उन्हाळ्याची सुट्टी आली रे आली की, आठवतो तो बर्फाचा गोळा आणि आंबा. दुपारी वाट्या वाट्या रस चेपून पुन्हा रात्री मँगो मिल्क शेक ढोसणारी आजची पिढी आंब्याच्या ठरलेल्या रेसिपीजबरोबरच जरा वेगळ्या पदार्थाच्या शोधात नेहमीच असते. आंबा नुसता खायचा, रस करायचा फार फार तर वडीत घालायचा नाही तर श्रीखंडात हे जारे जुने दिवस. आता आंब्याबरोबर वेगवेगळी काँबिनेशन्स ट्राय करायला अनेकजण सरसावतात. त्यातूनच तयार होतात मँगोचं मूड-फूड.
उन्हाळा म्हटलं की आइसक्रीम पाहिजेच. देशी आंबा कुल्फीपासून परदेशी जेलाटोपर्यंत सगळीकडे मँगो फ्लेवर पॉप्युलर दिसतोय सध्या. पण ‘नॅचरल’वाले जे हापूस आंब्याच्या फोडी घालून आईसक्रीम देतात ते लाजवाब. आंब्याचा मिल्कशेक तर आता घरीही आवर्जून केला जातो. पण पुण्याची खास मस्तानीची चव काही औरच. थिक केशरी मिल्कशेकमध्ये आंब्याच्या ताज्या आईसक्रीमचा गोळा. डेडली कॉम्बिनेशन. मँगो मस्तानीसाठी पुण्याच्या ‘सुजाता’मध्ये रांगा लागतात त्या उगाच नाही. पुणेकरांनी या पदार्थाला दिलेलं मस्तानी नाव सार्थ असल्याचं याची टेस्टच सांगते. आता पुण्याबाहेर मुंबईतही ठराविक ठिकाणी मस्तानी मिळायला लागलीय. गिरगाव, दादर अशा मराठमोळ्या उपनगरांत ती दिसते. असंच थोडंसं सिमीलर कॉम्बिनेशन आहे – मँगो फालूदाचं. अनेक छोटय़ा- मोठय़ा ‘कोल्ड्रिंक हाऊस’ नामक टपऱ्यांमध्येदेखील हा पदार्थ मिळतो. सब्जा, शेवई आणि मँगो पुन्हा एक नंबर चव देते. मँगो लस्सी हा आणखी एक पदार्थ सध्या तरुणांमध्ये फेव्हरेट आहे.
आंब्याचं मूड फूड शोधता शोधता मँगो शॉट या भन्नाट नावाचं पेय दृष्टीला पडलं. शॉट म्हणत असले तरी यात मद्यप्रेमींची सोय नाही बरं का. कॅफे कॉफी डे (सीसीडी)मध्ये गरम कॉफीला गारेगार पर्याय म्हणून हे ट्राय करायला हरकत नाही.
सध्या काही हॉटेलमध्ये आंब्याच्या पदार्थाचे खास फेस्टिवल सुरू आहेत. मरीन ड्राईव्हवरच्या हॉटेल इंटरकाँटिनेंटलमध्ये मँगो स्पेशल मेन्यू ठेवण्यात आलाय. भरवान धिंगरी हा एक वेगळाच पदार्थ तिथे मिळतोय. मसालेदार चीज आणि मँगो स्टफ्ड मशरूम्स त्यात आहेत. तंदूरी झिंगा औप आम हे असंच एक वेगळं कॉम्बिनेशन तिथे आहे. आंब्याला विदेशी पदार्थाबरोबर चाखायची मजा औरच. मँगो सुशी, मँगो निगरी, मँगो पिझ्झा, मँगो स्टफ्ड कसेडिया असले पदार्थ चाखायचे असतील तर हा स्पेशल मेन्यू तिथे ट्राय करायला हवा. पाल्र्याला एअरपोर्टजवळच्या सहारा स्टार हॉटेलमध्येही मँगो मॅनिया हा फेस्टिवल सुरू आहे. तिथेही असे आंब्याचे विदेशी प्रकार चाखायला मिळतील. मँगो मोजितो तिथे मिळतो. शिवाय बर्फात गोठवलेल्या आंब्याच्या फोडींची एक डिशही वेगळी आहे. काही रेस्टॉरंटमध्ये आंब्याच्या फोडी चॉकलेट सॉसबरोबर सव्‍‌र्ह करतात.
(संकलन सहाय्य- मानस बर्वे)