मनोरंजनाची विविध माध्यमं येत असली तरी नाटक या माध्यमाचं रसिकांवरचं गारुड कमी झालेलं नाही. उलट तरुण पिढी नव्या उत्साहानं रंगभूमीकडे वळतेय, प्रयोग करतेय आणि स्वत:ला घडवतेय. नाटक या समान आवडीनं एकत्र आलेल्या तरुण मंडळींचे अनेक ग्रूप सध्या उपनगरांमधून कार्यरत आहेत. २७ मार्च या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रंगभूमीशी तरुणाईनं जोडलेल्या नात्याविषयी..
रंगभूमीकडे वळणारी नवी पिढी नवे प्रयोग करायला एकत्र येत आहेत. हौशी तरुण कलाकारांचे ग्रूप पुण्या-मुंबईच्या उपनगरांमधून फुलत आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर जाणवलं की, कलेचा आनंद तर त्यांना या नाटकवेडातून मिळतोच पण जीवनाचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत नाटकामुळं शिकता येतं, असं या तरुण मंडळींचं म्हणणं आहे. श्रेष्ठ रंगकर्मीनी दिलेली शिकवण आणि नाटकांची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आजची तरुणपिढी जोमाने करत आहे. २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त रंगभूमी आणि आजच्या तरुण पिढीचं नातं तरुणांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बहुतेक वेळा नाटकांत काम करणाऱ्या कलाकाराचं पहिलं पाऊल रंगभूमीवर पडतं, ते इंटरकॉलेज एकांकिका स्पर्धाच्या माध्यमातून. आय.एन.टी, मृगजळ, युथ फेस्टिवल, सवाई, पुरुषोत्तम करंडक अशा मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धानी कलाकारांची एक फळीच्या फळी रंगभूमीला दिली. दिवस रात्र तालमी, प्रतिस्पर्धी कॉलेजविषयी स्पध्रेपुरतीच पण कमालीची खुन्नस, रंगभूमीवर नाटय़प्रयोग सादर करताना भान हरपून जाणारे करणारे कलाकार आणि निकालाच्या वेळी बेंबीच्या देठापासून ओरडत ट्रॉफी जिंकून आपल्या कॉलेजपर्यंत अभिमानाने ती मिरवत आणण्याचा तो क्षण!! हा सगळा प्रवास अविस्मरणीय असतो; पण कॉलेजमधली शैक्षणिक र्वष संपली की हा प्रवासदेखील संपतो आणि मग पासआउट झाल्यावर सगळे मित्र जेव्हा कट्टय़ावर जमतात तेव्हा स्पध्रेचे ते दिवस आठवून तासन्तास फक्त त्याविषयी गप्पा मारतात.
कॉलेज संपल्यावरदेखील रंगभूमीवर, स्पर्धामध्ये काम करणं चालू राहावं यासाठी आता तरुण पिढी कामाला लागली आहे. पासआउट झालेले,नोकरीला असलेले तरीही रंगभूमी या एका दुव्याने जोडले गेलेले तरुण एकत्र येऊन आपले ग्रुप्स तयार करून नाटकांची ही आगळीवेगळी कट्टासंस्कृती तयार करीत आहेत. पुण्यातला ‘चिरायु’ हा असाच एक नाटकवेडय़ा ध्येयाने झपाटलेल्या मुलांचा ग्रुप. २०१०मध्ये अमोघ कुलकर्णी याने ग्रूप सुरू केला. १८ ते ३० वयोगटांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलं इथे एकत्र येऊन नाटकं बसवतात आणि विविध ठिकाणी आपले प्रयोग सादर करतात. मूळची पुण्याची नसलेलीसुद्धा अनेक मुलं या ग्रुपमध्ये आता आली आहेत. मराठीप्रमाणेच िहदी नाटकांचे प्रयोगदेखील ‘चिरायु’ने केले आहेत. अधिकाधिक तरुण मुलांनी दिग्दर्शन व नाटकाच्या तत्सम महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे वळलं पाहिजे, अशी भूमिका या ग्रुपच्या सदस्यांची आहे. म्हणूनच आपल्या ग्रुपद्वारे भावी अभिनेते ते दिग्दर्शक अशी टीम तयार करीत आहेत.
तरुणांच्या या नाटकवेडय़ा ग्रुप्सचं वैशिष्टय़ म्हणजे संहितेपासून मेक-अपपर्यंत सारे विभाग कोणताही प्रोफेशनल आधार हाती नसताना ही मुलं व्यवस्थित हाताळत आहेत. डोंबिवलीतल्या पेंढारकर कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या सर्व स्पर्धा करून झाल्यावर संकेत ओक, अमेय दातार, सुमेध सावंत आणि मयूरेश नानल या चार मित्रांनी एकत्र येऊन आपला स्वत:चा ग्रुप सुरू करण्याचं ठरवलं आणि ‘वेध क्रिएशन्स’ची स्थापना झाली. सुरुवातीला ५-६ जण असणारा हा ग्रुप वाढत ४०-४५ जणांचा झाला. आज या ग्रुपकडून अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये ही तरुण मुलं बक्षिसं घेतात, शॉर्ट फिल्म्स करतात आणि विविध ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोगही टीम करतच असते.
या तरुणांच्या नाटकवेडय़ा ग्रुप्सना ग्लॅमर नाही की कुठे चमकण्याचं वेड नाही. आपापला उद्योग-व्यवसाय सांभाळत रंगभूमीच्या प्रेमासाठी आपल्या कामातून वेळ काढून ते एकत्र आलेले आहेत आणि प्रयोग करत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलं ग्रुपमध्ये असल्यामुळे कसा फायदा होतो याचं गमक पुण्याच्या ‘थिएट्रॉन’ ग्रुपला चांगलंच गवसलं आहे. इंजिनीयिरग करणारा मुलगा लाइट्सची कामं पाहतो तर सीए करणारा मुलगा नाटकाच्या बजेटची जबाबदारी सांभाळतो. त्यामुळे ग्रुपमध्ये नाटकातल्या या गोष्टी पाहण्यासाठी बाहेरच्या व्यक्तीची गरज लागत नाही. सगळ्या प्रेक्षक वर्गापर्यंत नाटक हे माध्यम पोचावं यासाठी थिएट्रॉन ग्रुप इंग्लिश नाटकं पण करतो. ‘एनसीपीए’, काळा घोडा फेस्टिवलमध्ये थिएट्रॉनने प्रयोग केले आहेत.
रंगभूमीवर तरुणाईला घडवणारे प्रसिद्ध रंगकर्मी विजय केंकरे म्हणाले, ‘आजच्या पिढीला प्रशिक्षणाचं महत्त्व लक्षात यायला लागलंय. इतर माध्यमांशी स्पर्धा असल्यामुळे आत्ताची जी तरुण मंडळी आहेत त्यांचा व्हिज्युअल सेन्स मोठय़ा प्रमाणात वाढीस लागला आहे. वाचिक अभिनयाबरोबर सादरीकरणावरदेखील मेहनत घेतली जातेय. आज व्यावसायिक रंगभूमीवर निराळे प्रयोग व्हायला लागले आहेत आणि तेही तरुण मुलांकडून होत आहेत.’
अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत नाटकात भाग घेण्यासाठीच नाही तर ते पाहायला येण्यासाठीही प्रोत्साहित केलं असे तरुण दिग्दर्शक म्हणजे प्रसाद भिडे. ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ हे त्यांचं नाटक सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र सेवा संघ आणि रुईया कॉलेजकडून विविध नाटकं ते स्पर्धाना उतरवतात. तरुण पिढीचं रंगभूमीशी असलेलं नातं सांगताना ते म्हणाले, ‘गेल्या दोन दशकांत एकांकिका या प्रकाराने महाराष्ट्रातलं नाटय़ क्षेत्र व्यापून टाकलंय आणि यामुळे रंगभूमीवर तरुण मोठय़ा प्रमाणात आकर्षति झाले. आजची पिढी ही सादरीकरणाकडे संहितेपेक्षा जास्त लक्ष देतेय आणि रंगभूमीचा वापर करून त्यातून अजून पुढच्या माध्यमापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करतेय.’
आज तरुणांचे असे अनेक ग्रुप्स रंगभूमीसाठी तयार होत आहेत. सध्या जरी हे ग्रुप्स प्राथमिक अवस्थेत असले तरीही या माध्यमातून मोठय़ा संख्येने तरुण पिढी रंगभूमीवर काम करण्यासाठी उत्सुक आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. ‘रंगभूमीकडून आम्ही अभिनयाचं तंत्र शिकतोच पण त्याचबरोबर दु:ख, राग, लोभ विसरून जिद्दीने कसं वावरायचं हे शिकत आहोत. अजून आयुष्यात भरपूर शिकायचं आहे,’ हेच त्यांचं म्हणणं आहे.

नाटकाचं ‘तंत्र’ मुलींच्या हाती
रंगभूमीवरच्या नवीन पिढीतील मुली अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, संगीत या तांत्रिक जबाबदाऱ्याही सांभाळायला लागल्या आहेत. ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ या प्रायोगिक नाटकामुळे आणि त्याच्या संगीतामुळे प्रकाशझोतात आलेली म्युझिक कंपोझर सुखदा भावे-दाबके म्हणाली, ‘रुईया कॉलेजमधून शिकत असताना विविध स्पर्धामधून मी नाटकांना संगीत द्यायला सुरुवात केली. माझ्या पहिल्या नाटकाच्या वेळेस ही मुलगी आहे, त्यामुळे तांत्रिक भाग कसा काय पेलवू शकेल, संगीत देणं हिला जमेल का अशी खात्री काही लोकांना नव्हती. कोणी मुलगी म्युझिक ऑपरेट करायला बसली आहे हे पाहून लोकांना आश्चर्य वाटायचं. पण आता रंगभूमीवर तांत्रिक गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न स्त्रियांकडून व्हायला सुरुवात होत आहे. निष्ठेने काम करत राहणं ही गोष्ट रंगभूमीकडून मी शिकले.’
दिग्दर्शनात उतरलेली अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी म्हणते, ‘दिग्दर्शकाला सगळ्याच गोष्टींची माहिती असावी लागते. त्याच्यावर नाटकाच्या प्रत्येक लहान-मोठय़ा घटकाची जबाबदारी असते. त्यामुळे दिग्दर्शनाची भूमिका खूप आव्हानात्मक आहे असं सतत वाटायचं, मग थोडंसं धाडस करू शकतो, असं जाणवल्यावर दिग्दर्शन करायचं ठरवलं आणि ही संधी ‘सोबत संगत’ नाटकाच्या निमित्ताने मिळाली. या भूमिकेत वावरताना स्त्री म्हणून मला कोणताही अडथळा आला नाही. रंगभूमीने मला प्रचंड ऊर्जा दिली, जगण्याची दृष्टी दिली.’
नाटक म्हणजे टीम वर्क! मग या टीममध्ये प्रत्येकाने एक होऊन काम करणं गरजेचं असतं. हा टीमवर्कचा फंडा कौमुदी वलोकर या दिग्दर्शक-अभिनेत्रीनं उलगडून सांगितला. ‘शाळा’ सिनेमामधली ‘आंबेकर’ म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकर. कौमुदीने दिग्दर्शन आणि लेखन केलेल्या ‘आजीवनी’ या नाटकाच्या अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘मी पुण्याच्या थिएट्रॉन ग्रुपकडून अनेक स्पर्धा केल्या; पण नंतर अधिकाधिक नवीन टीमसोबत काम करता यावं म्हणून आम्ही नवीन मुलं घेऊन टीम तयार केली. मुलं किंवा मुली अशी कोणतीच वर्गवारी त्यात नव्हती. ‘हे मुलाचं काम आहे’ असं न म्हणता पडेल ते काम प्रत्येक मुलगी करत होती, त्यामुळे मुलीदेखील बॅक स्टेजचं काम तितक्याच सक्षमपणे करू शकतात. शेवटी कोणताही ग्रुप प्रयोग करण्यासाठी एकत्र आलेला असतो, त्यामुळे मुलगा-मुलगी असा कोणताच भेद न ठेवता एक होऊन ‘आजीवनी’ नाटक केलं. अजून अनेक संकल्प रंगभूमीवर आणायचे आहेत. मी विविध माध्यमांमध्ये काम करत असले तरीही रंगभूमीवर जास्त रमते आणि म्हणूनच रंगभूमीवर काम करणं मला कधीच थांबवायचं नाहीये.

सुरुवातीला मुलगी म्युझिक ऑपरेट करायला बसली याचं लोकांना आश्चर्य वाटायचं. पण आता अनेक मुली रंगभूमीवर तांत्रिक गोष्टी हाताळत आहेत.
– सुखदा भावे-दाबके
(म्युझिक कंपोझर )