News Flash

नावातच ‘युजर’आहे!

सोशल मीडिया आणि मेसेंजरवर वावरताना आपलं युजरनेम झोकात असावं यासाठी प्रत्येकजण झटत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि असे तत्सम सोशल मीडिया म्हणजे आपल्या जीवनाचा अभिवाज्य भाग आहेत. या सोशल मीडिया आणि मेसेंजरवर वावरताना आपलं युजरनेम झोकात असावं यासाठी प्रत्येकजण झटत असतो.

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत आपल्याबरोबर असणारा आपला साथी फोन आणि त्यात दडलेले सोशल मीडिया आणि मेसेंजरचे अ‍ॅप्लिकेशन्स. प्रत्यक्ष आयुष्यात आपण किती अपडेट आहोत यापेक्षाही या व्हर्च्युअल विश्वातला आपला वावर हा अपडेटच असला पाहिजे याबाबत तरुणाई आग्रही असते. त्यामुळे इथे आपली ओळख महत्त्वाची ठरते आणि त्यासाठी सोशल मीडियाच्या अकाउंटवरचं आपलं युजरनेम आणि त्याबरोबर जोडलं जाणारं आपलं छायाचित्र पहिल्याच नजरेत वेध घेणारं असायला हवं यासाठी आपली धडपड असते. अर्थात इथे नावात काय आहे?, असं विचारून चालत नाही कारण हेच नाव सर्च करून लोक आपल्याला या व्हच्र्युअल विश्वात हुडकू न काढू शकतात. त्यामुळे आपलं नाव भारी तर काम भारी.. अशी इथली अवस्था आहे. म्हणूनच की काय सोशल मीडियावर युजर आयडी म्हणून वापरल्या जाणाऱ्या नावांचा एक वेगळाच ट्रेण्ड पाहायला मिळतो.

कधी कोणत्या आवडत्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरकडून प्रभावित होऊन युजरनेम ठेवलं जातं तर कधी स्वत:ची प्रतिमा कशी आहे हे नावातून स्पष्ट लक्षात यावं यासाठी प्रयत्न केला जातो. आडनावांवरून आपली ओळख करून देण्याचा ट्रेण्डही फेसबुकवर जोरात आहे. कुलकर्णीचा अमेय, शिंदेंची श्वेता, शर्माजी का लडका सुमेध, पाटलांची लाडकी मयूरी असे युजरनेम्स तुम्हाला हमखास दिसतील. शिवाय संपूर्ण नाव म्हणजे अगदी आई-वडिलांच्या नावासह आपले नाव आणि आडनाव असे लांबलचक युजरनेम ठेवायचा ट्रेण्डही पाहायला मिळतो.  यातूनच आजच्या तरुणाईची बदललेली मानसिकताही दिसून येते. आडनाव मग स्वत:चं नाव, वडिलांचं नाव असं नाव आपण शक्यतो दहावीच्या फॉर्मवर किंवा कोणत्या तरी सरकारी कामाच्या फॉर्मवरच लिहतो, परंतु हा ट्रेण्ड आता फेसबुकवरही दिसून येतोय. नाईक मंगेश अरुण, जाधव स्वराली दिलीप अशी नावं तुम्हाला नक्कीच दिसतील. याशिवाय, मराठीतून नावं लिहिण्याची पद्धतही गेल्या वर्षीपासून चांगलीच जोर धरू लागली आहे. अर्थात, नावातले हे बदल तांत्रिक बदलामुळेही शक्य झालेत. पूर्वी फेसबुकवर युजरनेमसाठी अक्षरमर्यादा होती आता ती वाढवली असल्याने मोठमोठी नावं देणं सहजशक्य झालं आहे.

फेसबुकइतकं च गाजलेलं माध्यम म्हणजे इन्स्टाग्राम. इन्स्टाग्राममध्ये तुम्हाला एक युजर आयडी आणि दुसरं तुमचं नाव अशी दोन नावं द्यायची असतात. म्हणजे या अ‍ॅपवर तुम्हाला नावावरून आणि युजर आयडीवरूनही शोधता येतं. त्यामुळे इथे नावापेक्षा युजर आयडीमध्ये अनेक  हटके प्रयोग दिसून येतात. इन्स्टाग्रामवर तुम्हाला अनेक इन्फ्ल्यूएन्सर दिसून येतील. त्यातही अनेक प्रकार आहेत. कोणी फूड इन्फ्ल्यूएन्सर आहे तर कोणी फॅशन इन्फ्ल्यूएन्सर . ज्याच्यात्याच्या कामाप्रमाणे तुम्हाला त्यांचे आयडी दिसतील. तुम्ही एखाद्या फॅशन इन्फ्ल्यूएन्सरचा शोध घेत असाल तर तुम्हाला द बोहो गाय, स्टाइल वॉम, स्वेटिंग स्टाइल, सिल ऑफ स्टाइल, फॅशन मास्टर, अ कर्वी गर्ल, फॅशन स्टॉकर, बिफोर स्टेपिंग आउट, बॉर्न ऑफ फॅशन, रूम ऑफ स्टाइल असे अनेक हटके युजर आयडी दिसतील. तर फुडी मॉम, फुडी जर्नी, लॉस्ट इन चीझ लॅड, व्होल ३० रेसेपी, हॉट फॉर फूड, फीड युवर सोल, हंग्री बॉय, भुखा इन्सान, ओह यम्मी अशा फूड इन्फ्ल्यूएन्सरच्या नुसत्या नावांनीच तोंडाला नक्की पाणी सुटेल. याशिवाय, आपण कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्नही अनेकदा या इन्स्टाग्रामवरून के ला जातो. त्यामुळे वो लंबे बालोंवाला लडका, वो साँवलीसी लाडकी, वो चष्मेवाला लडका, शायर बाबू, फोटूग्राफर बाबू, कर्ली लेडी, डिम्पल गर्ल, ड्रीम गर्ल, ड्रामा गर्ल, रायडर बॉइज, मिस्टर कॅप्टन, सुरेली शमा, बुलाती है मगर जाने का नाही, लिटील कप केक, आययम ओल्ड लव्हर, हिज चेरी, तिचा बोका कूल बंदी अशा चित्रविचित्र युजर आयडींचा खजिनाच तुमच्या नजरेस पडेल.

एखादा माणूस शायरी किंवा स्वत:चे विचार सोशल मीडियावर पोस्ट करत असेल तर त्यांची मै शायर तो नही, रेखंती लेखणी, माझी लेखणी, शब्दांची शाळा, बातों मे याद रखना, अनस्पोकन हार्ट असे युजरनेम हमखास सापडतात. एखादा सोशल मीडियावरून काही विकत असेल तर निव्वळ ब्रॅण्डचं नाव न ठेवता तिथेही काही प्रयोग के लेले दिसून येतात. यूटय़ूबवाली आरती, यूटय़ूबवाला लडका, सेल्फी क्लिकर, मी नाटय़कर्मी, स्पिरिट ऑफ मुंबई, बॅकिंग गुरुजी, टेक्निकल गुरुजी, हॅण्डमेड हॅप्पीनेस, केस जंक्शन अशी उदाहरणं तुम्हाला बिझनेस अकाउंट्समध्ये आवर्जून दिसतील.

आपण काय आहोत, आपण काय करतो, आपली आवड काय?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तरुण पिढी त्यांच्या युजर आयडीमधूनच देताना दिसते. काही महिन्यांच्या कालावधीने तुम्हाला युजर आयडीही बदलता येतात, त्यामुळे ही सोय लक्षात घेऊन इथेही अपडेटेड नावांचा प्रयत्न जाणीवपूर्वक के ला जातो. त्यामुळे इथे नुसती नावं नाही तर नावातच ‘युजर’ची ओळख दडलेली असते. ही चिवित्र नावांची ओळखही म्हणूनच अर्थपूर्ण आणि बोलकी ठरते!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:47 am

Web Title: loksatta viva article on soical media user name abn 97
Next Stories
1 केक आणि बरंच काही…
2 सदा सर्वदा स्टार्टअप : दृष्टिकोन गुंतवणूकदारांचा
3 क्षितिजावरचे वारे : क्वांटम म्हणजे काय रे भाऊ?
Just Now!
X