News Flash

शिस्त आणि ध्यास हवा..

‘हंसगामिनी’ हा स्वत:चा साडय़ांचा ब्रॅँड यशस्वीरीत्या नावारूपाला आणणाऱ्या उद्योजिका म्हणूनही निवेदिता जोशी-सराफ यांची ओळख आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘धूमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’सारख्या मराठी चित्रपटांमधून लोकप्रिय अभिनेत्री म्हणून एकेकाळी रुपेरी पडदा गाजवणाऱ्या निवेदिता जोशी-सराफ या पुन्हा एकदा ‘झी मराठी’वरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या कुटुंबातील सदस्य बनल्या आहेत. रंगभूमी, दैनंदिन हिंदी आणि मराठी मालिका, चित्रपट, आकाशवाणी अशा सर्व माध्यमांत वावरणाऱ्या कलाकार म्हणून निवेदिता जोशी-सराफ हे नाव सुपरिचित आहे. मात्र त्याचबरोबर ‘हंसगामिनी’ हा स्वत:चा साडय़ांचा ब्रॅँड यशस्वीरीत्या नावारूपाला आणणाऱ्या उद्योजिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून निवेदिता यांच्याशी संवाद साधला रेश्मा राईकवार आणि चिन्मय पाटणकर यांनी..

रंगभूमीवरच रांगायला शिकले

मला समज यायला लागल्यापासून मी रंगभूमी आणि आकाशवाणी या माध्यमांशी जोडले गेले. माझी आई त्यावेळी आकाशवाणीमध्ये होती. मे महिन्याच्या सुट्टीत तिच्या कामाच्या ठिकाणी ती मला सोबत घेऊनच जायची आणि मग तेव्हा मला सांभाळण्याची जबाबदारी श्रीनिवास खळेकाका घ्यायचे. रेडिओवर ‘आपली आवड’ म्हणून कार्यक्रम लागायचा आणि त्याचं रेकॉर्डिग करताना मी तिथे असायचे. आमच्या घरी सुरेश भटांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम वगैरे होत असत. पाच-सहा वर्षांंची असताना मी ‘नभोवाणी’वर सादर होणाऱ्या एका नाटकात वाचन केलं होतं. पु. भा. भावे यांच्या ‘वैरी’ या कादंबरीचं नाटय़रूपांतर करून बाळ कुडतरकर यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्यात कमलाकर सारंग हे माझे वडील होते. एकाच वेळी सगळ्यांनी एका माइकभोवती उभं राहून आपापले संवाद म्हणायचे अशी तेव्हाची रेकॉर्डिंगची पद्धत होती. मी दहा वर्षांंची असताना ‘रंगलेखा’च्या ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकात छोटंसं काम केलं होतं. या सगळ्या संस्कारांतून मी घडलेली असल्यामुळे रंगभूमी मला आधीपासूनच खूप जवळची होती.

बालरंगभूमी ते एकांकिका

वि. स. खांडेकर यांच्या ‘अमृतवेल’ या कादंबरीचं नाटय़रूपांतर मधुसूदन कालेलकर यांनी केलं होतं. त्यात मी लहानपणी छोटंसं काम केलं होतं. त्यावेळी अगदी थकलेले वि. स. खांडेकर तालमी बघायला बसलेले असायचे. मधून मधून ते माझा अभ्यासही घ्यायचे. मला आठवतंय की त्यांना नीट दिसत नसतानाही माझ्या अक्षरांच्या वळणावरून माझं काय चुकलंय ते त्यांनी मला सांगितलं होतं. मी लहान असताना सुधा करमरकर यांची ‘लिटल थिएटर’ आणि रत्नाकर मतकरी यांची ‘बालनाटय़’ अशा दोन संस्था बालरंगभूमीवर कार्यरत होत्या. मी बालनाटकात काम करायचे, त्यावेळी बालनाटकांचे व्यवस्थित प्रयोग व्हायचे, दौरेही व्हायचे. नंतर मोठेपणी ‘या मंडळी सादर करू या’ अशा नावाचा एक ग्रुप आम्ही तयार केला होता. यात विजय केंकरे, अजित भुरे, लक्ष्मीकांत बेर्डे, सुहिता थत्ते, पुरुषोत्तम बेर्डे, प्रदीप मुळ्ये असे आम्ही सगळे एकत्र होतो. त्यावेळी एकांकिका करायची म्हणजे ज्याच्या घरी वॉशिंग मशीन आहे त्याच्याकडेच वेशभूषेतले सगळे कपडे धुवायला द्यायचे, तालमीला चहा जरी मागवायचा झाला तरी आधी पैसे मोजायचे, अशा सगळ्या टप्प्यांमधून आम्हीही गेलोय. तेव्हाच हे ठरलं की या व्यवसायातच काहीतरी करायचंय, नेमकं काय ते माहीत नाही, पण हेच आपल्याला आवडतंय याची जाणीव झाली होती.

टीव्ही ही इंडस्ट्री आहे..

मी मराठीपेक्षा हिंदी मालिका अधिक केल्या आहेत. १९८४ मध्ये मी ‘ये जो है जिंदगी’ नावाच्या सिटकॉममध्ये काम करत होते. शरद जोशी, जसपाल भट्टी, कुंदन शहा, रमण कु मार, मंजुल सिन्हा, शफी इनामदार अशी अनेक दिग्गज नावं त्याच्याशी जोडलेली होती. माध्यमांमध्ये बदल होत गेला तशी या इंडस्ट्रीशी जोडलेले अनेक समांतर व्यवसाय, रोजगार विकसित होत गेले. अगदी बॅकग्राऊंड डान्सर्सपासून ते कॅमेरामनपर्यंत आणि केटररपासून ते स्पॉटदादांपर्यंत अनेक लोक याच्याशी कायमस्वरूपी जोडले गेले. तसं म्हटलं तर कामाची अनिश्चितता सगळ्याच क्षेत्रांत आहे. मात्र एखाद्या अभिनेत्याचं करिअर जितकं अशाश्वत आहे, त्यापेक्षा तांत्रिक बाबी हाताळणाऱ्यांकडे अधिक निश्चिती आहे.

‘सासूबाई’ने घराघरात पोहोचवलं

‘अग्गंबाई सासूबाई’च्या गोष्टीतच वेगळेपणा आहे. मुळात माझ्या वयाशी साधर्म्य साधणारी एक स्त्री एका डेली सोपची नायिका असू शकते हा विचारच धाडसी होता. मला ‘आसावरी’ तिच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी भेटली, पण त्याआधी तिचं ५० वर्षांंचं आयुष्य काय पद्धतीने तिने घालवलं असेल याचं एक कॅरेक्टर स्के च मी तयार केलं आणि तिचा स्वभाव अंगी बाणवायचा प्रयत्न केला. वयाच्या या टप्प्यावर तिला कम्पॅनियनशिपची गरज भासावी आणि ‘शुभ्रा’सारख्या कोणीतरी तिच्या त्या भावनांची दखल घ्यावी ही गोष्टच खूप वेगळी होती. या मालिकेमुळे लोक मला त्यांच्या घरातलीच एक समजायला लागले. एकदा मला शूटिंगला जायला आधीच उशीर झालेला, मी गाडी चालवत होते आणि ट्रॅफिकमध्ये अडकले. एका बसच्या कंडक्टरने मला पाहिलं आणि मला शूटिंगला जायला उशीर होतोय म्हणून सगळ्या गाडय़ा नीट मागे घ्यायला सांगून मला जागा करून दिली. जाताजाता माझ्या गाडीचा दुसऱ्या गाडीला हलकासा धक्काही लागला आणि त्यानेही छानसं हसून ‘राहू दे’ म्हणत मला जाऊ  दिलं. अशा घटनांनी समाधान मिळतं आणि हीच आपल्या कामाची पावती असते.

भातुकलीसारखा संसार

मला मुळात लग्न वगैरे करायची कधी फारशी इच्छाच नव्हती, पण सालीवरून पाय घसरून पडतात तशी मी प्रेमात पडले आणि मग मात्र मी कसलाच विचार केला नाही. लग्न करेन तर याच व्यक्तीशी असं माझं ठरलं होतं. लग्न झाल्यानंतर मला माझ्या संसाराला, माझ्या घराला पूर्ण वेळ द्यायचा होता. भातुकलीमध्ये आपण जसे रमतो तसंच मला संसारात रमायचं होतं. त्यामुळे मी ठरवून या क्षेत्रापासून ब्रेक घेतला. माझ्या मुलासोबतच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार मला व्हायचं होतं. माझ्या मुलाने मी घरात नसताना पहिला शब्द उच्चारला आहे हे मला नको होतं. त्यामुळे मी माझ्या घराला माझा पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं. १९८४ ते १९८९ या काळात मी चित्रपट क्षेत्रात काम करत होते आणि त्या पाच वर्षांंत मी ३५ चित्रपट केले. जी १४ वर्षे माझ्या घराला आणि मुलाला मी दिली, त्या सगळ्या वेळात मी इंडस्ट्रीत होणारे बदल पाहत होते, समजून घेत होते, हे बदल स्वत:त भिनवू पाहत होते. हा वेळ मी जाणूनबुजून दिला असल्यामुळे मला त्यात काही वावगं वाटत नाही.

रंगभूमीचा अनुभव

मी नाटकात काम करत होते तेव्हा बऱ्यापैकी चांगल्या सोयी मिळायला सुरुवात झाली होती. नाटय़गृहांची संख्या, त्यांची स्थिती, प्रवासाची सोय, राहण्याची सोय अशा सगळ्याच बाबतीत सकारात्मक बदल होत होते. मात्र आपले खाण्यापिण्याचे, सवयींचे नखरे बाजूला ठेवून असेल तसं अ‍ॅडजस्ट करायची सवय मला नाटकांच्या दौऱ्यांमुळे लागली. ‘दुर्वाची जुडी’ आणि ‘प्रेमाच्या गावा जावे’ अशा दोन नाटकांत मी तेव्हा काम करत होते, ज्यांचे मिळून महिन्याला जवळजवळ ४५ प्रयोग व्हायचे. त्या काळात साधारणत: कलाकार एकावेळी एकाच माध्यमात काम करायचा. मी नाटकाच्या बरोबरीने एखाद-दुसरा कार्यक्रम करत होते, मात्र त्या दैनंदिन मालिका नव्हत्या. त्यावेळी होत्या त्या मालिका ‘सिटकॉम’ या प्रकारात मोडत होत्या, ज्याच्या प्रत्येक भागात त्याच व्यक्तिरेखा पण स्वतंत्र गोष्ट सांगतात. त्याची दोन तासांची शिफ्ट असायची किंवा जास्तीत जास्त ९ ते ६ अशी शिफ्ट असायची. त्यामुळे माझ्या नाटकाला त्याचा कधी त्रास झाला नाही. ब्रेकनंतर परत आल्यावर मालिकांच्या शूटिंगमधली घाई आणि चित्रपटांमधल्या सीन्सचं उलटसुलट क्रमाने होणारं शूटिंग यांचं मला दडपण वाटत होतं. पण नाटकाशी मी इतकी जास्त कम्फर्टेबल होते की मी नाटकानेच सुरुवात करायची ठरवली आणि ‘तुझ्या माझ्यात’ या नाटकात काम करू लागले.

मालिकांची चॅलेंजेस वेगळी

दैनंदिन मालिकांची शिफ्टच मुळात १३ तासांची असते. रोजचा एपिसोड रोज दाखवला जाणं आवश्यक असतं. कधी जास्त वेळाचा महाएपिसोड वगैरे असेल तर जास्त प्रेशर आणि जास्त काम! ‘दुहेरी’च्या वेळी माझा पाय फ्रॅक्चर झाला होता, मला बेडरेस्ट सांगितली होती, मात्र व्हीलचेअरवर बसलेली दाखवून का होईना, पण मला एक महिना शूटिंग करावं लागलं. एकता कपूरच्या एका सीरिअलच्या शूटिंगच्या वेळी काही तांत्रिक बिघाडामुळे आम्हाला शूटिंग थांबवावं लागलं आणि मग शूटिंग पुन्हा सुरू केल्यावर गेलेला वेळ भरून काढण्यासाठी सलग २६ तास शूटिंग करावं लागलं. एका हिंदी सीरिअलमध्ये माझं राजघराणं होतं. त्यामुळे भरपूर मेकअप, केसांना जड गंगावन, भरपूर नक्षीकाम असलेला पदर आणि तोही डोक्यावरून, असा सगळा जामानिमा करावा लागायचा. त्या पदराच्या वजनाने मला मानेचं दुखणं सुरू व्हायची वेळ आली. या सगळ्यामुळे मला ‘आसावरी’ जास्त सोपी वाटते आणि आवडते. त्यात मेकअप नाही, भारी कपडेपट नाही, दागदागिने नाहीत. त्यामुळे सगळं अगदी छान सहज सुरू असतं.

मॅरेथॉनची आवड

१९९२ पासून मी अगदी नियमितपणे जिमिंग करते. ‘पिरामल’चा ‘एक्झरसाइज फिजिओलॉजी’ हा कोर्स मी केला. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्विमर्स, रनर्स, स्प्रिंटर्ससाठी मी विनामूल्य डाएटिशियन म्हणून काम करत होते. वेट ट्रेनिंग बंद करून चालणं सुरू केलं त्यावेळी मी माझं डाएटसुद्धा प्रोटीन्सवरून कार्ब्सवर आणलं. त्या चालण्यातूनच मला ‘रनिंग हाय’ जाणवलं आणि मी रनिंगचा सराव करायला सुरुवात केली. पहिल्यांदा मी वसई-विरार मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. २१ किलोमीटरची ती मॅरेथॉन होती. माझे १५ किलोमीटर झाल्यावर माझ्या थाईजमधून ब्लीडिंग होत होतं आणि मला मॅरेथॉन सोडून द्यायची इच्छाही झाली होती. पण माझ्यापुढे ८५ वर्षांचे एक अंध सरदारजी शांतपणे धावत होते आणि त्यांना रस्ता सांगायला म्हणून जो हेल्पर होता त्याला एक हात नव्हता. त्यांच्याकडे बघून मला धीर आला, मी ती रन पूर्ण केली आणि माझ्या वयोगटात मी तिसरी आले.

‘हंसगामिनी’

व्यवसाय करणं ही काही माझी कल्पना नाही, हा काही माझा पिंड नाही. माझ्या नणंदेच्या मुलाचं लग्न होतं आणि तो स्वत: यूएसला असतो. मात्र सगळी खरेदी इथे होणार होती. त्यावेळी माझा एकंदरीत चॉइस बघून नणंदेच्या यजमानांनी मला साडय़ांचा व्यवसाय करण्याबद्दल सुचवलं. ज्यावेळी ब्रह्मपुत्रेला पूर आला होता तेव्हा तिथल्या ओरिसाच्या साडय़ा माझ्याकडे आल्या होत्या. नो प्रॉफिट, नो लॉसवर त्या विकायच्या होत्या. आलेल्या साडेतीनशे साडय़ांपैकी आम्ही ३४५ साडय़ा विकू शकलो. त्यानंतर साऊथला थेट विणकरांकडून साडय़ा विणून घेऊन मी विकायला सुरुवात केली आणि ‘हंसगामिनी’ची सुरुवात झाली.

निंदकाशी संसार!

माझ्याकडून माझ्या कामात ज्या चुका होतात, त्या सगळ्या मला घरातूनच कळतात. माझे पती अशोक सराफ नेहमीच माझ्या कामातल्या त्रुटी मला सांगत असतात. मात्र ते जितकं क्रिटीसाइज करतात तितकंच स्वत:बद्दल ऐकूनही घेतात. त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. स्वत:च्या हेल्थची काळजी घेणं, आपल्या कामावर संपूर्ण लक्ष देणं, कोणतीही गॉसिप्स न करणं, आपण काम करत असलेल्या क्षेत्राबद्दल आदराने बोलणं, वागण्यात प्रचंड शिस्तप्रिय असणं, संपूर्ण पॅशनने काम करणं अशा अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून अंगीकारल्या आहेत. माझ्या साडय़ांच्या ब्रॅंडचं नाव ‘हंसगामिनी’ हेही त्यांनीच ठेवलेलं आहे.

चिकित्सक वृत्ती आवडली

कार्यक्रम खूप सुंदर झाला. ‘व्हिवा’मुळे मला माझ्या आवडत्या अभिनेत्रीला जवळून पाहता आलं, ऐकता आलं. त्यांचा निवेदिता ते आसावरी हा प्रवास गप्पांमधून सहज आमच्यापर्यंत पोहोचला. त्यांची प्रत्येक गोष्टीविषयीची चिकित्सक वृत्ती मला फार आवडली. आसावरी या भूमिकेमुळे त्या आम्हा प्रेक्षकांच्या जास्त जवळ आल्या असल्या तरी त्यांचे आधीचे सर्व चित्रपट मला अजूनही आवडतात.

– प्रतीक्षा परुळेकर

मेहनतीचं महत्त्व पटलं

मी ‘व्हिवा लाउंज’ला पहिल्यांदाच आलो होतो. कार्यक्रमाचा अनुभव खरंच खूप उत्तम होता. एक अभिनेत्री म्हणून बाहेरून आणि आतून दोन्ही पद्धतींनी त्यांना प्रत्येक गोष्ट जपावी लागते हे समजलं. त्यांना भावनिकदृष्टय़ाही समजून घेता आलं. त्यांची चिकित्सक वृत्ती आवडली. बाहेरून ग्लॅमरस दिसणारं हे काम करताना किती मेहनत घ्यावी लागते हेही त्यांच्याकडून समजलं. आणि त्यामुळेच मला मेहनतीशिवाय फळ नाही हे उमगलं.

– ऋतुराज मिटकरी

अभिनय क्षेत्रातील करिअरची माहिती

माझं वय १३ वर्ष आहे. मला अगदी लहानपणापासून निवेदिता या अभिनेत्री म्हणून आवडतात. जुन्या काळातली अभिनेत्री असली तरी मी आवर्जून त्यांचे जुने चित्रपट बघितले आहेत. ‘व्हिवा लाउंज’मुळे मला त्यांच्याविषयी अनेक गोष्टी समजल्या. त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून शिकायला मिळालं. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असेल तर काय काय करावं हे त्यांच्या गप्पांमधून मला सहजरीत्या समजलं.

– सिमरन दळवी

आवडत्या अभिनेत्रीची भेट

निवेदिता यांची मालिका सुरू झाल्यामुळे मला पुन्हा एकदा माझ्या आवडत्या अभिनेत्रीला बघता येतं आहे. आसावरी या भूमिकेचा मी खूप मोठा चाहता आहे. माझ्या आवडत्या अभिनेत्रीला भेटायला मी लांबून आलो होतो. या कार्यक्रमामुळे मला ही संधी मिळाली.

– अशोक लाहरे

प्रभावित करणारं व्यक्तिमत्त्व

संपूर्ण गप्पांमधून त्यांच्या प्रत्येक वाक्यातून मला निवेदिता सराफ यांचं व्यक्तिमत्त्व समजत गेलं. पालक कसं सरसकट आमच्यासारख्या तरुण मुलांना गृहीत धरतात, एका दोघांमुळे सगळ्या जनरेशनला बोलतात. हे असं पालकांनी करू नये हे मला त्यांचं मत योग्य वाटलं. त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांत काम केलं आहे. एका माध्यमाचा उपयोग हा दुसऱ्या माध्यमात काम करताना कसा होतो हे समजलं. एवढय़ा व्यग्र जीवनातूनही त्या सगळे अपडेट ठेवतात, जनरल गोष्टींवरही त्यांचं लक्ष असतं हे जाणवलं. मोठय़ा गॅपनंतरही करिअर होऊ  ंशकतं हे त्यांनी आम्हा सर्व तरुण मुलीना दाखवून दिलं आहे.

– शीतल म्होप्रेकर

अभ्यासाची सवय लावली पाहिजे

मी नालंदा विद्यापीठात कथकली आणि मोहिनीअट्टम शिकले आहे. पण पायाला दुखापत झाली आणि ते सोडावं लागलं. नंतर मी गव्हर्मेन्ट कमर्शियल डिप्लोमा केला. कोणत्याही क्षेत्रात असू तरी अभ्यास सखोल व्हायला हवा ही आईची शिकवण आणि मोठय़ा बहिणीने मला लावलेली सवय होती. त्या सवयीमुळे ज्या ज्या भूमिका मी केल्या त्या प्रत्येक भूमिकेचं कॅरेक्टर स्केच काढण्याची माझी प्रवृत्ती तयार झाली, जिचा मला भूमिका प्रत्यक्षात आणताना प्रचंड उपयोग झाला. पण हीच वाचनाची आणि अभ्यासाची सवय पुढच्या पिढीला लावण्यात खरं तर आमची पिढीच कमी पडली. माझ्या आईने मला इंग्रजी पुस्तकं  वाचायचं कम्पल्शन केलेलं आणि ‘वाचलं’ असं खोटंच सांगून खपून जायचं नाही, कारण माझी आई मला मग त्याचा सारांश इंग्रजीतूनच लिहायला लावायची. इतकं कठोर होणं आमच्या पिढीला जमलं नाही आणि कदाचित म्हणूनच पुढची पिढी वाचत नाही, विचार करत नाही हा आरोप त्यांच्यावर करणं चुकीचं आहे.

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 4:10 am

Web Title: loksatta viva lounge nivedita saraf abn 97
Next Stories
1 टेकजागर : तंत्रसाक्षरतेचा संकल्प
2 फिट-नट : तुषार माने
3 जगाच्या पाटीवर : जाणिवांच्या सकारात्मकतेचा प्रवास
Just Now!
X