लेबनॉन
आजपासून शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. ही खाद्यसंस्कृतीची सफर असेल. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. या सफरीचा पहिला स्टॉपओव्हर आहे लेबनॉन.
आजपासून मी आपल्याला नेणार आहे जगाच्या सफरीवर. कधी अमेरिकन, कधी काँटिनेंटल नावानं तर कधी ओरिएंटल नावानं देशोदेशीचे पदार्थ आता आपल्याला चाखायला मिळतात. ते तशाच ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्यापुढे येतात की त्यांचं भारतीयीकरण होतं, हा भाग वेगळा. पण देशोदेशीचे पदार्थ आता आपल्याला नवीन राहिले नाहीत हे खरं. ते कसे बनवायचे हे तर मी सांगेनच. त्याबरोबरच त्या देशाची खाद्यसंस्कृती, तिथल्या खाण्याच्या सवयी, एटिकेट्स यांची माहिती या नवीन सदरातून देण्याचा प्रयत्न या सदरातून करत आहे. आजपासून मी तुम्हाला नेणार आहे जगाच्या सफरीवर.. यातला पहिला स्टॉप आहे – लेबनॉन.
लेबनॉन हा असा जगातला एकमेव देश आहे ज्याचं नाव गेल्या चार हजार वर्षांपासून बदललेलं नाही. बायबल हे नाव मुळात लेबनॉनच्याच बायब्लोस या अतिशय प्राचीन शहराच्या नावावरून आलंय, असं म्हणतात.
लेबनॉनमध्ये एकंदरीतच अरब कल्चर आहे. भाषेपासून कला, संगीत इत्यादींवर अरबी संस्कृतीचा प्रभाव आहे. सुमधुर संगीत जसं या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे तसंच कुटुंबासमवेत किंवा आप्तेष्टांबरोबर मेजवानी करणं हादेखील त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. जसं आपल्या रोजच्या जेवणात पोळी, भात, भाजी असं असतं, तसं लेबनीज जेवणात पिटा ब्रेड, हम्मस (काबुली चना डिप), बाबा गनूश (वांग्यापासून तयार केलेलं डिप), फाहतूश (एक प्रकारचं सॅलड), फॅलाफल (चण्याचे गोल वडे) हे पदार्थ लेबनीज जेवणात नेहमी असतात. जेवणाचं टेबल अशा निरनिराळ्या डेलिकसीज्नी सजवलं जातं. त्याला हे लोक ‘मेझे’ असं म्हणतातं.
लेबनॉनमध्ये जेवणात ऑलिव्ह ऑइल, लसूण, लिंबाचा रस, पुदिना, ऑरिगॅनो, जायफळ, दालचिनी, पार्सले, कोथिंबीर या सगळ्या गोष्टींचा सढळ हस्ताने वापर केला जातो. लेबनॉन क्युझिन जगभरात टेस्टी, हेल्दी आणि फ्लेवरफूल म्हणून प्रसिद्ध आहे. दोन छोटय़ा आणि सोप्या लेबनीज रेसिपीज खास तुमच्यासाठी..

ओपन फेस फतायर्स
साहित्य : पारीसाठी – मैदा – १ वाटी, तेल ३ टीस्पून, पाणी – आश्यकतेनुसार, मीठ पाव टीस्पून

सारणासाठी साहित्य : पनीर – अर्धी वाटी, दही २ टीस्पून, बारीक चिरलेला पुदिना – २ टीस्पून, मीठ – २ चिमूट, काळी मिरीपूड – २ चिमूट, पातीचा कांदा (बारिक चिरलेला) – १

कृती : पारीसाठी घेतलेले साहित्य एकत्र करून त्याची कणीक मळून घ्या. हा गोळा अर्धा तास भिजवून नंतर त्याचे छोटे गोळे करून घ्या.
आता त्यांची पारी करून लांबट लाटून घ्या. त्यात स्टफिंग भरून घ्या. आता मधला भाग उघड ठेवून दोन्ही बाजूने बंद करून घ्या. आता हे फतायर्स साधारण १८० डिग्री सेल्सिअसवर १५ ते २० मिनिटांसाठी बेक करून घ्या. तांबूस रंग आल्यावर आपल्या आवडीच्या सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

गार्लिक लेमन लेबनीज पोटॅटो
साहित्य : बटाटे (मध्यम आकार) – २, बारीक चिरलेला लसूण – २ टीस्पून, लिंबाचा रस दीड चमचा, टोमॅटो प्युरी – २ टीस्पून, मीठ अर्धा टीस्पून, पॅपरिका पावडर – दीड चमचा (नसल्यास लाल तिखट वापरा.), तीळ (पांढरे) – दीड टीस्पून, बारीक चिरलेली पुदिना पाने – दीड टीस्पून, साखर – २ चिमूट, ओरिगानो – अर्धा टीस्पून, व्हेज स्टॉक – १ कप (गाजर, कोबी, कांदा, तेज पत्ता, काळी मिरी, या सगळ्याचे तुकडे पाण्यात उकळून घ्या आणि ते पाणी स्टॉक म्हणून वापरा.), ऑलिव्ह ऑइल – २ टीस्पून.

कृती : बटाटे धुऊन घ्या आणि सालासकट लांबट तुकडे कापून घ्या. आता एका भांडय़ात हे बटाटे घेऊन वरील सगळे साहित्य बटाटय़ावर टाका (भाज्यांचा स्टॉक वगळून) आणि एकत्र करून घ्या. आता एक पसरट नॉनस्टिक पॅन गरम करा आणि मिश्रणासकट बटाटे त्या पॅनमध्ये टाका. मंद आचेवर दोन्हीकडून परतून घ्या. आता बटाटय़ाला रंग आल्यावर केलेल्या व्हेज स्टॉकपैकी निम्मा त्यावर ओता आणि मंद आचेवर शिजवा. आवश्यकतेनुसार स्टॉक टाका. सगळा मसाला बटाटय़ाला लागला पाहिजे. बटाटे शिजल्यावर गरमागरम सव्‍‌र्ह करा.

आजची सजावट
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कावर्ि्हग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..

लाल मिरचीचं फूल
साहित्य : मोठी लाल मिरची (ओली), टूथपिक आणि थंडा पानी. बस्स..

१. मिरची तीन भागात कापून घ्या.
२. मोठय़ा आणि मधल्या भागावर सुरीने पाकळ्यांसारखा आकार कापून घ्या.
३. सेंटरचा भाग आणि बिया सुरीने काढून टाका. फूल थंड पाण्यात टाका आणि १५ मिनिटांत फूल छान फुलेल. (पाणी शोषून घेईल.)
४. आता मोठं फूल, मधलं लहान आणि मिरचीचं टोक असे तिन्ही भाग टूथपिकनं एकत्र जोडा. छान फूल तयार! करून बघा.