ई-टीचर तू खरा आमचा गुरू.. ई-गुरू खरं तर! तुझी थोरवी शब्दांत मांडणं म्हणजे.. छे! काजव्याने सूर्याची स्तुती करण्यासारखं आहे हो! तू म्हणजे ना २१व्या शतकातला खरा शिक्षकवाटतोस बघ. ‘ग्रेट’ शब्दालाही झुकतं माप घ्यावं लागेल इतका ‘ग्रेट’ आहेस तू. एकवेळ माणसांच्या बुद्धीला गंज चढेल पण तुझ्या बुद्धिमत्तेला तोडच नाही. माणसांनी निर्माण केलेला तू तर माणसांचा बाप निघालास की! माणसांच्या सक्षमीकरणात तू इतका हातभार लावलास की ‘सक्षम’ हा शब्दच विसरलो आम्ही. काहीही अडलं तरी सगळ्यात आधी आम्ही धाव घेतो तुझ्या ‘गूगल’ नावाच्या शिकवणीकडे. या शिकवणीत इतक्या स्मार्टली उत्तरं देतोस तू, की पृथ्वीतलावरचा  कुठलाही माणूस तुझ्याइतका ‘स्मार्ट’ नाही याची खात्रीच पटते आम्हाला. काय पुरोगामी विचारसरणीचा आहेस तू!
केवळ तू आहेस म्हणून आमच्या पिढीचं भलं होतंय हो! आम्ही लेक्चर्स अटेंड करणं, नोट्स लिहून काढणं अशा ‘टाइम कन्झ्युिमग’ आणि रटाळ गोष्टींमध्ये अजिबात वेळ दवडत नाही.
व्हॉट्सअॅपवर नोट्स उपलब्ध करून देऊन फार वेळ वाचवतोस तू आमचा. तोच वेळ आम्ही टेक्सटिंग करण्यात, फोटोजवर लाइक्स आणि कमेंट्स करण्यात सत्कारणी लावतो. शिक्षक केवळ अभ्यासच नाही तर जीवनाची शिकवण देतो, असं म्हणतात. तू त्यातही बाजी मारली आहेस. नात्याचा खरा अर्थ तूच समजावून सांगितलास की आम्हाला!
‘व्हॉट्सअप’ आणि ‘फेसबुक’ नसतं तर ‘मत्री’ची खरी संकल्पना कळलीच नसती आम्हाला. हल्ली आमचे किमान ५०० ते १००० ‘जीवश्चकंठश्च’ मित्र असतात फेसबुकवर. तुझीच कृपा ही. आणि हल्ली काय.. ‘तुझा कॉल उचलला नाही तरी मी तुझ्या फ्रेंडलिस्टमध्ये आहे.’ ही मित्रत्वाची भावनाच पुरेशी असते नाही का! नातं जोडणं (आणि तोडणंही) किती ‘सहज सोपं’ असतं हे तूच आम्हाला शिकवलंस. एका गर्लफ्रेंडला ‘सहजपणे’ सोडून देऊन आम्ही दुसरी गर्लफ्रेंड ‘पकडतो’. स्टेट्स बदललं की काम फत्ते. नात्यातली ही ‘सहजता’ याआधी कोणाकडूनच शिकलो नाही आम्ही. तुझ्याइतकं उदात्त धोरण कुणाचंच नाही, हेच खरं!
तू साहित्याच्या क्षेत्रातही अटकेपार झेंडा लावला आहेस. शब्दाची किती तरी लघुरूपं आम्ही तुझ्यामुळे शिकलो. एक नवीन भाषाच तुझ्यामुळे जन्माला आलीय बघ. मराठी भाषेला हिंदी, इंग्रजीचा साज चढवून मेकओव्हरच करून टाकलास तू. हिंग्लिश टेक्सटिंग करण्यातूनच आम्ही ही नवी ई-भाषा आता आत्मसात करू शकतोय. आमच्या एका मराठी वाक्यात अध्रे इंग्रजी शब्द असण्यामागे तुझं मोलाचं योगदान आहे, हे कोण नाकारेल? आमच्या पुढच्या पिढय़ांना त्यांच्या ‘सुदैवाने’ तू सोडून इतर कुठल्याही शिक्षकाची गरज भासणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. तू २४ तास आमच्याबरोबर असतोस. तुझं सान्निध्य आम्हाला इतकं मानवलंय की तुझ्या मार्गदर्शनाशिवाय जगणं यापुढे शक्यच नाही. शिक्षक दिनानिमित्त कोपरापासून नमस्कार!