ग्लॅमर कोशंटच्या पलीकडे जाऊन सध्याच्या फॅशनकडे पाहिलं, तर त्यामध्ये थोडी बंडखोरीची झलक दिसेल. जुन्या परंपरा मोडीत काढण्यासाठी केलेली बंडखोरी फॅशनमधून कायम दिसत आली आहे. तरीही बंडखोरीचं आताचं स्वरूप वेगळं आहे.. जुन्याकडे जाणारं, नैसर्गाने दिलेल्या प्रेरणेला मानणारं, सर्वसमावेशक, आधुनिकतेला शरण जाण्याचं नाकारणारं!

डाऊट इज आऊट
sunnyआजच्या फॅशनमध्ये तुमचं वय, वजन, उंची, करिअर, पाश्र्वभूमी काहीच आड येत नाही, हे निसंदिग्धपणे सांगणारा एक फॅशन शो लॅक्मे फॅशन वीकच्या या सीझनमध्ये गाजला. या शोचं नावच होतं – डाऊट इज आऊट. या शोच्या माध्यमातून रिलायन्स रिटेल्ससारखा मोठा उद्योग ई-कॉमर्समध्ये उतरत असल्याचं जाहीर झालं. त्यांच्या (ajio.com) ‘अजिओ ओन’ या कलेक्शनसाठीच्या पाच ‘शो स्टॉपर’ डाऊट इज आऊट ही थीम स्पष्ट करण्यासाठीच अवतरल्या होत्या. ‘रोल नो बार’ असं म्हणत मिग विमान चालवणारी पहिली भारतीय महिला फायटर प्लेन पायलट सुमन शर्मा रॅम्पवर आली. ‘साइझ नो बार’ असं सांगण्यासाठी कॉमेडी क्वीन म्हणून टीव्ही शो गाजवणारी भारती सिंग आली, ‘एज नो बार’ सांगण्यासाठी जुन्या जमान्यातले चित्रपट आपल्या नृत्याने गाजवणारी हेलन अवतरली, ‘जेंडर नो बार’ असं सांगत तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणारी ट्रान्सजेंडर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आली आणि ‘चॉइस नो बार’ असं सांगण्यासाठी पॉर्नफिल्म्सची पाश्र्वभूमी असणारी अभिनेत्री सनी लिऑनी रॅम्पवर आली. आमची डिझाइन्स कुठलीही साचेबद्धता पाळत नाही, कुणीही हे फॅशनेबल कपडे वापरू शकतो हे सांगण्यासाठी ‘अजिओ’ने पहिलं कलेक्शन ‘डाऊट इज आऊट’ नावानं सादर करण्यात आल्याचं रिलायन्स अजिओतर्फे सांगण्यात आलं. हा शॉपेबल इव्हेंट होता. म्हणजे या फॅशन शोमधले कपडे लगेच वेबसाइटवरून सामान्यांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले, हे विशेष.

एका पायात एका रंगाची चप्पल दुसऱ्या पायात दुसऱ्या रंगाची, एका कानात छोटय़ा कुडय़ा (याला ‘स्टड्स’ म्हणायचं बरं का!) तर दुसऱ्या कानात लोंबते कानातले (अर्थात डँगलर्स!), लाँग स्कर्ट घातलेला आणि त्याबरोबर पायात कॅनव्हास शूज किंवा अघळपघळ ड्रेसची वेडीवाकडी झालेली हेम, गुडघ्यावर- मांडीवर फाटलेली जीन्स, केसांचा थोडासा विस्कटलेला, सैलसर अंबाडा किंवा विस्कटलेली वेणी.. या वर्णनाच्या मुलीला काय म्हणाल? अजागळ, फॅशन सेन्स नसलेली .. एक मिनिट. तुम्ही चुकताय! ती मुलगी अगदी ‘अप टू डेट’ राहणारी आहे, फॅशन ट्रेण्ड्स जाणणारी आहे, ते ‘फॉलो’ करणारी आहे. हीच आजची फॅशन आहे – अनकन्व्हेन्शनल, वेगळी (याला ‘हटके’ म्हणतात हल्ली), काहीतरी सांगू इच्छिणारी, काहीशी बंडखोरीकडे झुकणारी. प्रस्थापित ‘फॅशन’च्या विरुद्ध.31
कुठल्याही प्रस्थापित संकल्पनेच्या, प्रथेच्या विरुद्ध काही करणारे ते बंडखोर. काहीतरी वेगळं करायची ही वृत्ती तारुण्यात शिरण्याच्या वयाबरोबरच येते, असं म्हणतात. बंडखोरी उमटते त्यांच्या विचारांतून आणि आचारांतून. आता तीच बंडखोरी फॅशनमधून अवतरते आहे. खरं तर फॅशनमध्ये पहिल्यापासूनच बंडखोरी उमटलेली आहे. गेल्या शतकातील सुरुवातीची स्लीव्हलेस फॅशन, ७०-८० च्या दशकातली हिप्पी फॅशन, ९० नंतरचे टॉर्न्ड जीन्सवाले किंवा अल्ट्रा मिनीज आणि लो वेस्टवाल्यांची फॅशन.. जुन्या परंपरा, प्रथा मोडीत काढण्यासाठी केलेली बंडखोरी फॅशनमधून कायम दिसली. तरीही बंडखोरीचं आताचं स्वरूप वेगळं आहे. काहीसं परंपरेकडे झुकणारं तरीही प्रतिगामी नसलेलं, नैसíगक रंगांना, नैसर्गिक कापडाला प्राधान्य देणारं. नुकत्याच मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये समर कलेक्शन्स सादर झाली. अनेकांच्या डिझाइन्सनी आधुनिकतेला शरण जाण्याचं नाकारत थोडं थांबून मागे वळून बघायला लावलं.
‘इंडिया कलेक्टिव्ह’ या सदरात काही नव्या डिझायनर्सनी असे अस्सल भारतीय – आपल्या मातीतले तरीही प्रस्थापित फॅशनच्या कल्पनांना छेद देणारे कपडे सादर केले.

शंतनू दास- चिराग गांधी या डिझायनर जोडगोळीने निळ्या, काळ्या रंगातल्या आपल्या कलेक्शनची प्रेरणा निसर्ग असल्याचे सांगितले. ‘माकू’ या त्यांच्या कलेक्शनची थीम ‘एअर वॉटर स्काय’ अशी होती. त्यांच्या सगळ्या मॉडेल्स मास्क लावून रॅम्पवर आल्या. ‘आजची फॅशन झटक्यात बदलणारी आहे. ती स्थिर नाही. आपण या फास्ट चेंजिंग फॅशनचे बळी होतोय. हे दाखवणारं आणि फॅशनचं परसेप्शन बदला, असं सांगणारं माझं कलेक्शन आहे’, शंतनू दास म्हणाला. याच ‘इंडिया कलेक्टिव्ह’मध्ये नॉर ब्लॅक नॉर व्हाइट नावाचं कलेक्शन सादर झालं. मृगा कपाडिया आणि अमृत कुमार या कॅनडास्थित भारतीय डिझायनर्सनी त्यांचे हे कलेक्शन ‘१०० परसेंट प्युअर लव्ह’ या थीमवर बेतलं होतं. सैलसर पायजमे, कफ्तान असे स्त्री-पुरुष दोघेही वापरू शकतील असे सिलोएट्स हे त्यांच्या कलेक्शनचं वैशिष्टय़. कच्छ, केरळ आणि आंध्रातल्या हातमागांवरील कापड वापरून अत्याधुनिक डिझाइन्स त्यांनी दिली. ‘कंफर्ट हीच स्टाइल असं आमचं मत आहे. ९०च्या दशकातल्या अ‍ॅथलेटिक वेअरमधून आम्हाला युनिसेक्स स्ट्रीटवेअरची प्रेरणा मिळाली’, असं अमृतने सांगितलं.
जगभरात थैमान घालणारा दहशतवाद, परस्परांमधली असहिष्णुता अशा सगळ्या विसंवादी जगातही अजून सौंदर्य संपलेलं नाही, हे दाखवणारं दीपा गुरनानी यांचं ज्वुल्री कलेक्शन सादर झालं तेच मुळी काळ्याभोर पाश्र्वभूमीवर. ‘ब्रसेल्सच्या बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा जगाला हादरवलं. या सगळ्या कॉन्फ्लिक्ट्समध्येही माणुसकी जिवंत आहे. सीकिंग ब्युटी इन काँट्ररी वर्ल्ड हेच आमच्या कलेक्शनमधून सांगायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच काळ्याभोर कपडय़ांवर चमचमणारं सोनेरी तेज घेऊन आमचे दागिने सादर केले’, दीपा गुरनानी म्हणाल्या.
32

मृणालिनी या डिझायनरने बनारस या थीमभोवती आपलं कलेक्शन सादर केलं. पण बनारस म्हटल्यावर तोंडात येणारी बनारसी सिल्क तिच्या कलेक्शनमध्ये कुठेच नव्हती. खादीचा वापर करून संपूर्ण काळ्या, मातकट रंगाच्या आणि प्लेन कापडावर तिने प्रयोग केले होते. बनारसच्या मातीचा हा रंग आहे. फॅशन ही अशी आपल्या मातीपासून प्रेरणा घेतलेली असावी, असं मत मृणालिनीने व्यक्त केलं. परोमिता बॅनर्जी या डिझायनरनेदेखील खादीचा वापर करत ‘पॉझ, ब्रीद अ‍ॅण्ड इव्हॉल्व्ह’ असं सांगत थोडं वेगळं कलेक्शन सादर केलं. ‘फॅशन ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा आपल्याला भावते, रुचते, आपली वाटते ती फॅशन ही माझ्यालेखी व्याख्या आहे. थोडं थांबून विचार करायलाही आपल्याला आजच्या धावत्या जगात वेळ नाही. माझ्या कलेक्शनमधून थोडं निवांत होऊन आयुष्याकडे बघण्याचा संदेश मी द्यायचा प्रयत्न केलाय’, असं ती म्हणाली.
यावर्षीचा लॅक्मे फॅशन वीक लक्षात राहिला तो अशाच साध्या तरीही वेगळ्या कलेक्शन्समुळेच. झुळझुळीत सॅटिन, शिफॉन या फॅब्रिक्सबरोबरीने यंदा सर्वाधिक वापर झाला नैसर्गिक फॅब्रिक्सचा. कॉटन, खादी, ज्यूटमधून नैसर्गिक रंगांतली कलेक्शन्स या अ‍ॅण्टी-फॅशनचा ट्रेण्ड उठून दाखवणारी होती. एकीकडे नामांकित डिझायनर्स वलयांकित सिने-अभिनेत्यांना घेऊन आपली तीच ती झगमगीत आणि म्हणून आकर्षक फॅशन सादर करत असताना, तुलनेने कमी प्रसिद्ध आणि तरुण डिझायनर्स मात्र साधेपणात सौंदर्य शोधत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत, हे यातून दिसलं. झुळझुळीत अंगासरशी बसणारे फिटिंग बाजूला सारत फॅशनची आणि स्टाइलची व्याख्या बदलायला लावणारी कलेक्शन्स यातून सादर झाली. अ‍ॅण्टी-फॅशनचा हा ट्रेण्ड किती दिवस चालेल याचा हिशेब करण्यापेक्षा एक वेगळा विचार यातून रुजतोय आणि अ‍ॅण्टी-फॅशनच्या ट्रेण्डमधून एक सर्वसमावेशक, आधुनिकतेला शरण जाण्याचं नाकारणारा, नैसर्गिक आणि खरेपणात सौंदर्य मानणारा विचार पुढे येतोय, हे जास्त महत्त्वाचं.