सौरभ करंदीकर viva@expressindia.com

मागील लेखात आपण पाहिलं की आपल्या पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या कचऱ्याचं वाढतं प्रमाण काबूत ठेवण्यासाठी नुसती झाडं लावणं आणि वृक्षतोड थांबवणं पुरेसं नाही. शिवाय या दोन्ही गोष्टी मानवी स्वार्थापायी हव्या त्या प्रमाणात केल्या जात नाहीत हे कटू सत्य आहे. झाडं लावण्याखेरीज शेतजमिनीवर दोन हंगामांच्या दरम्यान जमिनीची झीज होऊ नये म्हणून लावली जाणारी पिकं, रोपं (कव्हर क्रॉप्स) कार्बन शोषण करतात. त्यामुळे अशा रोपांकडे कार्बनविरोधी लढय़ातला आशेचा किरण म्हणून पाहिलं जातंय. याशिवाय कार्बन शोषण हा बॅसाल्ट खडकाचा नैसर्गिक गुणधर्म असल्याने, त्या दगडाची पावडर शेतजमिनीवर फवारण्याचे काही प्रयोग जमिनीचा कस वाढवण्यासाठी केले गेले. यामुळे शेतजमिनीतील कार्बनचं प्रमाण वाढून जमीन सकस तर होतेच, पण त्याबरोबरच वातावरणातलं कार्बनचं प्रमाण कमी होईल, असा सरळ हिशेब केला जातो. पण बॅसाल्टचा असा वापर करण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या इंधनाचं आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचं काय? असे ‘धरलं तर चावतं’ स्वरूपाचे प्रश्न तर आहेतच.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

‘स्पेसबॉल्स’ नावाच्या एका विनोदी चित्रपटात एक खलनायक एका प्रचंड आकाराच्या व्हॅक्युम क्लीनरने चक्क पृथ्वीचं वातावरण शोषून घेतो आणि मानवजातीला वेठीस धरतो, असा चमत्कारिक प्रसंग आहे. तो महाकाय व्हॅक्युम क्लीनर आपल्याला मिळाला तर कार्बन डायऑक्साइडचा कचरा क्षणार्धात साफ होईल अशी कल्पना मनात येऊन गेली. खरं तर अशाच कल्पनेवर आधारित कार्बन शोषण तंत्रज्ञानाचा वापर अनेक देशात केला जातो आहे. हवेतील कार्बन शोषून उच्च तापमानाच्या साहाय्याने त्याचं परिवर्तन कृत्रिम इंधनात करण्यात येतंय. काही कंपन्या कार्बन शोषण करू शकणारी यंत्रं चक्क कार्बन प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांनाच विकत आहेत. ‘मॅसॅच्युसेट इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) येथील सहाग वोस्की आणि अ‍ॅलन हटन या संशोधकांनी ‘इलेक्ट्रो – स्विंग अ‍ॅबसॉरप्शन सिस्टीम’ नावाची यंत्रप्रणाली विकसित केली आहे. यात विशिष्ट पदार्थाचा वापर करून विजेवर चालणारा एक फिल्टर तयार केला आहे. ज्यातून हवा सोडली की त्यातील कार्बन डायऑक्साइडचे रेणू वेगळे केले जाऊ शकतात. आणि विजेच्या प्रवाहाची दिशा बदलली की ते रेणू विलग करता येतात. या संशोधनाकडे मोठय़ा आशेनं पाहिलं जातंय. भविष्यात जागोजागी असे फिल्टर्स लावले गेले तर आश्चर्य वाटायला नको.

पृथ्वीला भेडसावणारा आणि या लेखमालिकेतला शेवटचा कचरा म्हणजे स्पेस जंक. ९ मे २०२१ रोजी चीनचा एक भरकटलेला अग्निबाण (रॉकेट बूस्टर) अवकाशातून पृथ्वीवर, अगदी आपल्या बाजूला – मालदीवजवळ आदळला. ते बूस्टर कुठे, कुणाच्या डोक्यावर कसं कोसळेल याबाबत जवळपास दहा दिवस वेगवेगळे अंदाज बांधण्यात सारे अवकाश शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ जुंपले होते. माझ्या लहानपणी ‘स्कायलॅब’ ज्याच्या डोक्यावर पडेल त्याला (म्हणजेच त्याच्या वारसांना) एक कोटी डॉलर्स भरपाई म्हणून मिळतील अशी अफवा पसरली होती. ज्या दिवशी स्कायलॅब पडणार त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळणार अशीही (अधिक आकर्षक) अफवा होती ! थोडक्यात, आपल्या डोक्यावर पृथ्वीच्या कक्षेत प्रचंड वेगाने घोंगावणाऱ्या उपग्रहांच्या, रॉकेट्सच्या लाखो कुचकामी तुकडय़ांपैकी एखादा आदळू शकेल याची कल्पना आपल्याला पूर्वीपासून असली तरी त्याची पुरेशी चिंता आपल्याला वाटत नाहीये.

१९५७ साली रशियाने स्पुतनिक उपग्रह प्रक्षेपित केला (होय करोनावरच्या लसीला त्यांनी हेच नाव दिलंय). त्यानंतर अवकाश-स्पर्धेला गती मिळाली. प्रत्येक विकसित तसेच विकसनशील देशांनी आपापले उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडायला सुरुवात केली. दूरसंचार, दळणवळण, हवामानाचा अंदाज, भूभागाचं शास्त्रीय तसंच लष्करी सर्वेक्षण, या कारणांसाठी असे उपग्रह वापरले जातात. परंतु ते प्रक्षेपित करताना वापरल्या जाणाऱ्या रॉकेटचे भाग, उपग्रहापासून अपघाताने विलग होणारे भाग आणि असे भाग एकमेकांना आपटून फुटून निघणारे धातूचे शेकडो छोटे छोटे तुकडे या साऱ्यांनी आपल्या ग्रहाची कक्षा भरत चालली आहे. आजच्या घडीला ३,५०० हून अधिक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत कार्यरत आहेत. त्यांना सुमारे १०,००० विविध आकाराच्या निकामी तुकडय़ांमधून मार्गक्रमणा करावी लागत आहे. या साऱ्यांवर अवकाश तंत्रज्ञांची नजर असते. आणि त्यांच्याशी टक्कर होऊ नये म्हणून उपग्रहांची कक्षा ते किंचित बदलू शकतात. पण पृथ्वीवरील रडारच्या नजरेत न येणाऱ्या लक्षावधी छोटय़ा तुकडय़ांचं काय करायचं? त्यापैकी काही तुकडे तर इतके गतिमान आहेत की ते दर दिवशी १६ पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करतात!

‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे असे तुकडे उपग्रह तसेच स्पेस स्टेशन सारख्या व्यवस्थांची धूळदाण करू शकतात. या कचऱ्याला साफ कसं करायचं? यापैकी अनेक छोटे तुकडे पृथ्वीच्या वातावरणावर आपटून आपोआपच नष्ट होतात, पण त्याची वाट पहात बसावं का? १९७८ साली नासामधील शास्त्रज्ञ डोनाल्ड केस्लर यांनी भाकीत केलं की स्पेस-जंकमुळे घडणारे अपघात आणि त्या अपघातातून निर्माण होणाऱ्या तुकडय़ांनी होणारे अपघात हे वाढतच जातील आणि पुढील काही दशकात अनेक उपग्रह नष्ट होऊ शकतील. अवकाशीय कचरा वातावरणात नष्ट होण्याचं प्रमाण नवीन उपग्रह प्रक्षेपणाच्या प्रमाणापेक्षा खूपच कमी आहे. इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ या संस्थेने ४०,००० स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याबरोबरच आम्ही स्पेस – जंक कमी करण्यावर देखील संशोधन करणार आहोत असं त्यांनी जाहीर तरी केलंय. पाहू काय होतं ते.

थोडक्यात, या लेखमालेत उल्लेखलेला विविध मानवनिर्मित कचरा भविष्यात कमी होईल काय? याचं उत्तर आपली भावी पिढी विविध क्षेत्रांतल्या आपल्या आगामी कर्तृत्वानेच देऊ शकेल. आपल्या आताच्या पिढीकडून सुधारणांची अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही.