गायत्री हसबनीस

एकीकडे वेस्टर्न अ‍ॅक्सेसरीज इतक्या रुजत असतानाही काही हटके आणि पारंपरिक दागिन्यांचे वेड कायम आहे. खासकरून कानात लोंबकळणारे झुमके तर आजच्या तरुणींच्या विशेष पसंतीचे आहेत. हल्ली टास्सेल असलेले लोंबकळते कानातले जास्त वापरले जातात आणि मुख्यत: ते ट्रॅडिशनल आणि मॉडर्न दोन्ही लूकवर सुटेबल आहेत. यंदा मोठय़ा आणि छोटय़ा झुमक्यांमध्येही विविध प्रकार येऊ घातले आहेत. यात काही ओळखीचे डिझाइन्सही परत दिसतील. त्याचबरोबर मेटल वर्क केलेले झुमकेही ट्रेण्डमध्ये आहेत. खूप सुंदर पद्धतीने नक्षीकाम केलेले मेटॅलिक झुमके सध्या सगळीकडे दिसतील.

टास्सेल पद्धतीने झुमके अर्थातच जोरदार ट्रेण्डमध्ये आहेत. यामध्ये धूमकेतूच्या शेपटीसारखे टास्सेल तुम्हाला दिसतील. कॉमेटच्या सुरुवातीच्या बॉडीप्रमाणे या टास्सेल झुमक्यांवरही सुरुवातीला डिझाइन वर्क पाहायला मिळेल. हिंदी-मराठी मालिकांमध्ये आपण लांबलचक झुमक्यांचे वेड सतत बघत असतो. असे लांबलचक झुमके फारसे ट्रेण्डमध्ये जरी नसले तरी ऑनलाइनवर दिसत असलेले असे हेवी झुमके फार वेगळ्या धाटणीच्या लुकमध्ये दिसतील. यामध्ये पर्ल आणि सिल्व्हर मेटलचे झुमके आहेत. यांची किंमत ही २,५०० ते ३, ७०० पर्यंत आहे. या झुमक्यांच्या शेवटी घूमर आणि त्यावर हलणाऱ्या बाली आहेत. फ्लोरल आकारातील सिल्वरमध्ये मोठी फुलं आणि पाकळ्यांच्या रूपात विविध कॉन्ट्रास्ट रंग यात आहेत.या झुमक्यांची किंमत ३,००० रुपयांपासून सुरू होते.

अगदी ट्रॅडिशनल झुमके हवे असतील तर अ‍ॅमेझॉनवर उत्कृष्ट चांदबाली कलेक्शन आहे. ज्यात तुम्हाला गोल्डन, सिल्व्हर, कुंदन, पर्ल झुमके मिळतील. यातले प्रकारही प्लेटेड, ब्लिडेड, प्लेटेड हूप, डॅन्गल असे नानाविध आहेत. सध्या जयपुरी झुमक्यातही असे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. मोत्यांचे ड्रॉप्लेट्स असलेले झुमकेही यात आहेत. हे सिंगल आणि मल्टिपल मोती झुमक्यांवर डिझाइन केलेले दिसतील. अ‍ॅमेझॉनवर असे झुमके ७५ रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. ब्लिंग आणि स्टड असलेले झुमके एकाच वेळी पारंपरिक पद्धतीचे आणि रॉयल टच असलेले आहेत.

मल्टिशेप झुमक्यांपेक्षा यंदा मल्टिकलर झुमके जास्त ट्रेण्डमध्ये आहेत. असे झुमके हे खासकरून गोल्डमध्ये पाहायला मिळतील. २२ कॅरेट सोन्यांच्या झुमक्यांना सध्या बाजारात मागणी आहे. त्यामुळे ६६,००० रुपयांपासून यांची सुरुवात होते. यामध्ये केशरी, हिरव्या आणि अबोली रंगाच्या झुमक्याखाली बाली दिसतील. या झुमक्यांमध्ये कोयरीचे, पाकळ्यांचे, कमळाचे, मोरांचे आणि फुलांचे डिझाइन्स पाहायला मिळतील. यात पूर्णत: सोन्याचे झुमकेही आहेत. यात उल्लेखनीय बाब म्हणजे ‘जेवर मंडी’ या शुद्ध पारंपरिक पद्धतीच्या झुमक्यांमध्ये प्रयोग केले आहेत. यामध्ये मल्टि अलॉय, पोलकी डायमंड, गोल्ड प्लेटेड आणि ऑक्सिडाइज्ड असे प्रकारही आहेत. यातही सर्वात नावाजलेला प्रकार आहे, कुंदन जडाऊ चा. यात झुमक्यांच्या खालचे लटकन एसिमेट्रिक पद्धतीचे किंवा एस शेपमध्ये आहेत. या सर्व झुमक्यांची किंमत १,९०० रुपयांपासून ६०,००० रुपयांपर्यंत आहे. ‘तिनिक्ष’, ‘अर्थ’ आणि ‘सिमेट्री’ या ब्रॅण्डकडून पोलकी डायमंडचे झुमके मिळतील. ‘सिमेट्री’ या ब्रॅण्डने पोलकी चांदबालीचे खूप लक्षवेधक डिझाइन्स आणले आहेत. मगर डिझाइन, चौकी डिझाइन आणि काही विंटेज डिझाइन्सही आणले आहेत. सनफ्लॉवर चांदबाली, पिकॉक चांदबाली, टेम्पल, लोटस, फ्लोरल, विंटेज, गोल्ड फेदर्ड असे हटके आणि पारंपरिक झुमके ‘सिमेट्री’ या ब्रॅण्डने आणले आहेत.

झुमक्यांचे हे वेड असे आहे की ते इथेच संपत नाही. मीनाकारी झुमके यंदा फार युनिक आणि वैशिष्टय़पूर्ण असे ठरले आहेत. कोणत्याही वयोगटांतील स्त्रिया नक्कीच हे ट्राय करू शकतात. हॅण्डक्राफ्टेड झुमके जितके वाखाणण्याजोगे असतात तितकेच मिनाकारी झुमकेही आकर्षक आहेत. त्यावर हॅण्डमेड फ्लोरल डिझाइन वर्क केलेले असते. असे झुमके हे सहजरीत्या ३००-५०० रुपयांत मिळतील. ऑक्सिडाइज्ड झुमके हे फार एथनिक वाटतात आणि तसे ते दिसतातही. किंबहुना कॉन्ट्रास्ट, मल्टिपल कलर, सेमी न्यूड, मोनोक्रोम आणि शिमर अशा कुठल्याही लुकवर उठूनच दिसतात. त्यामुळे झुमक्यांमध्ये कितीही पर्याय उपलब्ध असले तरी ऑक्सिडाइज्ड झुमके ते शेवटी ऑक्सिडाइज्डच. त्यांच्यावरचे प्रेम कमी होणारे नाही. झुमक्यांचे महत्त्व यंदा जास्त ट्रॅडिशनली असले तरी मॉडर्न लुकमध्येही त्यांना पसंती मिळाली आहे. साडी, शरारा, जीन्स किंवा कुर्ता, पलाझो, एथनिक वनपीस अशा अनेक बहुपर्यायी आऊ टफिट्सवर मॅच होणारे झुमके यंदा नक्की खरेदी करा!