26 February 2021

News Flash

वस्त्रान्वेषी : फलकारा

काही शब्दकोशांनुसार ‘पदर’ या शब्दाचा अर्थ ‘काही स्वीकार करण्याकरिता पसरलेले वस्त्र किंवा वस्त्राचा भाग’ असा दिला आहे.

पदराच्या वाऱ्याला ‘फलकारा’ हा अतिशय मोहक शब्द आहे. वाऱ्याने उडणाऱ्या पदरालाही ‘फलकारा’ म्हटले जाते.

|| विनय नारकर

स्त्रियांच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यांना पदराच्या प्रतीकाने मराठी भाषेत मांडले गेले. ते आपण पहिल्या लेखात पाहिले. इतकेच नव्हे तर अनेक प्रकारच्या लोक साहित्यातही पदरामुळे सुंदर प्रतिमांची भर घातली गेली. त्याबद्दल आपण दुसऱ्या भागात जाणून घेतले. पदर हा जसा साडीच्या रचनेत सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तसेच, तो व्यवहारातील भाषेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा होत गेला. पदर हा स्त्रीच्या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहेच, पण समाजमनही ‘पदरा’ भोवती बऱ्याचदा रेंगाळते. त्याचे प्रतिबिंब मराठी भाषेत पडत गेले. स्त्रियांच्या आयुष्यासंबंधी वाक्प्रचार तर ‘पदरा’ने दिलेच, पण व्यवहाराच्या भाषेतही कितीतरी वाक्प्रचार व म्हणी मराठीत पदराने रूढ केल्या.

काही शब्दकोशांनुसार ‘पदर’ या शब्दाचा अर्थ ‘काही स्वीकार करण्याकरिता पसरलेले वस्त्र किंवा वस्त्राचा भाग’ असा दिला  आहे. त्या अनुषंगाने ‘पदर पसरणे’, ‘पदरात घेणे किंवा टाकणे’, ‘पदरात पडणे किंवा पदरी पडणे’ असे वाक्प्रचार तयार झाले. पदराच्या या अर्थावरून काही म्हणी निर्माण झाल्या आहेत. ‘पदरचे खावे पण नजरचे खाऊ नये’, स्वाभिमानाशी तडजोड करू नये, या अर्थाची ही म्हण आहे. त्याच प्रकारची ‘पदरचे खावे व चौघात जावे’ असेही म्हटले जाते. म्हणजेच स्वत: च्या मेहनतीने कमावले असता, आपली प्रतिष्ठा वाढते. ‘पदरचे द्यावे तेव्हा चौघात जावे, पदरचे द्यावे व चौघात यावे’, इतरांचा फक्त पाहुणचार स्वीकारू नये, तर स्वत:सुद्धा इतरांचा पाहुणचार, मानसन्मान करण्याची तयारी ठेवावी. ही व्यावहारिक म्हण तर अतिशय मौलिक गोष्ट बोलून जाते, ‘पदरचे द्यावे, पण जामीन न व्हावे’.

‘पदर पसरणे’ हा वाक्प्रचार नम्रपणे, कळकळीने याचना करणे तसेच क्षमा मागणे अशा अर्थांनी वापरला जातो. ‘पदर पसरिला तुजला रिपुगज पंचानना नृपामाजीं ॥’ आणि ‘चुकले क्षमा करावी, पसराया उशीर काय पदर मला ।’ , अशा काव्यपंक्तींमधून हा वाक्प्रचार वापरलेला दिसून येतो. पदरास ‘पालव’सुद्धा म्हटले जाते. ‘पालव पसरोनि तुम्हांसी । मी मागतों अवघियासी ।’ ‘पदरात घेणे, पदरी घालणे किंवा पदरात टाकणे’ हा स्वीकार करणे किंवा स्वाधीन करून घेणे, कबूल करणे अगदी आश्रय देणे अशा प्रकारे योजिला जातो. त्या बरोबरच ‘पदरात पडणे किंवा पदरी पडणे’ म्हणजे मिळणे किंवा हाती येणे, तसेच ताब्यात येणे, असे अर्थ होतात.

या पदांमधून हा अर्थ नेमका लक्षात येईल,

घातली पदरी, पोटची मी लेक, करा देखरेख, माय म्हणे

आणि

पदरी घातला, पोटचा मी हो गोळा, भरून येता डोळा, माय म्हणे

काहीशा या अर्थाचीच ‘पदरी पडले झोड, हसून केले गोड’ ही म्हण आहे. म्हणजे काही अप्रिय गोष्टींही हसतखेळत स्वीकारल्या पाहिजेत. यावरून पदराचा अर्थ विस्तारत जाऊन ताबा, मालकी, कब्जा, स्वामित्व, अधिकार, संबंध या सगळ्या छटांपर्यंत पोहोचतो. याच संबंधाने ‘आपल्या पदरचा माणूस जाऊ देऊ नये’ असे म्हणता येते. म्हणजे नोकरीस ठेवलेला किंवा आश्रित असलेला अशा माणसास  ‘पदरचा माणूस’ म्हटलं जातं. अशा आश्रितास ‘पदरपेशा’ असेही म्हटले जायचे. पेशव्यांच्या पत्रव्यवहारात पुढील प्रकारे उल्लेख आला आहे. ‘विप्रांस शालजोड्या, पदरपेशास कडेतोडे पुष्कळ द्रव्य वाटलें’.

एखाद्याला जबरदस्तीने कुणाच्या हवाली वा स्वाधीन  केले तर ‘पदरी बांधला’ असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत ‘अंगी असेल ते काम अन् पदरी पडेल तो दाम’ अशी म्हण रूढ झाली. अशाच अर्थाचा पण वेगळी छटा असलेला आणखी एक वाक्प्रचार म्हणजे ‘पदरचे घालणे’. जसे ‘ही माझी पदरची बातमी नाही’ म्हणजे मनाचेच सांगणे किंवा तिखटमीठ लावून सांगणे असा अर्थ येथे ध्वनित होतो. याच अर्थाचे आणखी विस्तारित स्वरूप म्हणजे स्वत:ची खासगी मिळकत, पैसा असा पूर्ण व्यवहारी अर्थ पदराला जोडला गेला. याचं हे रूप पुढील वाक्प्रचारातून दिसेल, ‘मी माझा पदर मोडून तुला मदत केली’ आणि ‘तुझ्या पदरास खार पडला’. एखाद्याला स्वत:चा पैसा (विशेषत: धंद्यात) खर्च करावा अथवा भरावा लागणे, याला ‘पदर खर्चणे’ आणि नुकसान सोसावे लागल्यास ‘पदर गमावणे’ किंवा ‘पदराला खांच पडणे’ असे वाक्प्रचार पहायला मिळतात. एखाद्याने जमवलेल्या पैशास ‘पदरगाठ’ असेही म्हटले जाते.

याशिवाय आवरण, घडी, थर, पापुद्रा असाही पदराचा अर्थ होतो. त्या गोष्टीस अनेक पदर होते, या वाक्प्रचारात हा अर्थ आला आहे. चिरोटा या खाद्यप्रकारास अनेक पापुद्रे असतात, म्हणून त्यास ‘पदरफेणी’ असेही म्हटले जाते. आवरण हा अर्थ असणारा आणखी एक वाक्प्रचार म्हणजे ‘पदर घालणे’. म्हणजेच एखादी गोष्ट किंवा वस्तू उघडकीस येऊ न देणे. पुढील ओळीवरून हा वाक्प्रचार कसा प्रचलित झाला हे लक्षात येईल. यात ‘अंचळ’ आणि ‘पल्लव’हे पदराचे समानार्थी शब्द आले आहेत, ‘लपविला कृष्ण, अंचळ पल्लव मुखावरी घाली’. ‘पदर घालणे’ याला आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे, दिवा मालवणे. ‘बाईसाहेबांनी दिव्यास पदर घातला’. स्त्रिया पदराचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करत असतात. एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी त्या पदराला गाठ मारतात. त्यावरून आलेला अनुभव लक्षात ठेवणे याला प्रतीकात्मकतेने ‘पदराला गाठ मारणे’ असे म्हटले जाते. एखादी गोष्ट जवळ बाळगणे यास ‘पदरात बांधणे’ असे म्हटले जाते, त्याला कारणही स्त्रियांची, वस्तू पदरात बांधण्याची सवय हेच आहे. एखादी स्त्री जर निष्काळजीपणे वागली किंवा स्वत:च्याच तंद्रीत असली तर तिला ‘पदराचीही शुद्ध नव्हती’ असे म्हटले जाते.

एखाद्याची बाजू उचलून धरली असता ‘त्याच्या पदरी माप घातले’ असे म्हटले जाते. तसेच एखाद्याची बाजू सांभाळणे किंवा लाज राखणे याला ‘पदर सारणे’ म्हणतात. एका कवितेत असा उल्लेख  आला आहे, ‘माया माऊली कोणी नुरली । पदर साराया । धाव रें धाव यदुराया ॥

संभाषणकलेतही पदरासंबंधी काही वाक्प्रचार आहेत. जसे एखाद्याने जर मर्मावरच बोट ठेवलं किंवा महत्त्वाच्या मुद्द्यालाच हात घातला तर ‘पदराला हात घालणे’ असे म्हटले जाते. बोलता बोलता कुणी हमरीतुमरीवर आले किंवा एकेरीवर आले तर ‘एक पदरावर येणे’ असे म्हटले जाते.  घडी न मोडलेल्या साडीस ‘पल्लवबंद साडी’ असा सुरेख शब्द आहे. तसेच पदराच्या वाऱ्याला ‘फलकारा’ हा अतिशय मोहक शब्द आहे. वाऱ्याने उडणाऱ्या पदरालाही ‘फलकारा’ म्हटले जाते.

या शिवायही काही वाक्प्रचार आहेत जे फारसे प्रचलित नाहीत किंवा कालबाह्य झाले आहेत. म्हणी आणि वाक्प्रचार भाषेचे वैभव सूचित करतात त्याचप्रमाणे ते सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचेही वाहक असतात. एका वस्तूने इतके वाक्प्रचार जन्मास घालणे, असे उदाहरण विरळाच असावे. ‘पदराचे’ सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व यातून अधोरेखित होते. साडी हा वस्त्रप्रकार इतकी वर्षे का टिकून आहे यावरही यातून प्रकाश पडतो.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2021 1:35 am

Web Title: life lives of women nauvari saree akp 94
Next Stories
1 पुन्हा नव्वदीत!
2 ग्लोबल सी मेरी बोली…
3 संशोधनमात्रे : माती, पाणी, उजेड, वारा…
Just Now!
X