16 October 2019

News Flash

एक ‘मनोहर’ विश्व

माझा स्वयंपाकघरात जेव्हा वावर असतो तेव्हा किचन ओटय़ावर मातीचीच भांडी दिसतात.

मितेश जोशी

रोजच्या धावपळीतून थोडासा स्वत:साठी वेळ काढून रिलॅक्स होण्यासाठी आजची तरुणाई आवर्जून इकोफ्रेंडली होम्समध्ये वेळ घालवते. नैसर्गिक भाजीपाला, घरातही नैसर्गिक वस्तूंचा वापर, त्यामुळे वातावरणातही भरून राहिलेला एक वेगळाच गंध, शांतता व स्वस्थता काही दिवसांसाठी का होईना उत्साह देऊन जाते. आजच्या झगमगत्या जगात सगळा चकचकाट टाळून इकोफ्रेंडली होण्याचा दावा करत राहण्यापेक्षा तीच जीवनशैली मानून जगणं सोपं नाही पण अशक्यही नाही, सांगतेय नागपूरची मैथिली मनोहर..

चिऱ्याच्या दगडाच्या भिंती, शेणामातीने सारवलेलं घर, आजूबाजूला आल्हाददायक वातावरणनिर्मिती करणाऱ्या झाडांची गर्दी, चुलीवरचं स्वादिष्ट जेवण, नैसर्गिक भाजीपाला आदी गोष्टी तरुणाईला वीकेण्डला हव्याहव्याश्या वाटतात. घडाळ्याच्या काटय़ावर चालून थकलेला जीव मायेची ऊब मिळवायला निसर्गाकडेच धाव घेतो. मात्र याच निसर्गाच्या कुशीत रोजचं जीवन जगणाऱ्या मैथिली प्रफुल्ल मनोहर हिला ही इकोफ्रेंडली लाइफस्टाइलची प्रेरणा घरच्यांकडूनच मिळाली, असं ती म्हणते. मैथिलीच्या घरात १३ जणांचं एकत्र गोकुळ! सर्वाना या लाइफस्टाइलची आवड त्यामुळे जुनं घर पाडून नवीन घराची वीट ही इकोफ्रेंडलीच रचायची असं सगळ्यांनी ठरवलं. मैथिली सध्या ज्या घरात राहतेय त्या घरी ती पाचवीत असताना स्थलांतरित झाली. ‘ग्रीन हाऊस’ म्हणावं असं बारा हजार स्क्वेअर फुटाचं हे घर तयार व्हायला एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन वर्ष लागली आहेत.

मैथिलीचे काका प्रवीण यांच्या कल्पनेतून हे घर उभं राहिलंय. मैथिली तिच्या या ग्रीन हाऊसविषयी माहिती देताना सांगते, घर बांधताना त्यात सिमेंटचा वापर अजिबात केला गेलेला नाही. रेती, चुना, उडीद डाळ, डिंक आणि पाणी हे सगळं कोलूवर दळून वीस दिवस फर्मेट करून वापरलं तर सिमेंट न वापरताही आवश्यक तो परिणाम साधता येतो! मैथिलीच्या घरात इलेक्ट्रिसिटीचा वापर केवळ १० टक्केहोतो. घरात ९० टक्के वापर हा सोलार एनर्जीचा होतो. घरात आजी-आजोबांसाठी असलेल्या लिफ्टपासून घरातील टय़ूबलाइट, पंखा, मोबाइल चार्जिग या आणि अशा अनेक गोष्टी सोलार एनर्जीवरच चालतात. गरम पाणी हे घरात हिवाळ्यातच लागतं. त्यामुळे हिवाळ्यात बंबावर पाणी गरम होतं.

संपूर्ण घर हे काही शेणामातीने सारवलेलं नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात तीन मजली घर शेणामातीने सारवणं महाकठीण! यावर त्यांनी लायब्ररी एरियात एक वेगळाच तोडगा काढला. मोरचूद, फेव्हिकॉल, शेण आणि मातीच्या मिश्रणाने लायब्ररीची भिंत तयार केली आहे. त्यामुळे ती शेणाने सारवलेल्या भिंतीसारखीच दिसते. लिव्हिंग एरियातसुद्धा एक भिंत अशीच तयार केलेली आहे. मैथिली सांगते,घराला स्लॅब नाही. त्याच्या ऐवजी वरच्या मजल्यावर जैसलमेर आणि खालच्या मजल्यावर शहाबादी फरश्या घातल्या आहेत. सगळ्यात वर कौलं आहेत. खोल्यांची उंची २० ते २२ फूट आहे. काही ठिकाणी लाकडी फ्लोअरिंग आहे. घरात ज्या बाजूने सूर्यप्रकाश जास्त येतो त्या बाजूला दुहेरी विटांच्या भिंती घातल्यात. या सगळ्यामुळे घरातलं तापमान ७ ते ८ टक्के कमी राहतं. परिणामी पंख्यावर येणारा ताण कमी होतो. नागपुरात उन्हाळा आणि हिवाळा कडक असतो. घराच्या अशा रचनेमुळे उन्हाळ्यातली उष्णता थंडीत आणि थंडीतला गारवा उन्हाळ्यात अनुभवायला मिळतो. घरातील स्वयंपाकघर म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ आहे. स्वयंपाकघरातही रेतीचा ओव्हन आणि मातीचा फ्रिज पाहायला मिळतो. मातीच्या फ्रिजमध्ये आम्ही भाज्या ठेवतो. जेणेकरून त्यांना फ्रिजची थंड हवा न लागता मातीचा गारवा मिळून त्या टवटवीत राहतात. स्वयंपाकघरात चूल, जातं, पाटा-वरवंटा, रगडा, खलबत्ता अशा सगळ्या वस्तूदेखील जतन केलेल्या आणि वापरातल्या आहेत. चटणी खायची तर ती पाटय़ावर वाटलेली असाच घरातला नियम आहे. स्वयंपाकघरात हात धुवायला मी हँडवॉश वापरत नाही. भांडी विसळायला भांडय़ांचा साबण वापरत नाही त्याच्याऐवजी ‘निमशक्ती’ केव्हाही सरस, असं ती म्हणते. साबणाऐवजी लिंबाच्या सालाची पावडर वापरण्याचा नियम आहे. हात धुण्यासाठी किंवा भांडी विसळण्यासाठी वापरलेलं पाणी बागेत सोडलं जातं. स्वयंपाकघराला जोडूनच ‘किचन गार्डन’ आहे. त्यात कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, गवती चहा, कडीपत्ता, भेंडी असा भाजीपाला लावण्यात आला आहे.

माझा स्वयंपाकघरात जेव्हा वावर असतो तेव्हा किचन ओटय़ावर मातीचीच भांडी दिसतात. मला मातीच्या भांडय़ातून अन्न शिजवायला खूप आवडतं. त्या भांडय़ात अन्न शिजवल्याने त्याला एक मातीचा वेगळाच सुगंध आणि चव येते, असं तिने सांगितलं. इकोफ्रेंडली घर झाडांमुळेच तर खरं आणखी उठून दिसतं. मैथिली सांगते, घरातील झाडांची संख्या मोजायची झाली तर ते फारच कठीण काम आहे. सगळ्यांनाच झाडाची आवड असल्याने सगळ्यांनी मिळून बाग फुलवली आहे. मोठय़ा बागेत सीताफळ, लिंबू, संत्र, पेरू, मोसंबं, केळं, चिकू, नारळ, जांभूळ अशी बरीच झाडं आहेत. अनेक सुगंधी फुलांची झाडं आहेत. आयुर्वेदिक फायदे देणारी आयुर्वेदातली झाडं आहेत. घराच्या चारही बाजूंना ऑक्सिजन खेळता राहावा म्हणून वेगवेगळ्या जातींच्या तुळशी आहेत. या बागेसाठी खास डी-कम्पोस्ट मशीन आहे. त्यात कचरा, खरकटं वगैरे टाकल्यावर आठ-दहा तासांनी उत्तम खत तयार होतं. साधारण ३० किलो कचऱ्यापासून ६-७ किलो खत तयार होतं. घरासमोर चार हजार स्क्वेअर फुटांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे शिवाय बारमाही पाणी असलेली विहीरसुद्धा आहे.

इकोफ्रें डली लाइफस्टाइल म्हणजे फक्त घरातलं वातावरण नैसर्गिक ठेवणं इतकंच नाही हे मैथिली सांगते. लाइफस्टाइल म्हणून इकोफ्रेंडली तत्व स्वीकारल्यावर घराबाहेर वावरतानाही हा वसा जपावाच लागतो, असं सांगणारी मैथिली फिरताना स्कुटीचा वापर न करता ती इलेक्ट्रॉनिक कारचा वापर करते. संपूर्ण रात्र गाडी चार्ज केल्यावर ती साधारण ११० किमीचं अंतर कापते. मी बाहेर जायला यायला इलेक्ट्रॉनिक कारचाच वापर करते ज्यामुळे प्रदूषण होत नाही. पेट्रोल, डिझेलची बचत होते, असं तिने सांगितलं.

असं हे माझं ‘मनोहर विश्व’ ज्यात मी लहानाची मोठी झाले, खेळले-बागडले, खूप काही शिकले. इकोफ्रेंडली राहावं, जगावं, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेऊन प्रत्येक गोष्ट करण्याची प्रेरणा देणारी लाइफस्टाइल मी जगतेय याचा अभिमान वाटतो, असं ती म्हणते. अशी ही इकोफ्रेंडली लाइफस्टाइल मुंबई-पुण्यात फ्लॅटमध्ये जगणं अंमळ कठीण आहे, पण अशक्य नाही, असे सांगत किमान घराच्या गॅलरीत शोभिवंत झाडं लावणं, घराला गच्ची असेल तर तिथे बाग फुलवणं,  सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणं आदी छोटय़ा-छोटय़ा गोष्टी अंगीकारून आपण नक्कीच पर्यावरणाला हातभार लावू शकतो, असं तिने आग्रहाने नमूद केलं.

First Published on January 4, 2019 4:40 am

Web Title: maithili manohar of nagpur speak about eco friendly life