News Flash

खादी, कॉटन, लिनन झिंदाबाद!!!

मटका कॉटन, काला कॉटन हे फॅब्रिक्स किंवा लेहरिया, बाटिकसारखे प्रिंट्स तुम्हाला ‘ओल्ड फॅशन्ड’ वाटत असतील,

| May 1, 2015 01:15 am

vr21मटका कॉटन, काला कॉटन हे फॅब्रिक्स किंवा लेहरिया, बाटिकसारखे प्रिंट्स तुम्हाला ‘ओल्ड फॅशन्ड’ वाटत असतील, तर फॅशन कोशंट जरा उंचावायला हवा. कारण या फॅब्रिक्सना बोरिंग म्हणणाऱ्यांचा काळ आता सरला असून नव्या पिढीला हीच जुनी फॅब्रिक्स आणि प्रिंट्स आकर्षित करू लागली आहेत.

‘स्वांतत्र्य दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिना’च्या दिवशीच समस्त भारतवासीयांचे खादीप्रेम उफाळून येते, हे आत्तापर्यंत पाहण्यात आले आहे. खादी, कॉटन म्हणजे ‘बोअरिंग’, ‘आंटी टाइप्स’ फॅब्रिक्स असा शिक्काच सो कॉल्ड ‘फॅशनेबल’ जमातीने लावला असल्याने असे कपडे घालणं म्हणजे डाऊन मार्केट समजलं जात असे. कधी तरी चाळिशीतील बायकांना मोठय़ा बॉर्डरच्या कॉटन साडय़ा, कपाळावर मोठ्ठी टिकली आणि एक मोठा बन बांधून एलिट क्लासमध्ये ‘क्लासी’ म्हणवून घ्यायला आवडायचं. पण कॉटन, खादीपासून साडय़ा, सलवार कमीझ, कुर्ती, स्कर्ट आणि पटियाला सलवार बास, यापलीकडे काय व्हरायटी बनणार असा समज असतोच. यंदाच्या समर कलेक्शनमध्ये डिझायनर्सनी हा समज पूर्णपणे पुसून टाकला आहे.
कॉटन, खादीसारखी फॅब्रिक्स फॅशन जगतात अजूनही कालबाह्य़ झालेली नाहीत. फक्त गरज आहे, त्यांना नव्या ढंगात आणि आजच्या पिढीच्या स्टाइलनुसार सादर करण्याची. मुंबईच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सादर झालेलं समर कलेक्शन आणि दिल्लीच्या ‘अ‍ॅमेझॉन इंडियन फॅशन वीक’मधलं विंटर कलेक्शन यामध्ये सादर झालेल्या स्टाइल्स पाहता ‘कॉटन फक्त उन्हाळ्यातच.’, ‘कॉटन कान्ट बी सेक्सी..’, ‘कॉटन म्हणजे साडय़ा..’ असे गैरसमज पुसून टाकले आहेत.
पारंपरिक फॅब्रिक्सवर डिझायनर्सचा आत्मविश्वास
आजची तरुणाई वेस्टर्न आऊटफिट्स पसंत करते. त्यामुळे वन पीस ड्रेस, डेनिम, स्कर्ट्स, टय़ुनिक्स या पेहरावाला पसंती आहे. अगदी कित्येकदा पन्नाशीच्या स्त्रियादेखील कुर्ता आणि ट्राऊझर मिरविताना दिसतात. त्यामुळे साहजिकच शिफॉन, जॉर्जेट, नेट, लायक्रा, जर्सीसारख्या फॅब्रिक्सची मागणी वाढू लागली होती. त्यात शिफॉन, जॉर्जेटसारखे फॅब्रिक्स ब्राईट रंग पटकन पकडतात. कॉटन, खादी डाय केल्यावर डल दिसतात. कॉटन आणि डिजिटल प्रिंटचा छत्तीसचा आकडा असल्याने या आर्टिफिशियल फॅब्रिक्सचा भाव अजूनच वाढला. पण आज कॉटन, खादी, मटका कॉटन, लिनन, काला कॉटन, मलमल यांसारख्या फॅब्रिक्सनी नव्या ढंगात येत आहे. कितीही सुटसुटीत वाटली तरी शिफॉन, लायक्रासारखी फॅब्रिक्स आपल्याकडील उष्ण वातावरणाला साजेसे नाहीत. त्यामुळे आपल्या मातीतल्या कॉटनने त्यांची जागा घेतली आहे.
या फॅब्रिक्समधील गारमेंट स्टाइल्सची मर्यादाही डिझायनर्सनी पुसली. डिझायनर आनंद भूषण सांगतो, ‘‘कित्येक र्वष एक सवय म्हणून आम्ही आर्टििफशिअल फॅब्रिक्स वापरायचो. पण मलमलपासून इव्हनिंग वेअर कलेक्शन तयार केलं तेव्हा लक्षात आलं की, खरं तर हे फॅब्रिक आपल्या अंगासरशी सहज बसतं आणि यासोबत काम करणंही सोप्पं होतं.’’
पारंपरिक फॅब्रिक्ससोबत केलेले प्रयोग
रेड कार्पेट लुकसाठी प्रसिद्ध असलेला डिझायनर शैलेक्स याने पहिल्यांदाच मलमल वापरून रेड कार्पेटवर घालण्याजोगे आऊटफिट्स तयार केलं. मलमलमुळे या लुकला ग्लॅमरसोबतच कम्फर्टही मिळत असल्याचे तो सांगतो. डिझायनर अंजू मोदीनी स्ट्राइप्स आणि मलमलचा वापर करत कॉन्ट्रास्ट ड्रेसिंग या फॅब्रिक्ससोबतही सुंदर दिसू शकतं हे दाखवून दिलं. आर्टिफिशिअल फॅब्रिक्स म्हणजे भन्नाट कट हा समज पुसून टाकत कडक मटका कॉटनचा वापर करून डिझायनर पूनम भगतने स्टायलिश आणि मॉडर्न कट असलेले वन पीस ड्रेस सादर केले. डिझायनर वैशाली एस. ने खण फॅब्रिक्स वापरत, तर डिझायनर श्रुती संचेतीने हातमागावर तयार केलेल्या खादीचा वापर करूनही क्रॉप टाप्स, मॅक्सी असे मॉडर्न आऊटफिट्स तयार करता येऊ शकतात, हे दाखविले. डिझायनर गौरांगने यंदा चंदेरी फॅब्रिक आणि कांजीवरम व्हिव्ह याचा एकत्र संगम साधत साडीत प्रथमच वेगळा प्रयोग केला होता. थोडक्यात साडी, ड्रेसच्या पलीकडे या फॅब्रिक्सनी प्रयोग करता येऊ शकतात हे डिझायनर्सनी सिद्ध केले.
लूझ आउटफिट्सचा बोलबाला
या फॅब्रिक्सनी हे सर्व प्रयोग होत असताना, यांचं मूळ सौंदर्य लूझ आऊटफिटमध्ये आहे, हेही डिझायनर्स विसरले नाही. त्यामुळे यंदा रॅम्पवर लूझ गारमेंट्सनी सत्ता गाजविली. पलॅझो, स्ट्रेट पॅण्ट्स, स्टेट सलवार, फ्लेअर पॅण्ट्स, लूझ शर्ट्स, शर्ट ड्रेस, स्र्कट्स, ओव्हरसाइझ शर्ट्स यांसारखे आऊटफिट्स रॅम्पवर पाहायला मिळाले. डिझायनर तन्वी केडियाने पायजमा आणि फ्लोरल टय़ुनिक्सना एकत्र आणलं, तर सुरभी चौहानने डल शेडच्या लिनन आणि खादीलाही स्टाइलिश स्ट्रीटवेअरचं रूप दिलं. डिझायनर आनंद भूषणने शर्ट ड्रेस आणि चुडीदारला एकत्र आणत या सिझनमध्ये अनारकलीला एक नवा पर्याय दिला. हे कपडे घालायला आरामदायी असले, तरी अजागळ वाटणार नाहीत तसंच कॉलेज, गेटटूगेदर किंवा ऑफिस कुठेही घालता येतील हे भानही डिझायनर्सनी यावेळी राखलं.
योग्य फॅब्रिक- आऊटफिट
अर्थात या पारंपरिक फॅब्रिक्सचा वापर करताना योग्य फॅब्रिक आणि योग्य आऊटफिटची निवड करणं हेही महत्त्वाचं असतं. कॉटन फॅब्रिक्स कितीही प्रयत्न केले तरी डाय करताना गडद रंगच पकडतात, त्यांच्यावर डिजिटल प्रिंट्स होत नाहीत. त्यामुळे कॉटनचा वापर केल्यास सोबत टाय-डाय, लेहरिया, बांधणीसारख्या पारंपरिक प्रिंटिंग टेकनिक्स वापरणं योग्य ठरेल.
फ्रेश रंग मलमल, कॉटन सिल्कवर उत्तम पकडले जातात. कित्येकदा खादीवरही काही ठरावीक फ्रेश कलर पकडले जातात. कॉटन सिल्कवर डिजिटल प्रिंट्सही छान दिसतात. लिनिंनवर चेक्स म्हणजे अनबिटेबल कॉम्बिनेशन. चेक्स प्रिंट्ससोबत खेळायचं असेल तर याच्यासारखे फॅब्रिक नाही. – लिनिनवर एम्ब्रॉयडरीही खुलून दिसते.
आऊटफिट शिवतानाही कॉटनचे वजन हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. कॉटन जितके जड, तितकाच त्याचा फ्लो कमी. त्यामुळे अनारकली, फ्लेअर ड्रेससाठी मलमल, कॉटन सिल्क, लाइट वेट कॉटन उत्तम. शर्ट ड्रेस, स्र्कट, फिटेड ड्रेससाठी कॉटन, मटका कॉटन, काला कॉटन हे फॅब्रिक्स उत्तम. लिनिनला थोडासा कडकपणा असतो, त्यामुळे त्यालाही फ्लेअर ड्रेससाठी वापरू नये.
हाताळण्याची काळजी
’आर्टिफिअल फॅब्रिक्सपेक्षा कॉटन आणि इतर पारंपरिक फॅब्रिक्स हाताळताना अधिकची काळजी घ्यावी लागते हे मात्र खरं.
’या फॅब्रिक्सना पक्क्या रंगांनी डाय केलंय ना याची खात्री करून घ्या.
’कित्येकदा उन्हाळ्यामध्ये घामामुळे काखेत, मानेजवळ कपडय़ांचा रंग उतरलेला दिसतो. अशा वेळी कोणता ड्रेस कोणत्या सिझनमध्ये घालावा हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच धुताना शक्यतो त्यांना वेगवेगळं धुवावं. प्रिंटेड फॅब्रिक्ससोबत ही समस्या येत नाही.
’कित्येकदा लुकसाठी आपण मूळ फॅब्रिक आणि लायनिंगचे फॅब्रिक कॉन्ट्रास निवडतो. तेव्हाही कलर ब्लेंिडगची खबरदारी घेणं गरजेचं आहे. डार्क शेड्ससोबत ही समस्या बऱ्याचदा पाहायला मिळते. तसंच बाटिक, टायडाय प्रिंट्सच्या फॅब्रिक्समध्येही ही जाणवते. त्यामुळे या फॅब्रिक्सचे कपडे शिवण्यापूर्वी त्यांना दोनदा चागंलं धुऊन घेणं उत्तम.
’कॉटन-लिननमध्ये स्टार्चचा उपयोगही केलेला असतो. त्यावेळी त्यांनी शिवण्यापूर्वी धुणे गरजेचे असते.
    
कॉटन- लिनन फरक काय?
लिनन तसा म्हणायला कॉटनचाच एक प्रकार. सध्या बाजारात लिननचा बोलबाला वाढला आहे. पुरुषांच्या शर्टसाठी लिननचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. या दोन्हीमध्ये फार सूक्ष्म फरक आहे. पण त्या फरकामुळे लिननचा भाव कॉटनपेक्षा जास्त आहे.
’कॉटनच्या तुलनेत लिनन जास्त स्टिफ असते. त्यामुळे लिनन लगेच चुरगळले जाते आणि त्यावर चुन्या दिसून येतात. हीच खरी त्याला ओळखण्याची पद्धत आहे. लिनन घेताना कोपऱ्याने थोडं चुरगळून बघा, त्याला लगेच सुरकुत्या पडतात. अर्थात त्यामुळे या फॅब्रिकला कडक इस्त्रीची गरज असते. पण एकदा कडक इस्त्री दिली की, मात्र त्याच्या रुबाबाला तोड नाही.
’कॉटनपेक्षा लिननमध्ये उबदारपणा जास्त असतो. त्यामुळे हिवाळ्यात कॉटनपेक्षा लिननला पसंती जास्त असते.
’कॉटनच्या तुलनेत लिननची मॉइश्चर शोषून घेण्याची क्षमता कमी असते. तसेच मॉइश्चर शोषून घेतल्यावर त्यात बॅक्टेरिया तयार होण्याचा वेगही कॉटनपेक्षा कमी आहे. त्यामुळे टॉवेल्स आणि बाथ अ‍ॅक्सेसरीजमध्ये लिनन वापरले जाते.
मृणाल भगत -viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2015 1:15 am

Web Title: khadi cotton linen fashion comfortable in summer
टॅग : Cotton,Khadi
Next Stories
1 ऑस्करच्या रेड कार्पेटवर भारतीय कारागिरी
2 भावोत्कट
3 ‘अवन’ फ्रेश
Just Now!
X