29 January 2020

News Flash

‘शनाया’ आणि ‘शेवंता’ भेटतात तेव्हा..

मराठी मालिका-चित्रपटविश्वात ओळख निर्माण केलेल्या या दोघी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या

(संग्रहित छायाचित्र)

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर

डेसी सोपच्या माध्यमातून घराघरांतून लोकप्रिय झालेल्या, नायिका नव्हेत, पण त्यांच्यापेक्षाही कमालीच्या लोकप्रिय ठरलेल्या शनाया म्हणजेच अभिनेत्री इशा केसकर आणि शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर या दोन अभिनेत्री एकत्र येऊन गप्पा मारतात तेव्हा.. तेव्हा नेमकं काय होतं? आपापल्या बळावर मराठी मालिका-चित्रपटविश्वात ओळख निर्माण केलेल्या या दोघी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या. कधी एकमेकींना टाळ्या देत, तर कधी एकमेकींशी सहमत होत या दोघींनी केवळ आपला प्रवासच नाही तर अभिनय क्षेत्रातील ‘मी टू’ प्रकरणांपासून ते सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगपर्यंत अनेक मुद्दय़ांवर सडेतोड मतं मांडली. मालिकेतील भूमिकेपल्याड असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी ओळख करून देत त्यांना बोलतं केलं रेश्मा राईकवार आणि स्वाती पंडित यांनी..

इशा केसकर

‘कॉम्प्रोमाइज’चे प्रस्ताव येतातच

चांगली-वाईट माणसं सगळीकडेच असतात. प्रत्येक ठिकाणी चांगल्या-वाईट गोष्टी बघायला मिळतात, अनुभव येतात. एकदा मला एका व्यक्तीने असं सांगितलं होतं की, थोडं ‘कॉम्प्रोमाइज’ केलंस तर एखादी संधी देता येईल. त्या क्षणी माझ्या कलेच्या जोरावर मला जे मिळेल ते काम करेन, काम नाही मिळालं तर हे क्षेत्र सोडून देईन, असं उत्तर मी ठामपणे त्यांना दिलं होतं; पण तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मी या क्षेत्रात येऊन चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना, अशी शंका मनात येत होती. ती रात्र मी रडून घालवली होती. मला कोणी असं का विचारलं, हे कोणाला कळलं तर मी काय करू? समोरच्याने खोटं काही तरी पसरवलं तर मी काय करणार? अशा अनेक विचारांनी मला रडायला येत होतं; पण त्या एका घटनेनंतर मी स्वत:ला स्ट्राँग करायचं ठरवलं. यावरून अख्ख्या इंडस्ट्रीला वाईट ठरवणं नक्कीच अयोग्य आहे.

अपूर्वा नेमळेकर

शरीरावरून पारख का?

अनेकदा आमच्या मनात येईल, तसे आम्ही वागतो, अशी प्रेक्षकांची भावना असते. एखाद्या पुरस्कार सोहळ्यात आम्हाला नाचण्यासाठी वाहिनीकडून सांगितलं जातं तेव्हा त्यासाठी ड्रेस कोणते, मेकअप कोणता? या सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच ठरवलेल्या असतात. तिथे आम्ही काही करू शकत नाही. मध्यंतरी एका सोहळ्यात मी नृत्य सादर केले, तेव्हा मी जे कपडे परिधान केले होते, त्यावरून खूप वाईट शब्दांत मला ट्रोल केलं गेलं. आपलं शरीर काय, काय प्रकारचे कपडे घातलेत, याचा विचार न करताच नृत्य केल्याची टीका माझ्यावर झाली होती. मात्र, ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये हेच आकारमान असूनही माझी वाहवा केली जाते आणि नृत्य करताना माझ्या त्याच जाडेपणावरून टीका होते. प्रेक्षकांचा एवढा गोंधळ का होतो?

रात गयी, बात गयी!

सोशल मीडियावर इतके सारे मीम्स येत असतात, जोक्स येत असतात. अनेक लोक चांगलं बोलतात, अनेक लोक वाईट बोलतात. एखाद्याचा आत्मविश्वास पूर्ण संपून जाईल इतकं वाईट बोलतात. मात्र त्या गोष्टींना एवढं मनावर घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. माझ्या मते तरी सोशल मीडियाचं आयुष्य हे एका दिवसाचं असतं. आज एक विषय, उद्या एक विषय असं लोकांना चर्चेला मिळतच असतं. काल आपण कोणकोणत्या पोस्ट पाहिल्या हे आपल्याला आज लक्षातही राहत नाही. त्यामुळे त्या गोष्टींना तेवढंच महत्त्व आपणही द्यावं. आम्ही कलाकार तर केवळ प्रसिद्धी किंवा आमचे नाटक-मालिका, कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावेत इतक्याच उद्देशाने या सोशल मीडियाचा वापर करतो. त्यावर लोक काय बोलतात, याच्याशी देणं-घेणं नसतं आणि त्या माध्यमाकडे केवळ प्रसिद्धी किंवा संपर्काचे माध्यम इतक्या मर्यादित अर्थानेच पाहायला हवे.

वाट चुकून अभिनयात आले

मी कधी अभिनय करेन असं मला कधीही वाटलं नव्हतं. ‘बीएमएस’ करून बिल्डर्सच्या ऑफिसमध्ये मार्केटिंग सांभाळत होते. मास्टर्ससाठी मला यूकेला जायचं होतं. माझ्या बाबांना मात्र वाटत होतं की, मी अभिनय ही कला म्हणून एक्स्प्लोअर करावी, मला त्याच्यात नक्की काही तरी करता येईल. एक दिवस मला फेसबुकवर एक मेसेज आला आणि त्यात मला एक ऑडिशन द्याल का, असं विचारलं होतं. मला खात्रीने वाटलं की, कोणी तरी टाइमपास करतंय. बाबांच्या मते मी ऑडिशन देऊन बघायला तर काही हरकत नव्हती. त्यामुळे मी ऑडिशनला गेले आणि मला ‘आभास हा’मधली ‘आर्या’ मिळून गेली. प्रवेश तर सहज झाला होता, पण माझ्यासाठी पुढचा टप्पा सगळ्यात कठीण होता. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी पानभर स्क्रिप्ट बघून मी घाबरले होते. शाळेतही मी कायम अभ्यासू प्रकारातली मुलगी होते. कधी कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये नसायचेच! त्यामुळे हे पाठांतर करणं, ते खरोखर प्रेझेंट करणं यातलं काहीच मला येत नव्हतं आणि जमेल असं वाटतही नव्हतं. मला भीती होती, पण बाबांचा माझ्यावर विश्वास होता, मला हे जमेल याची त्यांना खात्री होती. त्यांच्या विश्वासाखातर मी धडपडत का होईना पण प्रयत्न करायला लागले. सवय होईपर्यंत माझ्यासाठी ते रोजचं अनेक पानी स्क्रिप्ट हे भीतीदायकच होतं.

पथनाटय़ातून सुरुवात

शाळेत दहावीत असताना मी पहिल्यांदा पथनाटय़ात सहभागी झाले. त्या वेळी मला बक्षीसही मिळालं. कॉलेजमध्ये नाटकाच्या ग्रुपशी जोडली गेले. एकदम तरुणपणातल्या कल्पना असतात ना आर्टिस्टिक नाटक, सिनेमे, शॉर्ट फिल्म वगैरे.. तशी माझीही इच्छा होती की, मी तसं काही तरी करावं; पण आईचं म्हणणं होतं की, आम्ही जे दररोज बघतो त्यात तू दिसलीस तर तू अभिनय करतेस, असं म्हणता येईल. यावरून नेहमी वाद होत असत. मला अगदी कमर्शियल असं काही करायचं नव्हतं आणि हे काही तरी चौकटीबाहेरचं वगैरे करण्यावर घरच्यांचा काही विशेष विश्वास नव्हता. आईच्या म्हणण्याचा मान राखायचा म्हणून मी एक शेवटची ऑडिशन द्यायची ठरवली, त्यात सिलेक्ट नसते झाले तर मी अभिनय सोडून देईन, असंही म्हटलं होतं. तेव्हा मला असं खात्रीने वाटलं होतं की, हा आपल्या अभिनयाचा शेवटचा दिवस असू शकतो. ऑडिशनला मला नऊ वारी वगैरे नेसून तयार व्हायला सांगितलं. हे पात्र एकदम हॅपी, चीअरफुल वगैरे आहे असं सांगितलं गेलं. तशा पद्धतीने मी ऑडिशन दिली. तेव्हा ऑडिशन घेणाऱ्या त्या दादाकडे बघूनच मला कळलं की, त्यांना हे आवडतंय. मग त्यांनी सुचवलेले बदल करून मी पुन्हा टेक दिले आणि ऑडिशनच्या शेवटी मला त्यांच्या डोळ्यांत बघूनच माझी खात्री झाली होती की, हा माझा अभिनयाचा शेवटचा दिवस वगैरे काही असणार नाही, उलट आता माझ्यासाठी नवीन क्षेत्र खुलं झालंय!

ही शेवंता कोण असेल?

‘रात्रीस खेळ चाले’चा पहिला सीझन आम्ही घरी बघायचो. मीही सावंतवाडीची आहे, त्यामुळे आम्ही ही मालिका खूप उत्सुकतेने बघायचो. त्या वेळी शेवंताचं जे चित्र त्यांनी नुसत्या संवादातून उभं केलं होतं तेव्हापासूनच ती शेवंता कोण असेल याची उत्सुकता होती. ती मालिका बघताना बाबांनी मला सहज म्हटलं होतं की, तू असं काही तरी कर जे आपल्या मातीशी जोडलेलं असेल. मला जेव्हा शेवंतासाठी ऑडिशनला बोलावलं होतं तेव्हा मला हे माहीतही नव्हतं की, मी शेवंतासाठी कॅमेऱ्यासमोर उभी आहे. ऑडिशनमध्ये पोशाख तर अगदीच सामान्य होता आणि त्यामुळे दिलेले डायलॉगही मी साध्या पद्धतीनेच म्हटले. त्यावर मला अशी प्रतिक्रिया मिळाली की, हे अगदीच हळदीकुंकू बाईसारखं होतंय आणि त्यांना हे असं साजूक तुपातलं नव्हे तर झणझणीत नॉनव्हेज खाणारं वगैरे असं पात्र उभं करायचं होतं. मग त्यांनी मला न राहवून शेवटी सांगितलं की, हे सगळं शेवंतासाठी चाललंय. त्या वेळी मला आश्चर्य आणि आनंद एकत्र होत होता. त्यांनी हे सांगितल्यावर मात्र माझा अ‍ॅटिटय़ूडच बदलला आणि मी ती ऑडिशन मस्त दिली. शेवंतासाठी मात्र त्यांनी मला दोन अटी घातल्या, एक म्हणजे केस कापायचे नाहीत आणि दुसरं म्हणजे दहा किलो वजन वाढवायचं!

शनाया आपल्या आजूबाजूला आहेतच!

इतरांची फजिती बघायला सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे शनायाची फजिती, शनायामुळे होणारी गुरूची फजिती या सगळ्या गोष्टी प्रेक्षक खूप एन्जॉय करतात. ही मालिकाही कोणताही सामाजिक संदेश वगैरे द्यायला तयार केलेली नाही, त्यामुळे केवळ निखळ मज्जा म्हणून ही मालिका बघितली पाहिजे. शनाया हे असं पात्र आहे ज्याचा कोणता तरी एक गुण प्रत्येकात असतो. कोणाला लाड करून घ्यायला आवडतं, तर कोणी तिच्यासारखं बावळट असतं. त्यामुळे शनाया ही अशी काही वेगळी कोणी नाही, खलनायिका तर मुळीच नाही. शनाया हे पात्र कोणत्याही क्षणी खलनायिका होऊ शकतं, पण ते तसं होऊ  नये याची संपूर्ण काळजी स्क्रीनप्ले आणि संवाद यांच्यातून घेतली जाते. भूमिका म्हणून शनायाकडे बघताना मलाही सुरुवातीचा कित्येक काळ अभिनेत्री रसिका सुनीलचा चेहराच डोळ्यासमोर येत होता. मला शनाया म्हणून स्वीकारायला जितका वेळ प्रेक्षकांना लागला तितकाच वेळ मला स्वत:लाही लागला. मी हे स्वत: मान्य करते की, मी फक्त सीरियलमधली खळगी भरून काढते आहे, शनाया अजूनही रसिकाच आहे.

सगळी माध्यमं वेगळी

नाटक-चित्रपट वेबसीरिज ही सगळी माध्यमं एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत. मी जेव्हा मालिकेमध्ये काम केलं तेव्हा प्रतिमा जोशींनी मला अभिनयाचे धडे दिले होते. त्या वेळी त्यांना मी विचारलं होतं की, तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ ? त्यावर त्यांनी मला सांगितलं होतं, एखाद्या नाटकात काम कर. तेव्हा मी ठरवलं की, एका तरी नाटकात काम करायचंच. खूप वेळा वाचनाला गेले, पण नाटकात कोणी काम द्यायला तयारच होत नव्हतं. तो नकार पचवणंही कठीण होतं. फायनली एकदा मला ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक मिळालं. दहावीची परीक्षा अनेक वर्ष सतत देणाऱ्या आणि तरीही पास न होणाऱ्या एका मुलीची भूमिका मला करायची होती आणि ती भूमिका कॉमेडी होती. तेव्हा अनेकांना ही शंका आली की, मला काय कॉमेडी जमणार! पण मला हळूहळू त्याचा सूर सापडला. त्या भूमिकेसाठी मला नाटय़ परिषदेचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. नंतर पुन्हा माझ्याकडे ‘आराधना’ ही मालिका आली ज्यात ती नायिका अगदी श्रद्धाळू वगैरे होती. तेव्हा एखादे वेळी मी देवळात वगैरे दिसले तर लोक मला म्हणायचे की, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, देव तुमचं ऐकतो. त्यानंतर मला त्या सोशीकपणाचा कंटाळा आला. मग मी ‘नेट्फ्लिक्स’वर एक वेबसीरिज केली ज्यासाठी मी आठ ते नऊ  किलो वजन कमी केलं. पुन्हा ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतासाठी मला वजन वाढवावं लागलं. प्रत्येक माध्यमाची वैशिष्टय़ं वेगवेगळी आहेत.

‘बानू’ ते ‘शनाया’

बानू हे पात्र मला खूपच मेहनतीने मिळालं होतं. त्यात मला मजा नक्कीच आली होती, पण त्याहीपेक्षा जास्त लोकांच्या श्रद्धेचा प्रत्यय आला होता. बानू अवखळ होती, खटय़ाळ होती, खंडेरायांची दुसरी बायको असूनही ती प्रेक्षकांची आवडती होती. तिच्यावर लोकांची श्रद्धा होती, प्रेम होतं आणि तिचा कधीच कोणाला रागही आला नाही. बानू सोशीक होती आणि तितकीच निस्सीम भक्तही होती. बानू मला करायला मिळाली हे माझं भाग्यच! शनाया मात्र अगदी उलट आहे. एक तर ती आजच्या काळातली आहे आणि त्यामुळे सोशीक वगैरे नाहीये. तीसुद्धा निरागस आहे, थोडीशी बावळटही आहे, पण वाईट नक्कीच नाहीये.

संयम हवाच!

अभिनय क्षेत्रात येताना संयम ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी मला हवा तसा रोल मिळणं, मला हवं तसं स्क्रिप्ट मिळणं, अशा सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळी मला पाहिजेत तशाच मिळणार नाहीत, हे माझ्या बाबांनी मला समजावलं होतं. त्यामुळे मला हे स्वीकारणं सोपं गेलं. मात्र जेव्हा प्रेक्षक ट्रोल करतात, अविश्वास दाखवतात तेव्हा वाईट वाटतं. पुरस्कार सोहळ्यातल्या माझ्या परफॉर्मन्सवरून जेव्हा प्रेक्षकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या तेव्हा मी दोन दिवस रडण्यात घालवले. नंतर मी हे स्वीकारलं की, याचा आपल्यावर परिणाम होऊ  देऊन चालणार नाही.

कॉलेजच सोपा मार्ग

या क्षेत्रात येण्यासाठी कॉलेजमधल्या नाटकाच्या ग्रुपमधून सुरुवात करणं हाच सगळ्यात उत्तम आणि सोपा मार्ग आहे. अगदी तेव्हा नाही जमलं तर नंतर ऑडिशन वगैरे शोधून तिथून या क्षेत्रात येता येईल. मी सुरुवातीच्या काळात फ्रीमध्ये काम करून कॅमेरा फेस करण्याचं शिक्षण स्वत:चं स्वत:च घेतलं. अनेक ठिकाणी फिल्म स्कूलचे विद्यार्थी डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म्स करत असतात, त्यांचं बजेट कमी असतं. त्यांना अशा फ्री काम करणाऱ्या आणि चांगल्या आर्टिस्टची गरज असते. मला रंगभूमीची सवय होती, पण चित्रपट करायचा तर कॅ मेरा फेस करावा लागणारा होता. फ्री काम केल्यामुळे कॅमेऱ्याची सवय झाली असती, थोडं ट्रेनिंग मिळालं असतं म्हणून मी तिथून सुरुवात केली.

शेवंता वेगळीच आहे

शेवंता ही काही खलनायिका अशी नाहीये. ती एक प्रवृत्ती आहे जिला पैसे, दागिने, चंगळ यांचा सोस आहे; पण तिला हे माहितीये की तिचा नवरा यांपैकी कशालाच पुरा पडू शकणार नाही. मग तिने अण्णांचा पर्याय शोधला आहे. याचा अर्थ ती कोणासाठीही उपलब्ध आहे का? तर तसंही नाही. ती अण्णांची प्रेयसी आहे. अण्णा अशी व्यक्ती आहे, की ते बायकोला कस्पटासारखं वागवतात, पण शेवंताने सांगितलं म्हणून कांदेही चिरतात, स्वत:चे कानही पकडतात. मालिकेतील ही गोष्टही बऱ्यापैकी मागच्या काळातली आहे. त्यामुळे तिचा शृंगारही साधाच आहे. शेवंताला शृंगारिक दाखवण्यासाठी कमी कपडे, अंगविक्षेप वगैरे काही करावे लागत नाही. याची तिला गरजही पडत नाही. पूर्ण साडी, दोन साध्या बांगडय़ा, कानात दोन रिंगा आणि गळ्यात साधं मंगळसूत्र अशा साध्या वेशातही ती केवळ नजरेतून अण्णांना खेळवते आहे. ती घरंदाज नाहीये, पण म्हणून ती रंगेल किंवा ‘चीप’ही नाहीये. आतापर्यंत शेवंता साकारताना त्या व्यक्तिरेखेचा एक बाज कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सगळीच दृश्यं ही अतिशय काळजीपूर्वक.. कुठेही तिच्या कपडय़ांचं भान सुटणार नाही, कुठेही ती अश्लील वाटणार नाही याची काळजी घेऊ नच चित्रित करण्यात आली आहेत. शेवंतासारख्या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला असतातच, हे या मालिकेमुळे भेटणाऱ्या लोकांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं आहे; पण म्हणून आम्ही तशा वागण्याचं समर्थन करतो आहोत, भलामण करतो आहोत, असं म्हणणं चुकीचं आहे. संपूर्ण मालिकेवरही कोकणची प्रतिमा बिघडवली, असा आक्षेप घेतला जातो. मात्र ही एक मालिका म्हणजे संपूर्ण कोकण नाही आणि त्यातून हा असा काही संदेश दिला जात नाही. मालिका या मनोरंजनासाठी असतात त्या केवळ मनोरंजनाच्या उद्देशानेच बघायला हव्यात.

चित्रपटसृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला – लिनल चौधरी

‘लोकसत्ता’चे खूप मनापासून आभार. कार्यक्रम खूप छान होता. मला ईशा आणि अपूर्वा या दोन्ही अभिनेत्रींच्या अनुभवातून अनेक गोष्टी समजल्या. यांच्यामुळे माझा या चित्रपटसृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांच्या प्रवासातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. जेवढे हे क्षेत्र वाईट आहे असं म्हटलं जातं तसं नाही हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.

बोल्ड आणि परफेक्ट

– अक्षा ओतावणेकर

दोन्ही अभिनेत्रींना जवळून बघता आलं, ऐकता आलं. अपूर्वाच्या बोलण्यातून तिने तिच्या भूमिकांसाठी स्वत:ला किती वाहून घेतलं आहे हे समजलं. शेवंता किंवा शनायासारखं बोल्ड पात्र साकारताना त्यामागे किती मेहनत आणि लक्ष द्यावं लागतं याचा अंदाज आला. बोल्ड आणि परफेक्ट अशा दोन्ही अभिनेत्री होत्या.

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं

– अथर्व कोठावळे

‘लोकसत्ता’मुळे आम्हाला दोन्ही सेलेब्रिटी अभिनेत्रींना जवळून बघता आलं, त्यांचे विचार समजले. आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची त्यांनी योग्य उत्तरं दिली. त्यांनी दिलेल्या उत्तरातून त्यांचा प्रवास तर उलगडलाच आणि त्यांची मेहनतही समजली. हा कार्यक्रम पुन्हा वसईत व्हावा, असं मला मनापासून वाटतं.

मोलाचा सल्ला – आदित्य घरत

कार्यक्रम खूप सुंदर झाला. दोन्ही अभिनेत्रींनी या क्षेत्रात येण्यासाठी खूप स्ट्रगल केला आहे. त्यांचा आजवरचा प्रवास सांगतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात येऊ  पाहणाऱ्यांसाठी अनेक टिप्स दिल्या. त्यांच्या अगदी उमेदीच्या कोळापासून ते आजपर्यंतचा कला क्षेत्राचा प्रवास समजला.

प्रवास महत्त्वाचा – सुभाष कदम

कार्यक्रमाला उशीर झाला, तरीही दोन्ही अभिनेत्री आमच्यासाठी एवढा वेळ प्रवास करून आल्या हे पाहून खरंच छान वाटलं. त्यांनी दिलेल्या प्रत्येक उत्तरातून आम्हाला अभिनय क्षेत्रातल्या अनेक गोष्टी समजल्या. शनाया अर्थात ईशाच्या बोलण्यातून तिचा पडद्यामागचा आणि सुरुवातीचा प्रवास समजून घेता आला. तिच्या कठीण काळातून ती कशी पुढे आली याची गोष्ट प्रेरणादायी होती.

संकलन : तेजश्री गायकवाड

First Published on August 16, 2019 12:59 am

Web Title: loksatta viva lounge isha keskar apurva appointed abn 97
Next Stories
1 गणेश वस्त्रांचे किमयागार
2 डिझायनर मंत्रा : व्यवसाय आणि फॅशनचा उत्तम मेळ – शंतनु निखिल
3 टेकजागर : जिओची पेरणी
X