जीजिविषा काळे

कोणी कधी कोणाला सांगायचे हा ज्याचा त्याचा हक्क आहे. तो त्यांच्याकडून हिसकावून घेऊ  नका. आपला समाज अजूनही या बाबतीत मागास आहे. त्यामुळे साहजिकच स्वत:चे सत्य सांगण्याची हिंमत होणे हे अवघड आहे. आपल्याकडे साधे सेम धर्म, जात असूनही प्रेमात पडलो आहोत हे सांगण्याची हिंमत तरुण-तरुणींमध्ये होत नाही अजूनही.. तर तुम्हीच विचार करा हे एवढे मोठे सत्य सांगणे कसे सोपे असेल?

प्रिय वाचक मित्र,

मागच्या पत्रात आपण ज्या विषयाला हात घातला तो आज पुढे नेऊयात. अनेक जणांचे मला फेसबुक आणि इन्स्टावर मेसेजेस आले. त्यासाठी धन्यवाद. मला आनंद आहे की, तुम्ही या विषयावर अजून जाणून घेऊ इच्छित आहात. खरे तर हा विषय असा एक-दोन पत्रांत संपणारा नाही, कारण जितक्या व्यक्ती तितकेच अनेक लैंगिकतेचे पदर.. सो कोणालाही सगळी माहिती नसते. कमी-जास्त असेल, पण संपूर्ण नाही; पण मग काय करणार? तर त्यासाठी काही सोप्प्या गोष्टी आहेत.

समजा, कोणी सीस जेंडर नसलेली व्यक्ती तुम्हाला तुम्ही त्यांना संबोधताना कोणते सर्वनाम वापरायचे सांगत असेल तर त्याचा आदर करा. चुकून चूक झाली तर माफी मागा. ‘कमिंग आऊट’ आणि ‘इन द क्लोझेट’ या संकल्पना तुम्हाला माहिती असतील. नसल्यास त्याविषयीही जाणून घेऊयात. ‘इन द क्लोझेट’चा शब्दश: अर्थ आहे ‘कपाटात असणे’. म्हणजे अशा व्यक्ती ज्यांनी अजूनही आपल्या लैंगिकतेबद्दल किंवा लैंगिक ओळख काय आहे याबद्दल कोणालाही सांगितलेले नाही. ‘कमिंग आऊट’ म्हणजे या गोष्टी सांगणे. समजा, तुमच्यावर कोणी विश्वास टाकून तुम्हाला स्वत:बद्दलची अशी एक नाजूक गोष्ट सांगितली असेल, तर ती तुमच्याच जवळ ठेवा. त्याची वाच्यता करू नका. कोणी कधी कोणाला सांगायचे हा ज्याचा त्याचा हक्क आहे. तो त्यांच्याकडून हिसकावून घेऊ  नका. आपला समाज अजूनही या बाबतीत मागास आहे. त्यामुळे साहजिकच स्वत:चे सत्य सांगण्याची हिंमत होणे हे अवघड आहे. आपल्याकडे साधे सेम धर्म, जात असूनही प्रेमात पडलो आहोत हे सांगण्याची हिंमत तरुण-तरुणींमध्ये होत नाही अजूनही.. तर तुम्हीच विचार करा हे एवढे मोठे सत्य सांगणे कसे सोपे असेल? इथे, ‘बाबा, मला इंजिनीयरिंग सोडून आर्ट्स करायचे आहे,’ हे म्हणायलाही जीभ धजत नाही, त्या समाजात, ‘आई – बाबा, मला मुलगा असणे सोडून मुलगी बनायचे आहे, मला मुलाशी नाही मुलीशी लग्न करायचे आहे,’ हे सहजपणे कसे सांगणार? नुसता विचार करून बघा.

मी या विषयावर दोन भागांतून लिहिण्याचे कारण हेच की, माझे अनेक मित्र एलजीबीटीक्यू + या समाजातले आहेत आणि मी त्यांना वर्षांनुवर्ष या अशा अनेक त्रासांतून जाताना बघते आहे. तुम्ही अनेक दिवस माझी पत्रे वाचत आहात, तुम्हाला काही गोष्टी पटतही आहेत, त्यामुळे तुमच्याशी या विषयावर संवाद साधावा असे मला वाटले. कदाचित तुमच्यापैकी चार लोकांनी जरी या विषयावर अजून माहिती घेऊन, संवेदनशीलतेने वागू लागलात, आपल्या आसपासच्या लोकांशी, जमल्यास घरच्यांशी या विषयावर संवाद करू शकलात तरी हा प्रयत्न सार्थकी लागला असे मी मानेन.

कदाचित तुमच्या जवळची व्यक्ती क्लोझेटमध्ये असेल, पण तुम्ही खिल्ली उडवाल या भीतीने तुम्हाला सांगू शकत नसेल. आशा करते की, तुम्ही एक सुजाण पिढीचे सुजाण नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडाल.

तेव्हा लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं, आमचं, त्यांचं सेम असतं; म्हणजेच, लव इज लव.

तुम्हाला काय वाटते हे मला नक्कीच कळवा. पुढच्या आठवडय़ाचे पत्र नक्की वाचा. स्पेशल असेल.

तोवर जाता जाता आजची टीप – आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तुम्हाला कदाचित काही होणार नाही; पण तुमच्यामुळे इतरांना त्रास होऊ  शकतो. दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होऊ  देऊ नका. थोडे दिवस कळ काढा. काळजी घ्या आणि स्वच्छता पाळा.

कळावे,

जीजि