News Flash

नवी ‘फॅशन’दृष्टी

वैशाली शडांगुळे या मराठमोळ्या फॅशन डिझायनरशी मनमोकळा संवाद

वैशाली शडांगुळे

फॅशन म्हटल्यावर डोळ्यांपुढे येणारे नेहमीचे चमचणाऱ्या सेलेब्रिटींचे विश्व म्हणजेच केवळ फॅशन डिझायनिंग नाही. त्यापलीकडे ती एक कला आहे. नुसता फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून ती साधेलच असेही नाही. इथे घट्ट पाय रोवायचे असतील तर कलेतील सच्चेपणा महत्त्वाचा आणि त्यासाठी स्वत:मधील कलाकारावर विश्वास हवा.. ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये गेल्या आठवडय़ात

वैशाली शडांगुळे या मराठमोळ्या फॅशन डिझायनरशी मनमोकळा संवाद झाला आणि त्यामधून फॅशनविश्वाची अशी एक निराळी बाजू समोर आली. वैशाली एस. या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या लेबलमागची फॅशन डिझायनर देशातील आघाडीच्या फॅशन शोमधील एक महत्त्वाचे नाव झाले आहे. वैशालीबरोबर रंगलेल्या गप्पांमधून फॅशनकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळाली. त्या गप्पांची ही झलक..
vashali4

कारागिरांबरोबर राहून शिकते

जेव्हा हातमागावर काम करणाऱ्या कारागिरांसोबत राहून त्यांचं जीवन अनुभवते, नवीन गोष्टी शिकते. एक डिझायनर म्हणून मला आपल्या मुळांपर्यंत जायला मिळतं, त्यांचा अभ्यास करता येतो, हाच माझ्या कामातला बेस्ट पार्ट मला वाटतो. कारागिरांबरोबर त्या गावागावांमधून राहते तेव्हा, नेहमीच्या कामातून तो रिफ्रेशिंग ब्रेक ठरतो. आपल्याला वाटत असतं की, त्या कारागिरांना आपण काम देतोय आणि आपण मदत करतोय. प्रत्यक्षात तेच आपल्याला मदत करत असतात, खूप काही शिकवत असतात. त्यांच्याकडून नवीन शिकणं ही एक प्रोसेस आहे आणि ती मी मनापासून एन्जॉय करते.

फॅशन वीकसाठी तयारी हवीच

फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची एक निवड प्रक्रिया असते. तुमची डिझाइन्स, पोर्टफोलिओ पाठवावा लागतो. तुमचं काम तिथे सिलेक्ट झालं, तरीही त्यापुढची तयारी मोठी असते. त्यासाठी आपण उत्तम काम करत असल्याची खात्री स्वत:ला असली पाहिजे. जर त्या रॅम्पवरचं आपलं कलेक्शन नावाजलं गेलं तर ते बाजारात आणण्याची आपली आर्थिक क्षमता आहे का, हे तपासून पाहायला हवं आणि नसेल तर ती तयारीदेखील करायला हवी. केवळ उत्तम कलेक्शन सादर करून त्याला मागणी आल्यावर आपण त्याचा पुरवठा करू शकणार नसू तर त्या एका शोनंतर तुमचं नाव कुणाच्याही लक्षात राहणार नाही. तुमच्या कामात सातत्य असलं पाहिजे. फॅशन शोमध्ये सहभागी होताना सर्वागीण तयारी झालेली असली पाहिजे.

सर्जनशीलता आतूनच येते

फॅशन डिझायनिंग ही कला आहे. कलेची जाण, कलेचं अंग आतूनच असावं लागतं. क्रिएटिव्हिटी आतून येते. कौशल्य नंतर आत्मसात करता येतं. पण क्रिएटिव्हिटी असावी लागते. फॅशन डिझायनिंग शिकायचे सल्ले अनेकांनी दिले. मीदेखील लहान लहान इन्स्टिटय़ूटमधून फॅशन डिझायनिंग शिकण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळी फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. आणि मोठय़ा इन्स्टिटय़ूटमध्ये जाण्यासाठी वेळेचं आणि पैशाचं गणित जमत नव्हतं. मग माझा मीच अभ्यास चालू केला. प्रत्येक कॉलेजमध्ये काय शिकवतात त्याची माहिती काढून मी घरीच अभ्यास सुरू केला. स्टिचिंग, एम्ब्रॉयडरी अशा फॅशन डिझायनिंगशी निगडित सगळ्या गोष्टी माझ्या मीच शिकले. या सगळ्यातून मला आंतरिक समाधान मिळत होतं. पण हे शिकणं हा कौशल्याचा भाग आहे. क्रिएटिव्हिटी अशी कुठेही शिकवून मिळत नाही. ती तुमच्या आतूनच आली पाहिजे असं मला वाटतं.

सकारात्मकता ढळू दिली नाही

मुंबईबद्दल इथे येण्याआधी खूप ऐकून होते. एकटी मुंबईत कशी राहणार याबद्दल धाकधूक होती. काही प्रमाणात भीतीही होती, पण आपल्याला काय करायचंय याबद्दल मी पूर्णपणे ठाम होते. घाबरून परत मागे जाण्यापेक्षा मी मुंबईकडे जाणारा रस्ता स्वीकारला. मुंबईत मी आले तेव्हा एकटीच होते. राहायच्या जागेपासून सगळी सोय स्वतची स्वत करावी लागली. इथे काही लहान-मोठे जॉब्ज केले, पण याच शहराने मला मोठी संधी दिली. मी स्वत:चं स्वत शिकलेल्या फॅशन डिझायनिंगच्या जोरावर आणि अर्थातच माझ्यातल्या क्रिएटिव्हिटीच्या भरवशावर स्वत:चं अगदी छोटंस बुटिक एका उपनगरात सुरू केलं. या सगळ्या प्रोसेसमध्ये नेहमीच स्वागतार्ह वातावरण होतं, रेड कार्पेट होतं, असं अजिबात नाही. संघर्ष होताच. पण यात कधीही सकारात्मकता ढळू दिली नाही.

कलेक्शन रॅम्पवर येताना..

हातमागावरच्या खणाच्या कापडाचं माझं एक कलेक्शन रॅम्पवर आलं, पण जोपर्यंत त्याचा आर्थिकदृष्टय़ा फायदा कारागिरांना होत नाही तोपर्यंत त्याला भविष्यात वाव मिळणार नाही. आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रात अनेकविध प्रकारचं कापड विणलं जातं, मात्र त्याचं पद्धतशीर ‘मार्केटिंग’ करण्यासाठी आपणच पुढे आलं पाहिजे आणि ते अजून होत नाही. त्यामुळे आपण आपलं फॅब्रिक, आपली संस्कृती इतरांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतो आहोत.

टेलर आणि डिझायनर

कोणतंही कापड टेलरकडे द्या आणि डिझायनरकडे द्या तुम्हाला निर्मितीमधला फरक नक्कीच जाणवेल. टेलरनं शिवणकौशल्य आत्मसात केलेलं असतं. पण नावीन्य क्रिएटिव्हिटी असेलच असं नाही. डिझायनर काही लहान लहान बदल सुचवून त्याच कपडय़ाला वेगळा टच देऊ  शकतो. म्हणजे खिसाच शिवायचा असतो पण एखादा खिसा किंवा हाताच्या बाह्य़ा यातूनही डिझायनर क्रिएटिव्हिटी आणू शकतो. फॅशन डिझायनिंग हे सोल्युशन आहे. ती कौशल्याला पुढे नेणारी कला आहे.

पुन्हा विदिशा

विदिशासारख्या लहान गावात, वयाच्या अठराव्या वर्षी करिअरसाठी घरातून निघून जाणं ही गोष्ट समजून घेतली जाण्यासारखी नव्हती. मुलगी घरातून निघून गेली म्हणजे – ‘काहीतरी असेल, म्हणून पळून गेली असेल’ अशी चर्चा होते. हा समज मी खोटा ठरवला.  अनेक वर्षांनी विदिशामध्ये परत गेले, तेव्हा सगळ्यांना माझं कौतुक वाटलं. त्यांना अभिमान वाटला. घरातून ‘पळून गेलेली’ मुलगी एवढी यशस्वी होऊन परतेल अशी ना कोणाला अपेक्षा होती, ना कोणाला ते खरं वाटत होतं. तिथून निघून आले होते तेव्हा मी अक्षरश: कोणीही नव्हते आणि आता स्वत:ची एक ओळख, स्वत:चा ब्रॅण्ड, काहीतरी अस्तित्व घेऊन तिथे परत जाताना मलाही खूप आनंद होता आणि गावातल्या सगळ्यांनाही माझा अभिमान वाटला.

विदिशा ते मुंबई व्हाया बडोदा

विदिशामध्ये आम्हाला हवं तितक एक्स्पोजर नव्हतं. करिअर म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनीयर एवढय़ापुरतेच विचार मर्यादित होते. तिथे राहून मला काही वेगळं करायला मिळालंच नसतं. त्यामुळे मी १८ वर्षांची असताना न सांगता घराबाहेर पडले. विदिशा सोडलं आणि भोपाळला जाऊन पोहोचले. तिथे लहान-मोठे जॉब करत शिकले. थोडे पैसे साठवले आणि बडोद्यात जाऊन पोहोचले. तिथे एका इन्स्टिटय़ूटमध्ये मी शिकवत असे. इन्स्टिटय़ूटसाठी काही प्रेझेन्टेशन्स करायची होती. त्यानिमित्त मला मुंबईला जाण्याची संधी मिळाली. इथे मुंबईत मी केलेली प्रेझेन्टेशन्स सगळ्यांना खूप आवडली. त्यातूनच कॉन्टॅक्ट्स झाले आणि त्यामुळे मला मुंबईमध्ये नोकरीसाठी विचारणा झाली. मग थेट मुंबई गाठली.

स्वत:वरचा विश्वास खूप महत्त्वाचा

पहिलं बुटिक चालू केलं तेव्हासुद्धा मी मला जसं वाटतंय, जे डिझाइन सुचलंय, तसेच कपडे बनवत होते. ट्रेण्ड कुठला, कुठल्या फॅशनची हवा आहे आणि काय खपेल याचा विचार केला नाही. उलट माझी क्रिएटिव्हिटी माझ्या एकटीची आहे आणि तोच तिचा यूएसपी आहे, हे समजून क्वचित प्रवाहाच्या विरुद्धही जात राहिले. अनेकदा लोकांची बरीच बोलणी ऐकावी लागली. पण त्यातूनच मला कॉन्फिडन्स मिळत गेला. यातून महत्त्वाचं एक झालं, ते म्हणजे माझी वेगळी ओळख निर्माण झाली. त्यातून नवी कामं मिळत गेली. माझा स्वत:वर, माझ्यातल्या कलेवर विश्वास होता आणि त्यामुळेच मी पुढे जाऊ  शकले.

आपल्या संस्कृतीचा ठेवा

पैठणी किंवा बनारसी साडय़ांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या तारा असायच्या ही केवळ कथा नाही. आपल्याकडे अशा प्रकारच्या साडय़ा फार पूर्वी बनत होत्या. त्यावेळी त्या खूप महाग आणि मौल्यवानदेखील असत. मात्र हळूहळू हे बदलत बदलत सगळं डुप्लिकेट झालेलं आहे. आताच्या वेगवान जगण्यामध्ये हातमागावरच्या कापडाला मागणी नाही. कारण ते मेंटेन करावं लागतं. प्रत्येक वेळी त्याला इस्त्री करावी लागते. या सगळ्यासाठी आता कोणाकडे वेळ नसतो आणि म्हणून परदेशी कापडाला मागणी अधिक आहे. मात्र आपल्याकडचं हातमागावरचं कापड हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. त्याची किंमत अमूल्य आहे.

पहिलं काम चंदेरीवर

माझं काम पहिल्यापासून हातमागाच्या कापडावर होतं. त्या कापडाशी एक विशेष लगाव आहे. ‘चंदेरी’वरच मी पहिलं काम केलं होतं. हातानं विणलेले जूट वगैरे कापडातून काहीतरी वेगळं करायची आवड होती. मी पहिलं बुटिक सुरू केलं तेव्हाच कॉरसेट बनवत होते. भारतात त्यावेळी कॉरसेट ही संकल्पना फारच नवीन होती. ही पाश्चात्त्य डिझायनिंगची संकल्पना आहे. अंगासरशी घट्ट बसणारं हे डिझाइन. मी पाश्चात्त्य कॉरसेटची कॉपी न करता भारतीय शरीरबांध्याला लक्षात घेऊन कॉरसेट तयार केले होते आणि भारतीय कापडाचा वापर केला होता. तेव्हासुद्धा काहींनी त्याला रिजेक्शन दिलं, तर काहींनी काहीतरी नवीन आहे म्हणून त्याला अ‍ॅक्सेप्ट केलं. त्यानंतर मी बनवलेल्या ड्रेसेसमध्ये सुद्धा हे नावीन्य जपत राहिले. माझे कपडे लोक आवडीने घालत होते. त्यांच्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि वैशाली एस. ब्रॅण्डची ओळख निर्माण झाली.

ट्रेण्ड ओळखू नका, तो घडवा !

तुमच्या अवतीभवती लोक जे कपडे वापरतात, तुमची आई, आजी ज्या प्रकारचे कपडे वापरतात त्याकडे बघून तुम्हाला ट्रेण्ड ओळखावा लागेल. जे विणकर हातमागावर काम करतात, ते कुठे ट्रेण्ड बघतात? ते निसर्गातून प्रेरणा घेऊन फुलं, पानं, वेलबुट्टी काढतात. त्यामुळे ट्रेण्ड ओळखण्यापेक्षा तो तयार करायला शिका. पाश्चात्त्य देशांमध्ये जो कलर फोरकास्ट किंवा ट्रेण्ड फोरकास्ट हा प्रकार आहे, तोदेखील निसर्गाच्या प्रेरणेवरच अवलंबून आहे. त्यामुळे केवळ वेस्टर्न स्टायलिस्ट काहीतरी सांगतात म्हणून फॉलो करू नका. तुमचा देश वेगळा आहे, संस्कृती वेगळी आहे, हवामान वेगळं आहे आणि त्यामुळे तुमचे कपडे पश्चिमेकडील देशांपेक्षा वेगळेच असणार आहेत. त्यात नवनवीन ट्रेण्ड आणा. कोणत्याही वेस्टर्न ट्रेण्डचं अंधानुकरण करू नका.

फॅशन म्हणजे नक्की काय?

सोप्या शब्दात फॅशन म्हणजे कम्फर्ट विथ क्रिएटिव्हिटी! स्वत:च्या कल्पनेने जुन्याला नवीन टच देणं, लोकांची आवडनिवड आणि जीवनपद्धती ओळखून त्यानुरूप नवी डिझाइन्स बनवणं म्हणजे फॅशन आहे. आपण जे कपडे तयार करणार आहोत ते लोकांना आवडतील का आणि वापरायला प्रॅक्टिकली शक्य आहे का, याचा विचार करणं म्हणजे फॅशन डिझायनिंग आहे.

वैविध्यपूर्ण भारतीय फॅशन

भारतीय कपडे खूप कम्फर्टेबल आहेत. आपणच आपल्या पेहरावाविषयी अभिमान बाळगला नाही, तर कोणीच त्याला आपलंसं करणार नाही. वेस्टर्न आऊटफिटला आपण सहजतेनं आपलंसं करतो तसं भारतीय पेहरावाला का नाही? किती वैविध्य आहे आपल्या फॅशनमध्ये. भारताची एक अशी फॅशन नाही. प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आणि त्यानुसार त्यांचा पेहराव. पावला-पावलावर भाषा बदलते तशी फॅशनही बदलते. प्रत्येक राज्यात हातमाग आहेत. महाराष्ट्रात पैठणी, इरकल, खण, बंगालमध्ये जामदनी, मध्य प्रदेशात चंदेरी, गुजरातची बांधणी, आसाममध्ये मेखला चादर.. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. एक पाच-सहा मीटरचा कापडाचा तुकडा किती प्रकारानं आपण गुंडाळतो. साडी म्हटल्यावर तिचे कित्येक प्रकार येतात. या ड्रेपिंगचं पाश्चात्त्य जगाला अप्रूप असतं. साधेपणातलं एवढं वैविध्य त्यांच्याकडे नाही. आपल्या हवामानाला, आपल्या शरीरयष्टीला आपले कपडे जास्त सुसंगत आहेत.

स्वत:मधला आत्मविश्वास महत्त्वाचा

मराठी कुटुंबांतून फॅशन डिझायनर बनणाऱ्यांचं प्रमाण आधी कमी होतं. मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे. मुळात आपण हे करू शकू, असा विश्वास स्वत:वर असेल तर कोणत्याही क्षेत्रात कोणीही कितीही विरोध केला तरी आपण आपलं काम करू शकतो. आपल्या कल्पनाशक्तीवर आपला स्वत:चा विश्वास असणं गरजेचं आहे. तरच ती गोष्ट आपण दुसऱ्याला पटवून देऊ शकतो.

फॅशन म्हणजे ग्लॅमर नव्हे

बहुतेकांचा हा समज असतो की फॅशन इंडस्ट्री म्हणजे ग्लॅमर. मात्र केवळ ग्लॅमरसाठी या क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलांनी हा समज वेळीच दूर करावा. या चकचकीत दुनियेत आपला निभाव लागणार का, असं वाटायचंही कारण नाही, कारण तुमचं काम हेच तुमचं ग्लॅमर असेल! इथे दोन प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे कामासाठी काम करतात आणि दुसरं म्हणजे ग्लॅमरसाठी काम करतात. आपल्याला कोणत्या प्रकारचं आणि कशासाठी काम करायचंय हे आपण ठरवायचं आहे. ते एकदा ठरलं की, बाकी कशाची भीती, संकोच बाळगायचं कारण नाही. स्वत:च्या कामावरचा विश्वास हीच मोठी गोष्ट आहे.

.. अन् डिझायनिंगची पदवी मिळाली

फॅशन डिझायनर म्हणून अकरा र्वष मी काम करत होते. वैशाली एस. नावानं दोन बुटिक कांदिवलीला आणि एक बांद्रय़ाला सुरू होतं. व्यवसाय यशस्वीपणे चालला होता. पण मनात एक खंत होती. आपण फॅशन डिझायनिंगचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही, हे कुठेतरी मनात होतं. ते शिकायची खूप इच्छा होती. २००९ मध्ये दिल्लीला जाऊन मी फॅशन डिझायनिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. त्यांच्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होऊनदेखील इन्स्टिटय़ूटमध्ये मला प्रवेश नाकारला गेला. म्हणजे इंटरव्ह्य़ूमध्ये मला सांगण्यात आलं की, एवढा यशस्वी उद्योग, घर, लहान मुलगी हे सगळं सांभाळून तुम्ही हा पूर्ण वेळेचा कोर्स पूर्ण करू शकणार नाही. उगाच जागा अडवू नका, ही त्यांची भूमिका होती. पण मी ठाम होते. मी त्यांना माझ्या शिक्षणाची आस त्यांच्या लक्षात आणून दिली आणि मला अ‍ॅडमिशन मिळाली. सुरुवातीला ते सगळं बऱ्यापैकी वेगळं वाटलं. मला कॉम्प्युटर फारसा वापरता येत नव्हता. मी आत्तापर्यंत हातानंच डिझाइन्स करायचे. इथे सगळं कॉप्युटरवर. थोडं जड गेलं. पण माझ्या हातानं केलेल्या डिझाइन्सनादेखील अ‍ॅप्रिसिएशन मिळत गेली. मी काही फक्त ग्रेडसाठी कोर्स करत नव्हते. ज्ञान मिळवायचं होतं. या काळात मी खूप वाचन केलं. सखोल अभ्यास केला आणि मला खूप काही नवीन मिळालं.

यूज अ‍ॅण्ड थ्रो

यूज अ‍ॅण्ड थ्रो ही मुळात भारतीय संस्कृती नाही. आपल्याकडची माणसं सर्व गोष्टी जपून ठेवणारी आहेत. एखाद्या वस्तूचा पुरेपूर उपयोग अर्थात ‘ऑप्टिमम युटिलायझेशन’ ही भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे हातमागावरची चंदेरी, खादी, पैठणी, बनारसी, खण इत्यादी कापड आपण जपून वापरत असू. त्यांची काळजी घेत असू. मात्र या फास्ट लाइफने आपल्याला आपल्या कपडय़ांकडे इतकं लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.

रिसर्च करा

भारतातल्या हातमागावरच्या कापडावर काम करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसर्च करा. कुठे काय बनतं, कसं बनतं, कशासाठी वापरलं जातं या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या. आपल्याकडे हातमाग ६ मीटरचे असतात. त्यामुळे त्या कारागिरांना फक्त सहावारी, पाचवारी साडय़ाच माहीत आहेत. त्यात तुम्हाला स्वत:ला काय वेगळं करता येईल त्याचा विचार करा. दर पंचवीस किलोमीटरवर साडी नेसायच्या पद्धतीत थोडा थोडा बदल होत गेलेला दिसेल. त्यातून तुम्हाला काही नवीन सापडतंय का ते बघा. त्यावर काम करा जे अजून समोर आलेलं नाही. त्यासाठी गावागावात जा, कारागिरांकडून शिकून घ्या आणि मग त्यावर विचार करा.

स्वत:चं लेबल की, ब्रॅण्डसाठी काम?

फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतल्यानंतर जर अनुभव घेण्याची संधी मिळत असेल तर तिचा पुरेपूर फायदा घ्या. इंडस्ट्रीमध्ये काम नक्की कसं होतं, डिझायनर्स कसं काम करतात ते प्रत्यक्ष पाहायला, शिकायला मिळत असेल तर ती संधी सोडू नका. तुमच्याकडे स्वत:ची कल्पनाशक्ती आहे, सर्जनशीलता आहे, मात्र कामातली कौशल्ये नसतील तर त्यातून ‘परफेक्ट’ काम होत नाही. कामाचा अनुभव असेल तर आपले कष्ट, कापड, पैसा सगळंच वाया जाण्याची शक्यता कमी असते. ब्रॅण्डसाठी काम करताना ज्या डिझाइनची कल्पना करताय ते कागदावर आणि तिथून हँगरवर कसं आणायचं हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. कोणत्या डिझायनरकडे किंवा कोणत्या ब्रॅण्डमध्ये इंटर्नशिप करताय हेसुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचा इंटरेस्ट आणि तुमची वर्कप्लेस हे जुळणं गरजेचं आहे.

जेव्हा आपण क्रिएटिव्हिटीला कौशल्याची जोड देतो तेव्हा आपल्या कामात चुका कमी होतात. जेव्हा तुम्ही कामाचा अनुभव घेऊन इंडस्ट्रीमध्ये येता तेव्हा काम नक्की काय पद्धतीने करायचं हे तुम्हाला माहीत असतं, किती विविध प्रकारचं काम असतं ते तुम्हाला माहीत असतं. त्यामुळे स्वत:च्या चुकांमधून शिकत, ठेचकाळत पुढे जाण्याची गरज पडत नाही. स्वत:च्या चुकांमधूनही माणूस शिकतो पण त्यात वेळ, पैसा, कष्ट अशा अनेक गोष्टींचं नुकसान होतं. कामाचा अनुभव असेल तर हे सगळं टाळता येऊ  शकतं.

फॅशनमुळे कॉन्फिडन्स नव्हे तर कॉन्फिडन्समुळे फॅशन!

फॅशनेबल किंवा स्टायलिश कपडय़ांच्या वापराने कॉन्फिडन्स वाढतो हा फक्त गैरसमज आहे. याउलट तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यात जर तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकत असाल तर ती आपोआप फॅशन ठरते. तुम्हाला ते कपडे कॅरी करता येत असतील, वावरायला सोपे असतील तर तुम्ही आपोआप कॉन्फिडन्ट होता. वावरतानाचा आत्मविश्वास, सहजता आणि आपल्याला शोभून दिसते आहे हा विश्वास म्हणजेच फॅशन.

धाग्यातून मिळते दिशा

तुम्ही ज्या कपडय़ावर काम करत आहात, त्याच्यासोबत तुम्हाला राहावं लागेल. त्याची जडणघडण जवळून बघावी लागेल, त्याच्याशी स्वत:ला जोडून घ्याल,  तेव्हा आपोआप तुम्हाला त्यापासून नवीन कलाकृती घडवण्याची प्रेरणा मिळेल. निदान मी तरी या कापडय़ाच्या धाग्यातून मिळालेल्या प्रेरणेनुसार काम करते. फॅब्रिक गिव्हज मी डायरेक्शन. म्हणूनच माझं पहिलं कलेक्शन मी चंदेरीमध्ये केलं होतं. चंदेरी मध्य प्रदेशची. ती मी लहानपणापासून पाहात आले होते. कपडय़ासोबत जगायला शिका, आपसूकच नवनवीन कल्पना सुचतील.

फॅशनचा माग

मुळात फॅशन म्हणजे काय किंवा फॅशन डिझायनर म्हणजे कोण, तो नक्की काय करतो.. या कशाची माहिती मला लहानपणी नव्हती. मध्य प्रदेशातल्या विदिशामध्ये माझं लहानपण गेलं. विदिशा तसं लहानसं शहर. त्यामुळे हे फॅशन वगैरेचं जग आमच्यापासून फार लांब होतं. या सगळ्याबद्दल फारशी माहिती नव्हती. पण आयुष्यात काही तरी वेगळं करायचं हे नेहमीच माझ्या डोक्यात होतं.. अगदी लहानपणापासून. लहानपणी आई एखादा फ्रॉक आणून द्यायची तेव्हा त्यावर काही नक्षीकाम करत किंवा काही वेगळं करून घ्यायची माझी धडपड असायची. मी माझ्या पद्धतीने फ्रॉक शिवून घ्यायचा प्रयत्न करायचे. फॅशन डिझायनिंग हे असं आतून आलं. तसं माझं औपचारिक फॅशन डिझायनिंगचं शिक्षण झालं नव्हतं. मी सायन्स ग्रॅज्युएट. नोकरी करता करता शिकले. नंतरही छोटय़ा छोटय़ा नोकऱ्या करत राहिले. एका ठिकाणी नोकरी करायचे तेव्हा, तिथे येणाऱ्या उच्चभ्रू स्त्रियांना फॅशनविषयक जाता जाता एखादा सल्ला द्यायचे. तू हे असं घाल, या कापडाचा असा ड्रेस चांगला दिसेल वगैरे वगैरे.. हे असे सल्ले लोकांना आवडायचे. पटायचे. त्यातूनच फॅशनविषयी उपजत आवड पुढे आली.

ओरिजिनॅलिटी महत्त्वाची

फक्त कोर्स केलात आणि तुम्ही डिझायनर झालात असं कधीही होऊ  शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. कॉलेज, सिलॅबस या सगळ्यापलीकडे जाऊन स्वत:ला डेव्हलप करायला पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान मिळवायला हवं. कोर्समध्ये शिकलेल्या टेक्निकल गोष्टी प्रत्यक्ष कामात नक्कीच उपयोगी पडतात. काम सोपं होतं. पण मुळात क्रिएटिव्हिटी असावीच लागते. ती आतून यावी लागते. कोणतंही चांगलं काम करण्यासाठी ‘ओरिजिनालिटी’ खूप महत्त्वाची असते. मी सगळं नवं केलं, असं नाही. असं करकरीत नवं काहीच नसतं. जुन्याची प्रेरणा असते. पण त्यात तुमच्या क्रिएटिव्हिटीचं नावीन्य असावं लागतं. आपण दोन-तीन ‘इन्स्पिरेशन्स’ घेऊन फेरफार करून समोर ठेवलंत तर ते ओरिजिनल म्हणता येणार नाही. सगळ्यांपेक्षा वेगळं घडवायचं असेल तर ते खरं पाहिजे, आतून आलेलं पाहिजे, तरच ते लोकांपर्यंत पोचेल आणि त्यांना आवडेल.

केवळ परदेशी शिक्का
vaishali-1
आपल्याला हँडलूम आवडत नाही, पण शिफॉन आवडतं. त्याचं मूळ कारण म्हणजे त्याच्यावर ‘इम्पोर्टेड’ हा शिक्का असतो. उद्या आपलं धोतर जर कोणा परदेशी डिझायनरने रॅम्पवर आणलं आणि परदेशी कंपनीने बाजारात आणलं तर नवीन ‘फॅशन स्टेटमेंट’ म्हणून आपण ते वापरू. जीन्स खरं तर फार कम्फर्टेबल नसते. घट्ट असते, त्यात खाली बसता येत नाही, पण तरीही आपण डेनिम्स वापरतो. कारण ‘वेस्टर्न आउटफिट’ आणि त्याचा ट्रेण्ड आहे म्हणून.

फॅशन म्हणजे आधुनिकता आणि आधुनिकता म्हणजे पाश्चात्त्यांचं अनुकरण हे समीकरण साफ चूक आहे. आपली संस्कृती, हवामान, शरीरयष्टी वेगळी तशी फॅशनही वेगळीच असली पाहिजे. किती बाहेरचं घ्यायचं आणि किती आपलं वापरायचं ते आपणच ठरवायचं.

-वैशाली शडांगुळे
vaishali2

आपल्या देशात प्रत्येक राज्याचे हातमाग आहेत. त्यातल्या कापडाची वैशिष्टय़ं वेगवेगळी आहेत. त्यातलं सौंदर्य वेगवेगळं आहे. ही कला जपली पाहिजे आणि त्यासाठी सरकारकडूनही पाठिंबा मिळणं आवश्यक आहे. हातमागावरचे खण शोधण्यासाठी मी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात सगळीकडे फिरले. शेवटी अगदी सीमेजवळच्या गावात खण विणणारे केवळ दोन माग सापडले. अस्सल हँडलूमचे खण विणणारी केवळ दोन कुटुंब शिल्लक आहेत. या विणकरांना सपोर्टची गरज आहे. त्यांचं काम राज्यापलिकडे जायला हवं.
-वैशाली शडांगुळे

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर, प्राची परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 1:15 am

Web Title: loksatta viva lounge with fashion designer vaishali shadangule
टॅग : Fashion
Next Stories
1 गाइज अ‍ॅण्ड अदरवाइज : प्रेमाचा फुलटॉस
2 फॅशनची परिभाषा उलगडली..
3 Wear हौस : स्लिट का तडका
Just Now!
X