भक्ती परब

संख्यावाचनाची नवीन पद्धत हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. समाजमाध्यमांवर तरुणाई कधी विनोदी तर कधी समतोल मतं मांडत असताना दिसते. एकंदरीतच मराठी भाषेविषयी ते काय विचार करत आहेत, याचंही प्रतिबिंब त्यातून उमटत आहे. मराठी भाषेतील बदल, भाषेचा घसरणारा दर्जा, दैनंदिन जीवनातील भाषेचा कमी होत जाणारा वापर हे सगळेच महत्त्वाचे मुद्दे असले तरी तरुणाई मात्र मराठीच्या वापराबाबत सकारात्मक आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त हिंदूी, इंग्रजी किंवा एखादी पर्यायी भाषा यायला हवी, अशी खूणगाठ बांधतानाच मराठीचा गोडवा त्यांच्या ओठांवर आणि आचरणातही दिसतो..

‘माझ्या नावातील जोडाक्षरं उच्चारायचा त्रास होणारी मंडळी माझं नाव यापुढे इंग्रजी पद्धतीप्रमाणे ‘रश’, ‘मी’ असे उच्चारू शकतात,’ अशी एकीने सोशल मीडियावर पोस्ट केली, तर त्यावर कमेंट म्हणून एकाने लिहिलं, ‘उगाच बुवा तुम्ही सगळ्याला नावं ठेवताय. ही खरं तर फारच जुनी पद्धत असावी. म्हणजे पूर्वी कोणी विचारलं, की अरे, किती दक्षिणा देऊ ? तर म्हटलं जायचं, दे वीस एक रुपये किंवा दे पन्नास एक रुपये. मग एकवीस, एक्कावन रुपये देण्याची पद्धत पडली.’ या कमेंटनंतर पुढे हसणारे इमोजी. एका मराठीतील पोस्टवर कमेंटसुद्धा मराठी भाषेतूनच येत होत्या. संख्यावाचनाच्या निमित्ताने झालेल्या चर्चानी सोशल मीडियाला एक नवा विषय मिळाला; पण यावर व्यक्त होताना प्रत्येक जण मराठी भाषेतूनच व्यक्त होत होता. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियातून व्यक्त होणारी तरुणाई अतिशय समर्पकपणे मराठी शब्दांचा वापर करते, हेही त्यातून दिसत होतं.

‘कमी टक्के पडले तरी टेन्शन घेऊ नका, तसेही अर्धे इंजिनीयर स्टँड अप कॉमेडी करत आहेत’, अशी हास्यटिपणी दहावी-बारावीच्या निकालानंतर सोशल मीडियावर फिरत होती. या ओळीने अनेकांना दिलासाही दिला, तसंच ते वाक्य इंग्रजी एक-दोन शब्दांचा वापर करून मराठीतून लिहिलेलं असल्यामुळे ते वाचलंही जात होतं. तशीच त्यात गंमतही होती. एरव्ही ‘डोन्ट टेक टेन्शन’ अशा आशयाचं बरंच फॉरवर्डेड साहित्य आपण इंग्रजीतून वाचतच असतो; पण त्यात मातृभाषेचा ठसका येतो तेव्हा त्याविषयी आपलेपणा वाटतो.

अजून असाच एक मेसेज समाजमाध्यमांवर फिरत होता. तो असा होता की.. ‘आपलं नाव आणि ओळख भलेही छोटी आहे; पण जेवढी आहे ना, तेवढी आपल्या जिवावर आहे.’ आता हे वाक्य वाचल्यावर कडक बाणा जाणवतो. एक प्रकारचा स्वॅग जाणवतो, हे टेचात सांगणं आहे हे पटतं. तसेच ते आपल्या भाषेतून असल्यामुळे ते आपलंसंही वाटलं. हे जर इंग्रजी भाषेतून असतं तर जास्त शेअर झालं नसतं, पण भाषिक टच आल्यामुळे ते जास्तीत जास्त शेअर झालं. अशी अनेक उदाहरणं देता येतील.

हे बघ भाऊ, असं बोलून पुढे संवादाला सुरुवात करणारी अलीकडे बरीच मंडळी भेटतात. तरुण मुलं एकमेकांना हाक मारताना ‘भावा’ वगैरे असे शब्द सर्रास वापरतात. तसंच काही जण नव्या मंडळींना भेटल्यावर दादा, ताई किंवा शिक्षिकांना बाई वगैरे म्हणणं पुन्हा नव्याने कॅ म्पसमध्ये रुळू लागलं आहे. ‘ए भावा.. आता आपलीच हवा, एकदम कडक, भाऊंचा विषय खोल आहे’, अशा अनेक प्रकारे भाषेचा गमतीशीर वापरही तरुणाईकडून सध्या होताना दिसतो.

आपली मातृभाषा आपल्यासाठी काय असते, याविषयी सांगताना एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. काहींना कदाचित ती माहिती असेल. एकदा सम्राट अकबराच्या महालात एक दूर देशीचा पाहुणा आला होता. त्याला अनेक भाषा अस्खलित येत होत्या. त्यामुळे त्याची मातृभाषा कुठली हे अकबराला कळेना. अकबराने त्याची खरी भाषा (मातृभाषा) कुठली हे ओळखण्याची जबाबदारी बिरबलावर टाकली. बिरबलाने त्याच्याशी संवाद साधला. त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवला तरी त्याला ओळखता येईना. शेवटचा उपाय म्हणून त्याने पाहुणा रात्री गाढ झोपेत असताना त्याच्यावर हल्ला करण्याचे नाटक केले. त्या वेळी तो जिवाच्या भयाने ‘या अल्ला’ असे ओरडला आणि चतुर बिरबलाने त्याची भाषा ओळखली.

सांगायचा मुद्दा हाच की, आपण आपल्या मातृभाषेखेरीज अन्य कुठल्याही भाषा शिकलो तरी आपल्या मनाशी नाळ जोडलेली मातृभाषा कायमच आपल्याबरोबर राहते; पण असे असले तरी आता आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विविध भाषिक गटांमुळे तसेच शिक्षण, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विविध भाषिक लोकांमध्ये मिसळत असल्यामुळे आपल्या भाषेवर त्याचा मोठय़ा प्रमाणात प्रभाव पडतो. त्यामुळे आपली मातृभाषा चांगल्या प्रकारे आत्मसात करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आता आवश्यकता भासू लागली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी भाषा सक्ती धोरण अशा विषयांवर तरुणाई कानाडोळा करत नाही. त्यांना या सगळ्या गोष्टी आपल्या भाषिक भविष्यासाठी चालल्या आहेत, याची जाण आहे. याचं प्रतिबिंब ट्विटर या समाजमाध्यमावर प्रामुख्याने दिसतं. या माध्यमाचा वापर करून मोठय़ा प्रमाणात तरुणाई मराठीच्या वापराबाबत आग्रही असते. विकिपीडियावरील डेटामध्ये मराठी भाषेत जास्तीत जास्त माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करणारीसुद्धा तरुणाई आहे.

मराठी भाषेच्या जोडीला आगरी, मालवणी, पश्चिम महाराष्ट्राकडची बोली, विदर्भातली बोली, मराठवाडय़ाकडची बोली अशा प्रादेशिक बोलींचाही मराठी प्रमाणभाषेत समर्पक वापर आजची तरुणाई उत्तम करते. त्यांना पूर्णत: त्या प्रादेशिक भाषेचं रूप भलेही कळत नसेल, पण त्या भाषेतील काही शब्द रोजच्या मराठी बोलण्यात ते सहज वापरतात. त्यात त्यांना गंमतही वाटते आणि आपलेपणाही वाटतो.

कित्येक मंडळी मराठी भाषेत समाजमाध्यमांवर आणि डिजिटल स्वरूपात मराठी लिहीत नाहीत; पण त्यांना अशा माध्यमांवर मराठी भाषेत मात्र वाचायला खूप आवडतं. उदाहरण म्हणून आपल्या फेसबुक वॉलचंच घ्या. आपल्या फेसबुक वॉलवर कित्येक पोस्ट असतात, पण  आपली नजर आपल्या भाषेतील पोस्टवर सर्वात आधी जाते. त्यानंतर  इतर भाषांकडे जाते. ऑनलाइन आशयनिर्मिती करणाऱ्या विविध माध्यमांत काम करणारी तरुणाईच आहे. त्यामुळे आपलं म्हणणं मनापासून मांडण्यासाठी आधी प्राधान्य मराठीला दिले जाते. त्यानंतर सर्व स्तरांतील वाचकाला कळावं, या हेतूने इंग्रजीत लिहिलं जातं.

संकेतस्थळं, ब्लॉग किंवा समाजमाध्यमांवर मराठी भाषेत व्यक्त होण्याचं प्रमाण गेल्या दोन-तीन वर्षांत खूप वाढलं आहे. इथून पुढेही ते वाढत जाणार आहे, कारण ये हृदयीचे ते हृदयी घातले.. असा सुखद अनुभव फक्त आपल्या भाषेतूनच येतो, हे तरुणाईला पक्कं ठाऊक आहे. रांगडेपण, नाजूकपण, भावनिकता, थेटपणा यातली नजाकत आपल्या भाषेतून व्यक्त होताना उठून दिसते. तसेच आपण किती कूल आहोत, आपल्या बोलण्यात किती स्व्ॉग आहे, काय थाट आहे, आपलीच भाषा कशी लय भारी आहे, अशा पद्धतीने इतर भाषिक मित्र-मैत्रिणींशी पंगा घेतानाही आजची तरुणाई भाषिक आनंद लुटत असते. त्यामुळेच की काय, भाषेबद्दल वाद घालण्यातही तरुणाईनेच पुढाकार घेतलेला दिसून येतो आहे. संख्यानामावरून झालेल्या चर्चेच्या निमित्ताने तरुणाईचं हे मातृभाषाप्रेमच अधोरेखित झालं आहे.

viva@expressindia.com