शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीत लेबनॉननंतरचा आपला स्टॉपओव्हर आहे कोरिया.
आजपासून आपली कोरियाची सफर सुरु होतेय. कोरियाच्या जवळचे देश म्हणजे चीन आणि जपान, यामुळे दोन्ही देशांचा प्रभाव कोरियाच्या खाद्यसंस्कृतीवर दिसतो. पण कोरियाचं वेगळेपण म्हणजे इथे जपान, चायनासारखा चहा जेवणासोबत घेतला जात नाही. दुसऱ्या महायुध्दापासून नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया असे दोन भाग झाले, पण खाण्याच्या बाबतीत मात्र सगळेच दर्दी.
जगभरात प्रसिध्द असलेली कोरीयन डीश म्हणजे ‘किमची’ (Kimche). ही कोरीयाची ‘नॅशनल डिश’ समजली जाते. कोबी, मुळा, लाल मिरची, मीठ, फीश सॉस व इतर भाज्या घालून ही डिश बनवली जाते. हिवाळ्याच्या सुरवातीस घराघरांमध्ये ही डिश बनवली जाते. एक प्रकारच्या लोणच्याचा प्रकार, पण प्रत्येक घरची रेसिपी वेगळी व लज्जतही वेगळी.
पुलगोगी/Pulgogi/(ग्रिल्ड बारबेक्यू बीफ) हा देखील घराघरामध्ये बनणारा एक पॉप्युलर प्रकार आहे. मी शिपवर असतांना आमच्या मेन्यू मध्ये हा कोरियन प्रकार हमखास असायचा.
जेवतांना चॉपस्टीकचा वापर होत असल्यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या किंवा चिकन चे तुकडे लहान आकाराचे असतात. आपल्याकडे कसं.. जेवतांना घरच्यांशी चार गप्पा मारल्याशिवाय जेवणाची मजा येत नाही. तिथे तसं चालत नाही बरं का! तिथे जेवतांना बोलणं हे असभ्यतेचे लक्षण मानलं जातं. तिथे घास गिळून गप्प बसावं लागतं. एक तर कोरियन फूड म्हणजे तिखट आणि झणझणीत, शिवाय जेवतांना बोलायचे नाही. आता बोला !

स्टर फ्राइड व्हेजीटेबल्स विथ राईस नूडल्स (कोरियन स्टाईल जापचुई)
साहित्य : राईस नूडल्स – २०० ग्रॅम, गाजराचे लांबट काप – अर्धी वाटी, मुळयाचे लांबट काप – अर्धी वाटी, कोबी लांबट चिरलेली – १ वाटी, बारीक चिरलेला पालक – अर्धी वाटी, मशरुम स्लाईस केलेले – अर्धी वाटी, कांदयाचे लांबट काप – अर्धी वाटी, लांबट कापलेली लाल मिरची (सुकी) – ४ ते ५, बारीक चिरलेला लसूण – दीड टी स्पून, पातीचा कांदा लांबट कापलेला – अर्धी वाटी, व्हेजीटेबल स्टॉक – अर्धी वाटी, सोया सॉस – १ टी स्पून, तिळाचे तेल – ३ ते ४ थेंब, काळी मिरीपूड – २ चिमूट, सिझिनग पावडर – अर्धा टी  स्पून, तिळ – अर्धा टी स्पून, रिफाईन्ड तेल – ३ टी स्पून, मीठ स्वादानुसार.
कृती : राईस नूडल्स पाच मिनीटे उकळून घ्या व पाणी काढुन टाका. (हक्का नूडल्स पण चालतील. त्यांना शिजेपर्यंत उकळून घ्या व पाणी काढून टाका). एका पॅन मध्ये रिफाईन्ड तेल गरम करा. त्यात लसूण, कांदा, लाल मिरची टाकुन २ मिनीटे परतून घ्या. नंतर त्यात गाजर, मुळा, मशरुम, कोबी, काळी मिरी पूड टाकुन शिजवून घ्या. २-३ मिनीटांनंतर उकडलेले नूडल्स, सोया सॉस, सिझिनग पावडर, मीठ, व्हेज स्टॉक टाकुन पाणी आटेपर्यंत शिजवा. आता गॅस बंद करुन त्यात तिळाचे तेल आणि तिळ टाकून, टॉस/मिक्स करुन घ्या.  आता त्याला प्लेट मध्ये अरेंज करुन पातीच्या कांद्याने सजवा व गरमा गरम सव्‍‌र्ह करा.
टीप : जर राईस नूडल्स नसतील तर नेहमी वापरात असलेले हाक्का नूडल्स वापरुन ही रेसीपी करुन बघा. नूडल्स टेस्टी होतात.

किमची सॅलेड
साहित्य : पत्ता कोबी – १ मध्यम, पातीचा कांदा-लांबट कापलेला – २, ठेचलेला लसूण – ३ पाकळया, किसलेलं आलं – १ चमचा, मुळा लांबट कापलेला – १ छोटा, लाल तिखट – १ चमचा, साखर – २ टी स्पून, िलबाचा रस, पाणी, मीठ.    कृती : कोबीला मोठया चौकोनी आकारात कापून घ्या. आता मीठाच्या पाण्यात हे तुकडे टाकुन १ तास ठेवा. मीठाच्या पाण्यातून कोबी काढून घ्या. आता कोबीमध्ये मुळा, साखर, लसूण, आलं,
लाल तिखट, लिंबाचा रस टाका व नीट मीक्स करुन घ्या. दोन ते तीन तासानंतर ते व्यवस्थीत मुरेल. मग ते सर्व करा. जेंव्हा ओरीएंटल मेन्यू असेल तेंव्हा साईड डीश म्हणून हे सॅलेड सव्‍‌र्ह करु शकता.
टीप : कोरीया मध्ये ट्रॅडिशनली या सॅलेडमध्ये  रँ१्रेस्र् पेस्ट, फीश सॉस, आणि कोरीयन चिली पावडर वापरतात. हे सॅलेड साधारणपणे एक आठवडा फरमेंट केल्यावर खाल्ल जातं. ‘किमची’ साठी ‘नाप कॅबेज’ (कोबीची ही एक विशिष्ट जात आहे) वापरला जातो.

आजची सजावट : लिंबाचे फुल (लेमन फ्लॉवर)

हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कार्व्हिंग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
साहित्य : मध्यम साईझचे लिंबू, लाल मिरची आणि टुथपीक.
१. प्रथम लिंबाच्या देठा कडून एक मोठा गोल पातळ स्लाईस कापून घ्यावा. तसेच दुसऱ्या बाजुने लहान गोल स्लाईस कापावा.
२. लिंबाच्या मोठया स्लाईसच्या किनाऱ्यावर पाकळीच्या आकाराचा कट दयावा.
३. लाल मिरचीचा छोटा गोल आकार कापून घ्यावा.
४. कट दिलेल्या मोठया स्लाईस वर लिंबाचे लहान स्लाईस, त्यावर लाल मिरचीची छोटी गोल चकती ठेवावी आणि टुथपीकने खोचुन लिंबाचे फुल तयार करावे.