vd199
फॅशनमधून समाजाचं प्रतिबिंब दिसतं, असं म्हणतात. मुंबईत गेल्या आठवडय़ात झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये विविधरंगी फॅशनेबल डिझाइन्स सादर झालीच, पण हे समाजमनाचं भान राखत अनेक डिझायनर्सनी स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आपल्या डिझाइन्सच्या माध्यमातून आवाज उठवला. फॅशन वीकमध्ये डिझायनर्स काय कलेक्शन सादर करणार आहेत, याची उत्सुकता असते, तितकीच उत्सुकता हे कलेक्शन कोणत्या थीमवर अवलंबून आहे, हे जाणून घेण्यातही असते. यंदाच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर्सनी त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींपासून प्रेरणा घेत आपली कलेक्शन्स सादर केली. त्यामध्ये स्त्री-पुरुष समानता, स्त्री-सबलीकरण आणि स्वच्छंद, मुक्त, निर्भय तरुणीची प्रतिमा फॅशनच्या माध्यमातून सादर केली गेली.
अनेक डिझायनर्सनी समाजातील महिलांचे स्थान या मुद्दय़ांवर आपल्या कपडय़ांच्या माध्यमातून परखड भाष्य केलं. आघाडीचा डिझायनर मनीष मल्होत्रा यानं ‘ब्लू रन वे’ थीम सादर केली. यामधून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश त्याने दिला. डिझायनर्स तेरेसा लायसोम आणि उत्सव प्रधान यांच्या ‘मंकी.सी.मंकी.डू’ लेबलमधूनही स्त्री-सबलीकरणाचा संदेश देण्यात आला. डिझायनर वसुंधराने महाभारतातल्या ‘द्रौपदी’पासून प्रेरणा घेत बोल्ड, कणखर स्त्रीसाठीचे दागिने सादर केले. डिझायनर अम्रिता खन्ना आणि गुर्सी सिंग यांचे ‘लव्हबर्ड्स’ हे लेबल, डिझायनर पायल सिंगली, डिझायनर ध्रुव आणि डिझायनर शिखा-विनिता यांनी आपल्या कलेक्शन्समधून स्त्री-पुरुष समानतेवर भर दिला होता.
ब्रायडल वेअरमध्येही नेहमीच्या त्याच त्या कलरपॅलेटपेक्षा वेगळा विचार या वेळी दिसला. लाजरी-बुजरी, आकर्षक आणि दागिन्यांनी मढलेली नववधू दाखवण्याऐवजी डिझायनर्सचं लक्ष आधुनिक नववधूने वेधलं होतं. ही नववधू नव्या विचारांची आहे, तिला तिचा पसंतीच्या रंग, कापड आणि स्टाइलचे कपडे लग्नाच्या दिवशी हवे असतात. भरगच्च दागिने आणि जड लहेंगा यात अडकून पडण्याऐवजी कम्फर्टेबल, हलके पण स्त्रीचं सौंदर्य अधोरेखित करणाऱ्या पॅटर्न्सची ब्रायडल वेअरमध्ये चलती होती. ‘बी सेक्सी’ हा मंत्र लग्नातही वापरण्यास तिची हरकत नसते, अशा नववधूची झलक यंदाच्या ब्रायडल कलेक्शन्समध्ये दिसून आली.

प्रवास, शिल्पकला, नकाशे आणि  स्कल्प्टेड लुक
स्त्री-सबलीकरणाखेरीज यंदा लक्षवेधी ठरलेली थीम म्हणजे प्रवास. वर्षभराची विश्रांती घेऊन जग फिरलेल्या डिझायनर रिमी नायकने आपल्या कलेक्शनमध्ये ‘काटरेग्राफिक प्रिंट्स’ म्हणजे नकाशाच्या प्रिंट्स आणि बंगाली बाराखडीतल्या अक्षरांचा समावेश केला होता. तर डिझायनर शिल्पा रेड्डीच्या कलेक्शनमध्ये न्यूयॉर्क शहराची छाप दिसून आली. डिझायनर नेहा अग्रवालला रशियाच्या प्रवासादरम्यान उमगलेली तिथली संस्कृती कपडय़ांमधून दाखवली डिझायनर सुभिका दावडाला इंग्लंडमधील रोमँटिसिझम आणि तेथील पेस्टल शेड्सनी आकर्षित केलं होतं. पापा डोण्ड प्रीच या ब्रॅण्डसाठी इंग्लिश संस्कृती प्रेरणा होती. इंग्लिश बॅकयार्डच्या थीमवर यातल्या अ‍ॅक्सेसरीज डिझाइन केल्या होत्या. आता डिझायनर बनलेल्या मंदिरा बेदीला बनारस शहराने भुरळ घातली. बनारसी साडय़ांना तिनं नव्या रूपात सादर केलं. डिझायनर तरुण तेहलानीला सिंग सिस्टर्स या जुळ्या बहिणींनी चितारलेल्या भारतातील विविध ठिकाणच्या चित्रांवरून प्रेरणा मिळाली होती. तर डिझायनर आरती विजय गुप्ताची थीम इमारतींवर आढळणाऱ्या ‘मोझ्ॉक आर्ट’वर आधारित होती.
यंदाच्या फॅशन वीकसाठी लॅक्मेची मूळ थीम ‘स्कल्प्टेड लुक’ ही होती. आदिमकाळापासून आतापर्यंत शिल्पकलेमध्ये आलेले विविध बदल आणि मूर्तीमध्ये दिसून येणारे शार्प कट्स हे या लुकचं वैशिष्टय़ होतं. ही थीम मुख्यत: मेक-अपमध्ये वापरण्यात आली. या लुकसाठी सर्वाधिक फोकस लिपकलरवर दिला गेला. मॅट कलर लिपस्टिक अनेकांनी वापरली. तसंच नाक, हनुवटी सारख्या चेहऱ्याच्या विशिष्ट भागांना उठाव देण्यावर भर होता. डिझायनर अनामिका खन्नाने ग्रॅण्ड फिनालेला या मेकअप ट्रेण्डच्या थीमवर आधारित इंडो-वेस्टर्न कपडय़ांचे कलेक्शन सादर केलं.