28 January 2021

News Flash

क्षितिजावरचे वारे : वाळूतली रेघ

भविष्यात काय घडेल याचा अंदाज बांधायचं मात्र आपण सोडलेलं नाही

(संग्रहित छायाचित्र)

सौरभ करंदीकर

भविष्याबद्दल अचूक अंदाज वर्तवणाऱ्या व्यक्ती अनेकदा तोंडघशी पडताना आपण पाहिलं आहे. जितकी व्यक्ती मोठी तितकी फजितीदेखील मोठी. नॉस्ट्राडॅमस काय म्हणाला याबद्दल खऱ्या- खोटय़ा चर्चा गेल्या दशकभरात घडत आल्या आहेत. २०१२ साली आपल्या जगाची एक्स्पायरी डेट होती. आता ती उलटून गेल्यागत आपली अवस्था आहे हे करोनाकाळात तरी वाटतंय. महाप्रलयाचं एकवेळ सोडा, तंत्रज्ञान क्षेत्रात अशा भविष्यवेत्त्यांना त्यांच्या विधानांनी अनेकदा जेरीस आणलेलं आहे.

१९७७ साली डेकचे (डी ई सी — डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन) संस्थापक केन ओलसन एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, ‘प्रत्येकाच्या घरात कॉम्प्युटर असण्याची गरज काय? असं कधीही होणे शक्य नाही!’ १९६० च्या दशकापर्यंत ‘कॉम्प्युटर’ या वस्तूचा आकार खूपच मोठा असे. मेनफ्रेम प्रकारातील कॉम्प्युटरसाठी एक स्वतंत्र इमारत बांधली जात असे. १९७५ साली अल्टेअर नावाचा आपल्या टेबलवर मावेल असा कॉम्प्युटर बाजारात आला. आज आपल्या अनेकांकडे लॅपटॉप नाहीतर डेस्कटॉप कॉम्प्युटर आहेत. केन ओलसनचं वाक्य काही वर्षांतच विनोदाचा विषय झालं.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हेदेखील त्यांच्या अशाच एका वादग्रस्त विधानामुळे बेजार झाले होते. १९८० च्या दशकात कधीतरी, कुठल्याशा मुलाखतीदरम्यान त्यांनी ‘६४० किलो बाइट (केबी) एवढी मेमरी प्रत्येकासाठी पुरेशी आहे’, असं म्हटल्याचा आरोप आहे. ‘बाइट’ हे संगणकात माहिती साठवण्याचं एकक आहे. आपल्या मोबाइलवर काढलेला साधा फोटोदेखील पाच-दहा मेगाबाइट (एमबी) एवढी जागा घेतो (१ एमबी  = १०२४ केबी). एखादा व्हिडीओ काही जीबीपर्यंत जागा व्यापतो. बिल गेट्सनी या आरोपाचं खंडन करण्याचा वर्षांनुवर्ष प्रयत्न केला, परंतु जगातला सर्वात हुशार माणूसदेखील कधी कधी मुर्खासारखं बोलून जातो, याबद्दल सर्वाना गुदगुल्या होत राहिल्या. खरं तर बिल गेट्स असं म्हणाल्याचा ठोस पुरावा नाही, परंतु त्यांच्या ‘एम एस डॉस’ या प्रणालीच्या एका आवृत्तीवर ६४० केबीची मर्यादा घातली गेली होती हे मात्र खरं.

भविष्यात काय घडेल याचा अंदाज बांधायचं मात्र आपण सोडलेलं नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आलेख पाहिला तर भविष्यात काय घडू शकेल, हे जरी सांगता आलं नाही, तरी जी प्रगती होईल ती कधी होईल, याचा अंदाज बांधता येतो. इतिहासपूर्वकाळात नावारूपाला आलेली तंत्रं — उदाहरणार्थ, दगडातून निर्माण केलेली हत्यारं, चाकाची रचना, अग्नी (पेटवायची पद्धत) — इत्यादी गोष्टींचा मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की मानवाला लागलेल्या प्रत्येक शोधादरम्यान काही शतकांचा कालावधी गेला आहे. कृषीक्षेत्राचा इतिहास सुमारे एक लाख वर्षांचा आहे. प्राण्यांना पाळून त्यांच्याकरवी कामं करून घेणं, तसंच दूध, लोकर इत्यादी मिळवणं या तंत्राचा इतिहास दहा हजार वर्षांचा आहे. अक्षर लेखन इसवीसनपूर्व ३००० वर्षांपासून सुरू आहे. पाण्यावर चालणारी चक्की इसवीसनपूर्व १०० वर्ष नावारूपाला आली. छपाईची कला (ठशांच्या स्वरूपात) १०४५ साली सुरू झाली. या आकडय़ांवरून आपल्या लक्षात आलं असेल की दोन शोधांमधलं अंतर हळू हळू कमी होत चाललेलं आहे.

वाफेवर चालणारं इंजिन १६९८ मध्ये विकसित केलं गेलं, तर निरोप पाठवण्यासाठी ‘तार’ वापरायला १८२३ साल उजाडावं लागलं. १८५६ साली प्लॅस्टिक बनवलं गेलं तर, १९०३ साली राईट बंधूंच्या विमानाने उड्डाण केलं. विसाव्या शतकात शोधांची मालिका वाढतच गेली. मानवाने अवकाशात झेप घेतली, अणुशक्तीचा शोध लागला. इंटरनेट उदयाला आलं, बिनतारी — मोबाइल दळणवळण होऊ लागलं. मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरू लागले, मानवनिर्मित अवकाशयानं सूर्यमालिकेतील इतर ग्रहांच्या दिशेने प्रक्षेपित केली गेली. एकविसाव्या शतकात अणूपासून—ब्रह्मांडापर्यंत आपली नजर पोहोचलेली आहे. मानवी स्वार्थ, हितशत्रुत्व, युद्धं, आर्थिक संकटं, सामाजिक चळवळी, राजकीय दबाव, औद्योगिक कुरघोडय़ा इतकंच नाही तर नैसर्गिक आपत्ती आणि रोगराई या सर्व गोष्टीदेखील हा वेग थांबवू शकलेल्या नाहीत. तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन वेगवेगळ्या शोधांमधलं अंतर आता वर्षांवरून महिन्यांवर आलं आहे. असं म्हणतात की नवीन कल्पना सुचण्याचं प्रमाण बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ‘रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ विभागांमध्ये आता काही मिनिटांवर पोहोचलं आहे! अर्थात या कल्पनांपैकी प्रत्येक कल्पना क्रांतिकारक असतेच, नावारूपाला येतेच, असं नाही.

पण हे सगळं चाललंय कुठे? या अमर्याद प्रगतीला काही मर्यादा, काही सीमारेषा आहे का? भविष्यात मानवी प्रगतीचा एक परमोच्च क्षण असेल, असं पहिलं भाकीत हंगेरियन—अमेरिकन गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ जॉन वोन नॉयमन यांनी केलं. त्या क्षणाला त्यांनी ‘टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी’ असं नाव दिलं. तांत्रिक प्रगतीचा आलेख वर वर जात राहील आणि एक क्षण असा असेल ज्या क्षणी जे काही शोधायचं, जे काही सापडायचं ते आपल्याला सापडेल. त्या क्षणापलीकडे मानवजात काहीही करू शकणार नाही, असा विचार त्यांनी मांडला.  १९९३ साली व्हर्नान विंज या विज्ञानकथा लेखकाने ‘अशी सिंग्युलॅरिटी २००५ ते २०३० या काळात येईल असा अंदाज वर्तवला. प्रसिद्ध संशोधक आणि भविष्य—अभ्यासक रे कर्झवाईल यांच्या मते क ॉम्प्युटर आणि इतर क्षेत्रातील प्रगती एका ‘सजग कृत्रिम बुद्धिमत्तेला’ (सेल्फ अवेअर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) जन्माला घालेल, जिला प्रगत होण्यासाठी, जगवण्यासाठी मानवाची गरजच उरणार नाही. अशा  निष्क्रिय करणाऱ्या ‘सिंग्युलॅरिटी’ची आपण वाट पाहावी का? कदाचित मानवी आयुष्याला त्यानंतर एक वेगळा अर्थ प्राप्त होईल. परंतु ही सीमारेषा ही एक वाळूतली रेघ आहे, काळ्या दगडावरची नव्हे. मानवी कुतूहल अमर्याद आहे. ते कदाचित आपल्याला तेव्हादेखील स्वस्थ बसू देणार नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 12:30 am

Web Title: loksatta viva article on accurate predictions about the future abn 97
Next Stories
1 वस्त्रांकित : ‘जोट’दार वळणवाट
2 फॅशनेबल हुडहुडी
3 ‘केश’रंगी रंगले!
Just Now!
X