याची

घोषणाही अंबानी यांनी केली आहे. हे सगळे कमी म्हणून की काय, जिओ फायबरच्या ‘प्रीमियम’ ग्राहकांना २०२०पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे चित्रपट त्याच दिवशी आपल्या घरच्या टीव्हीवर पाहता येणार आहेत. रिलायन्सच्या या वार्षिक सभेतील घोषणा पाहता जिओची पावले डिजिटल क्षेत्राकडे वळली आहेत, हे सांगायला नको. तीन वर्षांपूर्वी जिओची सेवा सुरू झाल्यानंतर देशभरातील डेटा वापर, ऑनलाइन स्ट्रीमिंग प्रेक्षकांची वाढती संख्या, ओटीटी वाहिन्यांचे आगमन आणि आता जिओ फायबरचा आरंभ या सगळय़ांकडे एकत्रितपणे पाहिल्यास हा निव्वळ योगायोग आहे, असे म्हणता येणार नाही. रिलायन्सच्या दूरदृष्टी आणि कल्पकतेचे हे उदाहरण आहेच; पण यासोबतच बाजारात आधी गरज निर्माण करायची आणि मग त्या लाटेवर स्वार होऊन आपल्या उद्योगाची भरभराट करायची, हे रिलायन्सचे तत्त्व ‘जिओ फायबर’च्या घोषणेतूनही दिसून येते.

अर्थात रिलायन्सने हे आजच केले आहे असे नाही. ज्या काळात भारतात मोबाइल हा केवळ उच्चभ्रूंच्या हातचे खेळणे समजला जात होता, त्या काळात रिलायन्स कम्युनिकेशनने दीड हजार रुपयांत मोबाइल आणून सामान्य माणसाला मोबाइलच्या विश्वात नेले. ज्या काळी मोबाइल डेटा हा चैनीची गोष्ट मानला जात होता, त्या काळात जिओने स्वस्त मोबाइल डेटा उपलब्ध करून मोबाइल डेटा ही गरज बनवली. त्यातूनच ऑनलाइन मनोरंजनाचे माध्यम भारतीयांसाठी खुले झाले आणि आता जिओ फायबर त्याच्या लोकप्रियतेवरच डिजिटल क्षेत्रात पाय रोवू पाहात आहे.

हे सगळे होत असताना सर्वसामान्य ग्राहक आनंदातच आहे. जिओ फायबरच्या रूपात त्याला वेगवान इंटरनेट माफक दरात मिळणार आहे. सध्या देशातील

विविध राज्यांत एअरटेल, बीएसएनएल, हॅथवे, टाटा अशा कंपन्यांच्या वेगवान इंटरनेट सेवा सुरू आहेत. मात्र या सर्वात जिओ फायबर सर्वात स्वस्त असणार आहे. ४० एमबीपीएस प्राथमिक वेग असलेल्या एअरटेलचे ब्रॉडबॅण्ड इंटरनेटचे मासिक शुल्क ७९९ रुपयांच्या आसपास आहे. बीएसएनएलचेही त्याच प्रमाणात शुल्क आहेत. टाटाचे इंटरनेट शुल्क ६०० रुपये असले तरी त्याचा प्राथमिक वेग १६ एमबीपीएस इतका कमी आहे. या पार्श्वभूमीवर ७०० रुपयांत १०० एमबीपीएसचा वेग देणारे इंटरनेट भारतीयांना हवेहवेसे वाटेल, यात नवल नाही. पण मग ‘जिओ’ला हे कसे परवडते, हा प्रश्न पडतोच.

खरं तर हे अत्यंत साधे सोपे बिझनेस मॉडेल आहे. ५० रुपयांना मिळणारी एखादी वस्तू १५ रुपयांत मिळू लागली की, तिच्या ग्राहकांची संख्या वाढते. समजा, अमुक एक वस्तू ५० रुपयांना मिळत असताना तिचे १०० ग्राहक असतील तर विक्रेत्याला ५००० रुपये मिळतात. तीच वस्तू १५ रुपयांना मिळू लागल्यावर तिच्या ग्राहकांची संख्या ५०० झाली तर विक्रेत्याला ७५०० रुपये कमावता येतात. इतकं साधं गणित रिलायन्सच्या धुरीणांनी मनात पक्कं बांधून ठेवलं आहे. गेल्या तीन वर्षांत जिओचे ग्राहक शून्यावरून ३४ कोटींपर्यंत गेले आहेत, हे या बिझनेस मॉडेलच्या यशाचेच उदाहरण आहे. एकीकडे ही ग्राहकसंख्या ५० कोटींवर नेण्याचे रिलायन्सने जाहीर केले असतानाच आता जिओ फायबर, जिओ सेट टॉप बॉक्स यांच्या माध्यमातून डिजिटल विश्वातही या कंपनीचा डंका वाजणार हे निश्चित!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 12:51 am

Web Title: jio gigafiber internet data abn 97
Next Stories
1 फिट-नट : सुयोग गोरे
2 जगाच्या पाटीवर : आय कॅनडू इट
3 शेफखाना : आसामी तऱ्हा
Just Now!
X