आता, हे काय बुवा? अशी कपाळावर आठय़ांची लिपी रेखाटू नका. ही आहे जपानी भाषा. या एसएमएसचा ढोबळ अर्थ असा की- ‘हाय, माझं नाव अंकिता आहे. मला जपानी भाषा खूप आवडते.’ आता या मेसेजला जपानीत उत्तर देणं कठीण असल्यानं मी आपली ‘स्माईली’च्या आधारे वेळ निभावली. पण जपानीप्रेमी अंकिता पाटीलबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता अधिकच वाढली.  
अंकिताला भाषेची गोडी शाळेपासूनच. पुस्तकातले धडेच्या धडे तिला पाठ असत. ‘डी. जी. रुपारेल महाविद्यालया’त प्रवेश घेतल्यावर तिचा मराठी वाङ्मयाकडे कल होता. तिला सायकॉलॉजीमध्ये करिअर करायचं होतं. पण सायकॉलॉजीपेक्षा मराठी वाङ्मयाचा अभ्यास सहजगत्या करता येईल, असं तिला वाटलं. पुढे मराठीत एम.ए. करण्यापेक्षा यूपीएससी करण्याचा विचारही तिनं केला होता. यादरम्यान तिच्या नातलगांनी एखादी भाषा शिकण्याचा सल्ला दिला होता. पण अंकिताला फ्रेंच, जर्मनसारखे नेहमीचे पर्याय नको होते. ‘रामनारायण रुईया महाविद्यालया’मधल्या रविवारच्या जपानी भाषा वर्गाबद्दल कळलं. तेव्हा एसवायला असताना तिनं जपानी भाषा शिकायचं ठरवलं. जपानी शिकायला लागल्यावर त्या भाषेच्या अनुषंगाने काही तरी करावं असं तिला वाटू लागलं. अंकिता म्हणते की, ‘हा योग्य वेळी घेतलेला निर्णय होता. त्याच वेळी मला खऱ्या अर्थाने जपानी भाषेची आवड निर्माण झाली.’
‘जापनीज लँग्वेज असोसिएशन’तर्फे दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यापकी मुंबई-पुण्याच्या स्पध्रेत तिनं बाजी मारली. पश्चिम विभागातली ट्रॉफी तिला मिळून ‘जपान ईस्ट आशिया नेटवर्क ऑफ एक्स्चेंज फॉर स्टुडंण्टस् अ‍ॅण्ड युथ प्रोग्रॅम’ अंतर्गत जपानला जायची संधी मिळाली. तेव्हा फुकुशिमाच्या अणुभट्टीत स्फोट झाल्यानं अंकिताची टीम नागासाकीत राहिली. या दहा दिवसांत दोन्ही संस्कृतींतल्या अनेक गोष्टी तिला जाणवल्या. जपाननं तांत्रिक आणि वैचारिकदृष्टय़ाही खूप प्रगती केल्येय. एका विकसित राष्ट्राची ती फिनिक्स भरारी आहे. अंकिता सांगते की, ‘त्यांची प्रत्येक गोष्ट सिस्टीमॅटिक आहे. एकदा आम्ही मॉलमध्ये जेवायला गेलो होतो. माझं जेवण लवकर झाल्यानं तिथल्या पुस्तकांच्या दुकानात मी गेले. ग्रुप लीडरची दोन वाजता निघायचंय, ही सूचना प्रमाण मानून मी पुस्तकांच्या विश्वात रमले. नंतर हॉटेलकडे येताना ते सापडेना. मी हरवले.. मग गार्डना विचारल्यावर त्यांनी सचित्र नकाशा दाखवला. मला ग्रुपला जॉइन होता आलं. जपानी न येणाऱ्यांचा त्यांनी विचार केला होता, हे मला खूप आवडलं.’
जपानी शिकायला सुरुवात केली, तेव्हा खूप उत्सुकता होती. त्यातलं ओ की ठो काहीही माहीत नसलं तरीही.. जपानी भाषेमध्ये बाराखडीपेक्षा चित्रलिपीचा वापर अधिक होतो. माझ्या शिक्षिकेनं चित्रलिपी काढल्यावर मी आ वासून त्याकडे बघतच राहिले. समोरचं काहीही कळत नव्हतं. हे सगळं आपल्याला जमेल का, असंही वाटलं. पण हळूहळू कळायला लागल्यावर एक वेगळी मजा येऊ लागली. फ्रेंच, जर्मन भाषांची लिपी इंग्रजीच आहे. जपानी शिकताना शून्यापासून सुरुवात करावी लागते. भारतीय भाषा नि जपानी भाषेचं व्याकरण समान आहे. कर्ता-कर्म-क्रियापदाची रचना आहे. अशा किती तरी गमती कळून शिकण्यातला रस वाढला, असं ती सांगते.  
जपानी बाराखडीचे ‘हिरागाना’ आणि ‘काताकाना’ असे प्रकार आहेत. ‘हिरागाना’त फक्त जपानी शब्द असून जपानी भाषा शिकवताना ‘हिरागाना’ वापरतात. त्यातील अक्षरं, शब्द, छोटी वाक्यं असं व्याकरण शिकवलं जातं, तर ‘काताकाना’मध्ये अधिकांशी जपानी भाषेत आलेले परदेशी शब्द आहेत. ‘केईगो’ म्हणजे ‘पोलाइट लँग्वेज’ आहे. जपानमध्ये दुसऱ्याशी बोलताना हुद्दय़ानुसार भाषा बदलते. त्याचं अखंड अवधान बाळगणं, व्यावसायिकदृष्टय़ा अपेक्षित असतं. जपानीच्या खालून वर अशा चढत्या क्रमानं पाच लेव्हल्स असतात. त्यातील सुरुवातीच्या लेव्हल्समध्ये कांजी, हिरागाना आणि काताकाना, बेसिक व्याकरण शिकवलं जातं. पुढच्या लेव्हल्समध्ये कांजीची क्लिष्टता वाढत जाते. ‘जपान फाऊंडेशन’तर्फे आयोजल्या जाणाऱ्या भाषाविषयक विविध स्पर्धाचं मुंबईत ‘एनएम महाविद्यालय’ सेंटर आहे. मराठी भाषेविषयी असं का होऊ शकत नाही, हा प्रश्न अंकिताच्या मनात अनेकदा येतो.   
एस.वाय.च्या वर्षी तिचा अभ्यास नि जपानी भाषाचे वर्ग चालू होते. त्याच सुमारास ‘पुकार’साठी अंकिताच्या ग्रुपनं केलेल्या प्रोजेक्टचा विषय होता- ‘अंधांना अपेक्षित असलेले आपण’. वर्षभराच्या या प्रोजेक्टमध्ये त्यांनी विविध स्तरांतील लोकांच्या मुलाखती घेतल्या. फिल्ड व्हिजिटस् केल्या. अंध आणि सामान्य माणसांतली दरी कमी करण्याच्या दृष्टीनं छोटय़ा गोष्टी शोधल्या. त्यासाठी शॉर्ट फिल्मही तयार केली. या अनुभवानं त्यांना खूप समृद्ध केलं. अलीकडेच त्यांनी पुन्हा एकत्र येऊन ‘वुमन एम्पॉवरमेंट’साठी एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे.     
पुढे टी.वाय.ला मराठी वाङ्मयाच्या अभ्यासासाठी ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’त जाऊन नोटस् काढाव्या लागत. रविवारी जपानी शिकायला जायचं. ट्रेनमधला वेळ लॅपटॉपवर जपानी गाणी-मालिका बघून व्होकॅबलरी वाढवण्यात सदुपयोगी लावायचा. जपानीचे २० वर्षांचे पेपर्स सोडवण्यासाठी ट्रेनमधलीच ३५ मिनिटं वापरायला लागायची. टी.वाय.नंतरचा वेळ तिनं जपानीसाठीच दिला. ‘जपानी भाषेत एम.ए. करायला आपल्याकडे फारसा स्कोप नाहीये. अलीकडेच ‘जेएनयू’मध्ये जपानीच्या पुढच्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाल्येय. मी जपानमध्ये जाऊन एम.ए. करणारेय. तिथं ती गोष्ट सहज होईल नि वेगळी मजा येईल,’ असं ती सांगते.
अंकिता ‘साची निहोनगो गोगाक्को’मध्ये (आनंदी जपानी शाळा) शिकत्येय नि शिकवत्येय. स्नेहा असईकर तिच्या शिक्षिका आहेत. बरेच जण प्रायव्हेट संस्थेत शिकून मग ‘जपान फाऊंडेशन’च्या स्पर्धा देतात. प्रायव्हेटमध्ये रॅपो चांगला असल्यानं अनेक जण त्याला प्राधान्य देतात. ‘जपान फाऊंडेशन’च्या स्पर्धाचं सर्टििफकेट मिळाल्यावर जगभरात कुठंही नोकरी करता येते. ती सांगते की, ‘आता माझा बेस चांगला झालाय. एन २ ला ८० जण बसले होते. त्यातले ३-४ जणच पास झाले. सध्या मी एन १ हा अ‍ॅडव्हान्स कोर्स करत्येय. त्याची परीक्षा डिसेंबरमध्ये आहे. एन १ मध्ये वाङ्मयीन जपानीकडे वळणारी व्होकॅबलरी आहे. मुंबईत या परीक्षेसाठी फार तर १० जण बसतात, एवढी ती प्रचंड कठीण आहे. पण नंतर मिळणाऱ्या प्रेस्टिजचा आनंद अवर्णनीय आहे. संधी मिळाल्यास मला ??? ‘त्सु२याकुशा’ ??? अर्थात इंटरप्रिटर व्हायचंय. त्यानिमित्तानं जगभर फिरायला मिळेल नि अनेकांशी संवाद साधता येईल.’  
अंकिताला एन २ होईपर्यंत नोकरी नव्हती. एन १ चा अभ्यास हा पुष्कळसा सेल्फस्टडी असतो. तेव्हा कामाचाही अनुभव घ्यायचा असं तिनं ठरवलं. त्यादृष्टीनं चाचपणी करून काही ठिकाणी अप्लाय केलं. एन २ साठी मुंबईतच राहणं भाग असल्यानं केपीओसाठी जपानी भाषातज्ज्ञाचा जॉब स्वीकारला. अंकिता सांगते की, ‘ही अ‍ॅनालिस्टची पोस्ट असून मी ‘डेल’साठी काम करत्येय. त्यांच्या साइटवर जपानी क्लाएंटनी पाठवलेली रिक्वेस्ट ‘डेल’ला कम्युनिकेट करायला लागते. क्लाएंट्सचे कॉल्स घेऊन त्यांच्या अडचणी सोडवते. हा जॉब सुरू होऊन महिनाच झालाय. आतापर्यंत केवळ भाषाशी निगडित असल्यानं तांत्रिक गुंतागुंती उकलतील का, असा प्रश्न पडला होता. पण ते सगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आणि ट्रेिनगमुळे सुकर होतंय. एक भाषातज्ज्ञ म्हणून, इथं खूप शिकायला मिळेल, असं वाटतंय. आपण शिकत असलेलं तांत्रिक ज्ञान भाषेला पूरक ठरणार, हेही जाणवतंय.’
एन २ झाल्यावर अंकिता क्लासमध्ये बेसिक लेव्हल शिकवायला लागली. एन ५ ला जपानी भाषेची काडीमात्र माहिती नसल्यानं शून्यापासून सुरुवात करावी लागते. हे कठीण आव्हान तिनं स्वीकारलेलं आहे. केवळ भाषा शिकवून उपयोग नाही, तर ती शिकताना समोरच्यांचा त्यातला रस कायम राहील, यासाठी प्रयत्न केले. जपानी शिकायला वय किंवा शिक्षणाचं बंधन नाहीये, असं सेन्सेना (शिक्षकांना) वाटतं. जपानी भाषा शिकणाऱ्यांत कॉलेज स्टुडंटची संख्या अधिक असून कॉर्पोरेट ऑफिसमधले लोकही येतात. जपानी शिकायला सुरुवात केली, तेव्हा तीही विद्यार्थीच असल्यानं त्यांची मानसिकता तिला माहीत होती. अभ्यासाची सवय असल्यानं ते अभ्यास करतात. तर मोठय़ा माणसांमध्ये डेडिकेशन असतं. भाषेतला रस वाढल्यावर तिच्याविषयीचं ममत्व वाढतं, असं तिला वाटतं.  
ती सांगते की, ‘जपानी शिकायला सुरुवात केली, तेव्हा घरचा सकारात्मक पािठबा होता. पुढे त्या भाषेत रस वाटला. मग स्पर्धामधील सहभाग आणि वेगळ्या फिल्डमधल्या करिअरला मिळणाऱ्या स्कोपमुळे घरून विरोध होण्याचं काही कारणच नव्हतं. कॉलेज आणि भाषेच्या अभ्यासात घरकामात मदत करायला सवडच मिळत नाही. आताही ऑफिस सुटल्यावर एन ५ च्या बॅचला आठवडय़ात दोनदा शिकवणं, एकदा माझं स्वत:चं शिकायला जाणं, शनिवार-रविवार एन १ चा अभ्यास करणं अशी धावपळ चालल्येय. त्यातही मजा येत्येय. जपानी शिकल्यावर ट्रान्सलेशन, इंटरप्रिटेशन आणि टीचिंग असे पर्याय उपलब्ध आहेत. जपानींना इंग्रजी शिकवणं कठीण आहे, पुढे तेही करण्याचा विचार आहे. ‘चोकाई’ या परीक्षेत टेप ऐकवून त्यातल्या संवादावर प्रश्न विचारतात. ड्रामा बघितल्यावर त्यांच्या अँक्सेंटची सवय होऊन व्होकॅबलरीही वाढते. म्हणून मला जपानी ऑनलाइन ड्रामा म्हणजे तिथल्या कमी भागांच्या मालिका बघायला फार आवडतं. जपानमधली बोलीभाषा यानिमित्तानं कळते.’
कॉटन ग्रीनच्या ‘शिवाजी विद्यालया’त असताना अंकिता जिल्हास्तरीय बुद्धिबळ खेळायची. आता मात्र ते खूपच मागं पडलंय. ग्रुपसोबत गप्पा मारणं, पृथ्वी थिएटरला जाणं, मराठीतले वेगळे सिनेमे बघणं नि कट्टय़ावर त्याविषयी तासन्तास चर्चा करायला तिला आवडतं. ओरिगामीची कला तिनं आत्मसात केलीय. कॅलिग्राफीचंही तिला आकर्षण असून चित्रकलेमुळे हात थोडा अडला असल्याचं ती सांगते. नृत्य-नाटकादी गोष्टींतून जपानी माणूस आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून ती जपण्याचा प्रयत्न करतोय. ही संस्कृती इथं जपानी शिकणाऱ्यांनाही कळावी म्हणून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वार्षकिोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात विद्यार्थी उत्साहानं सहभागी होतात. त्यानिमित्तानं मुंबईत जपानी शिकणाऱ्यांशी ओळख होते.
* लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com या संकेतस्थळावर माहिती पाठवावी.