22सलवार कमीझचं नाव घेताक्षणी नव्या पिढीच्या कोणत्याही फॅशनप्रेमी तरुणीच्या डोक्याला आठय़ा येणं सहाजिकच आहे. आईच्या कपाटातले ते ढगळ सलवार कमीझ घालण्यासारखं दुसरं दु:ख नाही. ‘नुसतं खात बसून कमरेचे टायर बनवायचे आणि ते झाकायला सलवार सूट्स घालायचे’, असं काहीसं मत या सलवार कमीझबद्दल असतं. पण गेल्या काही दिवसांपासून फॅशन स्ट्रीटपासून ते हाय एण्ड फॅशन स्टोअर्सपर्यंत प्रत्येक ठिकाणी पायघोळ कुर्ता आणि स्ट्रेट फिट सलवार दिसू लागली आहेत. जुन्या सलवार कमीझचं हा मॉडर्न अवतार आहे, असं म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे कॉलेजपासून ते किटी पार्टीपर्यंत सर्वच ठिकाणी अगदी सगळ्या वयोगटातल्या स्त्रिया हा ट्रेंड फॉलो करत आहेत.

मुळात हा ट्रेंड आपला नसून आखाती देशातील स्त्रियांकडून घेतलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी डिझायनर्सनी भारतात कलेक्शन्स सादर करायला सुरुवात केली आहे, त्याची ही पहिली झलक आहे. पांढऱ्या किंवा पेस्टल शेडच्या बॅकग्राऊंडवर फ्लोरल प्रिंट्समध्ये हे कुर्ते पहायला मिळतात. शक्यतो त्यांच्या हेमला लेस लावलेली असते. फिटींगला लूझ असले, तरी त्याखाली वापरल्या जाणाऱ्या ब्राईट शेडच्या स्ट्रेट फिटच्या सलवारने त्यांना फेमिनाईन लुक मिळतो. हे कुर्ते घोटय़ापर्यंत उंचीचे म्हणजे अँकल लेन्थ असतात. ते तसेच वापरावेत. आपली उंची कमी आहे म्हणून शॉर्ट कुर्ता घेतल्यास त्याची मजा कमी होईल. या सलवार कुर्त्यांसोबत दुपट्टा घेण्याची गरज नसते. त्यामुळे सुटसुटीत आणि स्टायलिश डेसिंगचे चाहते असाल तर हा नवा पर्याय वापरुन पहाच.तुमचे प्रश्न पाठवा

तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com