vv05नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

मागच्या आठवडय़ात म्हणाल्याप्रामाणे आज सादर आहे कुमारजी आणि किशोरीताईंच्या उपशास्त्रीय गाण्यांची प्ले लिस्ट.
सुरुवात किशोरीताईंपासून करू या. ताईंनी तशी गाणी कमीच गायली आहेत, पण जी गायली आहेत ती अजरामर करून ठेवलेली आहेत. मीरा-किशोरीताईंचा आवाज हाच मीरेचा आवाज आहे. ओरिजिनल मीरा असंच गात असणार यात शंकाच नाही. ‘म्हारो प्रणाम’, ‘हे मेरो मनमोहना’, ‘जोगी महानों दरस’ ही मीरा भजने ताईंच्या आवाजात ऐकताना हाच एक भाव आपल्या मनात असतो.
जे मीरेच्या बाबतीत तेच ‘बोलावा विठ्ठल’ आणि ‘अवघा रंग एक झाला’ या मराठी भजनांच्या बाबतीत म्हणता येईल. शांत, संथ, प्रासादिक आणि तितकेच उत्कट, आर्त! त्या भजनी ठेक्यावर आपणही आपोआप डोलू लागतो, विठ्ठलमय होऊन जातो. आपला रंगसुद्धा श्रीरंग होऊन जातो,
ताईंनी बाळासाहेबांकडे (पं. हृदयनाथ मंगेशकर) गायलेली दोन गाणी तर फारच सुंदर. ‘हे श्याम सुंदर..’ आणि त्यातली ती ‘विनवुनि.. ’ची जागा.. कमाल! तशीच ‘जाइन विचारित रानफुला..’ मधली ‘सजण मला..’ ची जागा. या दोन जागा फक्त ताईच घेऊ जाणे!
कुमारजी. ‘निर्भय निर्गुण गुन रे गाऊंगा..’ असे म्हणत कुमारजी आपल्यासमोर जणू निर्गुण या शब्दाचा अर्थच उलगडून दाखवतात. सतत चालणारा निर्गुणी ठेका साथीला घेऊन कुमारजी आणि त्यांच्या पत्नी वसुंधरा कोमकली निर्गुणी भजनांच्या द्वारे आपल्याला कबीराच्या भक्तीचे, तल्लीनतेतील त्या निराकार अवस्थेचे दर्शन घडवतात. ‘उडम् जाएगा हंस अकेला’, ‘अवधूता.’, ‘सुनता है गुरु ग्यानी’, ‘घट घट में पंछी डोलता’, ‘झीनी रे’, ‘हीरना समझ बूझ’, ‘गुरुजी..जहां बैठु वहा छाया जी’, ‘राम निरंजन न्यारा रे’ ही आणि अशी अनेक निर्गुणी भजने कायम माझ्या फोनवर हजर असतात.
‘मला उमजलेले बालगंधर्व’च्या माध्यमातून बालगंधर्वाच्या गायकीची वेगळीच बाजू कुमारजींनी दाखवून दिली आहे. ‘नाथ हां माझा’, ‘मम आत्मा गमला’, ‘जोहार मायबाप जोहार’, आणि ‘प्रभु अजी गमला’ ही भैरवी ही कुमारजींनी गायलेली नाटय़गीते मी नेहमी ऐकत असतो.
कुमारजींचे अजून एक गाणे मी नेहमी ऐकतो आणि जे तुलनेने कमी लोक ऐकतात ते म्हणजे ‘लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा’ हा तुकारमाचा अभंग. या गाण्याचा भाव आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुमारजींनी आपला आवाजच बदललाय. तो अगदी लहान मुलासारखा करून टाकलाय. लहानपण धारण करून जणू त्यांनी हे गाणे गायलेले आहे. ऐकले नसेल तर ऐकाच.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

हे ऐकाच…
हंस अकेला
मागच्या आठवडय़ात ‘भिन्न षड्ज’चा उल्लेख केला होता. या वेळी कुमारजींवरील माहितीपटाविषयी बोलू. ‘हंस अकेला’ ही डॉ. जब्बार पटेल यांनी केलेली कुमारजींवरील डॉक्युमेंट्री आवर्जून पाहावी. यात कुमारजींच्या जीवनपटापेक्षा त्यांच्या विचारप्रक्रियेवर, गायकी, रागदारी आणि एकूणच संगीताविषयीचे त्यांचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे. कुमारजींचा नातू भुवनेश कुमारजींच्या भूतकाळात डोकावतोय अशी संकल्पना आहे आणि मग त्याला लागत गेलेला कुमारजींचा शोध अशा रीतीने ही फिल्म पुढे सरकत राहते. हा माहितीपट पाहिल्यावर तुम्ही कुमारजींच्या गायकीच्या अजून जवळ पोहोचू शकाल, त्या गायकीचा नव्याने आणि अजून जास्त प्रमाणात आनंद घेऊ शकाल.
जसराज जोशी