28 January 2020

News Flash

गर्ल्स स्कोअरिंग

स्पोर्ट्स हा बहुतेकांच्या आवडीचा विषय. त्यातून क्रिकेट हा तर आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा! क्रिकेटच्या क्षेत्रात करिअर म्हणजे केवळ आपल्या लाडक्या ‘देवा’सारखं बॅट तळपावता येणं हेच आपल्याला...

| May 29, 2015 01:13 am

स्पोर्ट्स हा बहुतेकांच्या आवडीचा विषय. त्यातून क्रिकेट हा तर आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा! क्रिकेटच्या क्षेत्रात करिअर म्हणजे केवळ आपल्या लाडक्या ‘देवा’सारखं बॅट तळपावता येणं हेच आपल्याला माहिती. पण क्रिकेटच्या मैदानावरचं महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या या मैत्रिणींनी थोडी वेगळी वाट निवडली आहे. स्कोअरर होण्याची. प्रत्येक मॅचचा स्कोअर आपल्यापर्यंत अधिकृतरीत्या येतो या स्कोअर्समुळेच. इतके दिवस स्कोअरर किंवा गुणलेखक होण्यातही पुरुषांचीच मक्तेदारी होती. नुकत्याच संपलेल्या ‘आयपीएल’मध्ये प्रथमच काही मुलींना स्कोअरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आजही देशभरात ‘बीसीसीआय’ने मान्यता दिलेल्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ाच स्कोअरर गर्ल्स आहेत. त्यापैकी पाच जणींशी ‘व्हिवा’नं केलेली बातचीत

स्कोअररचं काम म्हणजे खरं तर क्रिकेटच्या मैदानावरचं महत्त्वपूर्ण पण तसं दुर्लक्षित काम. त्यातही अनेक वर्ष हे काम पुरुषांकडेच असायचं. यंदाच्या आयपीएलमध्ये मात्र स्कोअरर म्हणून काही स्त्रिया दिसल्या. वर्षां नागरे, वृंदा राठी, पूर्णिमा आपटे, हेमांगी यरझल आणि सुषमा सावंत यांनी आयपीएलसाठी स्कोअरर म्हणून काम केलं. संपूर्ण भारतात सध्या केवळ १० महिला स्कोअरर आहेत. त्यापैकी या पाचजणींशी बोलायची संधी मिळाली.
वृंदा, वर्षां, पूर्णिमा, हेमांगी आणि सुषमा या सगळ्या मुंबईच्याच. या वेगळ्याच फिल्डकडे कसं यावंसं वाटलं? ‘सुरुवातीला किंग्ज सर्कलच्या इंडियन जिमखान्यामध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो, तिकडे आम्ही खूप बेसिक पातळीवर स्कोअिरग करायला शिकलो. तेव्हा या क्षेत्रातलं काहीच माहीत नव्हतं, आम्ही साधी वही-पेन वापरून स्कोअिरग करायचो. तेव्हा आमच्या कोच सुरेखा भंडारी यांनी आम्हाला स्कोअिरग सीरियसली घेण्याबद्दल सल्ला दिला. आम्हाला याविषयी फारशी माहिती नसल्याने आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ऑफीसकडे पावलं वळवली. तिथे स्कोअरिंगबद्दल बरीच माहिती झाली आणि मग आम्ही याचा प्रोफेशन म्हणून विचार करू लागलो.’ वर्षां, वृंदा, हेमांगी, पूर्णिमा सांगतात. सुषमा यांना त्यांच्या पतीकडून स्कोअरिंगचे धडे मिळाले. त्यानंतर त्यांनीही स्कोअिरग प्रोफेशन म्हणून स्वीकारलं.
अम्पायिरगप्रमाणे स्कोअिरगसाठीसुद्धा परीक्षा द्याव्या लागतात. स्कोअिरगसाठी एमसीएची (मुंबई क्रिकेट असोसिएशन) बेसिक परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं आणि त्यानंतर बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) प्रोफेशनल स्कोअरिंगची परीक्षा अनिवार्य असते. २०१० मध्ये प्रथमच बीसीसीआयच्या परीक्षेत या मुंबईच्या स्कोअरिंग गर्ल्स पास झाल्या. वर्षां नागरेला पहिल्यांदा आयपीएलचं स्कोअरिंग करण्याची संधी मिळाली. नंतर बाकीच्यांनाही ही संधी मिळाली. ‘मागच्या वर्षी आयपीएलमध्ये आम्ही निरीक्षण करणे, सराव करणे यासाठी फिल्डवर यायचो. यंदा प्रथमच आयपीएलचं स्कोअरिंग केलं’, स्कोअरिंग गर्ल्स सांगतात.
स्कोअिरग हे पेशन्स जोखणारं काम आहे. कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे. प्रेशरखाली अखंड ६-७ तास काम करावं लागतं. फिल्डवर येणारा पहिला माणूस आणि बाहेर पडणारा सगळ्यात शेवटचा माणूस हा स्कोअरर असतो. खरं तर काम मोठं आहे, पण बाहेरच्या माणसांना याबद्दल एवढी माहिती नसते. पण तरीही आम्ही हे सगळं एन्जॉय करतो, असं त्या सांगतात. ‘आम्ही अगदी गल्ली क्रिकेटपासून स्कोअिरगची सुरुवात केली. आझाद मदानामध्ये होणाऱ्या लहानसहान मॅचेसपासून ते वानखेडेवर होणाऱ्या मोठय़ा मॅचेसमध्ये स्कोअरिंग केलंय. मुंबईमधील बऱ्याचशा जिमखान्यात आम्ही स्कोअिरग केलं आहे. लोकल मॅच आणि वानखेडेवर होणारी मॅच यात खूप फरक असतो. स्कोअरर या नात्यानं मोठय़ा मॅचेसमध्ये आम्हाला मीडियाबरोबर कनेक्टेड राहावं लागतं. अनेक लोकांना हँडल करावं लागतं. एकूणच सगळं खूप एन्जॉय करतो आम्ही..’ वर्षां तर सांगते, ‘मोठय़ा मॅचेसपेक्षा लोकल मॅचेस मी जास्त एन्जॉय करते. कितीही ऊन असो धूळ माती असो त्याची मजा एसीच्या बंद खोलीत मला येत नाही.’
या वेगळ्या कामासाठी घरच्यांचा, कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाला, असं सगळ्याच सांगतात. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आणि क्रिकेटवरच्या प्रेमामुळे या अपरिचित फील्डमध्ये स्थिरावलोय, असं त्यांचं म्हणणं. सुषमा सांगतात, ‘क्रिकेट बघायला खूप आवडायचं. त्यानंतर या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर जास्तच आवडू लागलं.’ क्रिकेट या खेळाविषयी पॅशन, प्रेम या दोन गोष्टींमुळेच या सगळ्या या प्रोफेशनमध्ये आहेत. हेमांगी म्हणते, ‘अभ्यासाची फारशी आवड नसल्यानं क्रिकेटलाच आपलं करिअर बनवायचं हे निश्चित केलं होतं. खरंतर क्रिकेट माझ्यासाठी काय आहे हे शब्दात सांगू शकत नाही. क्रिकेट माझा सपोर्ट आहे. माझं दुसरं कुटुंब क्रिकेट आहे.’ पूर्णिमा तिला दुजोरा देते. ‘क्रिकेट खरंच आमचं जीवन आहे. उद्या जर क्रिकेट सोड असं कोणी सांगितलं तर ते नाहीच शक्य होऊ शकत.’
प्राची परांजपे

First Published on May 29, 2015 1:13 am

Web Title: ladies scorer
टॅग Ipl,Ipl 8
Next Stories
1 शेअर द लोड
2 युवर जॉब : माय प्रायॉरिटी
3 लिहिते व्हा…
Just Now!
X