19 September 2020

News Flash

आरोग्यक्षेत्रातील सहकारी

जगाच्या पाटीवर

|| अन्वया जोगळेकर

मी सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटलमधून ‘बॅचलर्स ऑफ फिजिकल थेरपी’चं शिक्षण घेतलं. त्यानंतर भारतातच मास्टर्स करावंसं वाटत होतं. पण आपल्याकडे फिजिओथेरपीबद्दल (भौतिक चिकित्सा) तितकीशी जागरूकता आलेली नाही. शिवाय अद्ययावत तंत्रज्ञानही उपलब्ध नाही. फिजिओथेरपीची गरज आहे, ही गोष्टच लोकांनी अद्याप स्वीकारलेली दिसत नाही. डॉक्टरांनी सांगितल्यावरच रुग्ण फिजिओथेरपी घ्यायला येतात. स्वत:हून येणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. अमेरिकेत हे मुद्दे दिसत नाहीत. इथे लोकांना फिजिओथेरपीबद्दल माहिती आहे. लोक उपचारांसाठी येतात. शिवाय आपल्याकडे या क्षेत्रात यायचं कारण त्या विद्यार्थ्यांला एमबीबीएस मिळालेलं नसणार, असंच समजलं जातं. तसं अमेरिकेत नाही. तिथे एकूणच काम करण्याला योग्य तो मान दिला जातो, तसा तो फिजिओथेरपी क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही मिळतो. कामाचे तास ठरलेले असतात. कार्यालयीन नियम पाळले जातात. ऑस्ट्रेलियामध्ये स्पोर्ट्स फिजिओथेरपीला चांगला वाव असला तरी मला ते करायचं नव्हतं.

भारतातलं शिक्षण संपल्यावर लगेचच मला इथे यायचं असल्याने त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. तेव्हा मी एण्ट्रन्सशिप करत असल्याने माझ्याकडे गुणपत्रिका वगैरे आवश्यक कागदपत्रं नव्हती. त्यामुळे लगेच देण्यासाठी म्हणून प्रोव्हिजनल सर्टिफिकेट्सची जुळवाजुळव करावी लागली. कन्व्होकेशन झाल्यानंतरच डिग्रीचं सर्टिफिकेट मिळतं, त्यामुळे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. काहीजण ही धावपळ आणि खर्च टाळण्यासाठी वर्षभर थांबतात. मला तसं करायचं नव्हतं. मी फक्त याच विद्यापीठात अर्ज केला होता. घरी आई थोडीशी नाराज होती. मी भारतातच शिकावं, परदेशात गेल्यावर मुलं परतत नाहीत वगैरे गोष्टींचा विचार ती करत होती. त्यामुळे मीही इतरत्र अर्ज केला नव्हता. इथे प्रवेश मिळाला नसता तर आपल्या सीईटीचा अभ्यास सुरू करणार होते. सुदैवाने ‘लोमा लिंडा युनिव्हर्सिटी’मध्ये ‘ट्रान्झिशनल डॉक्टरेट ऑफ फिजिकल थेरपी’ या दीड वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. या विद्यापीठाबद्दल माझ्या महाविद्यालयातील सीनिअर्सकडून कळलं होतं. येथे येण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही ‘इम्पोरियल ओव्हरसीज’ या संस्थेची मदत घेतली होती. अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांपैकी हे एक विद्यापीठ आहे. इथला खर्च खिशाला परवडणारा आहे. परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी असणाऱ्या मार्गदर्शनपर वर्गाचा खूप उपयोग होतो. प्रवेशप्रक्रियेमधले बरेच बारकावे किंवा गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. या वर्गातील अनेक मॉक व्हिसा इंटरव्ह्य़ूजना सामोरी गेल्याने माझी फायनल इंटरवूासाठी चांगली तयारी झाली.

इथे येताना विमानात थोडासा ताण आला होता. नशिबाने पाल्र्यातील आम्ही तीन मैत्रिणी एकत्र आलो. इथली नीरव शांतता आणि मुंबईतला कलकलाट या दोन टोकाच्या गोष्टी लगेच जाणवल्या. त्यामुळे पहिले दोन-तीन दिवस झोप लागत नव्हती. जणू कानाला दडा बसला आहे आणि ऐकू येत नाही, असं वाटायचं. पहिल्या दिवशी आईला फोन करून बऱ्यापैकी रडारड झाली होती माझी. स्वयंपाक फारसा येत नसल्याने ‘रेडी टू इट’ आणलं होतं येताना, तर काही दिवस तेच खाल्लं. जेटलॅगचा परिणाम जाणवला होता. इथल्या शांततेत रुळायला आणि संस्कृतीची तोंडओळख व्हायला वेळ लागला. इथे काही बाबतीत खूप मोकळेपणा आणि काही बाबतीत खूप सनातनी आहेत. इथले काही लोक धार्मिक श्रद्धेपोटी मांसाहार करत नाहीत. त्याचा फायदा मला झाला. ऑन कॅम्पस शाकाहारी खाणं मिळतं. ऑफ कॅम्पस जेवताना फार हाल होतात, सतत दक्ष राहावं लागतं. सुदैवाने ऑन कॅम्पस राहायची सोय झाली. दोन विद्यार्थ्यांमध्ये रूम शेअर केली जाते. डॉर्मेटरीसारखी पद्धत असल्यामुळे लॉण्ड्री, साफसफाईसारख्या कामांमधला वेळ वाचतो.

पाल्र्यातल्या आम्ही मैत्रिणी मी, शाल्मली सूरकर, सायली कंटक आणि रत्नागिरीची राधा जोशी अशा रुममेट म्हणून राहतो. जमतील तसे सणवार साजरे करतो. दिवाळीत मैत्रिणीच्या आईने पाठवलेलं कंदील लावलं होतं. संक्रांत लॉस एंजेलीसहून तिळगूळ आणून साजरी केली. डॉर्मेटरीमध्ये खूप भारतीय राहतात. शिवाय नायजेरिया, ब्राझील, कोरियन, ऑस्ट्रिया आदी देशांतील विद्यार्थ्यांचीही ओळख झाली. धर्म, जात आदी गोष्टींवरून कोणताही भेदभाव नसतो. भोवताली माणसांचा वावर असणं महत्त्वाचं ठरतं. सार्वजनिक वाहतूक ठरावीक काळ असल्याने स्वत:ची गाडी नसेल तर टॅक्सी मागवायला लागते. मात्र टॅक्सीने फिरणं खूप महाग पडतं.

मला किंचित भीती वाटत होती की, प्राध्यापकांचे खूप जलद उच्चार मला कळतील का? आपल्याला एवढं जलद इंग्रजी ऐकायची सवय नसते. पण ती भीती त्यांचं बोलणं ऐकून लगेच मावळली. प्राध्यापकाशी संवाद साधता येतो. ते चांगल्या रीतीने शंकानिरसन करतात. इथली शिकवण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा विचार करून लेक्चर्समध्ये योग्य ते ब्रेक्स दिले जातात. प्रॅक्टिकलवर भर असतो. थिअरीचा रट्टा मारावा लागत नाही. प्रॅक्टिकल परीक्षांमध्ये प्रॅक्टिकलच विचारलं जातं. रुग्णांशी कसं बोलत आहात, त्यांना कसं वागवत आहात वगैरे विद्यार्थ्यांच्या कृती काटेकोरपणे पारखल्या जातात. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार प्रॅक्टिकल केल्यास गुण मिळतात. भारतात प्रॅक्टिकलच्या वेळी एक अस्पष्टसा तणाव असायचा, तो इथे नसतो. ई-बुक्स मिळाल्यावर सुरुवातीला वाटलं होतं की, अशी ई-बुक्स वाचण्याची सवय नाही आपल्याला, तर कसं वाचणार? पण मला ते लवकर जमलं. इतकं की, पहिल्या तीन महिन्यांनी घेतलेल्या परीक्षेत आमच्या बॅचमध्ये मी टॉपमध्ये आले. या सुयशाबद्दल मला डीनचं सर्टिफिकेटही मिळालं. आम्हाला प्रेझेंटेशन करायची असतात. ती मी करू शकेन, असा आत्मविश्वास वाटत नव्हता. पण मी ते सादरीकरण चांगलं केलं. प्रत्येकाला वेगवेगळे विषय दिले होते आणि कुणी कुणाला जोखत नव्हतं. शांतपणे दुसऱ्याचं बोलणं ऐकलं जात होतं. त्यामुळे साहजिकच भीती वाटणाऱ्यांचा आत्मविश्वस वाढायला मदत झाली. इथे मार्क्‍स ई-मेलवर पाठवले जातात. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात एक मुद्दा मांडला होता, ‘किसीकी खामियाँ नोटीस बोर्ड पर लगाकर क्यूँ एक्स्पोज करते है..’ त्याची आठवण झाली आणि इथे ती पद्धत नाही त्यामुळे समाधानही वाटले.

संशोधनावर भर असणारं शिक्षण इथे दिलं जातं. एखादी पद्धत परिणामकारक आहे, हे सिद्ध झालेलं असेल तरच ती रुग्णासाठी वापरता येते. आपल्याकडे काही मशिन्स आजही वापरली जातात, इथे त्यावर बंदी आहे. प्रॅक्टिकलसाठी मात्र इथे तितका वाव मिळत नाही. आपल्याकडे पालिका रुग्णालयातील रुग्णांवर ज्युनिअर फिजिओथेरपिस्टना (शिकाऊ  भौतिकोपचारतज्ज्ञ) उपचार करायला मिळतात. रुग्णांच्या आजार आणि त्यावरील उपचारांत विविधता आढळते. इथे परवाना नसल्यास कोणत्याही रुग्णाला हात लावू शकत नाही. योग्य मार्गदर्शनाखाली रुग्णाला बघता येतं. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल रुग्णांवर नव्हे तर वर्गमित्रांवर करावं लागतं. मला ऑन कॅम्पस रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली आहे. त्यासाठी सोशल सिक्युरिटी नंबर असणं आवश्यक होतं. तो घ्यायला किंवा अन्य व्यावहारिक कामांसाठी सॅन बर्नाडिनोला जावं लागतं. तेव्हा थोडीशी भीती वाटते. कारण तिथले होमलेस लोक चोरी-लूटमार करतात, असं ऐकिवात आहे. तिथे रस्त्यानं चालणारे लोक कमी असतात. मदतीला हाक मारली तर येणार कोण?

रिसर्च असिस्टंट म्हणून मिळणाऱ्या मानधनात हॉस्टेलचा खर्च भागतो. सुरुवातीच्या काळात शिक्षण आणि नोकरी या दोन्ही गोष्टी साधणं कठीण गेलं. पण पाण्यात पडलं की पोहता येतं असं म्हणतात, तसं नंतर या गोष्टी साधता यायला लागल्या. झोप, जेवण, अभ्यास, काम वगैरे चक्रात फिरताना वेळेचं व्यवस्थापन करावंच लागतं. घरच्यांची किंमत पुन्हा अधोरेखित झाली. काही खाद्यपदार्थ यूटय़ूबवर बघून आणि स्वत: डोकं लढवून शिकले. चौघीजणी एकत्र किंवा आलटूनपालटून स्वयंपाक करतो. इथे राहून आम्ही स्वावलंबी झालो. दुसऱ्याकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत, हे शिकलो. सोबत असणाऱ्या मैत्रिणींची मदत खूप झाली मला. त्यांच्या सहकार्याविना मी पुढे जाऊ  शकले नसते. तसं सहकार्य आणि पाठिंबा सगळ्यांना मिळेल असं नाही. त्यामुळे सतत सजग राहाणं गरजेचं आहे.

कोण म्हणतं की, भारतातच आई-वडिलांना एकटं राहायला लागतं; कारण त्यांची मुलं अमेरिकेत असतात. अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकसुद्धा एकटेच राहतात. कारण त्यांची मुलं त्यांच्या देशात असूनसुद्धा त्यांच्यापासून हजारो मैल लांब असतात. या अशाच एका आजी-आजोबांनी मला फॅमिली म्हणून अ‍ॅडॉप्ट केलं. ही लोमा लिंडा युनिव्हर्सिटीची एक खूप छान आणि वाखाणण्याजोगी पद्धत आहे. आमच्यासारख्या आई-बाबा आणि आजी-आजोबांपासून दूर राहणाऱ्या मुलांसाठी यापेक्षा चांगलं काय असू शकतं? एवढंच नाही तर आम्हाला ते त्यांच्या सणावाराला त्यांच्या घरी बोलावतात आणि आमच्यासोबत तो सणवार साजरा करतात. मला आठवडय़ातून दोनदा लेक्चर्स असतात. बाकीचे दिवस अभ्यासाला, असाईनमेंटला आणि इतर अक्टिव्हिटीजना वेळ मिळतो. इथल्या जिममध्ये बॉलीवूड वर्कआऊट असतो. मोठा  स्विमिंगपूल आहे. स्क्वॉश, टेनिस, बॅटमिंटन आदी अनेक खेळांची साधनं आणि काही फनगेम्सही उपलब्ध आहेत. इथे समोरच्या माणसांशी विशेषत: रुग्णांशी सहृदयतेनं वागावं, अशी अपेक्षा असते आणि ते शिकवलंही जातं. रुग्णांकडून डॉक्टरांबद्दल फीडबॅक देणारा फॉर्म भरून घेतला जातो. इथली लायसन्स परीक्षा (परवाना)- ‘नॅशनल फिजिकल थेरपी एक्झामिनेशन’ ही परीक्षा खूप कठीण समजली जाते. प्रत्येक राज्याचा परवाना क्रमांक वेगळा असतो, पण परीक्षा सगळ्यांची सारखी असते. त्यातही प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाते. इथले आरोग्यसेवेबद्दलचे कायदे अत्यंत कडक आहेत. आमच्या परीक्षेत त्यावरही प्रश्न विचारले जातात. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची कुवत सिद्ध होते. ही परीक्षा देण्यासाठी भारतातील अभ्यासक्रमातले गुण आणि या विद्यापीठातील परीक्षांत मिळणारे गुण यांची समकक्ष पडताळणी होऊन विद्यार्थ्यांला या परीक्षेला बसता येतं. केवळ परीक्षा देऊन काम सुरू करता येत नाही. तर त्या त्या राज्यांमधले याविषयीचे नियम, व्हिसामधल्या अटींनुसार विविध तांत्रिक बाबींची पूर्तता होणं आवश्यक असतं. पुढे पीएच.डी. आणि नोकरी करायचा विचार आहे. त्यासाठी गुणसंख्या चांगली लागते आणि स्पर्धा अगदी तगडी आहे. विश मी लक!

कानमंत्र

  • अर्ज करणं, कागदपत्रांची पूर्तता करणं आदी गोष्टींमध्ये वेळ ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. वेळेचं व्यवस्थापन करायला शिका.
  • स्वावलंबी होण्याची मानसिक तयारी भारतातून निघतानाच करून या.

शब्दांकन – राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 12:05 am

Web Title: loma linda university
Next Stories
1 जरा खोलात जाऊ..
2 ओळख न्यू यॉर्क फॅशन वीकची!
3 दार्जिलिंगची सफर
Just Now!
X