12 July 2020

News Flash

संस्कृताचे प्रयोग

शाळेत ‘स्कोअरिंग विषय’ बनून राहिलेल्या संस्कृतबद्दल शाळा- कॉलेजनंतरही आपुलकी वाटत असल्यानं आणि रंगमंचाची आवड असल्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुण प्रोफेशनल्सनी संस्कृत नाटक मंडळीची

| August 8, 2014 01:05 am

शाळेत ‘स्कोअरिंग विषय’ बनून राहिलेल्या संस्कृतबद्दल शाळा- कॉलेजनंतरही आपुलकी वाटत असल्यानं आणि रंगमंचाची आवड असल्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुण प्रोफेशनल्सनी संस्कृत नाटक मंडळीची एक मोट बांधली आहे. त्यांच्या या धडपडीविषयी आणि नाटय़प्रयोगांविषयी..
संस्कृत नाटकअसं म्हटलं की पुणेरी पगडी-भिकबाळी आणि नऊवारी साडी-बुगडी घालून वावरणारी पात्रं किंवा मग थेट पौराणिक कथानकांवर – रामायण-महाभारतावर आधारित नाटक सादर करणारे कलाकार आपल्या डोळ्यांसमोर येतील!! त्यातही संगीत नाटक
म्हटलं की, तरुणाईच्या डोळ्यासमोर वेगळं काही उभं राहण्याची शक्यता तशी कमीच! परंतु हा समज दूर करण्यासाठी तसंच संस्कृत भाषेतून तरुण पिढीचंही मनोरंजन होऊ शकतं हे ठसवण्यासाठी, साधं-सोप्पं संस्कृत नाटक रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न पुण्यातील ‘मनस्वी’ या हौशी नाटक मंडळीने केलाय. पौराणिक तसंच जुनी गाजलेली नाटकं सादर करणारी अनेक मंडळी ठिकठिकाणी आहेत. परंतु ‘संस्कृत’ भाषेत अगम्य-अवघड असं काही नाहीये हे लोकांना पटवण्यासाठी ‘मनस्वी’ने काम सुरू केलंय. पुणे विद्यापीठातून संस्कृत घेऊन एम.ए. झालेल्या रेणुका पंचपोर-शुक्ल आणि आनंद शुक्ल या तरुण जोडप्याच्या संस्कृतप्रेमातून ही कल्पना पुढे आली आणि मग निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या पण संस्कृतच्या आवडीपोटी एकत्र जमलेल्या १४ मित्रमत्रिणींनी मिळून ती प्रत्यक्षात साकार केली!
या ग्रुपमधलं कुणी जर्मन लँग्वेज स्पेशालिस्ट आहे, तर कुणी चार्टर्ड अकाऊंटंट, एक जॅपनीज लँग्वेज ट्रेनर आहे, एक िपट्रिंग क्षेत्राशी निगडित आहे, तर कुणी कार्यक्षेत्र सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आहे. पण सगळ्यांचा समान दुवा आहे, तो म्हणजे संस्कृतप्रेम आणि रंगभूमीविषयी आवड. २०१२ साली ‘कालाद्री’ या संस्कृत नाटकाच्या प्रयोगापासून ‘मनस्वी’चा प्रवास सुरू झाला व नंतर नवीन काहीतरी लिहून ते लोकांना पटवण्यापेक्षा, ‘मनस्वी’ने ‘शांतेचं कार्ट चालू आहे!’ या धमाल विनोदी मराठी नाटकाचं संस्कृत भाषांतर करून सादर करायचं ठरवलं.
मराठीतलं हे तुफान लोकप्रिय नाटक प्रेक्षकांनी संस्कृतमध्येही आपलंस केलं. फग्र्युसन कॉलेजच्या नाटय़स्पध्रेतला या नाटकाचा केलेला स्वागत प्रयोग, संस्कृत साहित्यातल्या नामांकित वाक्यार्थ सभेसाठीचा प्रयोग तसंच मुंबईतल्या महाराष्ट्र सेवा संघासाठीचा प्रयोग सगळेच गाजले. त्यामुळे संस्कृतमध्येही नाटक सहज एन्जॉय करता येतं हे अधिकाधिक लोकांना कळलं.. पटलं!!
‘खुद्द नाटकाच्या टीममध्येही काही जणांना फारसं संस्कृत येत नव्हतं, परंतु तालमीदरम्यान भाषेची गोडी वाढली, आकलन वाढलं आणि प्रयोगाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आत्मविश्वास आला,’ असं अर्चना सांगते. अधीशच्या मते, ‘सर्वच वयोगटातील लोकांना हे नाटक आवडलं, हा प्रतिसाद खूप बोलका आणि उत्साह वाढवणारा होता.’ संस्कृतमध्ये असूनही लोकांना नाटक सहज समजतं याचं श्रेय मात्र ‘मनस्वी’ने निर्वविादपणे अमोघ प्रभुदेसाई या भाषांतरकाराला दिलंय. संस्कृत भाषा ही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता, अन्य बोलीभाषांप्रमाणे सर्वाना कळावी, सर्वांपर्यंत पोचावी हा मनस्वीचा उद्देश आहे, असं ‘मनस्वी’ ग्रुपमधली रेणुका आवर्जून सांगते. ‘नाटक समजलं नाही तर तिकिटाचे पसे परत,’ असं सांगायला आनंद कचरत नाही.
प्रत्येकाच्या कामाच्या वेळा सांभाळून-रात्री जागून तालमी करून ‘मनस्वी’चं काम सुरू असायचं. सध्या मात्र ब्रेक घेऊन दोन- तीन नाटकांच्या स्क्रिप्ट्सवर काम चालू आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला साधं-सोप्पं संस्कृत नाटक पुन्हा पाहायला मिळेल!! शाळेत ‘स्कोअिरग विषय’ बनून राहिलेल्या संस्कृतबद्दल खरोखरची आपुलकी तरुणाईला वाटतोय, हेच ‘मनस्वी’शी जोडलेल्या कलाकारांकडे बघून वाटतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2014 1:05 am

Web Title: marathi drama translated in sanskrit language
Next Stories
1 मेक-अप टिप्स : डोळ्यांचे आकार आणि अनुरुप मेक-अप
2 ओपन अप : addict
3 खावे त्यांच्या देशा : चीझ वाईन अ‍ॅण्ड डाईन
Just Now!
X