|| विनय नारकर

पुरुषांचा पेहराव विचारात घेतला तर सर्वात आधी उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे ‘शिरोभूषण’. मानवी अवयवांत जसा मेंदू किंवा डोके सर्वात महत्त्वाचे, तसे पेहरावामध्ये ‘शिरोभूषण’! पाश्चात्त्य वेशभूषांच्या प्रभावामुळे व काळाच्या ओघात पुरुष रोज शिरोभूषण धारण करीत नसले तरी लग्न समारंभ व इतर खास प्रसंगावेळी रेशमी पटक्यांची निवड वरचेवर वृद्धिंगत होते आहे.

मस्तकावरचा पेहराव किंवा वस्त्र ही खास पुरुषांची मक्तेदारी. ही मक्तेदारी पुरुषांनी खूप झोकात मिरवली. कोशा पटयेका, डाव्या डोळ्याच्या आखावरी चाले सखा ज्वानीच्या झोकावरी असा हा पटक्याचा रुबाब. शिरोभूषणांमुळे पुरुषी रुबाबाला एक डौल मिळाला. वर्षानुवर्षाच्या शिरोभूषणांच्या परंपरांमध्ये नावीन्य येत बरेच वैविध्य निर्माण झाले. हे वैविध्य शिरोभूषणांचा आकार, लांबी, बांधण्याच्या शैली, वस्त्रप्रकार, रंग, प्रासंगिकता, विणल्या जाणाऱ्या पेठा, यातून निर्माण झालेल्या प्रथा, अशा सर्वच बाबींमध्ये खुलत गेले. शिरोभूषणांबाबत रूढ होत गेलेल्या प्रथांबाबत आपण आधीच्या लेखात जाणून घेतले.

शिरोभूषणांचा मुख्य हेतू उन्हापासून संरक्षण हा होता. त्या अर्थाचा ‘उष्णीष’ असाही शब्द शिरोवेष्टनासाठी योजण्यात आला आहे, परंतु मनुष्य आपल्या स्वभावानुसार त्यांचा वापर सौंदर्यवर्धनासाठी करू लागला. तिथेच तो थांबला नाही, मानवी स्वभावाच्या खोडीनुसार या  शिरोभूषणांचा वापर त्याच्या कल्पनेतील उच्चनीचता दर्शवण्यासाठीही केला जाऊ लागला. एखाद्याची पगडी किंवा शिरोवेष्टन बघून त्याची ज्ञातिओळख होत असे. अशा प्रकारे शिरोभूषणे ही ज्ञातिनिदर्शक झाली.

आपल्याकडे व्यवसायानुसार पडलेल्या अठरा जातींचा उल्लेखच मुळी ‘अठरापगड’ जाती असा केला जातो. जितक्या जाती तितक्या पगड्या, त्यावरून अठरापगड. त्या अठरापगड जाती म्हणजे तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, गुरव, धनगर, गवळी, वाणी, जैन, कोष्टी, साठी, चितारी, माळी, तेली व रंगारी. लुगड्यांच्या नेसण्यावरूनही असंच एखादी स्त्री कोणत्या समाजातील आहे हे समजत असे. त्यामुळे जातीबाबत ‘पगडीवरून पुरुष तर लुगड्यावरून बाई’ असे म्हटले वर वावगे ठरू नये.

स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी गांधीजींनी ही गोष्ट हेरून जातिधर्माच्या पलीकडे जाणारे शिरोभूषण तयार केले. खादीची पांढरी टोपी ही स्वातंत्र्यसैनिकांची ओळख बनली. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्यांनी ही टोपी धारण करायची, म्हणजे आपला धर्म-जात सोडून एक भारतीय म्हणून सामील व्हायचे. ‘गांधी टोपी’ या नावाने ओळखली जाणारी ही टोपी जातिअंताचे प्रतीक बनली. १९२०-२१ साली असहकार चळवळीच्या वेळी गांधीजींनी ही टोपी तयार करून स्वातंत्र्यसैनिकांच्या पोशाखात सामील केली. गांधीजींनी काका कालेलकरांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ही टोपी काश्मिरी टोपीवर बेतली असल्याचे लिहिले होते. आपण मात्र आपल्या स्वभावातील खोडीनुसार या टोपीमध्ये काळा, निळा, भगवा असे रंगवैविध्य आणले. असे असले तरी एक गोष्ट नमूद करावीच लागेल ती म्हणजे गांधी टोपीने शिरोभूषणांतील वैविध्य, जे आपले सांस्कृतिक संचित होते ते नष्ट झाले.

आधीच्या काळी पुरुषांचा पोशाख पाच गोष्टींनी युक्त असायचा. पोशाखात जामा, निमा, मंदिल, इजार व शेला ही पाच वस्त्रे येत. ‘जामा’ म्हणजे शरीराच्या वरच्या भागात नेसण्याचे वस्त्र, जसे अंगरखा, कुर्ता आदी, निमा म्हणजे खालच्या भागाचे वस्त्र म्हणजे धोतर, घोडेस्वारीसाठी इजार किंवा तत्सम वस्त्रे आली, अंगावर पांघरण्यासाठी शेला असायचा, शेल्याच्या जागी पंचा, उपरणे, शालजोडी, घोंगडी असे अनुरूप पर्याय असायचे. आणि मंदिल म्हणजे शिरोभूषण. मानाच्या दृष्टीने शिरोभूषण सगळ्यात महत्त्वाचे. फक्त शिरोभूषणांच्याच कोणत्या परंपरा किंवा प्रकार होते ज्यातील वैविध्याने एका प्रकारचे सांस्कृतिक संचित तयार व्हावे… शिरोभूषणांची काही नावे पाहू या, पगडी, मुंडासे, फेटा, मंदिल, जिरटोप, पागोटे, टोपी, पटका (बादली पटका), तिवट, गोशपेच, रुमाल, कोशा, बत्ती, शेमला…

शिरोभूषणांत पहिला दर्जा पागोट्याचा. प्रतिष्ठित लोक पागोटेच घालत. नाना फडणवीसांचे वर्णन करणाऱ्या एका पोवाड्यात असे वर्णन आले आहे, ‘पागोटे शेला सुंदर अंगरखा शुभ्र भरदार’. हे पागोटे हातभर रुंद व पन्नासपासून सव्वाशे हात लांब असायचे. साहजिकच इतके लांबच लांब पागोटे बांधणे हे कौशल्याचे काम होते. पागोटे डोक्याला बांधताना, पुढच्या बाजूला नेहमी उजवीकडून डावीकडे व मागच्या बाजूला डावीकडून उजवीकडे असे बांधले जाते. साधारणपणे पागोटे स्वत: बांधले जात असे, परंतु याच्या लांबीमुळे ते काही लोकांना डौलदार बांधणे जमत नसे. त्यामुळे चांगल्या प्रकारे पागोटे बांधून देणाऱ्या लोकांना या कामासाठी पैसे देऊन बोलावले जाऊ लागले. त्यामुळे पगडबंद हा एक नवीन व्यवसायाच जन्माला आला. हे पगडबंद पागोटे छान बांधून देत असत.

मंगलप्रसंगी जर पागोट्याचा आहेर केला गेला, तर मात्र आहेराचे पागोटे लगेच स्वत: बांधून घेतले पाहिजे, असा शिष्टसंमत रिवाज होता. नाना फडणवीसांना मात्र स्वत: पागोटे बांधता येत नसे. सरदार पुरुषोत्तमदास पटवर्धनांनी ही बाब हेरली होती. नानांना याची जाणीव करून द्यायची म्हणून एकदा एका भोजनप्रसंगी त्यांनी नानांना मुद्दाम पागोट्याचा आहेर केला. अशा प्रकारे नाना फडणवीसांची तिथे पागोट्यामुळे फजिती झाली.

ही पागोटी मुख्यत्वेकरून पैठण व चंदेरी इथे विणली जायची. पैठणला हिंदू विणकर पैठण्या विणत तर मुस्लीम विणकरांचे मुख्य काम पागोटी विणणे हे होते. आपल्याकडे कुसुंबी रंगाची पागोटी विशेष लोकप्रिय होती. हा कुसुंबी रंग पारिजातकाच्या देठापासून काढला जात असे. अठरापगड जातीमधील रंगारी या जातीचे कामच मुळी दरमहा पागोटी धुऊन, रंगवून देणे हे होते. या ओवीमध्ये असा उल्लेख आला आहे,

माझ्या दारावरनंकोण गेला झपाट्याने कुसुंबी पागोट्याचा अप्पाराया अशा या महत्त्वाच्या शिरोभूषणामुळे ज्याप्रकारे निरनिराळ्या प्रथा निर्माण झाल्या तशाच प्रकारे अनेक वाक्प्रचार व म्हणी निर्माण होऊन मराठी भाषाही समृद्ध झाली. स्त्रियांच्या ‘पदरामुळे’ आपल्या भाषेत भर पडली, पुरुषांचे पागोटेही या बाबतीत मागे नाही. पागोटे हे मनुष्याच्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानले गेले. त्या अर्थाने बरेच वाक्प्रचार मराठीत रूढ झाले आहेत. एखाद्याचे पागोटे उडविणे किंवा पागोटे खाली करणे म्हणजे एखाद्याचा दुर्लौकिक करणे. जसे ‘मुलानें बापाचें पागोटें खालीं केलें’.

व्यवहारातही काही वाक्प्रचार आले आहेत. जसे ‘पागोटे गमावणे’ म्हणजे व्यवहारात फसवले जाणे किंवा अपकीर्ती होणे. त्याचीच दुसरी बाजू म्हणजे ‘पागोटे गुंडाळणे’ म्हणजे एखाद्यास फसवणे किंवा लुबाडणे. याच अर्थात थोडासा बदल करून ‘पागोटे घेणे’ किंवा ‘पागोटे देणे’ असे म्हटले जाते… म्हणजे गैरमार्गाने यश मिळविणे. तशाच प्रकारे जर कुणी भलते उपद्व्याप करून काम साधत असेल तर त्यास ‘याची पगडी त्याच्या डोक्यावर करणे’ असे म्हटले जाते.

पागोटे आणि लौकिक असे समीकरण दाखवणारे आणखी वाक्प्रचार म्हणजे ‘पागोटे बाळगणे किंवा पागोट्याची लाज बाळगणे’ याचाच अर्थ आपल्या नावलौकिकाची चाड राखणे. स्वत:चा लौकिक राखणे किंवा पत राखणे यालाच ‘पागोटे सांभाळणे, पागोट्याचे पेच सांभाळणे’ असे म्हटले जाते.  तसेच ‘पागोट्याचे पेच गळ्यांत येणे’ म्हणजे केलेले कृत्य अंगलट येणे. स्वत:ची प्रतिष्ठा, पत राखून असलेल्या माणसास ‘पागोट्याचा धनी’ म्हटले जाते. पागोटे हे एकप्रकारे मानचिन्ह असल्याने एखाद्याची फजिती होणे याला पागोटे पडणे, पागोटे पालथे पडणे, पागोटे वाकडे होणे असे वाक्प्रचार योजले जातात. भांडण वा मारामारी करताना पागोट्याचा अडसर होईल म्हणून ते काढून ठेवले जायचे. त्यावरून एखाद्यासोबत भांडणाचा पवित्रा घेणे याला ‘आपले पागोटे बगलेत मारणे’ असे म्हटले जाते. कुणाचा सन्मान, सत्कार करण्याच्या प्रथांमध्ये तर त्या व्यक्तीस पागोट्याचा आहेर करणे महत्त्वाचेच असते, त्यावरून एखाद्याचा सन्मान करणे याला ‘पागोटे बांधणे’ असा वाक्प्रचार रूढ झाला. एखाद्याची खुशामत करणे किंवा एखाद्याला फूस लावणे यासाठी ‘पागोट्यास फुले बांधणे’ असे म्हटले जाते. पागोटे हे सर्वस्व अशी कल्पना करून ‘पागोटे टाकणे’ म्हणजे सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होणे, असा वाक्प्रचार रूढ झाला.

इतके वाक्प्रचार एकट्या पागोट्यामुळे मराठीत रूढ झाले. त्याबरोबर काही म्हणीसुद्धा तयार झाल्या आहेत. ‘पगडबंदाचे पागोटे मोडके’ ही म्हण ‘दिव्याखाली अंधार’ या उक्तीची आठवण करून देते. दुसरी एक म्हण अशी आहे, ‘आपल्या पागो-ट्यांशीं भांडावे’ म्हणजे कुणाचे दोष काढण्याआधी स्वपरीक्षण करावे. या लेखात आपण प्रामुख्याने ‘पागोटे’ या शिरोभूषणाबद्दल जाणून घेतले, इतरही अनेक प्रकार आहेत, ते पुढच्या भागात पाहू.

viva@expressindia.com